“अॅन फ्रँक”
“द डायरी ऑफ ए यंग गर्ल” ह्या नावाने जे पुस्तक गेली अनेक दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे ते म्हणजे “अॅन फ्रँक” ह्या लहान मुलीचे गुप्त स्थळी लपून राहिलेली असतानाचे हृदयद्रावक अनुभव आहेत.
12 जून 1929 रोजी या “अॅन फ्रँक” चा जर्मनीमधील फ्रॅंकफुर्ट शहरात जन्म झाला. अत्यंत गोड आणि हसरा चेहरा, बोलके डोळे आणि लोभस वाणी यामुळे ती शाळेत लोकप्रिय होती. स्वतः नेहमी आनंदी असलेली ती सगळीकडे आनंद पसरवायची. ती, तिचे वडील ओटो फ्रँक, आई एडिथ आणि मोठी बहीण मार्गो असे त्यांचे ज्यू अर्थात यहुदी धर्मीय चौकोनी कुटुंब जर्मनी मध्ये आनंदाने नांदत होते.

परंतु अॅन फ्रँक अवघी चार वर्षाची असताना तिला तिच्या कुटुंबासमवेत अमस्टरडॅम, नेदरलँड येथे स्थलांतरित व्हावे लागले कारण 1933 मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ता स्थापन केल्याने ज्यू लोकांचे राहणे अवघड होऊन गेले. पहिल्या महायुद्धात जर्मनी हरली; त्याचे खापर हिटलरने ज्यू धर्मीय लोकांवर फोडले आणि म्हणूनच त्यांचा छळ सुरू केला. इतका की त्यांना जगणे अशक्य झाले. त्यांच्या दैनंदीन आयुष्यात अनेक बंधने घातली, मुलांचे शाळेत जाणे बंद केले, करमणुकीचे कार्यक्रम, सिनेमा इत्यादी ठिकाणी जाणे बंद केले इतकेच काय ज्यू लोक बाहेर पडले, नियम मोडले तर त्यांना तात्काळ गोळी घालून मारून टाकायला लागले. म्हणूनच फ्रांक कुटुंबाने जर्मनी सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु दुर्दैवाने 1940 मध्ये जर्मनीने नेदरलँड या देशावर सुद्धा सत्ता मिळवली आणि फ्रॅंक कुटुंब तिथेच अडकले. कुटुंब प्रमुख ह्या नात्याने ओटो फ्रॅंक यांनी कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीतील गुप्त खोल्यांमध्ये सर्वांना लपवून ठेवले. कार्यालयात असलेल्या पुस्तकांच्या कपाटाच्या मागे एक चोर रस्ता होता तिथेच अंधाऱ्या आणि लहानशा जागी हे कुटुंब लपून वास्तव्याला होते. फ्रँक कुटुंबाबरोबर अजून एक कुटुंब देखील त्या गुप्त ठिकाणी राहायला आले.
