लॉकडाउनच्या काळात फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर अनेक प्रवाह आले आणि गेले पण एका प्रवाहाच्या बाबतीत कोणी एकाने थोडा वेगळा विचार केला आणि बघता बघता त्या छोट्याशा बीजाचं एका सुंदर अशा वृक्षात रूपांतर झालं. होय, मी पुस्तकप्रेमी या समुहाबद्दल बोलते आहे.
एक आठवडा एकाने एक मुखपृष्ठ सादर करायचं आणि दुस-या आठवड्यासाठी दुस-या कोणाला तरी खो द्यायचा अशा रीतीने हा प्रवाह सतत वाहता ठेवायचा ही मूळ कल्पना होती. तेव्हा फावला वेळ असल्याने अनेकजण या प्रवाहात सहभागी झाले पण लॉकडाऊन संपला आणि हा मुखपृष्ठ सादर करण्याचा प्रवाह आटला. कुठेतरी साखळी तुटली.

पण एका ठिकाणी असं झालं नाही. बँक ऑफ इंडियामधून उपविभागीय व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेल्या श्री.कृष्णा दिवटे यांनी हा प्रवाह अखंडित रहावा म्हणून पुस्तक प्रेमी या व्हाटसॲप समुहाची स्थापना केली आणि एक अभियान सुरू झालं.

दिव्याने दिवा लावावा तसं वाचनाची आवड असलेले सातारा येथील 99 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, प्रकाशन क्षेत्रातील भीष्माचार्य रामदास भटकळ, अनिल मेहता, सुनील मेहता, अखिल मेहता, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक अभय सदावर्ते, चंद्रशेखर टिळक, नागेश शेवाळकर, मोनिका गजेंद्रगडकर, माधव जोशी, राधिका कुंटे, आश्लेषा महाजन यासारखे प्रकाशक, साहित्यिक आणि अनेक सामान्य वाचक या अभियानाशी जोडले गेले. आधी जोडले गेलेले सदस्य नवीन सभासदांना जोडून घेऊ लागले आणि पहाता पहाता अभियानाचं रूपांतर चळवळीत झालं. पुस्तक परिचयाचा एकही दिवस खंड पडू न देता अव्याहतपणे सहा वर्षे चालणारा एक यज्ञ सुरू झाला.
आजच्या घडीला 2200 पेक्षा जास्त पुस्तकांचे परिचय इथे दिले गेले. त्यावरच्या चर्चा रंगू लागल्या. ज्यांना सलग एक आठवडा पुस्तक परिचय लिहिणं अवघड वाटतं त्यांच्यासाठी ‘नदिनप’ नवा दिवस नवा परिचयकर्ता हा उपक्रम चालू आहे आणि विशेष म्हणजे या उपक्रमात सहभागी झालेल्या सदस्यांनी पुढे आपणहून पुस्तक परिचयासाठी स्वतंत्र आठवडा मागून घेतला.
वाचकांची सोय झाली पण लेखकांचं काय ? त्यांच्यासाठीही वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात. दर शनिवारी रंगणा-या काव्यसंध्येने अनेक कविंना जन्म दिला. कथालेखकांसाठी कथाजागर हा उपक्रम राबवला गेला. रहस्यकथा, प्रेमकथा, विनोदी कथा, मुक्तोत्तरी कथा अशा अनेक प्रकारच्या पाचशेपेक्षा जास्त कथा या उपक्रमामुळे लिहिल्या गेल्या.

या उपक्रमात सहभागी झालेल्या कथालेखकांनी या उपक्रमानंतर स्वतःची पुस्तकं प्रकाशित केली.
ना.सी.फडके म्हणायचे की प्रत्येक वाचकामधे एक लेखक दडलेला असतो. या समुहाने ते सप्रमाण सिद्ध केलं आहे.
विंदा करंदीकरांच्या देणा-याने देत जावे च्या चालीवर म्हणायचं तर “लिहिणा-याने लिहीत रहावे, वाचणा-यांने वाचत रहावे,
वाचता वाचता एक दिवस वाचकाने लेखक व्हावे”

आत्तापर्यंत या समुहाने चार संमेलनं घेतली. पहिल्या संमेलनात फक्त एका पुस्तकाचं प्रकाशन करणा-या या समुहाने यावर्षी हा आकडा दोन हाताच्या बोटांच्या पलीकडे नेऊन पोचवला आहे आणि दिवसेंदिवस यात वाढच होत राहील हे नक्की.

माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचं तर पूर्वी मी निव्वळ वाचक होते. आज माझ्या हातून 50 पुस्तकांचे परिचय लिहून झाले.
हा समूह नसता किंवा मी या समुहात नसते तर उगाच फावला वेळ आहे, वाचलेल्या पुस्तकांबद्दल काही लिहुया असं म्हणत मी नक्कीच पुस्तक परिचय लिहिले नसते त्यामुळे माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या या 50 पुस्तक परिचयांचं श्रेय निःसंशय पुस्तक प्रेमी समुहाचं आहे.

एका व्यापा-याची गोष्ट सांगितली जाते. अंतसमयी दोन्ही मुलांना जवळ बोलावून त्याने सांगितलं की गावागावात घर बांधा. एका मुलाने खरोखरच त्याला जमेल तितक्या गावात घरं बांधली, दुस-याने मात्र अनेक गावांमधल्या लोकांजवळ मैत्रीचे बंध जोपासून प्रत्येक गावात स्वतःसाठी जिव्हाळ्याचं एक घर निर्माण केलं.

रोजच्या वाचनानंदासोबतच पुस्तक प्रेमी समुहानेही आम्हा सदस्यांमधे असेच आपुलकीचे बंध निर्माण केले आणि महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक गावात आमच्यासाठी एक जिव्हाळ्याचं घर निर्माण केलं आहे.
पुस्तक प्रेमी समुह हा आमच्यासाठी केवळ एक व्हाटसॲप समूह राहिलेला नसून हे आमचं आनंदाचं गाव आहे.
— लेखन : संध्या साठे जोशी. चिपळूण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869043300
