दुर्गेचे सातवं रूप, सातवी शक्ती ‘कालरात्री माता देवी’ आहे. देवी कालरात्रीचे रूप अंधार्या रात्रीप्रमाणे काळसर, केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे. काळे शरीर असलेली व तीन डोळे असलेली, केशसंभार विखुरलेली, वाहन गर्दभ. खड्ग धारण केलेली, भयानक असे तिचे रूप आहे.
कालरात्री देवी चतुर्भुज आहे. उजव्या हाताची अभय मुद्रा दुसर्या हाताची वरमुद्रा आहे. डाव्या हातात लोखंडाचा काटा आणि दुसर्या हातात तलवार आहे. जेव्हा ती श्वास घेते तेव्हा तिच्या नाकपुड्यातून ज्वाला निघतात. देवी पार्वतीने कालरात्री देवीने उग्र आणि क्रूर रूप धारण करून भयंकर अशा दूष्ट शुम्भ आणि निशुम्भ राक्षसाचा वध केला.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी या देवीचे पूजन करतात. माता कालरात्री देवीला लाल वस्त्रावर ठेवले जाते, जे तिच्या उग्र परंतु परोपकारी स्वभावाचे प्रतीक आहे. गंगाजलाने ती जागा पवित्र केली जाते, तुपाच्या दिव्याच्या मंद प्रकाशाखाली, भक्तगण भजन स्तोत्र म्हणतात. देवीला अक्षता आणि चंदन, सुवासिक रातराणीची फुल अर्पण करतात. आरती नंतर मंत्र आणि भजनांसह कापूर आणि दिवा लावला जातो. दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण आणि माता दुर्गा च्या मंत्रांचा जप करतात. मंत्र पठणासाठी लाल चंदनाची किंवा रुद्राक्षाची माळ वापरतात.
कालरात्री देवी ‘सहस्त्रार’चक्राशी संबंधित आहे. मस्तकावर (मुकुट चक्र) बरोबर मध्यभागी मुकुट स्थानी ती स्तिथ आहे.
कालरात्रीदेवीच्या उपासनेने भक्तांना सिद्धि आणि निधि प्राप्त होते. भक्ताच्या मनातली भीती दुर होत, अज्ञान व तणाव निघून जातात.
कालरात्री देवीला प्रसाद म्हणून गुळ किंवा गुळाचे पदार्थ नेवैद्य म्हणून दाखवले जातात. कालरात्री माता, नागदवणी वनस्पतीची संबंधित आहे. कालरात्री माताचे अति प्राचीन प्रसिद्ध मंदिर कालका, काशी येथे आहे.
क्रमशः
— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800