Homeलेखमाझी जीवन नौका : सात

माझी जीवन नौका : सात

“लोकपालक”

चार दिवस वाट पाहिल्यावर आमची शिप लोकपालक शेवटी एकदा बंदरात जेट्टीला येऊन लागली. सकाळी जहाजावर जाण्यासाठी आम्ही आंघोळी ब्रेकफास्ट करून, सर्व सामान आवरून, बॅगा परत पॅक करून, तयार होऊन बसलो. आम्हाला शिपवर नेण्यासाठी कंपनीचा विशाखापट्टण मधला एजंट कार घेऊन येणार होता.

थोड्याच वेळात एजंट कार घेऊन आला. सर्व सामान भरलं गेलं. अप्सरा हॉटेलचा निरोप घेतला. गाडीत बसलो. लग्नानंतरची आमची ही दुसरी वरात आता जहाजाच्या दिशेने निघाली होती ती मुकुंदांच्या कर्मभूमीकडे…..!
जहाजाकडे……! अगदी आमच्या दोघांच्याच शिपवरच्या त्या छोट्याशा घराकडे !

जेट्टीला लागून शिप उभी होती. आम्ही जेट्टीवर उतरलो. समोर महाकाय लोकपालक उभी होती. धक्क्याला लागूनचा तिचा वरचा अर्धा भाग दिसत होता. उरलेला अर्धा भाग पाण्याच्या खाली होता. मी या माझ्या नव्या घराला पायापासून…. नव्हे… नव्हे‌…..पाण्यापासून डोक्यापर्यंत न्याहाळलं.

वरच्या डेकवर युनिफॉर्म मधले काही ऑफिसर्स, क्रू मेंबर्स आपापल्या कामात गुंतलेले दिसत होते. लगबगीने इकडून तिकडे त्यांच्या हालचाली होत होत्या. नव्या येणाऱ्या आम्हाला वरची मंडळी न्यहाळत होती. आमच्याबरोबर जहाज जॉईन करणारे दोन क्रू मेंबर्स पण होते.

गाडीतून उतरून समोरच असलेल्या शिपच्या दिशेने निघालो. जशी जवळ जाईन तशी जहाजाची विशालता मनात ठसत होती. भला थोरला समुद्र, धक्क्याला आणि जहाजाच्या कडेला हळुवार येऊन स्पर्श करून परतणाऱ्या लाटा त्या समुद्रातच लुप्त होत होत्या. एका क्षणात कधीच न पाहिलेल्या त्या अतिभव्यतेच्या जवळ मी येऊन उभी राहिले होते.

जहाजाच्या डेक पासून खाली अगदी जमिनीपर्यंत एक लोखंडाचा जिना जोडलेला होता. त्याला गँगवे म्हणतात.साधारण पन्नास-साठ पायऱ्या असाव्यात. दोन्ही बाजूला पांढऱ्या पत्र्याच्या भक्कम भिंतीं, त्या मधून जाणाऱ्या खड्या पायऱ्या, धरायला दोन्ही बाजूंना कठडा, बार आणि दोरखंड सुद्धा.

जेट्टीवर महाप्रचंड ठश्यासारख्या आकाराचे भक्कम पण बुटके खांब होते. त्यांना अजस्त्र दोरखंडांनी शिप बांधून घातलेली होती. या खांबांना बोलार्ड म्हणतात. जहाजाच्या पुढच्या आणि मागच्या, दोन्ही बाजूंना मोठ्या टायरच्या सारखी भोके असतात. त्यांना फेअर लिड्स (fair lids) असं म्हणतात. आता एवढ्या महाकाय शिपची फेअरलिड तिला शोभेशी हवी ना !
त्यातून हे दोरखंड सोडून जेट्टी वरच्या बोलार्डना बांधलेले असतात. शिप जास्तीत जास्त स्थिर राहावी म्हणून तिला अशी बांधून घालावी लागते.

