“मनोज कुमार”
जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज, ४ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले. या निमित्ताने जाणून घेऊ या, त्यांचे कार्य, कर्तृत्व.
मनोजकुमार यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी हे होते. त्यांचा जन्म वायव्य सरहद्द प्रांतातील अबोटाबाद येथे एका पंजाबी हिंदू ब्राह्मण कुटुंबात २४ जुलै १९३७ झाला होता. भारताच्या फाळणीमुळे ते परिवारासोबत वयाच्या १० व्या वर्षी दिल्लीला स्थलांतरित झाले.
मनोज कुमार यांचे शिक्षण दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून झाले. त्यांचे कुटुंब दिल्लीतील विजय नगर निर्वासित कॅम्पमध्ये राहत होते. त्यानंतर ते जुन्या राजेंद्र नगर भागात स्थलांतरित झाले.

मनोज कुमार यांना लहानपणापासूनच मनोरंजन विश्व खुणावत होते. त्यांनी लहानपणी दिलीप कुमार स्टारर ‘शबनम’ हा चित्रपट पाहिला आणि त्याच क्षणी त्यांनी अभिनेता होण्याचे ठरविले. मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये भाग घेतला.
अभिनयाच्या वेडापायी मनोजकुमार शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. चित्रपट विश्वात आल्यानंतर त्यांनी आपले नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असेच कायम न ठेवता ते बदलून मनोज कुमार केले. याचे कारण होते अभिनेते दिलीप कुमार. लहानपणी दिलीप कुमार यांच्या चित्रपटांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. ते दिलीप कुमार यांचे चाहते बनले होते. ‘शबनम’ या चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज कुमार होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला होता की, जर चित्रपटात काम केले तर, स्वतःचे नाव मनोज कुमारच ठेवू. मुंबईत आल्यावर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले, त्यातून त्यांना पैसे मिळायचे. १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९६० मध्ये आलेल्या ‘कांच की गुडिया’ या चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणून भूमिका साकारली होती. यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमधून दिसले.

मनोज कुमार १९६२ मध्ये ‘हरियाली और रास्ता’ मध्ये झळकले. या चित्रपटात त्यांच्यासोबत माला सिन्हा मुख्य भूमिकेत होती. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. १९६४ मध्ये त्यांचा आणखी एक सुपरहिट चित्रपट ‘वो कौन थी’ प्रदर्शित झाला. १९७४ साली आलेल्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटानंतर मनोज कुमार त्यांच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर पोहोचले. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागल्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. त्यांच्या “शहीद’ या चित्रपटाने मोठी लोकप्रियता मिळवली.

“उपकार” या चित्रपटाद्वारे मनोज कुमार यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली. त्यामुळे ते “भारतकुमार’ या टोपण नावानेही ओळखले जात.
मनोज कुमार यांचे हरियाली और रास्ता, वह कौन थी, हिमालय की गोद में, उपकार, दो बदन, पत्थर के सनम, पूरब और पश्चिम, रोटी, कपडा और मकान आणि क्रांती हे चित्रपट विशेष गाजले. उपकार या चित्रपटासाठी मनोज कुमार यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. १९९२ मध्ये भारत सरकारने त्यांना “पद्मश्री’ व दादासाहेब फाळके देऊन गौरविले.

हरिकिशन गोस्वामी व मनोज कुमार बनलेल्या या व्यक्तीचा “भारतकुमार” कसा झाला याचा हा किस्सा. मनोज कुमार यांचा “शहीद” चित्रपट १९६५ मध्ये आला होता. त्यात त्यांनी शहीद -ए- आझम भगतसिंग यांचे पात्र साकारले होते. वास्तव आयुष्यात ते भगतसिंग पासून खूप प्रभावित होते. हा चित्रपट जेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी पाहिला होता त्या काळात शास्त्रीजीनी देशाला “जय जवान- जय किसान’चा नारा दिला होता. तो नारा ते देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवू इच्छित होते. त्यासाठी चित्रपटापेक्षा चांगले माध्यम दुसरे कुठले होते ? त्यामुळे त्यांनी मनोज कुमार यांना सुचविले की हा नारा केंद्रस्थानी ठेवून त्या भोवती फिरणारा एक चित्रपट तयार करावा. त्यातून मनोज कुमार यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट साकारला., तो होता “उपकार’ ! (१९६७). त्यात त्यांनी गावातील युवक “भारत”चे पात्र साकारले होते. हा युवक व्यवसायाने शेतकरी असतो. परंतु १९६५ मध्ये शत्रूने जेव्हा देशावर हल्ला केला तेव्हा तो सीमेवर मोर्चा सांभाळणाऱ्या जवानाच्या भूमिकेतही दिसतो. शास्त्रींना जे अपेक्षित होते ते साध्य झाले होते. परंतु त्याच वेळी मनोज कुमार यांना एक उद्देशही मिळाला. देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून ते स्वत:चे विचार प्रकट करण्याचा. तेव्हा सुरू झालेला सिलसिला त्यांनी शेवट पर्यंत कायम ठेवला. मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— लेखन : संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800