‘लखोबा सावकार’
‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ आणि ‘लढता लढता करोनाशी…. रक्ताळलेल्या वाटा’ या दोन पुस्तकांनंतर डॉ मोहन दिवटे यांची ‘लखोबा सावकार’ ही १२८ पृष्ठांची ग्रामीण वास्तववादी शोकात्म कादंबरी सकाळ प्रकाशन, पुणे यांनी नुकतीच नेटक्या स्वरुपात प्रकाशित केली आहे.
प्रस्तुत कादंबरीतील लेखनशैली विलक्षण ओघवती असून त्यातील अक्करमाशी म्हणून हिणावला गेल्यामुळे न्यूनगंडातून अधिकाधिक आक्रमक व वाम मार्गाला जाणार्या लखोबाची शोकात्म व्यक्तिरेखा लेखकाने अत्यंत प्रभावी व प्रवाहीपणे रेखाटली आहे. व्यक्तिरेखेबरोबर समकालीन गावकीसह ग्रामीण राजकारण आणि त्यातील छोटे छोटे बारकावे लेखकाने अत्यंत ओघवत्या शैलीत मांडले आहेत. ते मुळातच वाचण्यासारखे आहेत. व्यक्तिरेखेसह समकालीन राजकीय-सामाजिक जीवनातील मुत्सद्दिपणा, बेरकी-कावेबाजपणा तसेच बिलिंदर गावकी-भाऊबंदकी, द्वेष-मत्सर…यातील नाट्य-संघर्ष यासह संपूर्ण कादंबरी हळूवारपणे उलगडत जाते. ही उलगडण्याची प्रक्रिया हळूवार असूनही ती वाचकांच्या मनाचा कब्जा घेते.

व्यसनाधीन झालेला धाकटा मुलगा चंद्रकांत अचानक मृत्यू पावतो आणि कादंबरीतले नाट्य व काळोख अधिक गडद होतो. लखोबाने खेळलेले खेळ त्याच्या भोवतीच आवळले जातात. त्यातच घराला आलेल्या अवकळेची भर पडल्यामुळे शोकात्मिका अधिक प्रभावी होते.
डॉ मोहन दिवटे यांच्या या ग्रामीण शोकात्म कादंबरीला डॉ श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ती मुळातच वाचण्यासारखी आहे.
इथवर लखोबा सावकार या शोकात्म ग्रामीण कादंबरीचा जो धावत आढावा घेतला, त्यातून या कादंबरीचे प्रभावीपण व प्रवाहीपण लक्षात यावे !

— परीक्षण : दिलीप कुलकर्णी. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800