खरंच, अरण्यऋषी हे नाव सर्वार्थाने साजरे करणारे, प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ञ, वन्यजीव अभ्यासक, मारुती चित्तमपल्ली यांची काल, दिनांक १८ जून २०२५ रोजी प्राणज्योत मालवली.
ऋषी ज्याप्रमाणे सर्वज्ञ असतात तसेच, मारुती चितमपल्ली हे सर्वार्थाने ज्ञानी होते. सोलापुरातील टी.एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोइमतूर आणि बंगळुरू, दिल्ली कान्हा राष्ट्रीय उद्यान डेहराडून येथील वने व वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षेसेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. ‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’, ‘नवेगाव राष्ट्रीय उद्यान’, ‘नागझिरा अभयारण्य’ आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान होते.

वनविभागात ऋषींच्या तपसाधनेसारखी मनापासून सेवा करून प्राणी, पक्षी, पशु, झाडे याबद्दल सर्वार्थाने माहिती गोळा केली. त्यांनी २५ पुस्तके लिहिली. ही पुस्तके वाचताना जणू काही आपण त्या प्राण्यांना, पक्ष्यांना वनामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहत आहोत असे वाटते. ते स्वतः तेलगू भाषिक असले तरी त्यांना अनेक भाषा येत होत्या.
उदाहरणार्थ तेलुगु, मराठी, गुजराती, जर्मन, रशियन इत्यादी. उर्दू मिश्रित हिंदी त्यांना गुजराती मुसलमान समाजात राहिल्यामुळे अवगत होती. वयाच्या ८० व्या वर्षी संस्कृत पंडित तर ते नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत रीतसर शिक्षण घेऊन झाले होते.
३० एप्रिल २०२५ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांना, आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. मारुती चितमपल्ली यांनी आपणा सर्वांनाच वनाची भाषा शिकविली, पशुपक्षी यांच्याकडे संवेदनशीलतेने पाहायला शिकवले एवढेच नव्हे तर, त्यांच्या विश्वाची नवीन जाणीव आपल्याला करून दिली. अरण्यांचे संरक्षण करण्याची, पशुपक्ष्यांप्रती प्रेमसंवेदनांची जाण त्यांच्यामुळेच आपल्यात निर्माण झाली.
असा हा अफाट कीर्तीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध पक्षी प्रेमी दिगंतरात उडून गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— लेखन : श्रद्धा जोशी. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800