फेअर लीड

समुद्राच्या पाण्याच्या हालचालीने जहाज सतत हलकेच वर खाली होत असतं. धिम्या लाटांनी आणि वाऱ्याने होणारं आवाढव्य शिपचं हे नाजुकसं मुरडणं कधी लाटांच्या, वाऱ्याच्या जोराच्या हालचालीने वाढलं तर ते जेट्टीच्या भिंतीना सहन होण्यासारखं नसतं. शिप या भिंतीवर धडकली तर तिलाही इजा होऊ शकते. ही धडका-धडकी होऊ नये म्हणून मोठमोठ्या अजस्त्र टायर्स जेट्टीला घट्ट लावल्या असतात.
शिपचा धक्का हे टायर्स झेलतात. त्यामुळे जेट्टीची भिंत आणि शिप पण सुरक्षित राहते.

थोडं विषयांतर होईल पण एक गोष्ट मला खूप सांगावीशी वाटते ती म्हणजे :- प्रत्यक्ष समुद्रात जहाजाची अशी सहज होणारी हालचाल टायटॅनिक सिनेमात दाखवली गेली नाही आहे.जहाज बुडतानाचा, त्यानंतर माणसे वाचवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचा तो सीन त्यांनी बहुतेक समुद्राचा सेट उभा करून चित्रित केला असावा. त्यासाठी कृत्रिम समुद्र ही तयार केला असावा. कारण जहाजाची ही समुद्राच्या लाटांनी वर खाली होणारी नैसर्गिक हालचाल तिथे नजरेला दिसत नाही. अनेक जहाजं जवळून पाहिल्यामुळे मला सिनेमा बघताना ते फार जाणवले.असो.

जहाजाच्या मागच्या भागात इंजिन रूम असते. तिच्या वरच्या तीन-चार डेक्स वर सर्व ऑफिसर्स, क्रू मेंबर्स यांच्या राहण्याच्या केबिन्स असतात. प्रत्येकाला स्वतंत्र केबिन असते. आपली फ्लॅट सिस्टीम असलेली इमारत असावी तसं हे संपूर्ण अकॉमोडेशन असतं.

गॅंगवे चढून वरच्या डेकवर गेलो. तिथून दोन डेक सोडून वरच्या डेकवर आमची केबिन होती. तिथेच चीफ ऑफिसर, कॅप्टन, चीफ इंजिनियर, रेडिओ ऑफिसर यांच्या ही केबिन्स होत्या.

गृहप्रवेश : – आम्ही आमच्या केबिनमधे आलो. जहाजाच्या या घरात माझा प्रथमच गृहप्रवेश होत होता. आमचं सर्व सामान सुमान क्रू मेंबरनी केबिनमध्ये आणून पोहोचवलं.

या जहाजावर त्यावेळी अजित प्रधान हे सेकंड इंजिनियर होते. मुकुंद या जहाजावर चीफ इंजिनियरचे क्वालिफिकेशन – सर्टिफिकेट घेतलेले असले तरी, सेकंड इंजिनियर म्हणूनच जॉईन होणार होते.

तीन खास मित्र अजित हरी आणि मुकुंद

अजित मुकुंदांचा पूर्वीपासूनचा अगदी खास मित्रच. यापूर्वीही त्या दोघांनी जहाजावर एकत्र सेल केलं होतं. आमच्या स्वागतासाठी अजित आणि चीफ इंजिनियर हरिहरन् आमच्या केबिनमध्ये हजर होते.

हरिहरन् हा तमिळ आहे, मद्रास म्हणजे आता चेन्नईचा ! तो मुंबईला आला की आजितच्या घरीच उतरायचा. अगदी घट्ट मित्र. सगळे मित्र त्याला हरी म्हणतात.

अजित प्रधान आणि स्मिता प्रधान

आमच्या लग्नाला सांगलीला हरिहरन्, अजित प्रधान आणि सर्व प्रधान कुटुंबीय आले होते. त्यावेळची एक गंमत सांगते. लग्नात मुकुंदनी या सर्वांशी माझी प्रथमच ओळख करून दिली.

