Wednesday, July 2, 2025
Homeसाहित्यमराठी भाषा गौरव : काही कविता

मराठी भाषा गौरव : काही कविता

१. मराठी भाषा गौरवदिन

कथा नाटके कादंबरी अन्
अनेक कविता लिहिल्या त्यांनी
भाषेमधल्या ऐश्वर्याला
साज चढविला शब्दफुलांनी

साहित्याचे नटसम्राट हे
रसनेवरती नित सरस्वती
विशाखातल्या काव्यामधुनी
जगा समजली त्यांची महती

सरस्वतीच्या दरबाराचे
दैदिप्यमान रत्न अनमोल
समृध्द सालंकृत शब्दांनी
सजविले मराठीचे बोल

आत्मनिष्ठ अन् समाजभानी
क्रांतीकारी विचारधारा
ज्ञानपीठाच्या पुरस्काराचा
विशाखा शिरी खोवला तुरा

साहित्याच्या अनेक प्रांती
सहजपणाने ते वावरले
अनुभवसिद्ध प्रगल्भतेने
लेखणीतुनी शब्द प्रसवले

चाळीस वर्षे लिहून अविरत
माय मराठी केली उन्नत
मातृभाषा गौरवदिन हा
कुसुमाग्रजांप्रती समर्पित

रचना : सुरेश शेठ. कोथरूड. पुणे

२. माय मराठी

माझ्या मायेच्या भाषेने
केले बोलण्या प्रवृत्त
त्याच भाषेने जोडीले
छोटे मोठे आणि वृद्ध -१.

माझ्या मायेच्या भाषेने
मज अंगाई गाईली
आंजारुनी गोंजारुनी
माझी काळजी वाहिली -२.

माझ्या मायेच्या भाषेने
लहानाचे मोठे केले
झुंज जगाशी देण्यास
तिने मज शिकविले -३.

माझ्या मायेच्या भाषेने
दिली मज नाना नाती
माझे प्रेम त्यांच्यावरी
माझी नाती माझी माती -४.

माझ्या मायेच्या भाषेने
दिला मज स्वाभिमान
माझ्या माय मराठीचा
वाटे मज अभिमान -५.

भाषा मायेची मराठी
मज तिचे कवतीक
आज मलूल थोडीशी
पण नाही अगतिक -६.

माझ्या मायेच्या भाषेला
मिळे अभिजात दर्जा
दाटे आनंद कंठाशी
हर्षे मराठीत गर्जा -७.

— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली

३. माय मराठी

माझी मातृभाषा लाखात शोभते देखणी
वृंदावनी दीप भूपाळी गाती अंगणी

वासुदेव गातो गाणी दान पावलं
कोंबड्याची बांग गावं त्याने जागवलं

माय मराठी माझी जशी नाकातली नथ
शब्दालंकार ओढी काना मात्रांचा गं रथ

माय माझी सालंकृत काय तिचे अलंकार
गीता देई तत्वज्ञान आयुष्याचे सार

गोड तिचे पाढे गावे अमृताचे बोल
मराठीचा बाणा विचार शिकवी सखोल

संस्कृताचे सारस्वत पूजती सारे गणपती
विद्याधन कमवण्या अध्ययनी पूजे सरस्वती

देव धर्म कर्म शिकवते एकमेव
सांजवेळी शुभंकरोती मुखी वदती देव

मुले शिकती काव्य लयबद्ध चाली
संस्कारांची मांदियाळी कसे ठरती मवाली

बारमास सण होती गोडव्यात साजरी
भारत भूमीची मुले शोभती हासरी

महाराष्ट्र माय भूमीत घडले किती संत
किती कौतुक करावे विज्ञानाचे महंत

साऱ्या विश्वासाठी मागे ज्ञाना पसायदान
काय गोडवा वर्णावा जय जवान किसान

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई

४. मराठी

पिढ्या दर पिढ्यांनी जपावी मराठी
अशी अंतराळी भिडावी मराठी

तिचे गीत भारुड गझल लावणी ही
जगी उंच स्थानी रहावी मराठी

कला वैभवाचा सुगंधी खजाना
मनी दरवळावी फुलावी मराठी

तिच्या थोरवीचा अलंकार बाणा
सदा अंतरंगी मुरावी मराठी

अभीजात आहेच भाषा मराठी
लिहावी रुजावी उरावी मराठी

तिची गोड वाणी जगाला कळावी
सदा काळजावर वसावी मराठी

मराठी शिकाया विनवते ‘अनीसा’
चहू या दिशांना फिरावी मराठी

— रचना : अनिसा सिकंदर. दौंड

५ -: मराठीचे गौरव गीत :-
बालगीत
[चाल:- गोरी गोरी पान —- दादा मला एक वाहिनी आन ]

सौंदर्याची खाण
आम्हा अभिमान
माय मराठीचे
गाऊ गुणगान ।। धृ ।।

शब्द सृष्टीने
मराठी बहरे ।
वास्तव कल्पनेचा
विहंग विहरे ।।
सर्व धर्म ग्रंथ
मराठीची शान ।।१।।

चमके तियेत
भारतीय संस्कृती ।
ज्ञान सागर नि
असे ज्ञान शक्ती ll
संत साहित्याने
उंचावली मान ।।२।।

देव देश धर्माचा
सांगे महिमा ।
उच्च संस्काराने
शोभे प्रतिमा ।।
मराठी भाषा आहे
महाराष्ट्र शान ।।३।।

– रचना : अलका मोहोळकर. पंढरपूर

६. माय मराठी

माय मराठी तू स्वयंभू आहेस
मराठी नाही कोणाची सावली,
फूलू लागते जणू काव्याजंली
जशी मुंकूदराज आद्यकवी माऊली१!!

आई खेळवती जसे लाडके पोर
जन्मला आले तेव्हा बोबडे बोल,
ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत
तुकारामांच्या गाथेचे किती मोल !! २!

साने गुरुजींच्या श्यामची आई
पु. ल ची बटाट्याच्या चाळीत,
प्र. के अत्रे च्या एकच प्याला
वि. स खांडेकर अमृतवेलात.!! ३!!

कुसुमाग्रज झाले बालकवी
मंगेश पाडगावकरांच्या छायेत,
व. पू च्या तत्वज्ञानात
लता दीदी च्या गाण्यात.!! ४ !!

ग दि माडगूळकर लेखन
दिमाखदार गीत रामायण,
सुधीर फडके चे संगीत
जगदीश खेबुडकरचे गायन !! ५ !!

शिवरायांच्या निर्भीड स्वराज्यात
सावित्रीबाई, जोतिबाच्या शाळेत,
बहिणाबाईंच्या खानदेशी कवितेत
जनाबाईंच्या जात्यावरील ओवीत !! ६ ll

वारकरी संप्रदायातील अभंगात
सिताराम च्या रामायणात,
मराठी ची सांगू किती महती
जीवन जगावे समाधानात !! ७ !!

अभिजात भाषेचा दर्जा दिला
अखंडितपणे घडो तुझी सेवा,
आहेस स्वयंभू पहिली माय
हेच मागणे आहे आहे देवा. !! ८ !!

— रचना : सीता विशाल राजपूत. घाटनांदूर, जि. बीड

८. मायबोली

माझी मायबोली मराठी
अपुरे पडती शब्द कौतुके
झेंडा फडकविला अटकेपार
ख्यात कीर्ती असे दूरवर ……..

मधूर रसाळ गोमटी
अमृताहूनी आहे गोड
शब्दालंकारांनी नटते कशी
कुणी नाही तोडीस तोड……….

मऊ मेणाहूनी ती लवचिक
प्रसंगी वज्राहून ही कठीण
संतांची फुलली प्रतिभा शब्दांत
प्राचीन वारसा जपे साहित्यात ……….

अनेकानेक बोली भाषा
हेच तिचे मोठे वैभव
परभाषांना घेते सामावून
श्रीमंती पहा शब्दाशब्दातून………..

दर्जा मिळे अभिजाततेचा
गाथा गीताई ज्ञानेश्वरी
आहेत सुंदर आभूषण
आम्हास वाटते अभिमान………..

— रचना : डॉ. प्रभा वाडकर. लातूर

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४