अॅन च्या तेराव्या वाढदिवसाच्या दिवशी एक सुंदर लाल पांढरी दैनंदिनी तिला भेट म्हणून मिळाली होती. त्यातच तिने १२ जून १९४२ पासून १ ऑगस्ट १९४४ पर्यंत काही नोंदी करून ठेवल्या. तिने आपल्या डायरीला किटी असे नाव दिले होते. या दैनंदिनीमध्ये तिने अनुभवलेल्या अनेक प्रसंगांचे वर्णन केले आहे. अचानक स्वातंत्र्य हरवून गेलेल्या त्या कोवळ्या जीवाने रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी जसे की बाहेर जाण्याची परवानगी नसणे, खायला पुरेसे अन्नधान्य नसणे, कपडे लहान होत चालले आहेत पण तरीही इलाज नाही म्हणून तेच तोकडे कपडे घालायला लागले अशी व्यथा मांडली आहे. तिथे राहताना पकडले जायची भीती, सैनिकांची मारामारी, तोफांचे आवाज, युद्धाचे विदारक वास्तव जवळून बघताना जीवाची झालेली घालमेल हे देखील स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच तिचे कौटुंबिक जीवन, तिच्या आईबरोबर तसेच तिच्या मोठ्या बहिणीबरोबरचे तिचे संबंध, त्यांच्यात होणारे वाद, दुसऱ्या कुटुंबातील मुलगा पीटरवर तिचे असलेले प्रेम, एकूणच तिचे भावविश्व तिने मोकळेपणाने व्यक्त केले आहे. वयात आलेल्या मुलीचे भाव भावना कींतू परिस्थितीची साथ नसल्याने तिच्या कोवळ्या मनावर खोलवर होणारे परिणाम त्यातून झालेले वैचारिक मंथन असे बरेच काही त्यात वाचायला मिळते. तिने स्वतः साठी रंगवलेली स्वप्ने, पुढील आयुष्यात गाठायची ध्येये सुद्धा तिने नमूद केली आहेत. हे असे जगणे म्हणजे जगणे नाहीच अशी धारणा असलेली अॅन सूर्यप्रकाश पाहण्यासाठी, मोकळ्या आकाशाखाली उभे राहण्यासाठी मनोमन झुरत होती असे तिने लिहिले आहे. मोठी होऊन लेखिका व्हायचे स्वप्न ती बघत होती. जगाला प्रेरणा द्यायची उमेद तिच्या डोळ्यात होती. पण झाले ते सगळे विपरीतच.
कोण्या एका व्यक्तीने विश्वासघात केला आणि नाझी सैनिकांनी त्या सर्वांना पकडले. ४ ऑगस्ट १९४४ ला सगळ्यांनाच अटक करण्यात येऊन त्यांना आऊशस्वित्झ येथील छळ छावणी मध्ये रवाना केले गेले. स्त्रीया आणि पुरुष ह्यांना वेगळे करण्यात आले. त्यामुळे अत्यंत जवळीक असलेल्या तिच्या लाडक्या वडीलांपासून तिची ताटातुट झाली. नंतर आईला तिथेच आऊशस्वित्झ मध्ये ठेवण्यात आले तर दोघी मुलींना दक्षिण जर्मनी मध्ये असलेल्या बर्गन बेलसन नावाच्या छळ छावणीत पाठवले गेले. ह्या सर्व गडबडीत तिची दैनंदिनी मात्र तिथेच राहून गेली जिथे ते राहत होते. १ ऑगस्ट १९४४ ची तिची दैनंदिनी मधील शेवटची नोंद आहे तेव्हा ती लिहिते, “लोक तुम्हाला तुमचे तोंड बंद ठेवण्यास सांगतील पण ते तुम्हाला तुमचे मत व्यक्त करण्यापासून रोखू शकत नाहीत.” चिमुरड्या अॅनच्या लेखणीतून असे उद्गार म्हणजे नवलच, नाही का ?

कालांतराने ६ जानेवारी १९४५ रोजी आई एडिथचा उपासमारीने मृत्यू झाला. फेब्रुवारी मार्च दरम्यान बाहेरील परिस्थिती बदलल्याने वडील ओटो फ्रँक ह्यांची आऊशस्वित्झ मधून सुटका झाली. इकडे बर्गन बेलसन मध्ये त्याच दरम्यान टायफस नावाचा रोग पसरल्याने, खाण्याचे हाल झाल्याने व थंडी पासून संरक्षण करू न शकल्याने मार्गो व अॅन दोघींचा आळीपाळीने जीव गेला. एका दुर्दैवी कुटुंबाचा अंत झाला, फक्त ओटो जिवंत राहिले. त्यांच्या काही हितचिंतकांनी त्यांना गुप्त ठिकाणी जे त्यांचे सामान आणि कागदपत्रे होती ती दिली आणि त्यात अॅनची दैनंदिनी होती.
एकटे पडलेल्या वडिलांनी कशीबशी अॅनची दैनंदिनी बराच वेळ घेऊन वाचली. मित्रांच्या सांगण्यावरून आणि तिने लेखिका बनण्याचे लिहून ठेवलेच होते म्हणून त्यांनी ती पुस्तक रूपात प्रकाशित केली.

अॅन फ्रँकने लिहिलेली ही दैनंदिनी मूळ डच भाषेत आहे. या दैनंदिनीचे प्रथम प्रकाशन १९४७ मध्ये झाले. १९५२ मध्ये इंग्रजी भाषांतर अमेरिकेमध्ये प्रकाशित झाले व नंतर ७० पेक्षा अधिक भाषांमध्ये या दैनंदिनीचे भाषांतर झालेले आहे.
मराठीमध्ये मंगला निगुडकर यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे. आजपर्यंत ३० लाखांपेक्षा अधिक वाचकांनी हे पुस्तक वाचले आहे. काही शाळांमध्ये तर इतिहास शिकण्यासाठी ह्या पुस्तकाचा रीतसर अभ्यास केला जातो.
अॅन फ्रॅंक हिने तिच्या दैनंदिनीत लिहिलेला लहानसा मजकुर येथे देत आहे. ….
“जोपर्यंत जग आहे हा सूर्यप्रकाश आणि हे आकाश आहे जोपर्यंत मी त्यांचा आनंद घेऊ शकते तोपर्यंत मी दुःखी कशी राहू शकते ? घाबरलेल्या, एकाकी आणि दुःखी असलेल्या प्रत्येकाने ढग, निसर्ग आणि देव यांच्या सानिध्यात एकट्याने जाणे चांगले. मग तुम्हाला वाटेल की जे व्हायचे आहे तेच हे आहे. निसर्गाच्या सौंदर्यात आणि साधेपणात तुम्ही आनंदी राहावे अशी देवाची इच्छा आहे.”
इतके प्रगल्भ विचार पंधरा वर्षाच्या मुलीने तिच्या दैनंदिनीमध्ये लिहून ठेवले आहेत, यावर कदाचित विश्वास बसणार नाही म्हणूनच खात्री करून घेण्यासाठी तिची ही दैनंदिनी सगळ्यांनी नक्की वाचली पाहिजे. तिच्याबद्दल अजून जाणून घेण्याची इच्छा असल्यास खाली दिलेल्या लिंकवर तिची आत्मकथा ऐका.
https://youtu.be/s5g1J6MNQWo?si=Nx1LeKpp6gW2P5Gl
क्रमशः

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
I liked Anne’s msg hw to live happily with nature. But hw they lived that is beyond imagination
अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी लिखाण आहे असेच लेख लिहित जा जेणेकरून आम्हाला भारताबाहेर असलेल्या लेखकाच्या बदल माहिती मिळत राहील त्यानिमित्ताने आपण किती सुखी आहोत याची प्रचिती येते. जु लोकांना कशी वागणूक दिली जात होती त्या संदर्भात दूरदर्शन वर एक डॉक्युमेंटरी देखील पाहिल्याचे आठवते अतिशय विदारक….असो
Anne Frank हिच्या बद्दल जेवढी माहिती ऐकली होती त्याहून अधिक माहिती आजच्या ह्या लेखातून मिळाली..धन्यवाद. Waiting for next one.
अन् फ्रॅंक बद्दलची माहीती वाचून विपरीत आणी प्रतिकुल परीस्थिती असतांनाही जीवन जगता येते. आणी आहे त्या परीस्थितीत खंबीर राहणे. या लोकांना सलामच केला पाहीजे.
लेखिका प्रा. आशी नाईक या जगात आगळ्या वेगळ्या आणी वैशिष्ट्यपुर्ण असलेल्या व्यक्तिंचा परीचय करून देत आहे. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे. खूपच छान उपक्रम आहे. धन्यवाद !!!
आज पर्यन्त Anne Frank बद्दल थोडे ऐकले होते त्या पेक्षा बरीच माहिती आज तुमच्या ह्या लेखातून मिळाली..धन्यवाद.. waiting for next one.