Tuesday, August 5, 2025
Homeसाहित्यआलोक : २ पुस्तकं; २ प्रस्तावना

आलोक : २ पुस्तकं; २ प्रस्तावना

माध्यमकर्मी आणि सध्या शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ आलोक जत्राटकर यांच्या “ब्लॅक, व्हाईट अन ग्रे” तसेच “समाज आणि माध्यमं” या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच कोल्हापूर येथे झाले. आलोक यांनी अतिशय अगत्याने दोन्ही पुस्तके मला पाठवलीत. दोन्ही पुस्तके पाहता क्षणीच मला ती खूप आवडली. पुस्तकांची शीर्षके, मुखपृष्ठ, ले आऊट, डिझाइन, व्यक्त केलेले विचार, अनुभव सर्वच काही सरस आहे. मजकुराचा टाईप साईज मोठा असल्याने पुस्तक वाचण्यास सुलभ होते.

ही दोन्हीही पुस्तके केवळ माध्यमातील व्यक्ती आणि माध्यमांमध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठीच उपयुक्त नसून ती सर्व सामान्य वाचकांच्याही दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहेत. दोन्ही पुस्तकांना लाभलेल्या प्रस्तावना या अतिशय अभ्यासपूर्ण, विवेचनात्मक अशा आहेत.

“ब्लॅक, व्हाईट अन ग्रे” या पुस्तकाला प्रा रणधीर शिंदे यांची तर “समाज आणि माध्यमं” या पुस्तकाला डॉ राजन गवस यांची प्रस्तावना लाभली आहे. या दोन्ही प्रस्तावना पुढे देत आहे.

तुम्हा आम्हाला विचार करायला भाग पाडणारी ही पुस्तके लिहिल्याबद्दल डॉ आलोक जत्राटकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

डॉ आलोक जत्राटकर

“ब्लॅक, व्हाईट अन ग्रे”: प्रस्तावना……

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या या लेखसंग्रहाविषयी काही आरंभीचे शब्द. डॉ. आलोक जत्राटकर हे शिवाजी विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. जत्राटकर विद्यापीठात रूजू झाल्यानंतर दहा-एक वर्षांपूर्वी त्यांच्याशी माझा परिचय झाला. प्रथमदर्शनी वैयक्तिक संदर्भात आरंभीच्या काही महिन्यांत मला त्यांचा वावर काहीसा शिष्ट वाटला, ते त्यांच्या बाह्यरूपामुळे. वेशभूषा, केशभूषा आणि त्यांचा वावर नागरी वळणाचा असल्यामुळे. त्यानंतर विद्यापीठातील विविध कार्यक्रम आणि काही कामानिमित्त आमच्या भेटी होऊ लागल्या. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, स्वभावाचे आणि कार्यपद्धतीचे काहीएक जवळून दर्शन झाले. कामाच्या बाबतीत नेहमी कर्तव्यदक्ष, कल्पक दृष्टी आणि कामावरील अतोनात निष्ठा हे त्यांचे वैशिष्ट्य. लेखन, तंत्रज्ञानामधील पारंगतता आणि लोकाभिमुखता ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये! व्यक्तिगत आवड तसेच सामाजिक आवडीसाठी तंत्रज्ञानाचा किती चांगला उपयोग करता येऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. जत्राटकर. या आवडीपोटीच त्यांनी स्वतःचे ‘आ’लोकशाही’ नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू करून अनेक मान्यवरांच्या मुलाखती आणि भाषणे प्रसारित केली. तसेच विद्यापीठाच्या ‘शिववार्ता’ वाहिनीवरून देखील मुलाखती, भाषणे प्रसारित करण्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. याबरोबरच सांगितिक विश्व हा त्यांच्या आवड आणि छंदाचा महत्त्वाचा भाग.

समाजमाध्यमांवर आणि अन्यत्रही जत्राटकर यांनी उत्तम गाणी गायिली आहेत. समाजमाध्यमांवर सामाजिक, सांस्कृतिक व ग्रंथांविषयीच्या नोंदी घेत राहणे हा त्यांचा चांगला गुण. या आवड-अभ्यासाचाच एक भाग म्हणून त्यांनी मध्यंतरी ‘गुलामी’ (१९८५) चित्रपटातील ‘ जिहाल-ए-मस्कीं मकुन-ब-रन्जिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल है’ या मिठास आणि लोभस गाण्याचे केलेले रसग्रहण आणि विश्लेषण. ते त्यांच्या सांगितिक प्रेमाची साक्ष आहे. अनेकदा गाण्यांचे मुखडे आणि मधुर नादबंधांच्या सुरावटी आपल्या कानावर आणि मनावर आंदोलत असतात, त्या अर्थाशिवाय. अशी गाणी आपला माग काढत असतात. त्यातील शब्दार्थ मात्र अनाम राहतात. वयाच्या एका टप्प्यावर अशा गाण्यांच्या अर्थशोधयात्रेतून त्याचे उत्खनन केल्यास त्यातील अर्थसमजुतीतून वेगळा आनंद मिळतो. असा आनंद ते कायम मिळवतात. पत्रकार मित्र सचिन परब हा आमच्यातला समान संवाददुवा. सचिन कोल्हापुरात आला की, गप्पांना उधाण येते. या संवादात आडपडदा नसतो. डॉ. जत्राटकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि विचारदृष्टीचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे, व्यक्ती, विचारांबद्दलची सकारात्मक समन्वयदृष्टी. तसेच त्यांच्या विचारदृष्टीत सर्व प्रकारच्या मानवी गुणांवर आणि सद्भावावर असणारा विश्वास, हेही त्यांचे वैशिष्ट्य. वगळण्याचा भाग जत्राटकर यांच्या दृष्टीत नसतो. सर्व प्रकारच्या संगतीगुणांमुळे त्यांची दृष्टी ही उदार आणि सर्वसमावेशक इन्क्लुजिव्ह झाली आहे. ती उदार आणि उमदी आहे. ती एकारलेली नाही. सामाजिक जीवनाबद्दल अशी दृष्टी आणि गाढ आस्था आजच्या एकारलेल्या सार्वजनिक जीवनात अभावरूपानेच पाहायला मिळते. या लेखसंग्रहात डोकावण्याआधी पार्श्वभूमीदाखल हे शब्द महत्त्वाचे वाटले. कारण डॉ. जत्राटकर यांच्या या स्वभावदृष्टीचे प्रतिबिंब त्यांच्या लेखानात पाहायला मिळते.

लॉकडाऊन कालखंडातील एकांतकाळाने आणि नंतरच्या काळातील काही घटना, प्रसंग, घडामोडींवरून स्फुरलेले हे लेखन आहे. ते संमिश्र स्वरूपाचे आहे. त्याचे स्वरूप हे प्रतिक्रियात्म व प्रासंगिक स्वरूपाचे आहे. संग्रहातील पहिलाच लेख ‘मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है’. या लेखावरून वाटले की जत्राटकर यांचा हा सर्व लेखनप्रांत हा ललित स्वरूपाचा आहे. मात्र पुढे पुढे वाचत गेल्यानंतर ते समाजचिंतनशील स्वरूपाचे आहे, हे लक्षात येते. आजघडीला मराठी ललितगद्याचा बहुल असा विस्तार झाला आहे. एकेकाळी व्याजरोमँटिक आणि भाबडे भावविवश अलंकरणशील असे मराठी ललितगद्य मोठ्या प्रमाणात लिहिले जात होते. नव्वदनंतर मात्र महाराष्ट्राच्या विविध भागातील लेखकांनी लिहिलेले ललितगद्य हे समाज-संस्कृती, निसर्गनिष्ठ स्वरूपाचे आहे. मानवी जीवनातील विविध अंगांचा त्यास स्पर्श झाल्यामुळे ते व्यापक झाले आहे. त्यामुळे या ललितगद्याच्या धमन्यांचा विस्तार झाला. त्यामध्ये अनिल अवचटांसारख्या मातब्बर लेखकाचा आवर्जुन उल्लेख करायला हवा.

‘मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है’ या लेखात निपाणी गावाचे स्वभावशब्दचित्र आहे. त्यांचे गावाविषयीचे गतस्मरणरंजन आहे. गावकृतज्ञता आहे. स्थानिक लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि या गावातील माणसांविषयीच्या आस्थानोंदी आहेत. गावप्रेम आणि आत्मपरतेच्या अंगाने जुने गाव आणि आताचे गाव हा ‘बदल’ही टिपला आहे. बालपणातील ‘न दुनिया का गम था, ना रिश्तों के बंधन, बडी खुबसूरत थी वो जिंदगानी’ या बालगावभावना गतकातरतेशी नाते सांगणारे हे लेखन आहे. ‘आई माझा गुरू’ या लेखात आईच्या संस्काराच्या हृद्य आठवणी आहेत. लेखकाच्या बालपणातील ‘घडवणुकी’ची ही मातृसंस्कारकथा आहे.

