महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सादर समर्पित.
— संपादक
१. महामानव तू..
बा, महामानव तू,
माणुसकीला तारण्या
जन्म घेतलास तू
बा, महामानव तू !१!
होते बेहाल आमचे
ते नष्ट केलेस तू
मानसन्मान दिला
बा, महामानव तू !२!
दीन- दलितांना बाबा
जागे केलेस तू
शांती – सद्भावनेचा दिला
मंत्र सगळ्यांना तू !३!
असो मंदिर प्रवेश वा
चवदार तळ्याचे पाणी
निर्धार होता मनी
घोट घेता क्षणी !४!
नारा तुझा होता
न्याय, समता हवी
कसा लढलास तू
जावून गावोगावी !५!
असो गोलमेज वा
संसदेचे भवन
करार – कायदे केले
राखून जनतेचे मन !६!
राज्यघटना तुझी
आहे अनमोल धन
दिले कायद्याने अधिकार
तरले सारे समाजमन !७!
— रचना : राजाराम जाधव.
निवृत्त सहसचिव, महाराष्ट्र शासन, नवी मुंबई.
२. भिमराया
किती धन्यवाद देऊ भिमराया
माणुस बनवले तू दिनदलिताला
खितपत पडलो होतो गावाबाहेर
सन्मान दिलास तू दिनदलिताला
तुझीच लेकरे आम्ही भिमराया
तुझीच रे शक्ती भक्ती भिमराया
उध्दरली कोटी कुळे भिमराया
जगण्या श्वास दिला तू भिमराया
माणसास बळ दिले तू भिमराया
देशास संविधान दिले भिमराया
अफाट बुध्दीचा तु रे भिमराया
ताकत दिलीस तु रे भिमराया
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
मंत्र आम्हास दिला तू भिमराया
जगण्यासाठी संविधान निर्मिले तू
वेदनेचा कर्दनकाळ तू भिमराया
श्वास तू विश्वास तू
मानवतेचा राजा तू भिमराया
संविधान तू कायदा तू
लोकशाही घटनाकार तू भिमराया
— रचना : पंकज काटकर. काटी, जि.धाराशिव
३. महामानवा
महामानवा
तुझे अनंत उपकार
जोडोनी कर करिते नमन
क्रांतीसूर्य तू
जाचक रुढी परंपरांना
दिली मूठमाती
तू खुले केले चवदार तळे
शिल्पकार तू
लिहिले देशाचे संविधान
अस्पृश्यता नष्ट केली कायद्यानं
मुक्तिदाता तू
स्त्री आज गुलामीतून मुक्त
पोचली आता थेट अंतराळात
मूकनायक तू
संविधानाने स्त्री बोलते आहे
लिहिते आहे
अस्तित्वासाठी झगडते आहे
न्यायदाता तू हक्कामुळे
ती एक स्त्री म्हणून नव्हे
तर व्यक्ती म्हणून जगते आहे
मोकळा श्वास घेते आहे
महानायक तू
ठामपणे नाकारला मनुवाद
करुणा दायी बुध्द धम्म स्वीकारला
दलितांच्या मनात,
निर्माण केला आशावाद
— रचना : डॉ. प्रभा वाडकर. लातूर.
४. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
भारत भूमीवर भीमराव अवतरले
संविधान लिहून शिल्पकार जगी शोभले ॥धृ॥
थोर प्रकांड पंडित महामानवास वंदन
दीन दलित असपृश्यांचे फुलवले नंदन
गोरगरीबांना न्याय मिळवण्यास लढले
संविधान लिहुन शिल्पकार जगी शोभले ॥१॥
एकात्मता धर्मनिरपेक्षता दिले वरदान
इतिहासात घटणाकार म्हणुन आहे मान
संघर्ष जिद्द, धीर, चिकाटीने शिक्षण घेतले ॥२॥
शिका संघटीत व्हा संघर्ष कराचा नारा दिला
तळा गळातील जनतेचा अंधकार मिटवला
बौध्द धम्म स्विकारून,
दु:खितांच्या दु:खाला जागले ॥३॥
प्रखर ज्ञानाच्या तेजाने विश्व टाकले व्यापून
अशिक्षितांना शिक्षणाचा मार्ग दिला दाखवून
महिलांच्या उध्दारासाठी सतत ते झटले ॥४॥
— रचना : अनिसा सिकंदर शेख. ता.दौंड, जि.पुणे
५. विचारी भिमराव.. (शेती)
भिमराव खरोखरी
बळीराजाचे कैवारी
स्वप्न पाहिले तेव्हा
सुखी हवा शेतकरी
शेतीला उद्योग मान
म्हणायचे रे परोपरी
पायाभूत सुविधांची
कराया हवी तयारी
पाणी नियोजन हवे
लक्ष द्यायचे निर्झरी
चवदार तळे कहाणी
ममत्व तुमचे पाझरी
भाव मिळो मालाला
सच्चे हवेत मापारी
लुटतीलं बळीराजा
अडवा सर्व व्यापारी
सुखी संपन्न समृध्द
बनावा तो शेतकरी
कळे आता खरोखरी
डाॅक्टर कसे विचारी
पोशिंदा पहिला संप
घडवला तेव्हा जरी
अजूनि कर्जबाजारी
शेतकरी तसाचं तरी
महामानवाची स्मृती
जागृत सदैव रे ऊरी
चालून तव मार्गावरी
आचार यात्रा हो पुरी
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800