Wednesday, October 9, 2024
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

ययाति कन्या माधवी

“ययाती कन्या माधवी” ही कादंबरी मला अतिशय आवडलेल्या ‌कादंबऱ्यापैकी एक आहे. ही कादंबरी आवडण्याची अनेक कारणं आहेत. कादंबरीच्या नायिके बरोबर झालेला अन्याय आणि त्याचे कथानक. लेखिकेने केलेली कथेची अप्रतिम गुंफण. स्त्री मनाची चलबिचल, अनेक प्रसंगाचे इतके सुंदर वर्णन की ते प्रसंग जणू आपल्या समोर घटित होत आहेत हे जाणवणं, मानवी मनाचं उत्तम विश्लेषण, नवीन जन्माला आलेल्या अर्भकाला सोडून जाताना एका आईचा विलाप, नायिकेचा राग आणि तरीही पुन्हा थोरांची आज्ञा शिरसावंद्य असणं ही आणि अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे एकदा हातात घेतलेली ही कादंबरी सोडवत नाही.

मनाची व्याकुळता वाढवणारी, अनेकदा अश्रूंना वाट करून देणारी, हुरहुर लावणारी ही कादंबरी. सतत विचार करायला लावणारी ही “ययाती कन्या माधवी”.

ययाति कन्या माधवीची जीवन गाथा खूपच अघटित घटनांनी भरलेली. ययाति सारख्या राजाची कन्या आठशे चंद्र शुभ्र, शाम कर्ण असलेल्या अश्वांसाठी, एका नंतर एक एक राजांची पत्नी होऊन आणि प्रत्येक राजाला एक चक्रवर्ती पुत्र देऊन आयुष्य कंठणारी.

तू सदैव चिरयौवना आणि चिरकुमारिका रहाशील हे वरदान तिला पुढे वारांगनेसारखं आयुष्य जगावं लागणार, जणू हेच भाकित करणारं होतं.

गालव मुनिंना ऋषी विश्वामित्रांची गुरुदक्षिणा देण्यासाठी आठशे चंद्र शुभ्र, शाम कर्ण असलेले अश्व हवे होते. राजा ययातिकडे ही मागणी घेऊन आलेले ऋषी जर रिक्त हस्ताने परत गेले तर आपली नामुष्की होऊन, इतिहासात आपलं नाव नेहमीसाठी खराब व्हायला नको म्हणून आपली सौंदर्यवती राजकन्या, राजा ययाति, गालव मुनिंना दान देतात आणि सांगतात, “तिला एखाद्या राजाला देऊन, मोबदला म्हणून आठशे इच्छित अश्व मिळवा.”

हस्तिनापुरात, वसंतोत्सवात आलेल्या मद्रदेशाच्या राजकुमार अंबरीशला हृदय देऊन बसलेली माधवी वडिलांच्या वाचनासाठी सगळं सोडून गालव ऋषींबरोबर निघते. तेव्हा तिच्या मनावरचे आघात तिच्या आई देवयानी पेक्षा शर्मिष्ठा जास्त समजत असते.

माधवीचं दुर्दैव तिला तीन ठिकाणी फिरवून आणि प्रत्येक ठिकाणी फक्त दोनशे अश्व मिळवून, शेवटी न मिळालेल्या दोनशे अश्वांच्या मोबदल्यात, ऋषी विश्वामित्राची भार्या होण्यासाठी आश्रमात घेऊन येतं. ह्या सगळ्यात तिचं खरं आणि पहिलं प्रेम, प्रेमाच्या भेटवस्तू सगळं सगळं मागेच रहातं.

पहिल्यांदा ती पोहोचते ईक्ष्वाकुवंशीय राजा हयर्श्वकडे. पण त्याच्याकडे चंद्र शुभ्र, शामकर्ण दोनशेच अश्व असल्याने एक चक्रवर्ती पुत्रास जन्म देऊन तिला तिथून निरोप घ्यावा लागणार ह्या करारात ती अडकते. नव अर्भकास सोडून जातानाचा तो क्षण हृदय पिळवटून टाकणारा आहे. तिचं मन राजात अडकलं असून ही ममत्व आणि प्रेम ह्यातून नियती तिला दूर खेचून नेते. उरात दूध साठलेलं तसंच राहतं.

काही दिवसांनी काशीदेशीय दिवोदास ह्यांच्याकडे पोहोचताच परत तसाच अनुभव. फक्त दोनशेच चंद्र वर्ण,शाम कर्ण अश्व ह्यांच्या मोबदल्यात तिला एक पुत्रास जन्म देण्यासाठी तिथे अनेक राण्या आणि पुत्र असून ही राहणं भाग असतं. त्या राण्यांच्या दुस्वासाचा भोग माधवी भोगते. त्यांना दासीच्या हाताचं पाणी चालतं पण माधवीच्या हाताचं नाही. पुन्हा तीच पुनरावृत्ती. पुत्र जन्म होताच गालव मुनी घेण्यास येतात.

पुन्हा उरलेल्या अश्वांकरिता तिसरीकडे रवानगी. भोजनगरीत, उशीनरांकडे. जर इथे उरलेले अश्व मिळाले तर माधवी पुन्हा आपल्या पित्याकडे जाऊ शकणार होती पण नाही. दुर्दैव तिथे ही आडवं आलं फक्त दोनशे अश्वां ऐवजी पुत्र हा करार झाला. परत आईची ममता हरली.

अशात कळतं की ह्या पृथ्वीतलावर फक्त सहशेच चंद्र शुभ्र, शाम कर्ण अश्व आहेत. मग आपली गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी, उरलेल्या दोनशे अश्वांसाठी गालव मुनी, ऋषी विश्वामित्रांकडेच रवानगी करतात माधवीची. इथे माधवी ऋषीं विश्वामित्रांबरोबर वाद घालते, “जर इतके अश्व ह्या पृथ्वीतलावर नव्हतेच तर ही गुरूदक्षिणा तुम्ही का म्हणून मागावी ?”
हा तिचा जळजळीत प्रश्न माधवी विचारते आणि ते तिचं सांत्वन करतात. इथे मात्र तिच्या संमतीने त्यांचं मिलन होऊन एक सर्वगुणसंपन्न पुत्र जन्मास येतो आणि गुरुदक्षिणा पूर्णपणे प्राप्त झाल्याने माधवीची रवानगी पुन्हा तिच्या पित्याकडे म्हणजे राजा ययतीकडे होते.

ययाती परत आलेल्या माधवीच्या स्वयंवराचा घाट घालतात. माधवी मात्र ऋषी विश्वामित्रांचा आश्रम जवळ करते. इतकं होऊनही दुर्दैव माधवीची पाठ सोडत नाही. तिची तीन्ही मुलं ऋषी विश्वामित्रांच्या आश्रमात पठनासाठी येणार असल्याची बातमी येते आणि “तुझी ममता जागृत होऊन त्यात तू अडकशील” हा मुद्दा सांगून तिला आश्रमातून जाण्याचा सल्ला दिला जातो.

आता माधवी कुठे जाणार ? पुढे काय होतं ? तिचे भोग संपतात का ? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ही कादंबरी वाचावी लागेल. प्रत्येक राजाकडे राहून, पुत्राला जन्म देऊन त्या लहानग्या जिवाला टाकून दुसरीकडे जाताना तिची अवस्था, राग, चीड, सगळं वर्णन मन हेलावून टाकणारा आहे. पुढचं जीवन ही संघर्षमयच.

दान म्हणून देणारा पिता, एका पुत्रासाठी तिला स्वीकारणारे राजा, तिला गृहीत धरून चार ठिकाणी विकणारे गालव मुनि आणि आपल्या शिष्यास अशक्य अशी गुरुदक्षिणा मागणारे विश्वामित्र. हे सारं वर्णन पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रीवर लादलेले धर्मपाश आणि बंधन दर्शविणारे आहे.

राजकन्या असून माधवी एका वारांगनेसारखी, गणिकेसारखी रहात असताना तिचे मानसिक द्वंद्व, तिचा न आवरणारा राग, गालव मुनींशी घातलेले वाद हे सारं वर्णन काळजाला भिडतं. कादंबरीचा शेवट ही चटका लावून जातो.
ही कादंबरी प्रत्येक वेळेस घटनेच्या दोन बाजू दाखवते. एक घटना घडली तशी आणि दुसरी बाजू माधवीचं मन जाणून घेणारी.
लेखिकेने सारीच कथा अशा काही पध्दतीने लिहिली आहे की एकदा सुरुवात केली की ती पूर्ण संपविल्या शिवाय सोडवत नाही.
भाषा त्याकाळाला साजेशी असणार हे सांगण्याची गरजच नाही.
एकदातरी ही कादंबरी वाचावी….

राधा गर्दे

— परीक्षण : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments