“इमॅन्युएल कान्ट“
इमॅन्युएल कान्ट हे १८ व्या शतकातील अत्यंत महत्त्वाचे प्रभावशाली जर्मन तत्वज्ञ होत. टीकात्मक तत्त्वज्ञानामध्ये त्यांना रुची होती. नंतरच्या काळात त्यांनी प्राकृतिक भूगोल आणि मानववंश शास्त्र याचा देखील अभ्यास केला. इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, यांच्या शिवाय मानव पृथ्वी विषयी संपूर्ण माहिती मिळवू शकत नाही असे त्यांचे ठाम मत होते.
इ. स. १७२४ मध्ये २२ एप्रिल रोजी इमॅन्युएल कान्ट यांचा जन्म तत्कालीन अखंड जर्मनीचा भाग असलेल्या क्योनिग्सबर्ग येथे झाला. हा भाग आत्ताच्या रशिया खंडात येतो. ॲना रेजीना रॉयटर ही त्यांची आई आणि योहान गोर्ग कान्ट हे त्यांचे वडील असे दोघेही प्रोटेस्टंट शाखेच्या लुथरन (म्हणजे मार्टिन ल्यूथर ने प्रणित) उपशाखेला मानणारे होते. धर्म आणि धार्मिक जीवन म्हणजे साधेपणाने आणि नैतिकतेने जगणे अशी त्यांची धारणा होती. इमॅन्युएल ह्यांच्या तात्विक सिध्दांतांचा उगम बहुदा येथेच असेल. ह्या धार्मिक जोडप्याला एकूण ९ मुले झाली, इमॅन्युएल हे त्यातील चवथे आणि जगलेल्या मुलांमध्ये थोरले. त्यांचे बालपण अत्यंत भक्तिमय, धार्मिक परंपरा पाळणारे आणि शिस्तबद्ध पद्धतीने गेले. लहानपणी त्यांना अभ्यास, वाचनात रस होता, लॅटिन तसेच धार्मिक ग्रंथाचा अभ्यास ह्यावर त्यांच्या शिक्षणात भर होता.
इमॅन्युएल यांनी १७४० मध्ये पदवी शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी क्योनिग्सबर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यापुढील बराच काळ ते तिथेच राहिले. प्रथम विद्यार्थी दशेत तर नंतरच्या काळात प्राध्यापक भूमिकेत. त्यांनी दोन वेळा विवाहबद्ध होण्याचा विचार केला पण त्याचा विवाह मात्र झाला नाही. त्यांचे सामाजिक जीवन प्रेमळ मित्र परिवार आणि आदर सन्मान देणारे विद्यार्थी ह्यांनी भरलेले होते. मार्टिन क्नुट्झेन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गॉटफ्रीड लाईबनिझ आणि ख्रिस्तीयन वूल्फ ह्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. १७४६ मध्ये वडिलांचे आजारपण आणि यथावकाश मृत्यू यामुळे त्यांच्या अध्ययनात व्यत्यय आला परंतु त्यांचे स्वअध्ययन आणि लेखन त्यांनी नित्य नियमाने चालू ठेवले होते. १७४५ ते १७४७ या काळात त्यांना त्यांचे स्वतःचे लेखन केले, जे १७४९ मध्ये प्रकाशित झाले. त्या पुस्तकाचे नाव Thoughts on the True Estimation of Living Forces असे आहे ज्यात ते निसर्ग आणि नैसर्गिक तत्वज्ञान ह्या विषयावर अभ्यासू वृत्तीने केलेलं परीक्षण मांडतात.

पुढील काळात इमॅन्युएल यांनी अनेकविध विषयांवर लेखन केले. त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी तत्कालीन साहित्यिक जगतात तत्वज्ञानाविषयी कोणाची काय मते होती ते समजून घेऊ या.
सतराव्या शतकापासून 19 व्या शतकापर्यंत पाश्चात्य जगतात ज्ञानमीमांसेचा ऊहापोह शिगेला पोहोचला होता. प्रत्यक्षानुभव म्हणजे ज्ञान हे प्लेटो ने नाकारले होते. फ्रेंच तत्ववेत्ता रने डेकार्तने यथार्थ ज्ञानाप्रत पोहोचण्याचा मार्ग म्हणून संशय पद्धतीचा उपयोग केला होता, ज्याला बुद्धिवादी किंवा विवेकवादी असे नाव देण्यात आले होते. तर जॉन लॉक, जॉर्ज बर्कली आणि डेव्हिड ह्यूम यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी अनुभवातून मिळते ते ज्ञान असे मत मांडले होते.

इमॅन्युएल कान्टनी मात्र या सगळ्याचा सुवर्णमध्य काढून दोन्ही परस्परविरोधी परंपरेमध्ये समन्वय साधला. प्रदीप गोखले त्यांच्या ज्ञानमीमांसा (epistemology) या लेखात इमॅन्युएल कान्टच्या तत्त्वज्ञानाबद्दल बोलताना अतिशय समर्पक शब्दात म्हणतात, यथार्थ ज्ञान अनुभवानेच सुरू होते; पण ते अनुभवाने निश्चित होत नाही. ज्ञानाचा आशय अनुभवातून किंवा अंत:प्रज्ञेतून प्राप्त होतो; पण ज्ञानाला एक अनुभवनिरपेक्ष आकारही असतो, मग तो काल व अवकाश यांचा असेल किंवा द्रव्य, परिमाण, कार्यकारणभाव यांसारख्या अनुभवनिरपेक्ष आकलनकोटींचा (Categories of Understanding) बनलेला असेल. कांटने बुद्धीचे सामर्थ्य आणि मर्यादा या दोन्हींची मीमांसा केली.
कांटने ज्ञानाचे दोन प्रकारे वर्गीकरण केले. एका वर्गीकरणानुसार ज्ञान एकतर आनुभविक तरी असते किंवा अनुभवनिरपेक्ष तरी. दुसऱ्या वर्गीकरणानुसार ज्ञान एकतर संश्लेषणात्मक (synthetic) तरी असते किंवा विश्लेषणात्मक (analytical) तरी. संश्लेषणात्मक ज्ञान वास्तवाविषयी माहिती देणारे असते, तर विश्लेषणात्मक ज्ञान हे त्यात अंतर्भूत संकल्पनांच्या आंतरिक संबंधांमुळे सत्य असल्याने वास्तवाविषयी वेगळी माहिती देत नाही. कांटने दावा केला की, वरील दोन वर्गीकरणे एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत. म्हणजेच ‘संश्लेषणात्मक पण अनुभवनिरपेक्ष’ ज्ञान शक्य असते. कांटचा हा दावा हे त्याचे ज्ञान मीमांसेतील महत्त्वाचे योगदान मानले जाते.
१७८१ नंतरच्या काळात इमॅन्युएल कान्टचे मूलभूत असे तीन टीकात्मक निबंध किंवा सिद्धांत प्रकाशित झाले. त्यातील पहिला म्हणजे क्रिटिक ऑफ प्युअर रिसन (Kritik der reinen Vernunft). दहा वर्षांपेक्षा जास्त काळ विचार आणि चिंतन करून सरतेशेवटी तयार झालेली ही कृती असली तरीही कांट ही प्रकाशित करायला तयार होत नव्हते कारण त्यांना हेच आणि एवढेच सांगायचे आहे का ह्याची खात्री नव्हती.
दुसरा निबंध क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिसन (Kritik der praktischen Vernunft) १७८८ मध्ये प्रकाशित झाला. ह्यात ते प्रतिपादित करतात की तत्त्वमीमांसेचा सूक्ष्म अभ्यास देवाचे अस्तित्व व पुनर्जन्म ह्यावर विश्वास ठेवण्याकडेच घेऊन जातो. अर्थातच यात नैतिकता, खरेपणा अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते आणि कांट ह्यांनी अत्यंत सविस्तर आणि सूक्ष्म पद्धतीने विचार करून ह्या सर्व संकल्पना मांडल्या आहेत.

तिसरा निबंध क्रिटिक ऑफ जजमेंट (Kritik der Urteilskraft) १७९० मध्ये प्रकाशित झाला. ह्यात ते न्याय, निर्णय, निवड ह्याबद्दल तात्विक चर्चा करतात. बुद्धीच्या पातळीवरील ‘समज’ (Verstand) आणि स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याची क्षमता (Vernunft) अशा दोन महत्त्वाच्या बाबी ह्यात सखोल अभ्यासल्या आहेत.

सतरावे शतक जेव्हापासून पाश्चात्य जगतात ज्ञानोदय युग सुरू झाले. त्या काळातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली तत्त्वज्ञ, दार्शनीक म्हणून इमॅन्युएल कान्ट यांची गणना होते. तत्त्वज्ञानासारख्या अत्यंत किचकट तरीही आत्मिक समाधान आणि आनंद देणाऱ्या विषयाचा इतका सखोल अभ्यास इमॅन्युएल कान्ट सारखे बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वच करू शकते. १२ फेब्रुवारी १८०४ रोजी त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला परंतु त्यांच्या विचारांमुळे, साहित्यामुळे संपूर्ण जगभरात ते त्यांच्या ज्ञानाच्या रूपात सदैव जीवित आहेत.
त्यांच्या तत्वज्ञानावर आधारित काही सुंदर विचार तुम्ही येथे बघू, ऐकू शकता.

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800