मुकुंद,वेदवती, स्मिता, मागे उभे हरिहरन, अजित

हा अजित प्रधान, ही स्मिता प्रधान, या आई प्रधान, हा अभय प्रधान आणि हा हरी प्रधान…. मी चमकून पाहिलं. वाटलं की एवढ्या सगळ्या गोऱ्यापान मंडळीत हा एकटाच काळासावळा विठोबा कुठून आला ? माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून हरी सह सर्वजण मनमुराद हसले होते.

हरी आणि अजित या दोघांना केबिनमध्ये बघून मला फार आनंद झाला. या नव्या घरात, आमच्या सागरातल्या संसारात आमचं त्या दोघांनी जोरदार स्वागत केलं. माझ्यासाठी त्यांनी मिठाई आणली होती. आल्याबरोबर स्टुअर्डने थंडगार सरबत यादिलं. प्रत्येक केबिनची देखभाल करणे, बेड्स तयार करणं, साफसफाई करणं, चहापाणी, सरबत देणे अशी कामे करणारा एकेक मदतनीस असतो. त्याला स्टुअर्ड म्हणतात.

आमच्या स्टुअर्डचं नाव करवालो होतं. उंच, कुरळ्या केसांचा, गहू वर्णाचा, मध्यम वयीन गृहस्थ होता. अशोक कुमार सारखे त्याचे केस मागे फिरवलेले असायचे. या जहाजावर बहुतेक सर्व क्रू मेंबर गोव्याकडचे होते.

करवालोने सर्वांना good morning साब म्हटलं. मला good morning मेमसाब म्हणाला. मेमसाब हा शब्द ऐकून मला एक क्षण बिचकायलाच झालं.

माहेरी घरी ताई असलेली मी मांडवात नवरी, माप ओलांडल्याबरोबर सासरी मोठ्यांकडून मुकुंदाची बायको, सूनबाई, पुतणे मंडळींकडून काकू, भाचवंडांकडून मामी, दिरा-नणंदां कडून वहिनी, कधी-मधी मिसेस कुलकर्णी……
ही सारी माझीच सहस्रनामावळी
आत्ताशी कुठे थोडी अंगवळणी पडत होती तोच शिपवर आता हे मेमसाब….!
घरातल्या नात्यांच्या पलीकडच्या या जहाजावरच्या रितीरिवाजांशी झडलेली ही पहिली सलामी मला जरा कावरं-बावरंच करून गेली.

केबिनमध्ये किंबहुना सर्व जहाजावरच एक बारीकसा नाद सतत घुमून राहिला होता. एक हलकासा कंप ही सारखा जाणवत होता. त्यावर या तीनही इंजिनियर्सनी मला सांगितलं की इंजिन रूम मधली काही इंजिन्स सतत सुरू असतात. त्यांचा हा आवाज आहे. हलकीशी जाणवणारी कंपनं – vibrations ही त्यामुळेच आहेत. जहाज जरी जेट्टीला असलं तरी जहाजाच्या सर्व यंत्रणा, वीज आणि अन्न शिजवणं हे सुरू राहवंच लागतं. त्यासाठी इंजिन चोवीस तास सुरू असतं.

अजित इंजिनरूम मध्ये घालायच्या बॉयलर सूटमध्ये होता. मुकुंदपण कपडे बदलून बॉयलर सूट घालून आले. त्यांना त्या वेषात बघून मला फार गंमत वाटली. अगदी हसूच आलं.अजितला मुकुंद relieve करणार होते. सरबत घेऊन झाल्यावर मुकुंद आणि अजित इंजिन रूम कडे निघाले. हरी पण त्यांच्याबरोबर निघाला.

आता केबिनमध्ये मी एकटीच होते. मग माझं हे समुद्रामधलं बोटीवरचं नवं घर मी न्याहळायला लागले. दोन खोल्या असलेली ही प्रशस्त केबिन. केबिनच्या दारात पितळेचा चकचकीत उंबरा. आत आलं की डे रूम…..हॉल सारखी मोठी खोली. इथे डावीकडच्या भिंतीवर भरपूर कपाटे. पुस्तके इत्यादीसाठी शेल्फ. दरवाजाला लागून बॉयलर सूट ठेवण्याचे स्वतंत्र हँगर, त्याच्या खाली शू रॅक. एका शेल्फ मध्ये पाणी उकळण्यासाठी इलेक्ट्रिक केटल. समोर आणि उजवीकडच्या भिंतीना लागून सोफे. भिंतींच्या वर सुंदर पेंटिंग्स लावली होती. त्या दोन्ही भिंतींना खिडक्या होत्या. त्यातून स्वच्छ उजेड आत येत होता. खिडक्यांना सुरेख पडदे लावलेले होते. जाड काचेची डबल तावदानं ही त्या खिडक्यांची दारं ! मोठ्या स्क्रू नी ती घट्ट बंद केलेली होती. जहाजाच्या खिडक्यांना पोर्टहोल असं म्हणतात. केबिनमध्ये चोवीस तास ए.सी. सुरू असतो.

दरवाज्यातून आत आलं की उजव्या बाजूला टेबल खुर्ची. फाइल्स वगैरे ठेवण्यासाठी शेल्फ, ड्रॉवर्स, कपाटं. टेबलवर फोन. त्याच्यामागे बेडरूम कडे जाण्यासाठी दरवाजा. अगदी आपल्या घरी असते तशी छान पण लहानशी बेडरूम. त्यात डबलबेडच्या खालच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी मोठे ड्रॉवर्स. बेडला लागून एक छोटं साईड टेबल. त्यावर फोन. ही फोन यंत्रणा जहाजापुरतीच असते. इथून बाहेर कुठेही फोन करता येत नाही.

बेडरूम मधे भिंतीला लागून कपड्यांसाठी कपाटे, ड्रॉवर्स. एक लहान टेबल, इस्त्री साठी सोय. आरसा, ड्रेसिंग टेबल. त्याच्या पलीकडे प्रशस्त बाथरूम, टॉयलेट. बाथरूम मध्ये भला मोठा बाथ टब, गरम-गार पाण्याची सोय. बेसिनच्यावर आरशाचं कॅबिनेट, टूथपेस्ट, ब्रश, कंगवा वगैरे ठेवण्यासाठी ! दोन्ही खोल्यात दरवाज्यापासून भिंतीपर्यंत कार्पेट घातलेले. रूम फ्रेशनरचा सुगंध केबिन भर दरवळत होता. असं सगळं सुसज्ज घर.

अशा दोन खोल्या आणि बाथ टब असलेली प्रशस्त केबिन फक्त कॅप्टन, चीफ ऑफिसर, चीफ इंजिनियर आणि सेकंड इंजिनियर या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठीच असते. बाकी सर्व ऑफिसर्सना सिंगल रूम आणि छोटीशी बाथरूम टॉयलेट असं असतं.

मुकुंद येईपर्यंत मी बॅगा उघडून कपडे लावणे, खाण्यापिण्याचे पदार्थ डे रूम मधल्या शेल्फ मध्ये ठेवणं वगैरे सुरू केलं. अगदी पदर खोचून गृहिणीच्या भूमिकेत शिरले होते. नव्या संसाराचा नवा उत्साह होता. प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटत होतं. आज पर्यंत घराची सर्व ठेवरेव जीमाहेरी आईच करायची. सासरी तर वहिनी-सासुबाई ! त्यामुळे घर लावणं, वस्तूंच्या जागा ठरवणं वगैरे गोष्टी करायच्या असतात हे कधी लक्षातंच आलं नव्हतं. आता हे सगळं आपणच करायचं आहे ही जाणीव नकळत व्हायला लागली. कुमारीका, नवविवाहिता आणि आता पाहता पाहता आलेलं गृहिणीपद…. हे सगळं, काही समजायच्या आतच झपाट्याने घडत होतं.

या सगळ्या बदलांनी मला मोहून तर टाकलंच होतं. एखादं शोभा दर्शक जरासं फिरवलं, दिशा बदलली की प्रत्येक वेळी त्याच्या आतल्या आरशात सुंदरसं नवीन रंगीत चित्र निर्माण झालेलं दिसावं तसंच या सगळ्या स्थित्यंतरात एकेक बदलत जाणारं माझ्याच आयुष्याचं, भूमिकांचं नवं नवं चित्र माझ्यासमोर उभं राहत होतं. एक अनामिक हलकीशी भीती, दडपण ही निर्माण करत होतं. त्याची अबोध जाणीव कुठेतरी आत झिरपत होती.

हे जहाजावरचं आमचं छोटं घर मला फार आवडलं. फक्त सुरुवातीला तिथे वावरताना डोळ्यांना त्रास झाला, कारयू6ण केबिनची उंची कमी होती. पण पुढे एक-दोन दिवसात त्याची ही सवय झाली. शिप वर कमीतकमी जागेत बऱ्याच गोष्टी बसवाव्या लागतात. इतर अनेक गोष्टींबरोबर सर्वांसाठी केबिन्स ही बसविलेल्या असतात. त्यामुळे केबिनच्या भिंतींची उंची कमी ठेवावी लागते.

बेडरूम मध्ये ड्रेसिंग टेबलच्या जवळच्या टेबलवर गणपतीचा आणि तुळजाभवानीचा एक फोटो मांडला. घरून आणलेल्या बेसन लाडूचा नैवेद्य दाखवला. उदबत्तीच्या घरात दोन उदबत्त्या लावल्या. उदबत्त्यांचा सुगंध खोलीभर दरवळला. बरोबर आणलेला स्टीलचा हळदी कुंकवाचा करंडा ठेवला. देवाला हळदीकुंकू वाहिलं, नमस्कार केला. आमच्या या घरात देवांची स्थापना झाली.

तोपर्यंत अजित आणि मुकुंद इंजिन रूम मधून केबिनमध्ये आले. पात्यांचं सर्व handing over आणि taking over चं काम पूर्ण झालं होतं. त्या दोघांनी अंघोळी केल्या. कपडे बदलून आम्ही सर्व खाली ऑफिसर्स मेस मध्ये जेवायला गेलो.

डायनिंग रूम आमच्या डेकच्या खालच्या डेकवर होती. जहाजाच्या कॅप्टनचं आडनाव कुठार असं होतं. ते पारसी होते. वयाने मोठे होते. ते ही जेवायला येऊन बसलेले होते. इतरही काही ऑफिसर्स जेवायला आलेले होते. सर्व ऑफिसर्स युनिफॉर्म मधे किंवा बॉयलर सूट मधे होते.

डायनिंग रूम मधे सर्वांनी आमचं स्वागत केलं. वेलकम मॅडम. तोपर्यंतच्या माझ्या 21 वर्षाच्या लहानशा आयुष्यात मला असं मॅडम वगैरे कधी कोणी म्हटलं नव्हतं. हे सगळंच माझ्यासाठी फार नवं आणि फार वेगळं होतं. आता मॅडम हे बिरूद ही आपल्याला चिकटणार याची खात्री झाली.

ती स्वतंत्र मोठी डायनिंग रूम होती. त्याला लागून पॅन्ट्री होती. ही पण एक छोटीशी खोली. गॅलीत म्हणजे ज5हाजाच्या भटार खान्यात तयार झालेलं अन्न काचेच्या मोठ्या बाऊल्स मध्ये भरून पॅन्ट्रीत आणलं जातं.
गॅली डायनिंग रूमच्या खालच्या डेकवर होती. अन्न भरलेली ही गरम काचेची भांडी वर खाली नेण्यासाठी गॅली आणि पॅंन्ट्री याना जोडणारी स्वतंत्र छोटी लिफ्ट होती. अन्न पॅंन्ट्रीत आलं की तिथे ते गरम ठेवण्यासाठी हॉटप्रेस म्हणजे अन्न गरम राहील अशी मेटलची कपाटं असतात. ही आपल्या मायक्रोवेव्ह सारखी दिसतात. पण ती विजेच्या साह्याने गरम ठेवली जायची. त्यावेळेला मायक्रोवेव्ह नव्हत्या. तिथेच जेवणासाठी लागणारी सर्व क्रोकरी, कटलरी इत्यादी साहित्य पण ठेवलेले असायचे.

डायनिंग रूम मध्ये स्वच्छ, पांढरे शुभ्र टेबलक्लाॅथ घातलेलं डायनिंग टेबल, प्रत्येकासाठी स्वच्छ पांढरे परीटघडीचे इस्त्री केलेले टेबल नॅपकिन्स, टेबलाच्या बाजूने खुर्च्या, काचेच्या मेन डिश, साईड डिश, बाऊल्स, पाणी प्यायचे ग्लास, काटे चमचे, सुऱ्या वगैरे सर्व सरंजाम होता. मला तर हॉटेलमध्येच जेवायला आलोय असंच वाटत होतं. युनिफॉर्म घातलेले स्टुअर्ड्स आदबीने वाढत होते.

आपल्याला रोजची पाटपाण्याची…. किंवा टेबल पाण्याची म्हणूया…. सवय ! तूप-मीठ, चटणी, कोशिंबीर, भाजी, भात,पोळी किंवा भाकरी, दही, ताक, लोणी असं आपलं घरचं साग्र-संगीत जेवण असतं.

जहाजावर मात्र दुपारी फक्त भात, डाळ नावाची आमटी, दोन भाज्या, सॅलाड, नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी चिकन, मटण किंवा फिश यांची एखादी डिश, एखादी साईड डिश, पापड, लोणचं, दह्याच्या ऐवजी योगर्ट. रात्रीच्या जेवणात बाकी सर्व तसेच. पण रात्री भात नाही.फक्त पोळी असायची. बहुतेक काहीतरी गोड पदार्थ डेझर्ट म्हणून असायचा.

मी तर पूर्ण शाकाहारी. अंड ही कधी न खाल्लेली. घरी जेवणात बेताचं तिखट, मीठ, मसाले असायचे. इथे सर्व डाळी आणि भाज्यांच्यात लसूण, कांदा, गरम मसाल्याचा भरपूर वापर. जेवणाचा हा सगळा प्रकार माझ्यासाठी अजबच होता. जेवण झालं. खूप दमलो होतो. केबिनमध्ये आलो.

अजित सामान बांधून तयारच होता. आमचा निरोप घेऊन तो रिलीव्ह होऊन परत निघाला. मुकुंदाना या सगळ्याची सवय होती. पण अजित निघाला तसं माझं माहेरचं माणूसच मला सासरी सोडून परत निघालंय असं वाटलं. आई बाबा दादा अतुल यांच्या आठवणीने डोळे भरून आले. अजितला पोहोचवायला आम्ही दोघं आणि हरी खालच्या डेक पर्यंत गेलो. तो गॅंगवे उतरून गेला. आम्ही दोघं आमच्या केबिनमध्ये परत आलो.

आता ही केबिन हेच ……
खास आम्हा दोघांचं घर होतं !
क्रमशः

वेदवती कुलकर्णी

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

13 COMMENTS

  1. अवाढव्य शिपच नाजूकस मुरडण फक्त संथ
    समुद्रात अनुभवण्यात येत, हा exclusive अनुभव
    आहे.
    बोटीचे नेमक आणि अचूक वर्णन करत प्रज्ञानी
    आपला अनुभव प्रस्तुत केला आहे. खूपच
    छान..

  2. An insight into an entirely different life! Your detailed description makes one walk along with you through your exciting and novel experiences! So much of adjustment must have been involved in the process, but I am sure the love and immense patience of your beloved husband must have been the driving force behind everything. Awaiting the next segment 👍😍

  3. Dear Pradnya. You write so well, it’s as if your words come alive in pictures!!
    Our destinies were always linked to each other!! I too joined my first ship Lok in Vishakhapattnam with a long stay in Apsara Hotel.
    I’ve always wished we too could have sailed together just like our husbands did. We would have had such a wonderful time. No matter, this wonderful friendship of ours has always been beyond the boundaries of sea life and will carry on. Thank you for sharing your memories and for including us in them along with pictures!! Have read all the chapters so far and looking forward to more. Also saw your podcast and enjoyed it very much.

  4. वेदवती, नौकाजीवनातील अनेक बारकावे तू खूप रंजकपणे टिपले आहेस.या भागात वाचकांना अपेक्षित असा तपशील आहे. जहाजासंबंधीच्या तांत्रिक शब्दांचा अर्थ तू खूप सोप्या पद्धतीने स्पष्ट केला आहेस आणि त्यात काव्यात्मकता आणि मिश्किलपणा देखील आहे. एकवीस वर्षाच्या नवविवाहितेचा नवखेपणा तू अचूकपणे शब्दबद्ध केला आहेस. पुढील भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.

  5. वेदवती,
    तुझ्या तपशीलवार वर्णनशैलीला मनापासून सलाम ! 🫡🫡
    ‘नव्या घराला …..पाण्यापासून डोक्यापर्यंत न्याहाळलं’
    👌👌😀

    Detailing अतिशय समर्पक साधलंयस नि गृहप्रवेशाचं साग्रसंगीत ‘माप’ वाचकांच्या पदरात टाकलंयस.👍

    खूप छान.👍

  6. सुंदर लिखाण! इतके सगळे बारकावे लक्षात आहेत! टिपिकल मध्यमवर्गीय मराठी मुलगी जहाजावर कशी रुळते ते वाचणे मस्त आहे. तुझ्या वर्णनातून ते अनुभवायला मिळत आहे. Next upload please…

  7. छान चालली आहे लेख माला. वर्णन एकदम छान. डोळ्यासमोर उभे राहतेय. एक नवीन विश्व प्रकट होते आहे

  8. Pradnyatai, मी आधी म्हटल्याप्रमाणे, तुमचं सविस्तर वर्णन म्हणजे चित्रपट पाहण्यासारखं आहे….. The photos have added more charm to the article!

  9. वेदवती ताई
    तुमचा हा दुसरा गृहप्रवेश खूप आवडला. महाकाय जहाज पाहून तुमच्या मनातही तितकेच विचारांचे काहूर माजले असेल याची सर्व वर्णन वाचून जाणीव झाली. नवपरिणीतेला जहाजाला होणाऱ्या लाटांचा स्पर्श झाल्याने अवाढव्य शिपचं नाजुकसं मुरडणं अशा शब्दात वर्णन करणे साहजिकच आहे. तुमच्या नव्या घरामध्ये तुम्ही नव्या उमेदीने आपली खोली सजवली आणि नव्या आयुष्याला सुरुवात केलीत. इथेही मित्रांच्या रूपात तुम्हाला माहेरची माणसे भेटल्याचा आनंद मिळाल्याने एक वेगळेच समाधान वाटले असेल. त्यामुळे पुढील जीवन मार्ग सुकर अन् आनंदी झाला असेल.
    हे सर्व अनुभव तुम्ही नाजूक शब्दात कथन केले आहेत आणि नव जीवनाचा मनमुराद आनंद लुटत आहात हे पाहून आणि वाचून तुम्ही ह्या नव्या सासरी सुखी असल्याचे समाधान झाले.
    *डॉ. सुरेखा विवेक जोशी*

  10. सुंदर ओघवती शैली, अगदी जहाज आतून बघतोय असं वाटलं. मस्त

  11. Though I hadn’t seen/visited/travel on any ship or Cruz, your in details write up provided me interesting data of Floating Home. Voyage of your Jeevan Nauka stated from Sangli andvia Mumbai (Parle) reached Lokpalak. I am anxious to read further voyage. Last almost 20 years we don’t get an opportunity to know. Never Too Late.

  12. वर्णन इतकं सुंदर आहे की सगळं काही चित्रपटासारखं डोळ्यासमोरून पुढे सरकत आहे असं वाटलं! 👌👌

  13. अगदी छान जहाजाची सफर घडतेय ……आणि पुढे काय याचीही उत्सुकता वाटतेयं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments