Saturday, January 18, 2025
Homeसाहित्यमाझी जडणघडण : ३०

माझी जडणघडण : ३०

वाचन

व्यक्तीच्या जडणघडणीत जसा सभोवतालच्या, आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर भेटणार्‍या अनेक माणसांचा प्रभाव असतो तसाच निसर्गाचा, झाडाझुडुपांचा आणि वाचनात आलेल्या पुस्तकांचाही फार मोठा वाटा असतो. नुकताच वाचकदिन साजरा झाला. त्या निमीत्ताने आज मुद्दाम लिहावसं वाटतंय कारण माझ्या आयुष्यात वाचनसंस्कृतीला अपार महत्व आहे.
माझ्या मते तर माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक वाचलेली पुस्तके आणि दोन, भेटलेली माणसे.

वाचन हे चांगलं व्यसन आहे. ज्यामुळे माणसाचे मानसिक आरोग्य निरामय होऊ शकतं. ज्या व्यक्तीला वाचनाची आवड असते त्या व्यक्तीचे आयुष्य कधीही कंटाळवाणे होऊ शकत नाही. वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडत नाही. एकटेपणा जाणवत नाही. कारण पुस्तक हा असा मित्र आहे की जो आपली संगत कधीही सोडत नाही. आपल्या सुखदुःखात तो, त्याच आनंदी, मार्गदर्शक चेहऱ्याने, कळत नकळत सतत आपल्या सोबत असतो.

एका इंग्रजी लेखकाने म्हटले आहे की, “BOOKS ARE OUR COMPANIONS.
THEY ELEVATE OUR SOULS. ENLIGHT OUR IDEAS AND ENABLE US TO THE GATES OF HEAVEN”

कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह उन्नत करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे वाचन. कारण पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्त्रोत आहेत.

वयानुसार आपल्या वाचनाच्या आवडीनिवडी बदलत जातात. लहानपणी चांदोबा, गोट्या,फास्टर फेणे, जातक कथा, बिरबलच्या कथा वाचण्यात रमलं. कुमार वयात, तारुण्यात, नाथ माधव, खांडेकर, फडके यांच्या स्वप्नाळू साहसी, शृंगारिक, वातावरणात आकंठ बुडालो. शांताबाई, तांबे, बालकवी, इंदिरा संत, विंदा, पाडगावकर यांनी तर कवितेच्या प्रांगणात मनाभोवती विचारांचे, संस्कारांचे एक सुंदर रिंगणच आखलं. धारप, मतकरी यांच्या गूढकथांनी तर जीवनापलिकडच्या अफाट, अकल्पित वातावरणात नेऊन सोडलं. ह. ना आपटे यांच्या “पण लक्षात कोण घेतो..” या कादंबरीने तर वैचारिक दृष्टिकोनच रुंदावला. त्यांची यमी आजही डोक्यातून जात नाही. श्रीमान योगी, ययाती, छावा, शिकस्त, पानीपत या कादंबऱ्यांनी इतिहासातला विचार शिकवला आणि पु.लं. बद्दल तर काय बोलावं ? त्या कोट्याधीशाने तर आमच्या मरगळलेल्या जीवनात हास्याची अनंत कारंजी उसळवली. जीवन कसं जगावं हे शिकवलं. विसंगतीतून विनोदाची जाण दिली. व्यक्ती आणि वल्लीच्या माध्यमातून त्यांनी माणसं वाचायला शिकवलं. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृती चित्रे… कितीही वेळा वाचा प्रत्येक वेळी निराळा संस्कार घडवतात. ही यादी अफाट आहे, न संपणारी आहे. यात अनेक आवडते परदेशी लेखकही आहेत. साॅमरसेट माॅम, अँटन चेकाव,हँन्स अँडरसन, बर्नाड शाॅ, पर्ल बक, डॅफ्ने डी माॉरीअर, जेफ्री आर्चर, रॉबीन कुक.. असे कितीतरी. ही सारी मंडळी मनाच्या गाभाऱ्यात चिरतरुण आहेत कारण त्यांच्या लेखनाने आपली वाचन संस्कृती, अभिरुची, अभिव्यक्ती तर विस्तारलीच पण जगण्याला एक सकारात्मक दिशा मिळाली. त्यांनी आशावादही दिला, एक प्रेरणा दिली.

वाचनाने आमचे जीवन समृद्ध केले, निरोगी केले, आनंदी केले., कसे ? हे बघा असे…

विंदा म्हणतात,
“वेड्या पिशा ढगाकडून
वेडे पिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वी कडून होकार घ्यावे…”

कुसुमाग्रज म्हणतात,
“मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा…”

शेक्सपियर म्हणतात,
“प्रेम सर्वांवर करा, विश्वास थोड्यांवर ठेवा, पण द्वेष मात्र कोणाचाच करू नका.”
किंवा,
“सुंदर फुले हळुवारपणे उमलत असतात तर गवत झपाट्याने उगवते.”

साने गुरुजींनी सांगितले,
“खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे..”
हे सारंच विचारांचं धन आहे. अनमोल आहे ! अनंत, अफाट आहे आणि हे असं धन आहे की, जगण्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही स्वतःसाठी वापरा, दुसऱ्यांना द्या ते कमी होत नाही. वैचारिक धनासाठी डेबिट हे प्रमाणच नाही. ते सदैव तुमच्या क्रेडिट बॅलन्स मध्येच राहतं आणि फक्त आणि फक्त ते वाचनातूनच उपलब्ध असतं. म्हणूनच म्हणतात “वाचाल तर वाचाल”

वाचनाचे अनेक प्रकार असू शकतात. अध्यात्मिक ग्रंथ वाचन, चरित्रात्मक वाचन, कविता, ललित, कथा, कादंबरी, रहस्यमय ,गूढ, भयकारी, साहसी, अद्भुत, शृंगारिक, विनोदी, नाट्य, लोकवाङमय, प्रवास, संगीत, अगदी पाकशास्त्र सुद्धा. अशा अनेक साहित्याच्या शाखा आहेत. आता तर डिजिटल वाङमयही भरपूर आहे. ज्याने त्याने आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार, आवडीनुसार स्वभावानुसार, वाचावे. पण वाचावे. नित्य वाचावे.

वाचन हे माणसाला नक्कीच घडवतं. प्रेरणा देतं. कल्पक, सावध ,जागरुक बनवतं. केसरी आणि मराठा वाचून अनेक क्रांतीकारी निर्माण झाले. सावरकरांच्या कविता वाचताना आजही राष्ट्रभावना धारदार बनते.

वाचन आणि कुठलीही आवड अथवा छंद याचं एक अदृश्य नातं आहे. जसं आपण एखादं झाड वाढावं म्हणून खत घालतो आणि मग ते झाड बहरतं. तसेच वाचनाच्या खाद्याने आवडही बहरते. ती अधिक फुलते. चारी अंगानी ती समृद्ध होत जाते.आवडीला आणि पर्यायाने व्यक्तीमत्वाला आकार येतो.

मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच वाचनालाही आहेत. संगत माणसाला घडवते नाहीतर बिघडवते. वाचनातून अशी काही धोक्याची वळणं जीवनाला विळखा घालू शकतात. पण हे व्यक्तीसापेक्ष आहे. ज्याचे त्यांनी ठरवावे काय वाचावे. या नीरक्षीरतेची रेषा जर वाचकाला ओलांडता आली तर मात्र तो स्वतःची आणि इतरांची जीवनसमृद्धी घडवू शकतो.

कित्येक वेळा जाहिराती, रस्त्यावरच्या पाट्या, भिंतीवर लिहिलेले सुविचार, पानटपरीवरचे लेखन, ट्रकवर लिहिलेली वाक्येही तुम्हाला काहीबाही शिकवतातच आणि वाचनाची आवड असणारा हे सारं सहजपणे वाचत असतो आणि या विखुरलेल्या ज्ञानाची फुलेही परडीत गोळा करतो.

मला वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी बालवाङमय वाचायला आवडते. मी आजही परी कथेत रमते. रापुन्झेल, सिंड्रेला, हिमगौरी मला मैत्रीणी वाटतात. हळुच विचार डोकावतो, माझ्यासारख्या त्या मात्र वृद्ध होणार नाहीत. त्यापेक्षा त्या आहेत म्हणून माझेही शैशव अबाधित आहे. आजही मी बोधकथेत गुंतते.

भाकरी का करपली ?
घोडा कां अडला ?
चाक का गंजले ? या प्रश्नांना बिरबलाने एकच उत्तर दिले “न फिरविल्याने”, हे वैचारिक चातुर्य बालसाहित्य वाचनातून मला आजही मिळतं.
“तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी” या ओळीतला गोडवा माझ्या कष्टी मनाला आजही हसवतो.
बालवयात वाचलेल्या अनेक कविता नवे आशय घेऊन आता उतरतात आणि पुन्हा पुन्हा मनाला घडवतात.

॥ उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले अजूनही ॥
आज या ओळी मला जीवनाचा नवा अर्थ सांगतात. त्या झोपलेल्या चिऊताईत मला जणू काही मीच दिसते. कुणीतरी मलाच नव्याने जगाकडे, बदलत्या काळाकडे पहाण्याची दृष्टी देते.

वाचनाचा हा प्रवास न संपणारा आहे. शेवटचा श्वास हेच त्याचे अंतिम स्थानक असणार आहे. बाकी सगळं तुम्ही ठेवून जाणार आहात इथेच. कारण ते भौतिक आहे. पण वाचन हे आधिभौतिक आहे. पारलौकिक आहे. हे धन ही समृद्धी, हे विचारांचे माणिक—मोती तुमच्या बरोबर येणार, कारण ते तुमच्या आत्म्याचा भाग आहे…

क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on एक घास त्यांच्यासाठी..
Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय