Sunday, June 22, 2025
Homeलेखआम्ही नगरकर

आम्ही नगरकर

आम्ही नगरकर, नगरचे खूप अभिमानी आहोत. म्हणून सरकारने अहमदनगरचे रीतसर अहिल्यानगर करण्याच्या किती तरी वर्षे आधीपासूनच आम्ही अहमदनगर ला फक्त नगर म्हणत आलोय. तर अशा या नगर विषयी लिहिताहेत जेष्ठ लेखक श्री सदानंद भणगे.

अल्प परिचय :
सदानंद जगन्नाथ भणगे यांचा जन्म नगर जिल्ह्यातील कर्जत येथे १० मार्च १९५४ रोजी झाला. नगर येथील सोसायटी हायस्कुल मध्ये शिकत असताना आठवी पासूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. पुढे नगर कॉलेजला असताना कविता, एकांकिका लेखन, राज्य नाट्यस्पर्धेसाठी नाट्यलेखनाला सुरुवात, केली. इंग्रजी विषयात एम ए करीत असतानाच त्यांची स्टेट बँकेत निवड झाली. बँकेत असताना त्यांच्या कथा, कादंबरी लेखन, नंतर पुस्तके प्रकाशित होऊ लागली. विविध साहित्य प्रकारातील त्यांची २९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंकांमध्ये ते सातत्याने लिहित असतात. काही नाटकांमध्ये, दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक

प्रचंड वेगाने बदलत चाललेल्या परिस्थितीत गावांचे इतिहास, वैशिष्ठे आम्ही विसरायला लागलो आहोत. नगर शहर आणि जिल्ह्यात अशा अभिमानास्पद घटना, गोष्टी, ठिकाणे खूप आहेत. थोर विचारवंत, संत, राजकारणी प्रभूतीना ग्रंथ लेखनाची प्रेरणा नगरच्या मातीतच मिळालेली आहे.आम्हा नगरकरांना त्याचा अभिमान आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती नेवाश्याला, मानवी पिढ्यांना चिरंतर मार्गदर्शन करणार पसायदान इथेच लिहिले गेले. ज्या दगडी खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो पैस खांब आजही नेवाश्याच्या मंदिरात आहे. तीन वर्ष नगरच्या किल्यात बंदिवान असताना आत्मचिंतनातून पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया इथेच लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकृती अस्वस्थ्या मुळे नगर मुक्कमी विश्रांती साठी नगरला थांबले होते. नगरच्या थोर स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब पटवर्धन ह्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या सावेडी मधील भिस्तबागेतल्या बंगल्यात केली होती. इथेच डॉ.आंबेडकरांनी ‘थॉटस ऑफ पाकिस्तान’ हा ग्रंथ लिहिला. मौलाना आझाद ह्यांनी ‘गुबारे खातीर’ हा ग्रंथही याच शहरात लिहिला गेलेला आहे. दासगणू महाराजांनी गजानन महाराज आणि साईबाबा ह्यांची चरित्रे लिहिली. बालकवी ठोंबरे, रे. नारायण वामन टिळक अशी अनेक नामवंत साहित्यिक कवींना नगर मध्येच साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळाली आहे.

नगर शहरात कोर्ट गल्लीत आजही रावसाहेब पटवर्धन ह्यांचा वाडा दिमाखात उभा आहे. थोर शिक्षणतज्ञ ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक राजकीय चर्चेसाठी नेहमी या वाडयात येत असत. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी रावसाहेब आणि अच्युतरावांच्या काळात याच पटवर्धन वाड्यात जे. कृष्णमुर्ती, मौलाना आझाद, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, पंडित मदन मोहन मालवीय, न्यायमूर्ती रानडे अशा दिग्गज विभूतींची वर्दळ असे.या थोरांच्या पदस्पर्शामुळे नगरची ही वास्तू पावन झालेली आहे. संत ज्ञानेश्वर, माणूस, भरत मिलाप, माया बाजार, बलराम श्रीकृष्ण अशा ऐतिहासिक, पौराणिक सामजिक चित्रपटातून काम करणारे, देखणे अभिनेते शाहू मोडक नगरचेच. त्यांचे ज्ञानेश्वर, श्रीकृष्ण रुपातले फोटो, कैलेंडर्स लोक तसबीर, फ्रेम करून भिंतींवर लावत. जसं विष्णुपंत पागनीस म्हणजे तुकाराम तसच श्रीकृष्ण म्हणजे शाहू मोडक होते. ते १९१८ ते १९३१ पर्यंत नगरला रहात. आजही त्यांचा बंगला चितळे रोड वर आहे. त्यांच्या नावाने नगर मध्ये दरवर्षी एकांकिका स्पर्धा ही घेतल्या जातात.

जी अमर भूपाळी ऐकली की ऐकताना पहाट झाल्या सारखं वाटत ती देणारे पंडितराव नगरकर याच मातीतले. आपल्या संगीतामुळे राष्ट्रीय ख्याती मिळालेले सी.रामचंद्र म्हणजेच रामचंद्र चितळकर ह्यांनी नगरचे नावं मोठे केले. आपल्या संसदपटुत्वाने, निर्मळ चारित्र्याने आणि विनोद बुद्धीने एक काळ गाजवणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री कै प्रा.मधु दंडवते मूळचे नगरचे आणि दलित साहित्यातील मोठे प्रस्थ बलुतकार पद्मश्री कै दया उर्फ दगडू मारुती पवार हेही इथलेच.. सरदार मिरीकर, बाळासाहेब भारदे, कवी दत्त, वि.द घाटे, ग. ल ठोकळ, पद्माकर डावरे, नवल भाऊ फिरोदिया, मोतीभाऊ फिरोदिया, र.बा.केळकर. अशी बरीचशी नावं हळू हळू विस्मरणात जायला लागली आहेत किंवा ती नगरची आहेत हे आम्ही विसरायला लागलो आहोत.

एकेकाळी महाराष्ट्रात अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची गणली गेलेली जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती मिळवणारे अ. ए. सोसायटी हायस्कूल मधील शंकर देवराव क्षीरसागर, डॉ.पांडुरंग दामोदर गुणे आणि पांडुरंग महादेव बापट म्हणजे सेनापती बापट हे नगरचे भूषण आहेत. नव्या पेठे मध्ये गोरे वकिलांचा वाडा खूप प्रसिद्ध होता. १९२५/३० साला पासून पुढे अनेक वर्ष अण्णासाहेब गोरे वकील दररोज दोन्ही वेळेला जेवण्याच्या वेळी एक दोन गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या बरोबर जेवायला बसवत, ते जे खात तेच विद्यार्थ्यांना दिले जायचे. अनेक जण माधुकरी मागायला किंवा वाराने जेवायला गोरे वाडयात जात. सहस्त्रभोजनाचे पुण्य मला मिळालं असं गोरे वकील म्हणत. त्यांच्या नंतरच्या पिढीने वाड्यातला आड भीषण दुष्काळाच्या वेळी खुला केला होता. मालक स्वतः रात्री अपरात्री वाड्याचे दार उघडून महिलांना पाणी भरण्याची परवानगी देत असत. कला शिक्षक अं ज घारे सरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता, सूर्योदयाचे चित्र काढण्यासाठी ते विद्यार्थ्यांना घेऊन भल्या पहाटे भिंगार टेकडीवर घेऊन जात. राष्ट्रपती पुरस्काराच्या रकमेत स्वतःची भर टाकून त्यांनी शाळेला चित्रकला हॉल बांधण्यासाठी देणगी दिली होती, असे शिक्षक होते.

