Sunday, July 20, 2025
Homeसाहित्यपाऊस : काही कविता…

पाऊस : काही कविता…

१. “असा पाऊस प्रेमाचा”

असा पाऊस अगाऊ
दैना दैना केली बाई,
‘अरे…पुरे’ म्हणता मी…
त्याची भलतीच घाई !

असा पाऊस खोडीचा
वरुनच मजा पाही,
‘अरे…ये रे’ म्हणता मी…
पाठ फिरवून जाई !

असा पाऊस लाडोबा
डोक्यावर बसू पाही,
‘अरे…कारे’ म्हणायची…
जरासुद्धा सोय नाही !

असा पाऊस सज्जन
आल्याविना -हात नाही,
‘बरे…बरे’ म्हणायची…
लबाडाची जात नाही !

असा पाऊस प्रेमाचा
नाथ, स्वामी, सर्व काही,
‘अरे…तुरे’ म्हणताना…
लाज मना वाटे बाई !

— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई

२. !!! दुबार पेरणी !!!

कसंबसं एकदाच रानात
बिनधास्त पेरलं बियाणं
पावसानं फिरवली पाठ
हे पोट भरणार कशानं.

लगबगीने आनंदात आशेने
भरली काळ्या आईची ओटी
शेतकरी  झटत असतो
टिचभर पोटासाठी.

पावसा पावसा असा ऐनवेळी
नको नको मारू जीवघेणी दडी
पडू दे रे आनंदाच्या सरी
बसुदे आयुष्याची घडी.

— रचना : भागवत शिंदे पाटील. उक्कडगांवकर.

३. पाऊसही आहे साक्षीदार

लग्नानंतरचा पहिला पाऊस
भिजण्याची आता फिटेल हौस

नव्या संसाराची पहिली चाहूल
दोघांच्या सोबतीचे पहिले पाऊल

पहिल्या पावसाच्या सरी
देई जगण्यास नवी उभारी

ओलं चिंब अवघे रान
जपू पवित्र नात्याचा मान

फक्कड चहा, गरम भजी
एकमेका सांभाळण्यास आम्ही राजी

सात जन्माच्या बांधल्या गाठी
हा जन्म केवळ तुझ्यासाठी

पाऊस असे तो लहरी
मात्र आपली प्रीत गहरी

घेतला तुझा हातात हात
आयुष्यभर देईल साथ

भावनिक स्पर्शाचा सजला पूल
प्रेमाची ही अलगद चाहूल

जसा पाऊस कधी देतो हूल
जपतो आमच्यातील अल्लड मूल

आपल्या भेटींचा जुळला सूर
गप्पा गोष्टींचा ही आला पूर

मनी लागे ही हुरहूर
नको जाऊ सोडून दूर

पावसात मस्त आता खेळू
सुख दुःख मिळुनी झेलू

आज उगड मनीचे द्वार…
पाऊसही आहे साक्षीदार…

— रचना : रश्मी हेडे.

४. पाऊस आणि ती…..

तुला  पावसात पाहताना
मला फार हेवा वाटतो
तो तुझ्या रोमारोमांना स्पर्शतो
मी तुझ्यावाचून पोरका होतो

भिजलेली ती आता दूर जाते
मी इथे एकटा अपूर्ण
पण ती मात्र
पावसाला पूर्ण करते

वाट तिची पाहतात सारे
माझे मन, घर, आडोसा
ती बैठक तो चहा……
ती म्हणते मात्र  वाट पहा….

आगमन तिचे होते
गुलमोहरही फुलतो
रखरखत्या उन्हात जसा
वसंत बहरतो

मैफिल आमची 
ती एकटीच रंगवते
तिच्या समोर असण्याने
माझी काया शहरते

असा मी होऊन दंग
तिच्यात पार बुडून जातो
तिच्या तिरप्या नजरेने
तरुन जातो…

प्रहर पुढे सरकतो
मिठीत घट्ट मिटलेले वस्त्र
विलग होऊ लागतात
ओले केस  गाणी गातात

पाऊल आता पुढे सरकते
माझ्या नजरेस एक गोष्ट पडते
तिच्या देहावरी तिळ 
मलाच इशारा करती….

नजरेतूनच आता मी
अंतर आमच्यातले गाठतो
अंतराला मी अंतर देतो
हरवलेले भान स्थिर करतो..

— रचना : सायली शेंडे. डोंबिवली

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?