लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सर्वांना माहित आहे. जहाल गटांचे नेते अशी लोकमान्यांची ओळख होती. त्यांचा आणि थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा स्वतंत्र्य की सुधारणा हा वाद देखील सर्वांना माहीत आहे. प्रथम स्वतंत्र्य व मगच सुधारणा असा आग्रह धरणाऱ्या लोकमान्यांनी स्वतंत्र्यासाठी जनजागर व्हावा म्हणून घराघरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप दिले हा निर्णय खरोखरच क्रांतिकारी निर्णय ठरला आहे.
गणेशोत्सव म्हणजे ग्रामीण अर्थकारणास गती देणारा उत्सव या अर्थाने आपण याकडे बघितलं पाहिजे. या महोत्सवाच्या निमित्ताने एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेला काही काळासाठी गती प्राप्त होते असे म्हणायला हरकत नाही.
गणेशाला हिंदू शास्त्रात अग्रपूजेचा मान आहे. आपल्याकडे ६४ कलांचा परिचय सर्वांना आहे आणि गणेशाला सकल कलांचा नायक अर्थात गणनायक म्हणून ओळखले जाते. आपला देश आणि आपली संस्कृती यांचा विचार करताना आपल्या जीवनशैलीशी निगडित असे सण उत्सव आपल्याकडे आहेत आणि त्यांचं महत्त्व देखील अधिक आहे.
12 बलुतेदार परंपरा आज फारशी दिसत नाही मात्र अद्यापही थोड्याफार प्रकारे ग्रामीण भागात व्यवसायांचे स्वरूप कायम आहे. गणेशोत्सवाच्या काळात मूर्ति घडविणारे मूर्तिकार, त्यांना रंगकाम करणारे रंगारी असे खास मनुष्यबळ यांना जसे काम आणि उत्पन्न मिळते तसेच या काळात इतरही बाबतीत व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त होतो.
गणेशोत्सव हा तसा महाराष्ट्राचा उत्सव म्हणून ओळखला जात असला तरी लगतच्या राज्यांमध्ये अगदी राजधानी दिल्लीपर्यंत याचा विस्तार झालेला आपणास दिसतो आता समुद्रापार ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या सर्व ठिकाणी आता हा गणेशोत्सव साजरा होत असतो.
गणेशोत्सव निमित्ताने मंडप, वाद्य, संगीत या क्षेत्रातही मोठी उलाढाल होते. विविध प्रकारचे देखावे तयार करण्याची स्पर्धा या काळात होते यातूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत असतो.
कोकणात गणेश उत्सवाचे खास महत्त्व आहे. गणपती आणि गौरीच्या सणासाठी चाकरीसाठी मुंबई गाठलेल्या सर्व चाकरमान्यांनी कोकणात येऊन उत्सव साजरा करायचा यातून कोकणात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पैसा येतो. प्रत्येक चाकरमानी आवर्जून यासाठी खर्च करतो. कोकणातील ग्रामीण व्यवस्थेला बळकटी या काळात मिळते.
कोकणाबाहेर राज्यातील इतरत्र सर्व ठिकाणी महालक्ष्मीचा तीन दिवसाचा उत्सव याच 10 दिवसात असतो. यात रांगोळ्यापासून रोषणाईपर्यंत प्रत्येक घरातून खर्च केला जातो मिठाई, पुरणपोळी अशी पदार्थ तसेच विविध प्रकारच्या भाज्यांचे नव्हे तर अगदी पाने आणि फुलं यांचंही या सणात महत्त्व आहे. शेतकऱ्यांना देखील याचा थेट आर्थिक लाभ प्राप्त होतो म्हणूनच याला ग्रामीण अर्थव्यवस्थेत अधिक मोल आहे.
सण साजरा करताना संस्कृतीचा प्रसार देखील होतो. मेळे, आर्केस्ट्रा आदी काळाच्या मागे पडले असले तरी गणेशोत्सव मंडळी विविध प्रकारच्या स्पर्धा या काळात घेतात यामुळे सर्वांना आपल्या कलागुणांना जगासमोर मांडण्याची संधी मिळते.
विविध गणेश मंडळे सामाजिक उपक्रमांवर भर देतात यातून समाजात अनेक चांगली कामे याच काळात होताना दिसतील सोबतच अन्नदानाचे महत्त्व जाणून या काळात मोठ्या प्रमाणावर अन्नदान करणारे भंडारा सारखे उपक्रम या 10 दिवसात अधिक होतात. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे देखील या गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळे आयोजित करतात.
समाजातील आबालवृद्धांचा प्रत्येकाचा असा हा लाडका सण म्हणजे कला, साहित्य, संस्कृतीची एक पर्वणी असते अनेक पैलूंसह सामाजिक जाणीव प्रगल्भ करणारा उत्सव म्हणून याकडे बघितले पाहिजे आता लगबग बाप्पाच्या आगमनाची…..
— लेखन : प्रशांत विजया अनंत दैठणकर. जिल्हा माहिती अधिकारी, बीड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मराठी माणसाचे आगळे वेगळे दैवत गजानन मना मनात घर करून आहेत. लेखात उत्सवाचा सांस्कृतिक आढावा आवडला.
हवाईदलातील कार्यकाळात मी हिरीरीने सहभागी होत असे. नाटक आणि कीर्तन, प्रवचने याची आठवण मिलिटरीतील मराठी युनिट्स च्या भव्य विसर्जनाच्या मिरवणुका आठवून मन आनंदित झाले.