“रत्नाकर मतकरी : माझे गुरू”
काही दिवसांपूर्वीच माझ्या एका शालेय मैत्रिणिने मला विचारले, ”मला ना तुझ्या बाबतीत नेहमीच एक प्रश्न पडतो. मी तुझं लेखन अगदी आवडीने वाचत असते. म्हणूनच एक प्रश्नही विचारते. तू एका प्रसिद्ध साहित्यिकाची मुलगी, लहानपणी तुझ्या घरातलं वातावरणही साहित्य कलेसाठी पोषक असलेलं, तू आर्ट्सला न जाता सायन्स साईडला गेलीस, रसायनशास्त्र घेऊन पदवीधर झालीस, आता तू लिहितेस आणि लेखिका म्हणून तुझी ओळखही आहे पण तुझ्या या क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेल्या बँकिंग क्षेत्रात तू कशी काय गेलीस ? तुझ्या कलाप्रेमी मनाला ही व्यापारी पद्धतीची आकडेमोड कधीच रुक्ष आणि निरस वाटली नाही का ? तू आयुष्याची ३०/४० वर्षे या क्षेत्रात रमलीसच कशी ?”
खरं सांगू का ? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही. प्रवाहाबरोबर मी वाहत गेले असं म्हणूया फार तर. जे हवं ते मिळालं नाही म्हणून जे मिळालं ते स्वीकारलं असाही अर्थ कोणी काढला तरी तो अगदीच चुकीचा नाही पण माझ्या मैत्रिणिने असा थेट प्रश्न विचारून माझ्या मनाला थोडं विचलित केलं मात्र पण तरीही माझ्या मनात याविषयी कुठलाही सल नाही, कसलीही घुसमट नाही, तक्रारही नाही किंवा इथल्या ऐवजी तिथे असते तर माझं आयुष्य किती वेगळं आणि अधिक उंचीवरचं असतं अशी रुखरुखही नाही पण जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा माझ्याच बद्दल मी एक निष्कर्ष काढते की, मुळातच माझा स्वभाव आनंदी राहण्याचा आहे. सतत तक्रारी, नाराजी किंवा कुढत बसण्याचा माझा स्वभावच नाही. स्वतःला रमवून घेण्याचं एक तंत्र मला ईश्वरानेच दिलं असावं म्हणून असेल कदाचित पण माझ्या एकंदर प्रोफाईलशी पूर्णपणे भिन्न असलेल्या बँकिंग क्षेत्रात मी अगदी छानपणे स्वत:ला सामावून घेतलं हे खरं आहे. खरं म्हणजे याच क्षेत्रात माझ्यातल्या लेखनगुणांना भरपूर खाद्य मिळाले, प्रेरणा मिळाली. तोपर्यंत मी छोटे, मोठे लेख, कथा लिहितच होते. माझ्या कथा मुंबई आकाशवाणीवरून प्रक्षेपितही होत होत्या. आकाशवाणीच्या माननीय लीलावती भागवत यांनी मला सतत लिहितं ठेवलं. तसं म्हटलं तर माझ्या लेखनासाठी माझे आद्य गुरु म्हणजे माझे वडील ज. ना. ढगे हेच होते. ते तत्त्वज्ञ होते. थिअॉसॉफिस्ट होते. अर्थात त्यांच्या लेखनाचे विषय सर्वथा वेगळे, आध्यात्मिक बैठकीचे होते. मी मात्र नेहमीच हलकं फुलकं लेखन करत होते. पपा तेव्हा मला म्हणायचे, ”वाचन हा लेखनाचा मूळ पाया आहे आधी वाच मग लिही.”
अनुराधा मासिकातून माझ्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यावेळी सुप्रसिद्ध लेखिका सौ गिरिजा कीर या अनुराधाच्या संपादक होत्या आणि त्यांनीही माझ्या लेखनाला नेहमीच मनापासून दाद दिली. वेळोवेळी दुरुस्त्याही केल्या. शुद्धलेखनाच्या चुका होऊ नयेत म्हणून त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं. त्यांच्यात आणि माझ्यात एक गुरू शिष्याचं नातं होतं.
“तू नक्कीच चांगली लेखिका होऊ शकशील” असा विश्वास त्यांनी माझ्यात उत्पन्न केला हे निश्चित पण तोपर्यंत माझं जग लहान होतं. काहीसं संकुचित होतं. एका छोट्या वर्तुळात असलेल्या जीवनाशी माझी ओळख होती. त्या पलीकडे बघण्या इतपत माझी दृष्टी विस्तारली नव्हती पण मी बँकेत नोकरी करायला लागले आणि माझं विश्वच बदलून गेलं. आतापर्यंत भेटलेली माणसं, त्यांच्याशी माझं असलेलं नातं या एकाच भिंगातून मी जगाला पहात होते ते मात्र नोकरी करायला लागल्यापासून नक्कीच बदललं. एखाद्या शोभायंत्रातून बदलणारी असंख्य चित्रं पहावीत ना तशी मला माणसं दिसायला लागली. या माझ्या मानसिक बदलाला आणखी एक महत्त्वाची व्यक्ती कारणीभूत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध “नाट्यकर्मी रत्नाकर मतकरी.”
योगायोगाने माणसं भेटतात, त्यांच्यात मैत्री होते आणि नकळत त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकत राहतो.

बँक ऑफ इंडियात असताना रत्नाकर मतकरी आणि मी एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करत होतो. ते वरिष्ठ अधिकारी होते. सुरुवातीला इतक्या मोठ्या व्यक्तीशी बोलताना मला दडपण यायचं. पण हळूहळू कामाच्या व्यतिरिक्त व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांवर, चांगल्या चित्रपटांवर, वाचलेल्या मराठी इंग्रजी पुस्तकांवर आमच्यात मनमोकळ्या गप्पा होऊ लागल्या. एका अत्यंत बुद्धिमान आणि साहित्याची परिपूर्ण जाण असलेल्या व्यक्तीपाशी मी माझी मतं बिनदिक्कत मांडू शकत होते आणि तेही तितक्याच अस्थेने ऐकत. यामध्ये “मला खूप समज होती” असं नव्हे तर ते खूप साधे होते. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीशी ते संवाद साधू शकत होते हा त्यांचा मोठेपणा होता कारण त्या वेळेपर्यंत त्यांनी नाटककार म्हणून खूप नावलौकिक मिळवलेलाच होता. स्वतःची बालनाट्य संस्था स्थापित केली होती आणि “अलबत्या गलबत्या”, ”कळ लावणाऱ्या कांद्याची कहाणी” वगैरे सारखी त्यांची अनेक बालनाट्ये रंगभूमीवर गाजत होती.
एक दिवस माझ्या टेबलवर पडलेल्या काही कागदांवर मी लिहिलेली एक कथा त्यांनी सहजच वाचली आणि त्यांनी स्वतःहून मला आवर्जून सांगितले, ”चांगले लिहितेस. तुझ्याकडे विचार आहेत. पण हे तोकडं आहे, अपुरं आहे. त्यासाठी तू प्रथम स्वतःला घडवण्याचा प्रयत्न कर.” “म्हणजे कसा ?” लेखिका होण्याची माझी महत्वाकांक्षा नव्हती, स्वप्नंही नव्हतं. मला फक्त लिहायला आवडायचं एवढंच म्हणून मी हा प्रश्न विचारला.
“हे बघ आपल्या भोवती जे घडत असते ना त्याकडे जाणीवपूर्वक बघण्याचा प्रयत्न केलास तर तुला कथानकं मिळतील. आपल्याला भेटणारी कुठलीही व्यक्ती ही बिनमहत्वाची नसते हे लक्षात ठेव. शिवाय तुझं वाचनक्षेत्र आणि निरीक्षण क्षेत्र वाढव.”
माझ्यासाठी हा सल्ला नेहमीच खूप मोलाचा ठरला. स्वतःला बाहेर काढून जग कसं बघायचं हे त्यांनी मला शिकवलं. त्यांच्या लोककथा ७८, अरण्यक सारख्या नाटकांची संहिता केवळ त्यांच्यामुळेच मला वाचायला मिळाली आणि त्यावर त्यांनी जेव्हा माझा अभिप्राय मागितला तेव्हा मनातून मी फार आनंदले होते पण अभिप्राय हे निमित्त होतं. ही नाट्यसंहिता कशी निर्माण झाली त्या मागचं कारण आणि विचार महत्त्वाचा होता आणि तेव्हापासून मी वर्तमानपत्रातल्या बातम्या फक्त बातम्या म्हणून वाचण्यापेक्षा त्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करू लागले. मी किती आणि कशी घडले मला माहीत नाही पण माझ्यात ही प्रक्रिया सुरू करणारे माझे खरे गुरु हे रत्नाकर मतकरी होते आणि त्यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजते. एकदा मी त्यांची “शाळेचा रस्ता” ही गूढ कथा वाचली आणि मी अक्षरश: झपाटून गेले होते. त्यावेळी त्यांना मी म्हटलं होतं, “तुमच्यासारख्या गूढकथा मला कधीच लिहिता येणार नाहीत.”
तेव्हा ते म्हणाले होते, ”कधीही कुणासारखं लिहिण्याचा प्रयत्न करूच नये. तू तुझ्यासारखंच लिही. तुझी ओळख तुझ्याच लेखनातून निर्माण कर.” हे त्यांचे बोलणेही फार महत्त्वाचे ठरले. आमची वाचक लेखक मैत्री अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकली हे विशेष. ते जाण्याच्या आठ दिवस पूर्वीच आम्ही फोनवर मनसोक्त गप्पा केल्या होत्या. त्याही वेळेला त्यांनी मी सध्या काय वाचते, लिहिते याची चौकशी केली आणि मी कोणती पुस्तके वाचायलाच हवीत हे आवर्जून सांगितले होते.”
म्हणूनच म्हणते माझ्या बँकेतल्या नोकरीने मला हे सद्भाग्य प्राप्त करून दिले. मी त्यानंतरही अनेक वर्ष बँकेच्या निरनिराळ्या शाखांतून आणि कक्षांंतून नोकरी केली. त्या क्रेडिट डेबिट च्या जगात मला अनेक स्तरांवरची भली- बुरी स्वार्थी -निस्वार्थी, उदार- संकुचित, श्रीमंत- गरीब, निरनिराळ्या जातीची धर्मांची अनेक माणसे भेटली.या माणसांना टिपण्याचा आणि त्यांच्या जीवनात अदृश्यपणे डोकावण्याचा मी प्रयत्न करत राहिले आणि त्यायोगे माझे लेखन विकसित होत गेलं. एकाच ठिकाणी “अनेक माणसं भेटण्याचं एकमेव स्थान म्हणजे बँक” हे माझ्यापुरतं तरी एक महत्त्वाचं समीकरण आहे आणि every credit has a debit या महत्त्वाच्या बँकिंग लाॅ ने मला मानवी जीवनाचं वेगळंच गणित सोडवायला दिलं म्हणून मी तिथे रमले.
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
राधिकाताई तुमची लेखन शैली इतकी ओघवती आहे की मी लेख तो पूर्ण वाचल्यावरच थांबतो. आणि व्यक्तीचे स्वभाव, त्यांचं वागणं बोलणं हे सर्व तुम्ही छान टिपता.
राधिकाताई, माझी जडणघडण चा वरील 48 नंबरचा भाग वाचला. ओघवती शैली आणि सहजसोप्या शब्दातून व्यक्त होणे या गुणांमुळे लेख छान उतरला आहे. मी तुमचे प्रारंभीचे बरेच भाग वाचले. नंतर वैयक्तिक समस्यांमुळे तुमचे लेख वाचू शकलो नाही. पण त्यामुळे काही बिघडत नाही. वरील लेख वाचून तुमची जडणघडण कशी झाली हे सहज समजते. रत्नाकर मतकरीं सारख्या माणसांचा सहवास हा तर मोठ्ठाच लाभ म्हणायचा ! आणि हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे की ‘वाचन जितके जास्त आणि वैविध्यपूर्ण’ तेवढे लेखन देखील वैविध्यपूर्ण होत जाते. अवतीभवती इतक्या असंख्य घटना/प्रसंग घडताना दिसतात की काय लिहू आणि काय नाही अशी गत होते. गूढ, विनोदी, गुन्हेगारी, सांसारिक, लैंगिक, भावनिक, क्रौर्य, प्रेम आणि अशा अनेक विषयांवर लेखन केले तर आपणच आपल्याला नव्याने भेटल्याचा साक्षात्कार होतो. असो. जडणघडण लिहित असतानाच तुमचे वैविध्यपूर्ण कथा/कादंबरी लेखन देखील चालू असू द्या. अर्थात दिवाळी 2025 च्या अंकांसाठी तुमचे लेखन चालू असेलच. त्यासाठी शुभेच्छा.