Thursday, December 5, 2024
Homeलेख!! गगनगिरीतील योगशिबिर !!

!! गगनगिरीतील योगशिबिर !!

श्री गगनगिरी महाराजांचे मंदिरात खोपोलीला तीन दिवसांचे योगशिबिर आहे असे, आमची सखी अलका भुजबळ हिने सांगितल्यावर आम्ही उभयंता लगोलग तयार झालो. कारण सुदंर, पवित्र, स्वच्छ परीसरात बाजुलाच सुदंर खळखळत्या प्रवाहात धावणारी नदी आणि श्री सदगुरू गगनगिरी महाराजांची सजीव अशी मूर्ती. त्यांचा सहवास असलेली जागा, त्यानी खुप काळ तपस्या केलेली गुहा या सर्व गोष्टींचा आम्हाला लाभ होणार या उत्सुकतेने आम्ही आनंदित झालो आणि आम्ही सांगितलेल्या वेळी पोहचलो.

प्रथम योगशिबिरातील संस्थेच्या साधकांनी आम्हाला रजिस्ट्रेशन फार्म भरून आम्हास प्रत्येकी एक असे ओळखपत्र म्हणून कार्ड गळ्यात घालायला दिले. गरम गरम चहा देत रूमची चावी दिली आम्ही रूममध्ये फ्रेश झालो आणि मंदिरात दर्शनाला गेलो तिकडची स्वच्छता, शिस्तबद्धता आणि सुदंर वातावरणानी मन प्रसन्न झाले. संध्याकाळी भजन आणि आरतीने तन मन तृप्त झाले.

रात्री संस्थेतील साधकांनी आम्हां सर्वाना तीन दिवसांच्या योग शिबिराची कल्पना दिली वेळेचे प्रयोजन सांगितले व थोडक्यात योगशिबिराची पूर्ण माहिती तसेच रोजचे वेळापत्रक सांगितले. आम्ही शिबिरार्थी साधारण चाळीस पन्नासच्या आसपास होतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी गरम पाण्यानी आंघोळ करून ताजेतवाने होत खालीच एका मोठ्या हाॅल मध्ये जमा झालो. दारातच सुदंर रांगोळी आणि पणत्या लावल्या होत्या आत प्रशस्त हाॅल मध्ये श्री सदगुरू गगनगिरी महाराजांचा हार घातलेला सुदंर फोटो, फुलांची सजावट, रांगोळीत पणत्यांची रोषणाई असे प्रसन्न वातावरणात प्रथम आम्ही सर्वांनी गुरूवंदन करत प्रार्थना म्हटली.

संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश ताम्हाणे सरांनी आम्हांला योगाचे महत्व व काही प्रकार करून घेतले व त्याचे फायदे, काही अनुभव सांगितले. मग राजेश सरांनी आम्हांला, एकदंरीत आपला मानवी स्वभाव, आपली वृत्ती, आपली प्रवृत्ती आपली कवचकुंडले, आपले विचार आपले मन यावर खुप महत्वाचे सांगितले
मग थोडा वेळ नाश्ता व काढा देऊन परत एकत्र हाॅल मध्ये जमा झालो तेव्हा सौ अर्चना ताईंनी सर्वाना आपल्या शरीरातील पंचमहाभूतातील व सहा चक्राची माहिती सांगितली त्या प्रत्येक चक्राचे स्थान कुठे, त्याचे रंग, त्याचे बीज मंत्र त्यातील कमळातील पाकळ्या हे तर सांगितलेच पण त्या प्रत्येक चक्राचे वेगवेगळे प्राणायाम कसे असतात ते आम्हांला शिकवले व आमच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले हे विशेष. त्यातील बारकावे समजावले.

राजेश सरांनी योग निद्रा घेतली आपण प्राणायाम करतो शरीराने आणि मनाने करतो पण आपली जाणीव तिथे नेणे महत्वाचे असते. ती जाणीव ओळखता आली पाहिजे.
म्हणजे आपले शरीर तसेच आपले मन जागृत अवस्थेत शांतपणे जाणीवपूर्वक त्या प्रत्येक अवयवांवर नेऊन ती चेतना रिलॅक्स होत गेली पाहिजे. तर ती योगनिद्रा फायदेशीर होते असे समजावले.