डॉ. जत्राटकर यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक प्रकारच्या संवेदनशीलतेचे पैलू आहेत. या त्यांच्या संवेदनशीलतेतून स्फुरलेले विषय या लेखनात आहेत. परिसरचित्र आणि इतिहासदृष्टी हा त्यापैकीच एक. कर्नाटकातील यादवाड येथील शिवरायांच्या शिल्पाविषयीच्या नोंदी ‘शिवरायांचं शिल्प’ या लेखात आहेत. तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा शिवशिल्प पाहणीचा त्यांच्या मनावर जो ठसा उमटला, त्याचे वर्णन आहे. यादवाड या गावाशी निगडित, शिवाजी महाराजांशी निगडित कर्तबगार अशा मल्लाबाईची या वीरांगनेचा इतिहास त्यामध्ये आहे. अगदी या शिल्पावर या इतिहासकथेचा असणारा प्रभाव टिपला आहे. या शिल्पाच्या ‘एक चतुर्थांश भागात मल्लाबाईची कथा आहे. या शिल्पात शिवाजी महाराज आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर एक मूल आहे. त्याला ते दूधभात भरवताहेत. (‘भरवताहेत’ असे क्रियापद वापरणे हा देखील त्यांच्या स्वभावदृष्टीचा भाग आहे.) समोर मल्लाबाई एक वाटी घेऊन उभ्या आहेत. हे मूल मल्लबाईंचे असून त्याच्या दूधभातासाठी म्हणून महाराजांनी त्यांना बेलवडी दोन गावांच्या इनामासह परत केली.’ इतिहास, दंतकथा आणि लोकव्यवहाराच्या स्मृती अशा प्रकारच्या नोंदींमधून लक्षात येतात. तर, ‘विरासत को नजरअंदाज न कर…’ सारख्या लेखात ऐतिहासिक स्थळांचा वारसा जतन, संवर्धनाची जाण प्रकटली आहे. अजिंठा परिसरातील लेणी शिल्पांचे जतन गंभीरपणे केले पाहिजे, याविषयीचे हे कथन आहे. ‘जिताडा फ्राय अन् अलार्मिंग मुंबई’ या कथनात प्रवासातील एक मजेशीर अनुभव कथन केला आहे. रात्रभर झोप नसल्यामुळे, रेल्वेत डुलक्या घेत असताना प्रवासात पहाटे अलार्म वाजतो आणि अर्धवट झोपेत असलेल्यांना तो बॉम्ब वाटतो. या प्रवासक्षणाचे हे कथन आहे. हा लेख रंजक कथनात्मतेच्या अंगाने जाणारा आहे. तसेच स्थानिक इतिहासाचा भाग म्हणून निपाणी येथील देवचंद महाविद्यालयातील सात तरुण प्राध्यापकांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात घेतलेला धाडसी सहभाग आणि त्यांना झालेल्या तुरुंगवासाचा इतिहास कथन केला आहे. (‘नामांतर सत्याग्रहातील सात भारतीय’) त्यातूनच ‘नामांतर समता संघर्षाचे नवे पर्व’ असा छोटेखानी इतिहासलेखन आकाराला आल्याची नोंद त्यांनी घेतली आहे.

डॉ. जत्राटकर यांच्या या समाजविचारशील लेखनात एक प्रभावी सूत्र आहे ते स्त्रीस्वातंत्र्याचे व स्त्रीसमतेचे. भारतीय समाजव्यवस्था पुरुषप्रधान चौकटी आहेत. स्त्रीवर अनेक बंधने आहेत. त्यामुळे तिच्या स्वातंत्र्याचा व अस्तित्वाचा संकोच झाला आहे. भारतीय परंपरा स्त्रीला विषम वागणूक देत आली आहे. तसेच आधुनिक काळातही नवी भांडवली बाजार व्यवस्था स्त्रीचे पारंपरिक प्रतिमान रचते. याबद्दलचा नकारसूर जत्राटकर यांच्या लेखात आहे. ‘पणती तेवत आहे’ सारख्या दीर्घलेखात महाराष्ट्रातील स्त्रियांच्या चळवळी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ब्राह्मणेतर चळवळी, राजर्षी शाहू महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीप्रश्नासंबंधी केलेले कायदे व सुधारणा याबद्दलची मांडणी आहे. या पार्श्वभूमीवर आजघडीला रूढी, परंपरा व पारंपरिक स्त्री प्रतिमांना उठाव मिळत आहे. हा विरोधाभास जत्राटकर यांना हितावह वाटत नाही. मानवी अस्तित्व क्षीण करणाऱ्या परंपराचे पुनरुज्जीवन होत आहे, याबद्दल त्यांना खंत वाटते. स्त्री-पुरुष समतेचे तत्त्व त्यांच्या अनेक लेखांचे विषय झाले आहे. ‘सर, फ्यामिली हय क्या ?’ लेखात स्त्री पुरुष समतेचा विचार आहे. कुटुंब, सार्वजनिक जीवनातील स्त्रियांचा वावर मात्र त्यातही भेददृष्टी आहे. मानवी जीवनाला स्त्रीशिवाय अपूर्णत्व आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्याच्या अखेरच्या काळात ‘कौटुंबिक उपासना मंडळी’ स्थापना केली होती. जीवनाच्या हरएक प्रसंगात स्त्रीचा सहभाग आवश्यक असतो. यात समभाव आहे. किंवा महात्मा फुले यांच्या विचारदृष्टीतही नर-नारी समतेचे भान होते. या विचारदृष्टीचा प्रभाव जत्राटकर यांच्या लेखनावर आहे.

आजचे सार्वजनिक जीवन हे फार कलुषित एकांगी आणि हट्टाग्रही अस्मितावादी झाले आहे. तात्कालिक प्रतिक्रियावादी माहौल आणि त्याला मिळणारी प्रतिष्ठा जत्राटकर यांना अस्वस्थ करणारी वाटते. कोणत्याही घटनेवर सारासर विचार न करता उत्स्फूर्त प्रतिक्रिया देणे, ट्रोल करणे, एकांगी बाजू मांडणारा समूह सर्वत्र दिसत आहे. याबद्दल जत्राटकर यांची विशिष्ट भूमिका आहे. ती नीट समजून घ्यायला हवी. ‘अजीब दास्ताँ है ये’ या लेखात लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ज्या एकांगी प्रतिक्रिया तरुण पत्रकारांनी नोंदवल्या ही बाब जत्राटकर यांना अस्वस्थ करणारी वाटली. ‘व्यक्ती गेल्यानंतर तिच्या चांगल्या बाबी आठवाव्यात. त्यातील अधिक चांगल्याचा स्वीकार करावा आणि माणूस म्हणून तिच्या हातून झालेल्या चुकांचा पाढा वाचत न बसता, त्या पाठीवर टाकून पुढे चालत राहावे.’ अशी समज आणि समाजदृष्टी जत्राटकर यांची आहे. ती व्यापक आणि सहिष्णू आहे. तरतमभाव, सारासारविवेक हा नेहमीच महत्त्वाचा ठरतो, याचे भान त्यामध्ये आहे. विचारांमधील एकांगी अभिप्राय हा धोकादायक ठरू शकतो, याचे भान यात आहे. ‘श्यामच्या आईचा अस्वीकार आणि आपण’ या लेखातही हीच दृष्टी आहे. नागराज मुंजळे यांच्या ‘श्यामची आई मला माझी आई वाटत नाही.’ या विधानामागील भूमिका आणि त्याच्या पडसादाचा विचार लेखात मांडला आहे. अशा प्रकारच्या अस्वीकारामागं सामाजिक विषमता आणि माणसाची संधी नाकारणं, ही बाब आहे. त्यामुळे असे नकार एका मोठ्या चित्रफलकावर समजावून घ्यावे लागतात, असे त्यांना वाटते. ही विधाने एकांगी समजून घेणे त्यांना धोकादायक वाटते. तशी ती घेतली तर सार्वत्रिक नकार निर्माण होईल, अशी धोक्याची सूचना ते देतात. त्यासाठी ‘माणसाच्या सहृदयतेला साद घालत राहण्याची त्यांची क्षमता आपण सातत्यानं अधोरेखित करायला पाहिजे,’ असे त्यांना वाटते.

प्रा रणधीर शिंदे

आजच्या सार्वजनिक जीवनातील काही प्रश्नांची मांडणी काही लेखांत आहे. विशेषतः समाजातील अनेक प्रकारचे भेद जत्राटकर यांना अस्वस्थ करतात. माणूसपण नाकारणारे किंवा त्याला गौणत्व देणारे भेद आजच्या काळातही आहेत. ‘युनिफॉर्म’ सारख्या लेखात शालेय मुलांचे वेगवेगळ्या शाळांमधील (कॉन्व्हेट, इंग्रजी, सी.बी.एस.सी., सेमी व मराठी) गणवेश हे भेद निर्माण करतात. गणवेश हे जणू काही प्रतिष्ठा व भेददर्शक आहेत, ही जाणीव त्यांना अस्वस्थ करते. आजही माणसांना ‘डि-कास्ट’ होता आलेले नाही. आधुनिकता आणि सामाजिक प्रगतीतील अंतर्विरोध अवतीभवती दिसतात. याचाच एक भाग म्हणजे औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनावरून समाजात जे ध्रुवीकरण झाले, ते या आधुनिकतेतील अंतर्विरोधाचेच द्योतक आहे, असे जत्राटकर यांना वाटते. त्याच्या नोंदी जत्राटकर यांच्या लेखनात आहेत. ‘अजीर्ण, खाणं आणि जगण्याचं’ सारख्या लेखात अन्नाच्या होणाऱ्या अपरिमित नासाडीवरील चिंता त्यांनी मांडली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कॉपी नियंत्रणासाठी एका शाळेत त्यांची वस्त्रे काढून उलटी वस्त्रे परिधान करण्याची घटना त्यांना अस्वस्थ करणारी वाटते. ती मानवी स्वातंत्र्यावर, अधिकारांवर गदा आणणारी वाटते. तसेच मोबाईल एंटरटेनमेंट जगाने आपला भोवताल व्यापला आहे. त्यातून व्यक्तिकेंद्री (Personal) जग अवतीर्ण झाले आहे. तसेच मुखवट्यांच्या जगात विविध झुली पांघरून माणसं वागतात. त्यामुळे जगण्यातील खऱ्याखुऱ्या आनंदाला आपण मुकतो. सत्ता, प्रतिष्ठा, श्रेणी, राहणीमान, पद या तात्कालिक गोष्टींमुळे माणूस आपल्या आनंदी जीवनाला पारखा झाला आहे. हा विचार ‘एक चेहरे पे कईं चेहरे’सारख्या लेखातून मांडला आहे. दूरचित्रवाणीवरील पैसे घेऊन मुलाखती निश्चित करण्याची बाबही त्यांना गैर वाटते. ‘सेल्फ अप्रायझल’ सारख्या लेखात लॉकडॉऊन काळातील कुटुंबचित्रे आहेत. विशेषतः स्वतःचे केस कापण्याचा प्रसंग रेखाटला आहे. जीवनातले असे छोटे प्रसंग या आधीही मराठी ललितगद्यात आलेले आहेत. गुजगोष्टी किंवा वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्या ललितगद्यात असे अनुभव प्रकटलेले होते. दाढीतल्या पहिल्या पांढऱ्या केसावरही लेख लिहिले गेले आहेत.

‘शहर में शायद दंगा होनेवाला है’ या लेखात आजच्या भीषण उत्स्फूर्ततावादी, अस्मितावादी समाजकारणाची अस्वस्थ नोंद आहे. घटनांचा मागचा पुढचा विचार न करता ‘दंगली’ कशा निर्माण होतात, कशा घडवल्या जातात, याच्या नोंदी या लेखात आहेत. जत्राटकर यांचे समाजभान चौफेर आहे. अगदी लोकांना न आवडणाऱ्या विषयावरही त्यांनी लिहिले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे ‘सवलतीच्या देशा’सारखा लेख. भारतातील राजकारण हे लोकप्रिय समूहशरण झाले आहे. ते मतपेढीकेंद्रित आहे. त्यामुळे लोकांना आवडेल अशा लोकप्रिय सवलतींच्या धोरणांचा आणि घोषणांचा पाऊस पडत असतो. मात्र या सवलती शासनाची तिजोरी क्षीण आणि कमकुवत करणारी ठरतात, याचा राज्यकर्त्यांना विसर पडतो आहे. या विषयीची खंत या लेखात आहे आणि ती रास्तही आहे. एक प्रकारे आजचे आपले नागरी जीवन स्वास्थ्यहारक झाले आहे. याचा हा नोंदपट आहे किंवा एका अर्थाने समाजाचा एक्सरे रिपोर्टच.

डॉ. जत्राटकर यांच्या या लेखनाचा विशेष म्हणजे, या सर्व लेखनामागे संविधानाची चौकट आहे. तो त्यांचा दर्शनबिंदू आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता बंधूभावाची मागणी करणारे हे लेखन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारदृष्टीची छाया त्यांच्या लेखनावर आहे. माणूसपण अबाधित राहावे, अशी दृष्टी त्यामागे आहे. तसेच नागरी समाजातील नवे अंतर्विरोध व ताणतणाव त्यांना अस्वस्थ करतात. त्याचा विचार या लेखनात आहे. डॉ. जत्राटकर हे मूळचे पत्रकार असल्यामुळे सामाजिक जीवनाकडे चौफर पाहण्याचा त्यांचा डोळा हा जागृत पत्रकाराचा आहे. डॉ. जत्राटकर यांचे हे लेखन मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे आहे. आत्मपरता आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे विशेष नोंदवणारे तसेच त्यांच्या विचारदृष्टीचे सम्यकचित्र या लेखनात आहे. व्यापक सामाजिक दृष्टी, समतोल विवेक, चिंतनशीलता आणि सामाजिक हस्तक्षेप ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. आपले सामाजिक व नागरी जीवन अधिकाधिक सुखकारक व वर्धिष्णू व्हावे, अशा व्यापक तळमळीतून ते निर्माण झाले आहे. वाचक आणि मराठी समूहाचे समाजभान विस्तारविण्यामध्ये अशा लेखनाचे मोल निश्चित महत्त्वाचे ठरते.

  • “समाज आणि माध्यमं”: प्रस्तावना….

डॉ. आलोक जत्राटकर हे अत्यंत संवेदनशील, विवेकी आणि स्वतंत्र दृष्टी असणारे माध्यमकर्मी आहेत. या क्षेत्रात त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधन केले असून त्यांच्या संशोधनास व्यापक पातळीवर मान्यताही मिळालेली आहे. त्यांनी अनेक नियतकालिकांतून व प्रसारमाध्यमांतून विविधांगी कामगिरी केलेली आहे. स्तंभलेखक म्हणूनही ते मान्यताप्राप्त आहेत. अशा व्यासंगी व अभ्यासू जत्राटकर यांनी ‘समाज आणि माध्यम’ हे महत्त्वाचे लेखन केलेले आहे. हे संपूर्ण लेखन त्यांच्या चिंतनशीलतेचा आणि समाजभान बाळगणाऱ्या पत्रकाराचा प्रत्यय देतात. त्यांच्या या ग्रंथात त्यांनी माध्यमांविषयी आणि समाजाविषयी अत्यंत सजगपणे आपले विचार प्रकट केले आहेत.

या ग्रंथात एकूण २५ लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे पंचवीस लेख वेगवेगळ्या विषयांचा परामर्श घेणारे आहेत. असे असले तरी, या सर्व लेखांचे आशयसूत्रानुसार वर्गीकरण करायचे झाल्यास काही लेख विश्वव्यापी माध्यमांतराचा शोध घेणारे आहेत; तर, काही लेख सोशल मीडियातील उलाढालींचा शोध घेणारे आहेत. सोशल मीडियामुळे समाजात निर्माण झालेल्या विविध गुणदोषांची उकल करणारे आहेत. या सर्व लेखांतून एकच एक असे सूत्र न गिरवता, विविध आशयसूत्रे आणि उप-आशयसूत्रे यामुळे एकांगी मांडणी न होता तिला एक भरघोसपण उपजतच प्राप्त होते. या सर्व लेखांतून त्यांचा समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि सांस्कृतिक उलाढाली यांचा असणारा व्यासंग आपल्याला थक्क करून टाकतो. कोणत्याही गोष्टीकडे एकांगीपणे न पाहता समग्र दृष्टीने त्याचा वेध घेणे, आलोक जत्राटकर यांना महत्त्वाचे वाटते. पूर्वग्रह न बाळगता अभ्यासविषयाकडे तटस्थ आणि संदर्भासहित पाहण्याची दृष्टी त्यांना लाभलेली आहे, याचा प्रत्यय हे सर्व लेख देतात.

आलोक जत्राटकर प्रारंभीच्या काही लेखांतून माध्यमक्रांतीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, विश्वव्यापी माध्यमांतर हे लेख याची साक्ष देतात. भारतासारख्या विकसनशील देशात ही माध्यमक्रांती झाल्यानंतर कोणते बदल झाले, याचा समूळ ऊहापोह ते या ठिकाणी करतात. ज्या देशात मानवी संपत्ती विपुल प्रमाणात आहे, अशा देशात जेव्हा माध्यमक्रांती होते, तेव्हा निर्माण होणारे प्रत्र त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. गरिबीने गांजलेल्या देशात जेव्हा डिजीटल माध्यमे येतात, तेव्हा निर्माण होणारे गुंते अनाकलनीय होऊन जातात. भारतासारख्या देशात जेव्हा अशा स्वरूपाची माध्यमे येतात, तेव्हा त्याचे परिणाम कमालीचे व्यामिश्र स्वरूपाचे असल्याचे दिसते. या सर्व व्यामिश्र वास्तवाचा उभा-आडवा छेद आलोक जत्राटकर घेतात. भारतासारख्या विकसनशील देशात तंत्रज्ञान विकासाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास प्रारंभी सर्वांनाच वाटत होता. पण, या माध्यमांच्या आगमनानंतर आपल्या देशाच्या विकासाला खरोखरच हातभार लागला का, हा गंभीरपणे विचारात घेण्याचा मुद्दा आहे. अत्यंत सूचकपणे जत्राटकर या प्रश्नाचा शोध घेतात आणि संपूर्ण ग्रंथात याबाबतची अभ्यासू मांडणी करतात. सोशल मीडियातील सर्वाधिक वावर हा पौगंडावस्थेतील विशी-पंचविशीतील तरुणांचा आहे. हा वावर कोणते गुंते निर्माण करतो आहे, याचे सहजसूचन जत्राटकर यांनी केलेले आहे. फेसबुक गेल्या दोन दशकात आपल्यासारख्या गरीब देशांत काय धुमाकूळ घालते आहे, याचाही या ग्रंथकर्त्याने सूक्ष्म वेध घेतलेला आहे. ज्या देशात भाकरीचा प्रश्न गंभीर आहे, बेरोजगारांचे थवेच्या थवे सर्वदूर पसरलेले आहेत, अशा देशात फेसबुकचे जग कोणते भ्रम निर्माण करते आहे, याचा शोधही जत्राटकर यांनी घेतलेला आहे. हे सर्व शोधत असताना त्यांची शोधक दृष्टी सूक्ष्मातिसूक्ष्म होते आणि विविध तपशील निवडक पद्धतीने वाचकासमोर ठेवते. जत्राटकर नेहमी ‘नाही रे’च्या बाजूने विषयाचा शोध घेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे गरिबांना पुन्हा खोल दरीत कसे ढकलत आहेत, याचे आकलन मांडतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांनी नातेसंबंधांत जटिल प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रश्नांचा साक्षेपी वेघ आलोक जत्राटकर यांनी घेतलेला आहे. हा शोध घेत असताना या माध्यमांचा सर्जक उपयोग करता येऊ शकतो, हे भानही त्यांनी आपल्या लेखनात बाळगलेले आहे. भारतासारख्या देशात भ्रामक मायाजाल माध्यमे कशी पसरवू शकतात, याचा विचारही त्यांनी अत्यंत गंभीरपणे केलेला आहे.

कोरोना काळात ‘ऑनलाइन एज्युकेशन’ हा शब्द परवलीचा बनला. याबाबत विविधांगी चर्चा सुरू झाल्या. ऑनलाइन एज्युकेशन हे कसे फायद्याचे आहे आणि शिक्षणात क्रांती करणारे आहे, असे हिरीरीने मांडणारे बरेच तज्ज्ञ सगळ्या समाजात बोकाळले होते. त्यांनी ऑनलाइन एज्युकेशनमुळे आता वर्ग अध्यापनात क्रांती होणार, शिक्षकांची गरज संपणार, अशा स्वरूपाची विधाने सरसकट करून हैदोस घातला, ऑनलाइन एज्युकेशनचा गौरव करणाऱ्या लोकांना या देशात गोरगरीब, शेतकरीही राहतात, भटके-विमुक्त, दलित, शोषित वर्ग येथे जगतो, याचे यत्किंचितही भान नव्हते. या विषयाचा समग्र शोध व्यापक पातळीवर आलोक जत्राटकर यांनी घेतलेला आहे. ऑनलाइन एज्युकेशनचे फायदे आणि तोटे त्यांनी एका छोट्याशा लेखात सूक्ष्मपणे मांडले आहेत. जत्राटकर यांच्या लेखनाचे विशेष हे आहे की, ते विषयाची समग्र मांडणी करतात; पण, त्याबरोबरच सहजसुंदर भाषेचा वापर करून कोणत्याही वर्गातील वाचकाला आशय अवगत होईल, याची काळजी घेतात. त्यासाठी शब्दनिवड करताना ते विशेष जागृत असतात, याची साक्ष त्यांचे सर्वच लेख देतात. संशोधनासाठी डिजीटल क्रांती कशी उपकारक ठरली आहे, याची मांडणी त्यांनी एका लेखात केली आहे; पण, या डिजिटल क्रांतीमुळे संशोधनातील गडबड घोटाळे आणि उथळपणा याकडे जाणे त्यांनी हेतूतः थांबवलेले आहे. व्यावसायिक जबाबदारीच्या मर्यादा त्यांना या ठिकाणी निर्बंध घालत असाव्यात, असे वाटते.

डिजीटल क्रांतीने भारतातील सर्वच व्यापारविश्वाला कसे व्यापलेले आहे, याचेही चित्रण त्यांनी आपल्या लेखांतून केलेले आहे. डिजीटल क्रांतीमुळे व्यापाराचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे ते सुचवतात. ऑनलाईन मार्केटिंगमुळे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांच्या जीवनात आलेल्या संकटाचे स्वरूपही किती भयावह आहे. याचे सूचन ते आपल्या लेखनातून करतात. माध्यमक्रांतीने व्यापारक्रांती केली आहे, हे खरे असले तरी या व्यापाराचे स्वरूप बदलले असून त्यांनी माणसाच्या मानसिकतेचा पुरता बोजवारा उडवलेला आहे, याचे सूचनही जत्राटकर करतात. माणसाचे वस्तूत होणारे रूपांतर किती भयावह स्वरूपाचे आहे, याचे दर्शनही सहजपणे या लेखातून आपल्याला होते. प्रचंड भांडवली गुंतवणुकीच्या आधारावर आपले जाळे देशभरात विणणे, त्यासाठी आवश्यक त्या सर्व साम-दाम-दंड-भेद नीर्तीचा अवलंब करणे आणि स्थानिक व्यावसायिकांचा जीव घेणे हे या संपूर्ण ऑनलाइन डिजिटल मार्केटिंगचे सत्य अस्वस्थ करणारे आहे. जत्राटकर यातील साम्राज्यवादी वृत्तीचा सखोलपणे शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या परीने करतात.

या सर्व बदलत्या प्रसारमाध्यम क्रांतीने माणसाच्या जगण्यात कोणकोणते बदल घडवले आहेत, याचा शोध प्रस्तुत लेखक सखोलपणे घेतो. माणसा-माणसांत निर्माण झालेले अंतर, माणसाची संवेदनाहीन वृत्ती, नात्यातील निर्माण झालेली दरी, जगण्यातील हरवलेले समाधान, दुभंगलेले मानसिक जग आणि यातून निर्माण झालेल्या विविध विकृती या सर्वांमुळे आपले सामाजिक अस्तित्वच पोखरले जाते आहे. समाज म्हणून आपले असणारे समाजजीवन लोप पावत आहे. याचे भानही वाचकांना देण्यासाठी जत्राटकर विविध तंत्रांची योजना आपल्या लेखनात करतात. या माध्यम क्रांतीमुळे राजकारण कसे बदलले आहे आणि कडेलोटाच्या टोकावर उभे आहे, याचे चिकित्सक दर्शन जत्राटकर यांनी घडवलेले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे नेता होता येते, याचे एक नवीन दर्शन संपूर्ण भारताने अनुभवले आहे. भारतात झालेले सत्तांतर हे माध्यमक्रांतीचे अपत्य आहे. राजकारणात माध्यमक्रांतीने कोणते बदल घडवले, याचे सूचन जत्राटकर करतात. याबरोबरच या माध्यमक्रांतीने कोणत्या लैंगिक समस्या नव्याने उभ्या केल्या आहेत, याचा वेघही ते आपल्या लेखनातून घेतात. या माध्यमाने संपूर्ण समाज आणि समाजाची नैतिकता यामध्येच हस्तक्षेप करून प्रचंड ढवळाढवळ सुरू केली आहे, याचे स्वरूपही या ग्रंथात मांडले गेले आहे. जागतिकीकरण, प्रसारमाध्यमे आणि कुटुंबव्यवस्था यांचा एकत्रित विचार या ग्रंथात वेळोवेळी केलेला आहे. सर्व ग्रंथभर याबाबतची मांडणी आपल्याला सापडते. प्रसारमाध्यमांचे भवितव्य काय असेल, याबाबतही जत्राटकर यांनी गंभीरपणे मांडणी केलेली आहे.

हा एकूण ग्रंथ माध्यमक्रांती आणि भारत याबाबत व्यापक मांडणी करतो. भारतीय समाज व्यवस्था, या समाज व्यवस्थेची नैतिक मूल्ये, या समाज व्यवस्थेचा अर्थव्यवहार, सांस्कृतिक व्यवहार, राजकारण याबरोबरच या समाजातील स्रीची असणारी शोषित अवस्था, लहान मुलांचे प्रत्र, शिक्षण व्यवस्था, संशोधनाचे क्षेत्र, कृषी क्षेत्र, याबरोबरच दलित, पीडित, शोषित समाज या साऱ्यांना आपल्या आस्थेच्या कवेत घेऊन जत्राटकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. व्यासंग, संदभाँची योग्य निवड, तपशील याबाबतची जागरूकता आणि पूर्वग्रहाला कुठेही थारा न देता तटस्थ अभ्यासक म्हणून जत्राटकर ही सगळी मांडणी करतात. ती करत असताना आवश्यक ते परिश्रम घेण्यात त्यांनी कोठेही टाळाटाळ केलेली नाही. सहजसुलभ भाषा, छोट्या छोट्या वाक्यांची निर्मिती, त्यातून निर्माण होणारी लय त्यांच्या लेखनाला समृद्धता प्राप्त करून देते. जत्राटकर अभ्यासक म्हणून या क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. त्याबरोबरच ललित लेखनातही त्यांनी स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या लेखनाला उपजत लाभलेले लालित्यबळ अधिक गुणवत्ता प्राप्त करून देते. अशा अभ्यासकाला आपल्या समाजात आज तरी फार काही किंमत उरलेली आहे, असे दिसत नाही. त्यामुळे जत्राटकर यांची होणारी ससेहोलपट मी माझ्या डोळ्याने पाहात असलो, तरी उद्याचा एक अभ्यासक, महत्त्वाचा माध्यमकर्मी आणि चांगला लेखक मला आश्वासित करतो. त्यामुळे जत्राटकर यांचे भवितव्य उज्वल आहे, याची साक्ष हे संपूर्ण लेखन देते. म्हणूनच मला ते गंभीर, व्यासंगी आणि तटस्थ अभ्यासक म्हणून महत्त्वाचे वाटतात.

डॉ राजन गवस

या दोन्ही प्रस्तावना वाचून, ही पुस्तके वाचणे आजच्या काळात किती गरजेचे आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच.
आपले अभिप्राय जरूर कळवा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मातीv: सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments