दरवर्षी ७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग जन जागृती दिन असतो. यानिमित्ताने स्वतः कॅन्सरवर यशस्वी मात करून इतरांना जगण्याची उमेद देणाऱ्या अलका भुजबळ यांची प्रेरक कथा…..
विविध दूरदर्शन मालिकांमधून अभिनय केलेल्या, स्वतः उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू असलेल्या, अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या आणि स्वतःच्या आरोग्याविषयी सदैव दक्ष राहणाऱ्या अलका भुजबळ स्वतःच्या अनुभवाविषयी बोलताना म्हणाल्या…
माझ्या मुलीच्या जागरूकतेमुळे माझ्या कर्करोगाचे निदान त्वरित होऊ शकले. योग्य निदान झाल्यामुळे योग्य शस्त्रक्रिया, उपचार होऊन मला जीवदान मिळाले.
“मुलीने व पतीने धीराने परिस्थिती हाताळली, मलाही धीर देत राहिले. माझ्या कर्करोग लढ्यात डॉ. रेखा डावर खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या. आदर्श डॉक्टरांच्या त्या मूर्तीमंत उदाहरण आहे.” असा आपल्या जीवनाचा पट अलका भुजबळ उलगडत होत्या.
अलका भुजबळ यांना चार वर्षापूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाचे अचानक निदान झाले, तेव्हा त्या नुकत्याच अमेरिकेहून परतलेल्या होत्या. या भयंकर परिस्थितीत न डगमगता त्यांनी धीराने तोंड दिले. त्यामुळे सर्व डॉक्टर प्रभावित झाले. त्यांचा हा लढा ‘रिलायन्स वेब चॅनल’ वर ४ फेब्रुवारी २०१८ या ‘जागतिक कर्करोग दिनी’ प्रसारित झाला. ‘माय मेडिकल मंत्रा’ या लोकप्रिय आरोग्य विषयक ‘वेब चॅनल’ वरही त्यांची प्रेरक मुलाखत प्रसारित झाली. स्वानुभवावर आधारित “कॉमा” या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे.“काॅमा विषयी थोडसं”
आपल्या आरोग्याविषयी आपण सतत जागरूक असलं पाहिजे, यासाठी आरोग्य संवादक अलका भुजबळ विविध माध्यमातून सतत जन जागृती करीत असतात. स्वतः त्या त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक राहिल्याने त्यांच्या कर्करोगाचे निदान त्वरित होऊन त्या कर्करोगावर यशस्वी मात करू शकल्या.
काही वर्षांपूर्वी त्यांना अचानकपणे गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. भुजबळ कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. परंतु आजारपणात मिळालेली कुटुंबाची, मित्रमैत्रिणींची साथ आणि डॉ. रेखा डावर यांच्या चमूने केलेले योग्य उपचार, यामुळे त्यांनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली.
इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत तर केमोथेरपी सुरू असताना त्यांनी पती, मुलगी आणि मित्र मैत्रिणींच्या आग्रहाखातर स्वानुभव लिहिण्यास सुरूवात केली. प्रेरणादायी स्वानुभवांचे ‘कॉमा‘ हे पुस्तक त्यांनी लिहिलं.
अलका भुजबळ यांनी आपल्या आत्मकथन ‘कॉमा’ तून कॅन्सरच्या आजारपणात येणाऱ्या अडचणी, समस्या, समाजाची बघण्याची मानसिकता, स्वविचार तसेच डॉक्टरांची उपचारादरम्यान अपेक्षा, डॉक्टरांवर विश्वास, नात्यांची जपणूक व मानसिक आधार यावर सविस्तर, सोप्या, सहज आणि ओघवत्या भाषेत लिखाण केले आहे.
मुंबईच्या डिंपल पब्लिकेशननं “कॉमा” पुस्तक प्रकाशित केले आहे. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. या पुस्तकास वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
“कॉमा” पुस्तकाची उपयुक्तता पाहून हे पुस्तक अन्य भारतीय भाषेत येण्यासाठी त्या प्रयत्न करत आहे.
माय मेडिकल मंत्रा वेब पोर्टल, आकाशवाणी, दूरदर्शन, अन्य वाहिन्यांवर त्यांच्या प्रेरक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.
अलका भुजबळ यांच्या जीवनावर ‘कॉमा’ या नावानेच प्रभावी माहिती पट निर्माण करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तो प्रकाशित झाला आहे. राज्यपाल महोदय हा १० मिनिटे कालावधीचा माहितीपट पाहून खूप प्रभावित झाले. हा माहितीपट व कॉमा पुस्तक ही हिंदीत असावे, अशी मौलिक सूचना त्यांनी केली आहे.
कॅन्सर आणि एकूणच आरोग्य विषयक जन जागृती साठी अलका भुजबळ या त्यांचे पती, माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “कॉमा : संवाद” उपक्रमात हिरीरीने सहभागी होत असतात. या उपक्रमात प्रथम ‘कॉमा’ माहितीपट दाखविला जातो. त्यानंतर अलका भुजबळ थोडक्यात स्वानुभव कथन करतात. त्यानंतर डॉक्टर मार्गदर्शन करतात. यानंतर प्रेक्षकांशी दिलखुलास संवाद साधला जातो. या संवादामुळे प्रेक्षकांच्या शंकांचे तत्काळ निरसन होते.
आतापर्यंत मुंबई प्रेस क्लब – मुंबई मराठी पत्रकार संघ, नवी मुंबई महानगरपालिका, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा विविध ठिकाणी त्यांचे हे कार्यक्रम झाले आहेत. मात्र कोरोना मुळे पुढे असे कार्यक्रम आयोजित होऊ शकले नाहीत. म्हणून त्या ऑनलाइन मार्गदर्शन करीत असतात.
आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक परिस्थिती उत्तम असल्याने आपण कर्करोगावर मात करू शकलो. पण सर्वांची परिस्थिती असू शकत नाही, त्यांचं काय ? या प्रश्नाने अलका भुजबळ अस्वस्थ झाल्या. त्यामुळे ३७ वर्षाच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीने मिळणारा वेळ कर्करोग ग्रस्त, त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी त्या देत आहेत. तसेच ‘न्यूजस्टोरीटुडे‘ या लोकप्रिय ‘वेबपोर्टल’ च्या ‘सहसंपादक’ म्हणुन कार्यरत आहेत. कर्करोगांसाठी स्वयंसेवी संस्था सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
निवृत्तीनंतर काय ? हा प्रश्न अनेकांना पडतो. अलका भुजबळांनी निवडलेल्या मार्गाने इतरांना मार्गदर्शन होईल, असा विश्वास वाटतो.
अलका भुजबळ यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
आपणास काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास, त्यांचा “कॉमा- संवाद उपक्रम” आयोजित करावयाचा असल्यास त्यांच्या 9869043300
या मोबाईल क्रमांकावर किंवा
alka.bhujbal1964@gmail.com या ईमेल वर आपण संपर्क साधू शकता.
– लेखन : रश्मी हेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
Always Proud of you Alka Tai. U are an inspiration for so many people. God bless you ❤️❤️
Tq dear