कलकत्ता, बदलापूर येथील घटना घडल्यानंतर जो उद्रेक झाला, त्या विषयी प्राप्त झालेल्या ३ कविता पुढे देत आहे. अशा घटनांचा करावा तितका निषेध कमीच. या गुन्हेगारांना तत्काळ कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून सरकार योग्य ती पावले उचलेल, ही अपेक्षा.
– संपादक
१. आठवते आज फूलनदेवी….
नाही सीमा विकृतीला
नाही शरम भोगाला
नाही शब्द अन्यायाला
नाही मन नराधमाला…
शिक्षा द्यायला आता फूलनच हवी का ?
की प्रत्येक स्त्रीने, आता “फूलनच” व्हावे ?
पेटल्या अगणित मेणबत्या
निघाल्या अनेक मूक यात्रा
तावातावानी बोलल्या बायका
चर्चा झाल्या टिआरपी वाढवायला…
अर्ज झाले न्यायालयी
दरवाजे बडवले सरकार दरबारी
परिणाम झाले …शून्य…
निर्भया फक्त मरत राहिल्या
निर्भया फक्त मरत राहिल्या…
शिक्षा द्यायला आता फूलनच हवी का ?
की प्रत्येक स्त्रीने, आता फूलनच व्हावे ?
जेव्हा न्यायदेवता होते आंधळी
जेव्हा पोलिस यंत्रणा होते लंगडी
जेव्हा समाज शक्ती होते तोकडी
जेव्हा बलवान होते चांडाळ चौकडी
अगतिक होतात फक्त ललना
रडत रहातात त्यांच्या वेदना……
आणि… निर्भया फक्त मरतच रहातात
निर्भया फक्त मरतच रहातात…..
शिक्षा द्यायला आता फूलनच हवी का ?
की प्रत्येक स्त्रीने आता फूलनच व्हावे ?
नाही पाहिल्या खऱ्या दुर्गा, काली
पुराणातल्या त्या संहारकर्त्या
फूलन बदल्यासाठी पेटून उठली
धडा देण्यास नाईलाजाने सज्ज झाली..
हाच एक मार्ग आता उरलाय का ?
म्हणून आज आठवतेय फूलनदेवी….
म्हणून आज आठवतेय फूलनदेवी….
— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
२. चौरंग
मस्तावलेल्या लांडग्यांचा
सुळसुळाट झालाय सगळीकडेच
गावात शहरात गल्लीत
मुंबई अन् दिल्लीत
रिक्षात बसमध्ये रस्त्यात रेल्वेतही
एकेकटे किंवा समूहाने फिरताहेत चोहीकडे लांडगे
दबा धरून बसलेले,
शिकार करत आहेत कोवळ्या चिमण्यांची
माहित नाही अजून किती निर्भया,
निर्दयपणे शिकार होतील
भर चौकात जळतील
सगळ्यांच्याच आया धास्तावलेल्या असतात
चिमण्या सुरक्षित घरी येईपर्यंत
त्या नराधमांच्या मुसक्या आवळायला
कोणीच तयार नाही पुराव्याअभावी
शिवरायांचा कायदा अमलात आणून
छाटता यावेत त्यांचे हातपाय
चौरंग पाहून निदान
दहशत तरी बसेल इतरांवर
कदाचित पुन्हां नाही
कोमेजणार कळी उमलण्याआधी
निर्धास्त झोपतील त्यांच्या आया
गर्भात असल्या पासून न झोपलेल्या
— आशा ज्ञानेश्वर दळवी, दुधेबावी, सातारा
३. “पणती”
पणती जपून ठेवा
अंधार फार झाला
‘ती’ गेली चंद्रावर अंतराळी
राष्ट्रपती ही झाली
देशाचा कारभार पाहिला
ती जगी धन्य माऊली
मातृत्वाचे वरदान
केले काबीज सिंहासन
शत्रुचा संहार कापून गर्दन
गिधाडे घिरट्या घाली
कधी कुत्रे बेदरकार
माऊलीचे रुपे अष्ठलक्ष्मी
अंबा, नवदुर्गा तिच
प्रत्येकीत दडली सुप्त शक्ती
विसरतो नराधम नीच
नका नका झेलू वार, प्रहार
पेटवा अंगार चालवा तलवार
जीवंत त्यांना जाळा
थांबवा अमानुष पाशवी चाळा
पणती जपून ठेवा
अंधार फार झाला
— रचना : पूर्णिमा शिंदे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800