नभ अत्तराचे झाले
मन निळाईत न्हाले
सुटे मातीला गंध
रान गवताचे ओले
असा गहिवर दाटे
झाड रानात भरात
भुई ओलेती अजाण
दव टिपूर पानात
ओले नभ ओली धरा
लता वेली ओलसर
अंगोपांगी तृप्त रान
हासे धरेचे अधर
ऊन तलम केशरी
करी अलवार स्पर्श
नभ देखता भुईस
होई नवखासा हर्ष

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800