लष्करासाठीही नगरने थोर सुपुत्र दिले आहेत. ब्रिटीश कालखंडात सुभेदार नामदेवराव जाधव यांना व्हिक्टोरिया क्रॉस हा परमवीर चक्राच्या जोडीचा पुरस्कार मिळाला होता. जमादार सखाराम शिंदे यांनी इंडियन ओर्डर ऑफ मेरिट हे पदक मिळवले होते. आष्टीच्या मच्छिंद्र कडू ह्यांना वीर चक्र मिळाले होते. नगरच्या फ्लाईट लेफ्टनंट गोपालकृष्ण गरुड आणि कॅप्टन श्रीकांत धर्माधिकारी यांना पाकिस्तान बरोबरच्या युद्धात बहादुरी बद्दल वीरचक्र देण्यात आले. नाईक एकनाथ कर्डिले हे एकाहत्तर च्या पाक युद्धाच्या वेळी शोर्य दाखवून धारातीर्थी पडले. त्यांना मरणोत्तर वीरचक्र मिळाले. गोपीनाथ भिंगारदिवे वीरचक्र, दशरथ जांभे ना शौर्यचक्र तर बांगला युद्धाच्या वेळी कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी धारातीर्थी पडले त्यांना वीरचक्र मिळाले होते. ही नावे पाहूनच नगर विषयी अभिमान वाटतो.

नगर मधील एम आय आर सी, ए सी सेंटर ही ठिकाणे पाहिली की लष्करी दृष्ट्या नगर किती महत्वाचे होते आणि आहे हे समजते. विविध पदांवर भरीव कामगिरी करणारे जनरल अरुणकुमार वैद्य आणि जनरल के सुंदरजी हेही काही काळ आर्मड कोअर सेंटर एन्ड स्कूल या आस्थापनेत होते. मी बँकेत नोकरीला असताना निवृत्त जवानांना बचतीची माहिती देण्यासाठी एम आय आर सी आणि ए सी सेंटर या स्थापनेत जात असे, तेव्हा तेथील गंभीर वातावरण, शिस्त आणि शूर वीरांची छायाचित्रे पाहून अभिमानाने उर भरून येत असे. अशी ठिकाणे तरुणांनी पाहिली तर नक्कीच त्यांना लष्करात भरती होऊन शौर्य गाजवावेसे वाटेल.

भारतात एकमेव असणारे रणगाडा संग्रहालय सुद्धा नगर येथे एम आय आर सी परिसरात आहे. लष्करी प्रशासनाच्या नियंत्रणा खाली असणारे दुसरे केंद्र म्हणजे व्ही.आर.डी ई. (वाहन संशोधन आणि विकास अस्थापना) हे नगरच भूषण आहे.या केंद्राच्या विविध १४ ट्रयाक (मार्गावर) च्या खडतर कसोटीत जर वाहन यशस्वी झाले तरच त्याला परवाना मिळतो. संपूर्ण जगात अशा प्रकारचे दहाच मार्ग असून आशिया खंडात टोकियो (जपान) आणि नगर (भारत) या ठिकाणीच हे मार्ग आहेत. यात वेगवान मार्ग, खड्डेयुक्त मार्ग, पन्हाळी, उथळ पाण्याचा, चिखलाचा, वाळूचा, चढउतार असे अनेक मार्गावरून नव्या वाहानांची चाचणी होते.

स्वातंत्र्य लढ्यात कै जानकीबाई आपटे, त्यांच्या कन्या माणिकताई आणि कलाताई यांच्या बरोबर माया कडुस्कर, जानकीबाई कवडे, शांताबाई तांदूळवाडकर अशा अनेक स्त्रियांनी तुरुंगवास भोगला आहे. जानकीबाई आपटे यांनी १९३३ साली हरिजन वस्तीतील स्त्रिया व मुलामुलीना स्वच्छतेचे धडे द्यायला सुरुवात केली. मागासलेल्या जातीतील मुलीना प्राथमिक शिक्षण मिळावे, त्यांची राहण्या, खाण्याची मोफत व्यवस्था व्हावी या उद्देशाने बालिकाश्रम संस्थेची स्थापना केली.

नगरच्या मातीत अनेक संत, फकीर निर्माण झाले. अगदी निजानंद भैरवी, शहा शरीफ पासून मेहेरबाबा, संत दासगणू, आचार्य आनंदऋषि, रामकृष्ण क्षीरसागर महाराजांपर्यंत अनेक संत महंत होऊन गेले. मेहेराबाद येथे मेहेरबाबा यांची समाधी आहे. दरवर्षी अनेक देशी, परदेशी भक्तगण येथे जमा होतात. तर आनंदऋषिजींच्या मार्गदर्शना खाली कार्यरत असलेले श्री तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड शहराचे भूषण झाले आहे. क्षीरसागर महाराजांच्या इच्छे प्रमाणे उभे राहिलेले दत्त मंदिर नितांत सुंदर आणि स्थापत्य कलेचा नमुना आहे. अनेक भक्तगण येथे कायम येत असतात.

सुमारे शंभर वर्षा पूर्वी नगरचे सामाजिक जीवन घडवण्यासाठी ज्यांचा मोठा वाटा आहे ते बाळासाहेब देशपांडे वकील, ज्यांनी मृत्युपत्राद्वारे गरीब स्त्रियांच्या बाळंतपणासाठी त्यांचा एक वाडा आणि डॉक्टर, नर्सेस यांच्या उपचारा साठीही सोय केली. नगरच्या म्युनिसिपालिटी ने त्यांच्या इत्छे नुसार बाळासाहेब देशपांडे प्रसूती ग्रह, दवाखाना, सेवा सदन, होमक्लासेस अशा संस्थांची स्थापना केली. बाळासाहेब देशपांडे सुतीकाग्रह आजही आशा टॉकीज समोर कार्यरत आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. अशा सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींनी नगरच नावं मोठ केलं आहे.

नगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद निजाम शहा याचा मुलगा बुऱ्हाण निजाम शहा याच्या कारकिर्दीत जगातील सर्वात मोठी तोफ नगर येथे बनवली गेली ती ज्याने ओतली तो चुल्बी रमीखान तुर्कस्थान मधून बुऱ्हाण ची कीर्ती ऐकून नगरला आला होता, सिंहाकृती तोंड असणारी ५५ टन असलेली ही तोफ १४ फुट बाय चार इच आहे. या तोफेला ठोका मारला तर घंटे सारखा आवाज येतो. मलिक इ मैदान म्हणजेच मुलुख मैदान नावं असलेली ही प्रचंड तोफ नगरचे वैशिठ्य असली ती आता विजापूरच्या किल्ल्याच्या बुरुजावर उभी आहे. ही तोफ बुरुजावर चढवण्यासाठी दहा हत्ती चारशे बैल व असंख्य माणसे लागली अशी नोंद आहे. केवळ तिच्या अवाढव्यतेमुळेच इंग्रजांना ती इंग्लंड ला नेता आली नाही.

नगर जामखेड रस्त्यावर पाच सहा किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध अशी निजामशाही काळातली हत्तीबारव ही प्रचड मोठी विहीर असून ती स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना आहे. सुमारे दीडशे फुट लांब आणि दोनशे फुट रुंद अशी ही बारव असून चारही दिशांना पायऱ्या आहेत. आतील आकार शंकू सारखा असून आत निमुळते होत गेलेले कुंड आहे. बारवेच्या प्रत्येक दिशेला एक फुट उंचीच्या घडीव काळ्याभोर दगडाच्या चाळीसएक पायऱ्या आहेत. पाण्याच्या दाबामुळे भिंतीना तडे जाऊ नयेत म्हणून मध्ये उभे दगड लावलेले आहेत. दोन्ही बाजूना भिंतीमध्ये दगडी गोलाकार कोनाडे आहेत. मोटेच्या दगडी चौथऱ्या खाली सहा मजले संपूर्ण दगडी बांधकाम आहे. मोटेच्या उंचवट्याचा उतार ही दगडी बांधकामाचा आहे. त्या खाली कमानी मध्ये आतल्या बाजूस कोनाडे आहेत. आजही ही बारव सुस्थितीत असून प्रेक्षणीय आहे.

नगर शहराच्या संस्थापक असणाऱ्या अहमद निजामशाह ची कबर बागरोजा इथे आहे. त्याच्या शेजारी तालीकोट च्या लढाईतील विजयाची आठवण करून देणाऱ्या गुलामअली हत्तीची कबर आहे. ई.स.१५६५ मध्ये झालेल्या तालीकोटच्या लढाईत निजामशाह चा पराभव होत असताना गुलाम अली नावाच्या हत्तीने विजयनगरच्या रामराजाला सोंडेत पकडून त्याची दोन शकले केली. तालीकोटीच्या लढाईतील या विजयाची आठवण म्हणून गुलामअली मेल्या नंतर बाद्शाने त्याची देखणी कबर बांधली. त्याच्या शेजारी त्याच्या माहुताचीही कबर आहे.

रेसिडेन्शियल हायस्कूल समोरील हुतात्मा स्मारका जवळ कोल्हापूरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि पूर्णाकृती पुतळा आहे. ब्रिटीश राजवटीत १८८१ मध्ये महाराजांना बंदिवान म्हणून नगरच्या भुईकोट किल्यात ठेवले होते. याच आवारात नगर मधील स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरलेला स्तंभ उभारण्यात आला आहे.

पूर्वी नगर मध्ये भक्कम तट आणि दहा वेशी होत्या. आता माळीवाडा वेस आणि दिल्ली गेट ह्या दोनच वेशी शिल्लक आहेत. झेंडीगेट, बंगाल गेट, फर्गुसन गेट, नेप्ती वेस, नालेगाव वेस सर्जेपुरा वेस तोफखाना वेस, मंगळवार दरवाजा, किंग गेट फक्त नावानी उरली आहेत. शहाजहान बादशहाचा सरदार सर्जेखान ह्याने ह्या वेशी बांधल्या होत्या.

मोठमोठ्या शहरातून आता गगनचुंबी टॉवर्स उभे रहात आहेत, अपार्टमेंट्स मागे पडायला लागले, पण पूर्वी फ्लॅट पद्धती पण अस्तित्त्वात नव्हती. नगरला आणि इतर गावांत ही गल्ल्या गल्ल्या मधून एक दोन मजली दगडीवाडेच होते, नंतर गावाबाहेर टुमदार बंगले उभे राहिले. पण सुमारे शंभर वर्षापूर्वी नगरच्या काही नागरिकांनी एकत्र येऊन शेअर भांडवल गोळा करून अपार्टमेंट बांधलं. तिचं ती इमारत कंपनी. महाराष्ट्रातील पहिलेच आणि एकमेव उदाहरण आहे, कारण खाजगी मालकीच्या अनेक इमारती उभ्या रहात आहेत पण नागरिकांनी एकत्र येऊन बांधलेले अपार्टमेंट नाही. कापड बाजारातील कोहिनूर क्लॉथ स्टोअर च्या मागच्या बाजूस हे समोरासमोर उभ्या असलेल्या इमारती आहेत. ई.स.१८९० च्या सुमारास राजमल मुथा, बापू सोहोनी, धोंडो तांबोळी, पांडुरंग शहाणे अशा दहा व्यक्तींनी एकत्र येऊन शेअर भांडवल गोळा करून इमारत कंपनी संस्थेची स्थापना केली. पेंटा इंजिनियर ह्यांनी नकाशा तयार केला. एकूण अठ्ठेचाळीस ब्लॉक्स बांधले. पाण्यासाठी ४३ फुट उंचीवर मोठी टाकी बांधली. आजही इमारत कंपनी मोठ्या दिमाखात उभी आहे आणि विशेष म्हणजे इथेच पोस्ट ऑफिसच्या इमारती समोर लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, तेथे उभे राहूनच टिळकांनी त्यांची सुप्रसिद्ध घोषणा ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ केली होती. ह्या दृष्टीने नगरला खूप महत्व आहे.

अमेरिकेत एक सायकल सर्विस आहे. त्या कंपनीच्या सायकली मोबाईल ऍप द्वारे तुम्हाला रस्त्यावर मिळू शकतात. तुम्हाला हवे तिथे गेल्यावर फुटपाथवर तिथेच ती ठेवायची, मोबाईलनेच पेमेंट केले की ती लॉक होते. पन्नास साठ वर्षापूर्वी नगरात अशीच एक सर्व्हिस होती, अर्थात तेव्हा मोबाईलचा शोध लागला नव्हता. माणिक चौकातल्या सिटी पोलीस स्टेशन समोर येलूलकर यांचे सायकल दुकान होते. रेल्वे स्टेशन ला पायी जाणे लांब व कष्टाचे होते.एकट्या साठी टांगा परवडत नसे. येलूलकर एक आणा, म्हणजे सहा नये पैसे घेत, सायकल माणिक चौकातून घ्यायची आणि रेल्वे स्टेशनला त्यांचेच जे दुसरे दुकान असे तिथे जमा करायची. स्टेशन वरून गावात येणारेही तसेच करीत. दुसरे एक दुकानदार नगर भिंगार पण अशी सेवा देत. अनेक वर्ष अशी सेवा विश्वासावर चालली होती. आता घरा समोरून गाड्या चोरीला जातात. अशी सेवा कोण देणार ?

एखादी नाटक कंपनी नगरला आली की कलावंत धाव घेत गुंडू साडी च्या दुकानात. हातमागावरील सुती साड्या सबंध महाराष्ट्रात प्रसिध्द होत्या. चार पाच खोल्यांच्या जुन्या वाड्यातल्या या दुकानात अनेक प्रसिद्ध कलावंत मांडी घालून बसलेले दिसत. त्यांचे फोटोही दर्शनी भागांत लावलेले होते. हीच कलावंत मंडळी परत जातांना बन्सीमहाराज मिठाईवाल्याकडून खास गुलाबजाम घेऊन जात. नगरचा खवा पंचक्रोशीत प्रसिद्ध होता आणि अजूनही आहे. लग्नसराई आली की कोहिनूर, सारडा ह्यांच्या कापड दुकानात मुंगी शिरायला जागा नसायची एवढी गर्दी होत असे. कोहिनूर क्लॉथ स्टोअर्स मध्ये तर किराणा हप्त्याने घेतात तसं कापड हप्त्याने मिळत असे. ग्राहक कापड घेऊन दरमहा रक्कम फेडत असत. अनेक ग्राहकांची खातीच त्यांच्या दुकानात होती. अंबाडीच्या वाखा पासून कलात्मक वस्तू तयार करणारे ‘सीसल हैन्डीक्राफ्ट सेंटर’ देशातल्या आणि परदेशातल्या ग्राहकांचे आवडते आहे.

पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या वेश्या, देवदासी आणि त्यांच्या उपेक्षित संततीच्या सर्वांगीण पुनर्वसनाचे काम करणारी डॉ.गिरीश कुलकणी ह्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन उभी केलेली स्नेहालय संस्था १९८९ पासून इथे काम करीत आहे. आज या संस्थेचे कार्य देश विदेशात पोहोचले आहे. तर मनगाव येथील ‘माऊली’ ही संस्था निराधार, वृद्ध, आजारी लोकांना मायेने सांभाळते. डॉ राजेंद्र धामणे आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा धमाणे घरातल्या व्यक्तींप्रमाणे ह्या लोकांना सांभाळतात, खर तर ह्या दोन्ही संस्था बद्दल विशेष लेखच होतील एवढे त्यांचे कार्य मोठे आहे.

नाम स्मरणात गुंग असणाऱ्या वारकऱ्यांच्या गळयामध्ये जे टाळ असतात ते आणि झांजा या महाराष्ट्रात फक्त नगर येथेच तयार होतात. नगर मधील पांचाळ व तांबट समाजाने हा वडिलोपार्जित व्यवसाय जतन केला, वाढवला आहे. हे टाळ तांबे आणि कथील या धातूंचा रस साच्यात ओतून केले जातात. काही लोकांना घडीव थोक्याचे बटाल लागतात तर काहीना साधे नाद असणारे टाळ लागतात. ते बनवण ही पण एक कला आहे.

जसं जसं आठवत जावं तसतश्या खूप गोष्टी नगर मध्ये आहेत, ज्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. आमचं बालपण आमच्या आठवणी त्याच्याशी बांधल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच परगावी वा परदेशात गेलेली व्यक्ती एखाद्या संध्याकाळी नगरच्या आठवणीत जाते तेव्हा व्याकूळ होऊन जाते……

सदानंद भणगे.

— लेखन : सदानंद भणगे. नगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?