एकदंरीत या योगशिबिरात आम्ही शरीरशुद्धी क्रिया, उभे राहुन तसेच, खुर्चीवर बसून सुर्य नमस्कार शिकलो, प्राणायामाचे तीन बंध तसेच अनेक मुद्रा शिकविल्या. जलधौती, जलनेती यांची प्रात्यक्षिकं करवून घेतली. त्याचे महत्त्व समजावून सांगितले.

छाया ताई आणि प्रज्ञाताईने आम्हांला पाठीवरील, पोटावरील, तसेच उभे राहुन करायची आसने, तसेच अग्निसार क्रिया शिकविली. योग शिक्षक वायकुळे आणि नामदेव यानी प्रात्यक्षिक करून त्यातील बारकावे शिकविले. रोज नियमित आवश्यक असणारे दैनंदिन व्यायाम व नित्यावश्यक प्राणायम शिकविले.

राजेश सरांनी सक्रिय ध्यान घेतले तो आगळा वेगळा अनुभव मिळाला. त्याचे फायदे, ते का करावे हे छान समजावले तसेच त्याचा अंतर्मनाला फायदा होत मन कसे स्वच्छ, शुद्ध, साफ होते त्याचा अनुभव घेता आला.

राजेश सरांनी आम्हास त्राटक शिकविले त्या बद्दल काही गैरसमज आमचे दूर करत तुम्ही नित्य नियमाने केल्यास तुमचे सर्व रोग निवारण होते ते उदाहरण देत सांगितले व आमच्या कडून प्रात्यक्षिक करून घेतले.

तिसर्‍या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आम्हांला त्यांनी श्री गगनगिरी महाराजाच्या गुहेत, जिथे सदगुरू गगनगीरी महाराजांनी खुप काळ तपस्या व ध्यान धारणा केली होती त्या पवित्र गुहेत आम्हांला नेले लवकरच पोहचलो. मन प्रसन्न झाले. आम्ही सर्व जण शांत बसलो.
हलकेसे व्यायाम घेत राजेश सरांनी आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात आलेले छान अनुभव, आनंदी प्रसंग ध्यानात शातंपणे आठवणीत आणायचे, असे सांगत आमच्याकडून स्मृती ध्यान‘ घेतले नंतर त्या गुहेत आम्ही एक ‘होम’ केला सर्वांनी आरती केली.

एक छान अनुभव मनात साठवत आम्ही परत आश्रमात आलो. नाश्ता झाल्यावर पुन्हा आम्हाला जे जे शिकविले ते पुन्हा रिवाईज करून घेतले. तसेच आपल्यातली सकारात्मकता वाढवत आपण इतरांसाठी मंगल कामनाची साधनाविधी कशी करू शकतो. कशी करायची ते सामुहिक रित्या केल्याने त्याचा फायदा कसा होत असतो. त्याची काही उदाहरणं दिली.
शेवटी प्रत्येक व्यक्तीला योगाभ्यासचे एक एक पुस्तक भेट दिले व देवळातील पुजाराने प्रत्येकाला प्रसाद म्हणून एक एक श्रीफल आणि गगनगिरी महाराजांची ‘उदी’ दिली. मग महाप्रसाद दालनात, महाप्रसाद घेऊन योगशिबिराची तीन दिवसांची सांगता झाली.

नविन दुर्मीळ गोष्टी शिकल्याबद्दल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तीन दिवसांत आम्ही सर्वजण एक सहकुटुंब सहपरिवारासारखे राहीलो.
पुन्हा एकत्र येऊ, पुन्हा भेटू, या आश्वासनावर सगळे शिबिरार्थी आपापल्या घरी समाधानाने गेले.

पूर्णिमा शेंडे.

— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !