1) निसर्ग
आभाळाची गुणगुण ऐकुन चपलेनेही तान छेडली
रिमझिम रिमझिम जलधारांनी पैंजण नादे साद घातली
माता अवनी जलबिंदूंना कवेत घेते प्रेमभराने
हिरवी पाने चिंब चिंबशी डोलुन बघती हर्षभराने
या मेघांनी गट्टी केली पर्वतरांगासवे आगळी
धुक्या आडुनी डोंगर करती लपाछपीची सुंदर खेळी
मेघ मानतो तरंगिणींना प्रेममयी ती सखी आपुली
तरंग उसळत भुवयांनी मग तिने नशीली नजर टाकली
मृद्गंधाचा ओला परिमल कदंब वृक्षाचा तो दरवळ
नृत्यशील मोराचे नर्तन जलस्त्रोतांची सुंदर खळखळ
पर्जन्याच्या आगमनाने मादक होतो निसर्ग सारा
धरा वेगळी भासत असता देखावा सृष्टीचा न्यारा
कृषीवलांच्या हास्यामधुनी अमृतबिंदू झरू लागले
पाउस येता बीज रुजोनी कोंब तयांना फुटू लागले
रंगबिरंगी रूप लेऊनी कानन सजले विविध फुलांनी
स्वागत करते पूर्ण चराचर पर्जन्याचे रसिक मनांनी
— रचना : राधा गर्दे. कोल्हापूर
2) आषाढ..
आषाढाची सर
आली सरसर
भिजले अधर
धरतीचे…
भिजली ही माती
ओलवली भुई
सुखावली राई
पानोपानी..
आषाढ सरींचा
ओघवता ओघ
पाण्याची ती रेघ
भिजविते.
आषाढ सरींची
जिवलग माया
धरतीची काया
सुखावते.
— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
3) निसर्गाची वारी
निसर्गाची वारी | डोंगराचे वरी
येती प्रेम सरी | झुळझुळ ||१||
सौंदर्यांचा शेला | पांघरूण घेई
मोद जना देई | ठायी ठायी ||२||
वनराई देई | रानमेवा सर्वा
जन करा पर्वा | सदोदित ||३||
सोसाट्याचा वारा | मदनाचा बाण
आंगोपांगी छान | स्वाभिमान ||४||
हितगुज करी | फेसाळत्या सरी
मोद मनावरी | प्रसन्नत्वे ||५||
भजनाचा ताल | नदी संथ वाही
सागर प्रवाही | मिलनात ||६||
विटेवरी उभा | बाप पांडुरंग
सदा होई दंग | भक्तांवरी ||७||
निसर्गाची वारी | अवखळ वाटे
देहे येती काटे | वादळात ||८||
प्लास्टिक कहर | सागर किनारी
राक्षसाची वारी | विंवचना ||९||
आत्मबोध घ्यावा | निसर्ग पहावा
क्रांतीने फुलावा | कर्तव्यात ||१०||
— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई
4) पावसाची धार आली
पावसाची धार आली
तृप्त धरती गार झाली
थेंब फुल पानी सरींचे
छान मोती माळ झाली
चिंब झाले अंग सारे
गंध वेली धुंद झाली
मोकळ्या केशी कपाळी
मोतियाची मांदियाळी
बहरलेली अंकुरे ती
यौवनी भारावलेली
रंग गंधा च्या नशेने
धुंद झाली चिंब झाली
आसमंती सोहळा हा
पावसाळ्याची दिवाळी
ग्रीष्म झाला शांत आता
या ढगांची मस्त होळी
— रचना : विजय पांढरीपांडे. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
