कृत्रिम बुद्धिमत्ता लेखक, कवी, संपादक, भाषांतरकार आदी मंडळींना ‘रिप्लेस’ करू शकत नाही मात्र त्याचा उपयोग करण्यामुळे आपले कसे फायदे होऊ शकतील, हे आपण पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन लेखक तथा कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ श्री पवन कुलकर्णी यांनी केले. ते अ. भा. मराठी प्रकाशक संघ व महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रकाशकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)’ कार्य शाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते .
श्री. पवन कुलकर्णी यांनी एआय वापरण्यामध्ये प्रॉम्प्टचे महत्व, अधिकाधिक चांगले प्रॉम्प्ट कसे द्यावेत आदी बाबी सांगून, शिकवून प्रॉम्प्टच्या विविध प्रकारातली फरक स्पष्ट केले. प्रॉम्प्ट देताना वापरायच्या की वर्ड्सची माहिती व त्याचे महत्वही त्यांनी सांगितले. लेखक, संपादक व भाषांतरकार यांसाठी ही सर्व माहिती अतिशय उपयुक्त होती. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते व या गोष्टी कशा प्रकारे वापरल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. याच सत्रात सहभागी मंडळींनी आपापल्या लॅपटॉपवर प्रयोग किंवा प्रात्यक्षिकही करून पाहिली.

संपादक, प्रकाशक, लेखक श्री. सुश्रुत कुलकर्णी यांनी ‘एकूणच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ?’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. हे नवीन तंत्र आपल्या वयाचा विचार न करता प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हे तंत्रज्ञान नवे नसून सुमारे ८० वर्षांपासून याचा प्रवास कसा सुरू आहे हे सांगून त्यांनी सध्याच्या विविध एआय टूल्सचा परिचय करून दिला. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधल्या वेगवेगळ्या प्रकारांचा फरक त्यांनी समजून दिला. यातील टोकन नावाच्या संकल्पनेची त्यांनी माहिती दिली. प्रकाशकांसाठी ही टूल्स कशा कशा प्रकारे काम करू शकतील व प्रकाशकांचे श्रम व वेळ कसा वाचवू शकतील, व हे सर्व का वापरावे या सर्व संकल्पना त्यांनी स्पष्ट केल्या.

तिसऱ्या सत्रामध्ये सीएश्री. शिरीष देशपांडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून निर्माण होणारे किंवा होऊ शकणारे धोके, त्याबाबत घ्यायची दक्षता आणि त्याबाबतचे कायदे यांची माहिती देताना हे सर्व कसे काम करते याचीही माहिती दिली. याबाबतीत कॉपीराईटचे मुद्दे, एआयने तयार केलेल्या गोष्टींबद्दलच्या जबाबदाऱ्या, वापरकर्त्याने घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर भाष्य केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा कामांमध्ये पन्नास टक्केच करावा असे सुचवून आजकाल जे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार होत आहेत त्यातून वाचण्याचे दृष्टीने काय काय काळजी घ्यावी याबाबतही माहिती दिली.
प्रकाशक संघाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. अमृता कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रकाशक संघ साहित्य क्षेत्रातील विविध घटकांसाठी करत असलेल्या कार्याचा परिचय करून देत प्रकाशकांच्या दृष्टीने आजच्या कार्यशाळेचे असलेले महत्त्व सांगितले.

कार्यकारिणी सदस्य श्री. मधुर बर्वे यांनी मान्यवर मार्गदर्शक व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
प्रकाशक संघातर्फे श्री. सुकुमार बेरी, श्री. पराग लोणकर, श्री. जयदीप कडू, श्री. युवराज माळी, श्री. नितीन हिरवे , सौ. वीणा पेशवे आणि श्री देवेंद्र भुजबळ हेही उपस्थित होते.
एकूण ही संपूर्ण कार्यशाळा सहभागी व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त अशी होती. प्रत्येक सत्र चालू असताना व प्रत्येक सत्रानंतर झालेली प्रश्नोत्तरे व कार्यशाळेत केलेला सराव यामध्ये सर्व सहभागी मंडळींचा उत्स्फूर्त आणि उत्साहाने सहभाग होता.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
