भावनांना शब्दबद्ध करताना
यातनांना मूर्तरूप देताना
पिळवटून निघणारं हृदय
आणि कोंडलेले उष्ण श्वास
आतला आर्त कल्लोळ
वाळवंटात पोळणारा
एखादाच पाण्याचा थेंब
तो ही सुकु पाहणारा
वेदनांना तसंच जपणारं
स्पंदनांना उगीच रोकणारं
हळवं हळवं मन
त्यात रेंगाळणारी एक धून
मनोमन घुमणारी साद
खोल उमटणारे पडसाद
कधी मंद मंद झंकार
कधी अंतर्गर्भ हुंकार
हुंकारांची एक लय
लयींतनं उमलणारं वलय
फुटलेल्या बांधाचा प्रलय
तुटके शब्द अपुरे, निशब्द
एक दिवस ….
शब्दांत अर्थांची गुंफण
प्रतिष्ठापिलेले पंचप्राण
अनंत अथांग आकाश
मन झेपावलेली भरारी
स्वछंद विहरण्यासाठी

– रचना : नयना निगळ्ये, अमेरिका
Excellent