Wednesday, January 15, 2025
Homeपर्यटनअंदमानची सफर : ९

अंदमानची सफर : ९

“राधानगर बीच”

विजयपूरम (पोर्ट ब्लेअर) हे अत्यंत गजबजीचे ठिकाण आहे. तेथून जेव्हा आम्ही ITT Majestic या फेरीने स्वराज द्वीप (हॅवलॉक) येथे उतरलो तेव्हा बाहेरचा नजारा अवर्णनीय होता. अत्यंत निळाशार आणि शांत समुद्र पाहायला मिळाला. आपण एका सुंदर बेटावर उतरल्याची जाणीव झाली. आपल्या हातातील बॅग ओढत बाहेर जाताना जागोजागी थांबून समुद्राला पार्श्वभूमीवर घेऊन आम्ही अनेक फोटो काढले. किनाऱ्यावरच्या नारळाच्या झाडातून चौफेर वाहत असलेला वाऱ्याचा गारवा अनुभवला. तिथून ‘राधानगर बीच’ कडे जाण्यासाठी निघालो.

‘राधानगर बीच’ हा आशियातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. पांढरीशुभ्र मऊशार वाळू ज्यावर निसर्गाने जणू रचलीय असे वाटावे, किती सुंदर शंख- शिंपल्यांची नक्षी मनमोहक दिसत होती. विस्मयकारक सौंदर्यामुळे हे पर्यटन स्थळ पर्यटकांना मोहित करते आणि जगातील सातवा सर्वात सुंदर समुद्रकिनारा म्हणून देखील त्याचे नाव आहे. म्हणूनच कदाचित राधानगर बीचला ‘बीच नंबर ७’ म्हणूनही ओळखले जाते. ते अंदमानमधील हॅवलॉक बेटावरील राधानगर गावात आहे. समुद्रकिनारा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. राधानगर बीच हा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पाहण्यासाठी पर्यटक पोहोचतात परंतु सूर्यास्तानंतर समुद्रकिनाऱ्यावर थांबण्याची परवानगी नाही.

येथे स्फटिकासारख्या स्वच्छ निळ्या पाण्यात पोहण्याचा आनंद अनेक पर्यटक घेताना दिसले मग काय आम्हीसुद्धा कधी त्या पाण्यात कधी उतरलो कळलेपण नाही. पर्यटकांच्या सोयीसाठी येथे नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेली टुमदार विश्रामस्थळे आहेत. शॉवर रूम आणि बीच बेडची सुविधा उपलब्ध आहे. आम्हाला या टूरमध्ये कॉम्प्लिमेंटरी फोटोग्राफी मिळाली, ती याच बीचवर त्यामुळे तिथल्या प्रोफेशनल फोटोग्राफरनी आमचे असंख्य फोटो काढून दिले. आपण फोटो काढतो आणि प्रोफेशनल फोटोग्राफर फोटो काढतो त्यात नेमका काय बदल असतो हे फोटो पाहताना आज लक्षात येत आहे.
संध्याकाळी पाचच्या सुमारास येथे सूर्यास्त होतो त्यानंतर मात्र नंतर येथे पोहण्याची परवानगी नाही.

या स्वच्छ, शांत समुद्रकिनाऱ्यावर अनेक लहान मुले वाळूत खेळताना दिसली. संध्याकाळच्या वेळेस थोडे ढग भरून आल्यामुळे सूर्यास्त होताना जाणवला. आकाशात विविध रंगांच्या रंगछटाही दिसल्या परंतु सूर्याचे दर्शन काही झाले नाही. परंतु त्या दिवसाचे वैशिष्ट्य असे की गुबगुबीत ढगांचे पुंजके जणू समुद्राच्या पाण्यावर तरंगताहेत असे दृश्य पाहायला मिळाले, ज्याला भेदून सूर्याचे काही किरण पाण्यात उतरत होते.

पोहून दमून आल्यावर भूक लागतेच असे म्हणावे की खाण्याचे पदार्थ पाहून भूक चाळवते ? कोणत्याही समुद्र किनाऱ्यालगत ‘भेळ खाणे’, हे जणू समीकरणात झालेले आहे. पुढे आठ दिवसाचा प्रवास करायचा होता म्हणून आम्ही भेळ खाणे टाळले परंतु नारळ पाण्याचा मात्र आस्वाद घेतला. भेळपुरी स्टॉल्ससोबत तरुणांना आवडेल असे पावभाजी, मॅगी, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन जेवणाचे असंख्य स्टॉल्सही येथे आहेत. कपडे, दागिने व भेट देण्यास योग्य अशा अनेक वस्तूंचे स्टॉल्सही इथे आहेत. सूर्यास्तानंतर सर्वच पर्यटक या स्टॉल्सवर रेंगाळतांना दिसले, त्याला आम्हीसुद्धा अपवाद नव्हतो !
क्रमशः

— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. इतके सुंदर वर्णन वाचून कधी राधानगर बीचवर जातो आहे असे वाटते फोटोग्राफी तर खूपच सुंदर

    • मनापासून धन्यवाद! प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात अंदमानला जायलाच पाहिजे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय