Homeलेख"माझी जीवन नौका" : 14

“माझी जीवन नौका” : 14

रसिक हो,
सप्रेम नमस्कार
माझी जीवन नौका या जहाजावरील माझ्या जीवनाच्या लेखमालेचे पहिले तेरा भाग प्रसिद्ध झाले. त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. ते भाग तुम्हाला आवडले.
त्यानंतर माझ्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशन मुळे लेखनात खंड पडला.
तू परत लेखन सुरू कधी करणार ? तुझ्या जीवन नौकेच्या पुढच्या प्रवासाचं वर्णन वाचायला आम्ही खूप उत्सुक आहोत असं अनेकांनी आवर्जून विचारलं. मलाही लेखमालेत खंड पडल्यामुळे चुकचुक वाटत होती. परत कधी एकदा लेखन सुरू करतो आहोत असं झालं होतं.
आता माझे डोळे पूर्ण बरे आहेत. डॉक्टरनी वाचायला, लिहायला परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे आज पासून परत लेखन सुरू केलं आहे. लेखमालेचा १४ वा भाग तुमच्या हातात देताना मला अतिशय आनंद होतो आहे.

पहिले तेरा भाग सोमवारी प्रसिद्ध झाले. आता सोयीच्या दृष्टीने प्रत्येक आठवड्याला दर मंगळवारी पुढचा एक एक भाग प्रसिद्ध होईल.
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांची उत्सुकतेने वाट बघत आहे. तुमचं कौतुक आणि आशीर्वाद हेच माझं बळ आहे.

सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचे कृपाशीर्वाद आणि तुम्हा सर्व रसिक वाचकांचे प्रेम, आशीर्वाद यांनी ही लेखमाला पूर्ण व्हावी ही सादर प्रार्थना……

“मुंबईकडे”

विशाखापट्टणम् कडून मुंबईकडे ट्रेन धावत होती आणि माझं मन लोकपालक आणि पार्ला…. दोन्हीकडे ओढत होतं.
कसली विचित्र जीवघेणी असते ही ओढ !
मुकुंदांपासून लांब जाताना डोळे परत परत भरून येत होते. मुकुंदांच्या जहाजावरच्या नोकरीच्या या जीवनात पुढे आमच्या वाट्याला येणाऱ्या अनेक दीर्घ विरहांची ती नांदीच होती.

जानेवारी फेब्रुवारी १९७९ पर्यंत नाव ही माहीत नसलेला एक तरुण मार्च-एप्रिल ७९ मध्ये अचानक आपल्या आयुष्यात येतो. एका क्षणात मनाने आपण पूर्ण त्याच्याच होऊन जातो, मे मध्ये लग्न होऊन त्याच्याशी इतकं एकरूप होऊन जायला होतं, हे सारंच अचंबित करणारं होतं.

आता हे सारं आठवताना गंमत वाटते……. पण लग्न झालं तेव्हा हा सगळा सोहळा करून, मुकुंदांची पत्नी होऊन सासरच्या घरी गेले आणि आता तिथेच कायमचं राहायचंय हे त्या क्षणी मनात रुजलंच नव्हतं.
एखाद्या पाहुण्यासारख्या आपण सासरी आलोय आणि आपल्या-आपल्या आई-बाबांच्या कडे परत जायचं आहे असंच काहीसं मनात नकळत तरळत होतं.

मुकुंद पासून प्रत्यक्ष दूर गेल्यावर आपण त्याच्यात किती गुंतलेल्या आहोत ते फार फार तीव्रतेने  जाणवलं.

नणंदा-भावजया दोघीजणी
मला स्टेशनवर उतरवून घ्यायला माझी नणंद वृंदा आली होती. मी ट्रेनमधून खाली उतरल्याबरोबर आम्ही एकमेकीला कडकडून मिठी मारली. टॅक्सीनं घरी आलो. मी घरी पोहोचायच्या वेळेला शेजाऱ्यांच्या फोनवर मुकुंदांनी फोन केला. मी सुखरूप पोहोचले आहे म्हटल्यावर त्यांना हुश्श झालं असणार !

माझे सासू-सासरे म्हणजे दादा-वहिनी सांगलीला काही कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे
नणंदा-भावजया
दोघीजणी
खेळत होत्या
छप्पा-पाणी
अशी आम्हा दोघींची धमाल सुरू होती. मी येणार म्हणून रविवारला जोडून वृंदानं दोन दिवस रजा घेतली होती. मुकुंदांचेही एक दिवसाआड फोन येत होते.

वृंदा आणि मी ! लग्नानंतर खूप खूप वर्षानंतरचा फोटो.

वृंदा आणि मी, आम्ही दोघी नणंद-भावजय म्हणून कधीच राहिलो नाही. आमच्यात कधी वाद नाहीत, गैरसमज – मतभेद नाहीत, भांडण तर नाहीच नाही.
तिचं आणि माझं नणंद-भावजयीचं नातं हे या नात्याच्या पारंपारिक बाजाला बट्टाच लावणारं होतं.
आमच्यातलं नातं कायमच फार प्रेमाचं, मैत्रीचं, विश्वासाचं होतं. आमचं लग्न ठरल्यावर आम्ही दोघी प्रथम एकमेकीला भेटलो त्या क्षणीच ते घडलं होतं.

आमचं लग्न झालं तेव्हा सांगलीत माझ्या सासरचा आशीर्वाद बंगला आणि जुनं घर यात खूप मोठा राबता होता. घरात दोन आजेसासवा, चुलत सासवा, चुलत सासरे, दीर-नणंदा होत्या. त्यावेळी हे एक मोठं नांदतं-गाजतं कुटुंब होतं.

घरात गौरी, गणपती, नवरात्र वगैरे सर्व कुलाचार यथासांग पार पडत. आमच्या जुन्या घरात माझ्या चुलत सासूबाई पुष्पाकाकू हे सर्व अगदी साग्रसंगीत, आनंदाने करत असत. त्यावेळी सगळ्या कार्यक्रमांना, पूजा – जेवणं याला जुन्या घरी सर्वजण एकत्र असत.

आमच्या पिढीतली मी पहिली, सर्वात मोठी सून. म्हणून घरातल्या मोठ्या मंडळींनी आदेश दिला की सर्व दिरानणंदांनी वेदवतीला अहो वहिनी म्हणायचं. नणंद असल्यामुळे मला ही वृंदाला नियमाप्रमाणे अहो वृंदाताई म्हणायला लागलं.
आम्ही फक्त चारेक महिने फरकानं अगदी बरोबरीच्या होतो. आम्हा दोघींना ही हा नियम अजिबात रुचला नव्हता. पण….. !
अर्थात तो अहोकार आमच्यातल्या मैत्रीच्या, विश्वासाच्या, प्रेमाच्या नात्याच्या आड  मात्र कधीच येवू शकला नाही.

अगदी बरोबरच्या असूनही एकमेकीला नियम म्हणून अहो म्हणावं लागणं हा लग्न झाल्यावर  बरोबरचा मला पहिलाच फार विचित्र धक्का होता. कदाचित पुढच्या असंख्य अतिविचित्र धक्क्यांची ती चुणूकंच असावी. असो.

वृंदा आणि मी… आम्हा दोघींच्यात अहो वृंदाताई यांचं पुढे काही वर्षांनी सहज ए वृंदा आणि तिनेही अहो वहिनी सोडून अगं वेदवती म्हणणं असं आपसूकंच घडत गेलं.
तितक्याच सहज पुढे अनेक वर्षांनी माझ्या सासूबाईंना ही मी अहो वहिनी वरून ए वहिनी म्हणायला लागले.

चार दिवसांनी दादा-वहिनी येणार होते.
घरी पोहोचल्यावर खूप छान वाटलं. माझं घर जहाजावर मागे राहिलं होतं. पण जमिनीवरच्या या माझ्याच घराची ओढ खरंच वेगळीच होती.

वृंदाच्या हाताला अप्रतिम चव होती. जहाजाच्या जेवणा नंतर घरातलं जेवण अमृताहुनी गोड लागत होतं. जहाजावर मी जशी पाककलांनिपुणंच झाले होते. मग मी स्वयंपाक घराचा ताबा घेतला.

संध्याकाळी आम्ही दोघींनी आधी शर्मा भेळ पुरीवाल्याच्या दुकानाला भेट दिली. मनसोक्त पाणीपुरी, रगडा पॅटीस खाऊन घरी आलो. जीव तृप्त झाला.

आमची वृंदा
वृंदा खूप हिम्मतवान पण तेवढीच शांत. वृत्तीने आनंदी आणि खेळकर !
तिचं वाचनही भरपूर आणि सकस होतं. विचार स्पष्ट होते.

आम्ही कॉलेजमध्ये असताना देशात आणीबाणी पुकारली गेली होती. त्याला प्रचंड विरोध ही येत होता. धरपकड होत होती. सत्याग्रहींना तुरुंगात डांबले जात होते. हे सारं गैर आहे, आपण ही या लढ्यात उतरायचं असं म्हणून वृंदाने त्यात भाग घेतला.
आणीबाणीला विरोध करणाऱ्या मोर्चात भाग घ्यायला वहिनी परवानगी देणार नाही म्हणून तिला न सांगताच बाईसाहेब मोर्चात सामील झाल्या. अर्थात दादांना त्याची कल्पना तिने दिली होती.
मग काय, तिला अटक झाली आणि तुरुंगवास ही भोगावा लागला होता. त्यानंतर लवकरच सुटका ही झाली. त्यानंतर तिचं B.Com. पूर्ण झालं.

तिच्या या मोर्चात भाग घेण्याचे, तुरुंगवासाचं मला फारच कुतूहल होतं. त्या बद्दल मी तिला विचारलं तर मोठ्या मिश्कीलपणे हसत  म्हणाली, मला अटक करून घेऊन तुरुंगात जायचंच होतं. तुरुंग आतून कसा असतो ते बघायचं होतं.
दोघीही खो-खो हसलो.
मी म्हटलं, मग एखादा दरोडा वगैरे तरी टाकायचास ! की एवढ्या लवकर सुटका न होता तुला आतून तुरुंग मनसोक्त बघता आला असता
दोघीही परत खी-खी-खू-खू !

वृंदाने B. Com. केल्यावर नोकरीच करायची असं ठरवलं. तिची पहिली नोकरी, Post and telegraph मध्ये होती. तिच्या ऑफिस मधल्या मैत्रिणी माझ्या ही मैत्रिणी झाल्या.
त्या चार दिवसात मुंबईच्या लोकल ट्रेनमधून कसा प्रवास करायचा ते मला वृंदानं शिकवलं. अगदी इंडिकेटर कसे असतात, कुठल्या जिन्याने जायचं, तिकीट कसं काढायचं, रिटर्न तिकीट म्हणजे काय वगैरे सर्व ट्रेनिंग झालं.

एकदा तिनं आणि तिच्या मैत्रिणींनी ठरवून दादर स्टेशनवर मला बोलावलं.
मी लोकलने तिथे तिला भेटले. तेथून आम्ही सिनेमा बघून घरी आलो. मी एकटीने केलेला तो लोकलचा पहिला प्रवास म्हणजे माझ्यासाठी पहिलंवहिलं मोठं धाडस होतं !

पार्ल्यातलं पहिलं गृहिणीपण
सकाळी वृंदा डबा घेऊन ऑफिसला जायची. दुपारी धुणं भांडी करायला जानकीची मुलगी शकू यायची. तर रात्रीच्या भांड्याला सुलोचना म्हणून बाई यायची.
जानकीनं मुकुंदा काय म्हणतोय ? जहाजावर स्वयंपाक पाणी करतेस का? असं  मला विचारलं. मुकुंद बद्दल आरे-जारे करून केलेल्या चौकशीचं मला आश्चर्यच वाटलं. मग समजलं की मुकुंद अगदी लहान, शाळेत असल्यापासून जानकी आमच्याकडे काम करते आहे.
आमच्या बिल्डिंगमध्ये काम करणारी इंदिरा, आत्माराम ही खूप जुनी नोकर मंडळी ! अतिशय प्रेमळ. सगळ्यांनी आमची खुशाली विचारली.
खरंच ही सगळी कोकणातून मुंबईत कामासाठी आलेली माणसं किती प्रेमळ असतात !

सकाळची गडबड आवरली की शेजारीपाजारी कौतुकाने येऊन चौकशी करत, गप्पा मारत. संध्याकाळी वृंदा आली की दोघींची नुसती गप्पांची चिवचिव, बडबड चालायची.
दोघी मिळून रेकॉर्ड प्लेयर वर गाण्यांच्या रेकॉर्ड लावून ऐकायचो. त्यात मधुमती मधलं दैय्यारी दैय्यारी चढ गयो पापी बिछुवा हे गाणं तर पारायणं करून ऐकायचो. वृंदा मला चिडवून बेजार करायची.
थांब तुझी वेळ येईल तेव्हा बघून घेईन अशी गोड धमकी मी ही तिला द्यायची.

मग एका संध्याकाळी शेजारच्या हळदणकर मावशींनी आम्हा दोघींना जेवायला बोलावलं. मी अजिबात नॉनव्हेज खात नव्हते. त्यामुळे कोकणी मसाले घातलेला पण मस्त व्हेज स्वयंपाक त्यांनी केला होता. शेजारच्या नाईक काकी, लताच्या आई, त्यांच्या लेकी खूप प्रेमानं येऊन गप्पा मारायच्या.
वृंदा ऑफिसला गेली की एवढासा चहा घ्यायला ये गो म्हणून आग्रहाने चहा प्यायला लावायच्या.

माझी एक आतेनणंद मीरुताई त्यावेळी किर्लोस्करवाडीला राहात होती. त्यांचे पती, श्री रमेश नेर्लेकर किर्लोस्करवाडीत नोकरीला होते. ऑफिसच्या काही कामानिमित्त ते मुंबईत आले होते.
त्यादिवशी संध्याकाळी ते आमच्याकडे आले. त्यांच्याशी लग्नात ओळख झाली होती. पण त्यावेळी इतक्या असंख्य नातेवाईकांच्या ओळखी करून दिल्या होत्या की लक्षात राहणं कठीण होतं. मग वृंदानं त्यांची ओळख करून दिली.

आम्ही तिघांनी खूप गप्पा मारल्या. जेवायला आग्रहाने ठेवून घेतले. सासरी आलेल्या पाहुण्याची गृहिणी म्हणून सरबराई करायची माझी पहिलीच वेळ होती.
रमेशदादांना स्वयंपाक आवडला. आनंदाने जेवले. मन अगदी फुलून आलं माझं ! गप्पा मारताना मनावरचं ओझं खूप कमी झालं.

आमचे रमेशदादा खरोखरंच फार मनमिळावू, सज्जन गृहस्थ होते असंच म्हणावं लागेल. पुढे काही वर्षांनी संसार अर्ध्यावर असतानाच अचानक देवाघरी गेले.

रमेशदादांनी माझी शाळा, कॉलेज, मी English literature घेऊन B. A. केलेले होतं त्याविषयी खूप प्रश्न विचारले. साहित्यात इतका रस घेणारा माणूस पाहून छान वाटलं.
Oedipus Rex, Phaedra या ग्रीक ट्रॅजेडीज…. असल्या भन्नाट विषयांवर सुद्धा बोललो आम्ही. ती संध्याकाळ खूप छान, वेगळीच होती.

मुकुंदांचे फोन अधून-मधून येत होतेच. आई-बाबा, भावंडे, अजोळची सगळी मंडळी या सर्वांना भेटायला माझं मन व्याकूळलं होतं.
पण मला कलकत्त्याला कधीही पटकन निघावे लागायची शक्यता होती. त्यामुळे सांगलीला जाता आलं नाही. त्यांच्याशी जमेल तसं मी शेजाऱ्यांच्या फोनवर बोलत होते.

तीन-चार दिवसांनी दादा-वहिनी आले. चार दिवस का होईना सूनबाई घरी येऊ शकली याचा वहिनींना फार आनंद झाला होता. मग वहिनींच्या हाताखाली माझी अप्रेंटिसशिप परत सुरु झाली.

तीनही भावंडे : मुकुंद, डॉ श्रीकांत आणि वृंदा.

जहाज पुढच्या प्रवासाला कुठे जाणार आहे हे अजून ही ठरत नव्हतं. पण हे जहाज नेहमी परदेशच्या दौऱ्यावरच असायचं. त्यामुळे युरोप किंवा ऑस्ट्रेलियाला जाईल असं सर्वांना वाटायचं. म्हणून मग मी आणि वृंदानं त्यादृष्टीने थोडी कपडे खरेदी केली.

सांगली सारख्या गावात मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच साडी नेसायची अशीच पद्धत होती. आम्ही सर्व मैत्रिणी कॉलेजला, घराबाहेर कुठेही जाताना साड्याच नेसायचो. पिन लावून एका खांद्यावर पदर सोडायचा नाही. कायम दोन खांद्यावर पदर !
त्यामुळे जहाजावर ही मी साडीच नेसत होते.
पदराच्या छान निऱ्या घालून, पिन लावून, डाव्या खांद्यावर पदर कसा टाचायचा ते मला वृंदानेच शिकवलं.

एकदा साड्यांचे हिरवा पिवळा निळा लाल काळा पांढरा असे पाच सहा रंगाचे फॉल घेऊन आलो.
निरनिराळ्या रंगांच्या साड्यांवर चालू शकतील अशी चार ब्लाउजं पण शिवून घेतली.
परदेशात कुठे साडी खरेदी करता आली तर आपली तयारी हवी या दृष्टीने ही सगळी सज्जता आम्ही दोघींनी करून टाकली. माझ्याबरोबर वृंदासाठीही आग्रहानं  खरेदी केली.
आम्हा दोघींची ती गडबड पाहून वहिनीला खूप मजा वाटत होती आणि कौतुक ही वाटत होतं.

मुकुंदांच्या आठवणीत तर मी अखंड बुडून गेले होते. मला जहाजावर परत कधी जाता येईल याची वाट बघत होते. आता मुंबईत येऊन सुद्धा जवळजवळ नऊ-दहा दिवस झाले होते. मला येणाऱ्या बुलाव्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अनेकदा डोळे भरून येत होते. वृंदाजवळ गुपचूप रडत ही होते.

परत विशाखापट्टणकडे
आणि अचानक एके दिवशी सकाळी साधारण अकराच्या सुमाराला मुकुंदांचा फोन आला. माझी प्रतीक्षा संपली.
दोन दिवसानंतर आचार्य म्हणून एक फिफ्थ इंजिनियर जहाज जॉईन करणार होता. त्याच्या सोबतीने मुकुंदांनी माझी कलकत्त्याला यायची व्यवस्था केली. ऑफिसला कळवून त्याच्या बरोबरंच माझं ही विमानाचे तिकीट त्यांनी काढलं.

आता परत बॅग भरायची ! नव्याने घेतलेले कपडे, खायचे पदार्थ याच्या बांधाबांधीची गडबड उडून गेली.

मी निघताना परत तीच व्याकुळता ! वहिनी, वृंदाचा निरोप घेताना फार जड वाटत होतं. डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं…. पण मुकुंदाना भेटायची अधीरता मनात मावत नव्हती. मन नावे सारखं हेलकावत होतं.

वहिनींनी ओटी भरली. हातावर दही घातलं. मला एअरपोर्टवर सोडायला वृंदा आणि दादा आले होते. तिथे फिफ्थ इंजिनियर आचार्य भेटले. विमानाने कलकत्त्याच्या दिशेने झेप घेतली. पण विमानाच्या पंखांच्या आधी फुलपाखराचे पंख लावून मन कधीच कलकत्त्याला पोहोचलं होतं.
एअरपोर्टवर मला घ्यायला मुकुंद आले होते. लांबूनच एकमेकाला पाहिलं आणि नजरेनंच एकमेकाला भेटलो !
पहिल्यांदा दूर राहून परत भेटताना काय वाटलं त्या उत्सवाचं मला तरी शब्दात वर्णन नाही करता येणार !

आता नका क्षणांनो दोघात भिंत घालू…. !
हीच ती मन विंधणारी, जीव पिंजून काढणारी उत्सुकता ! तीच आयुष्यात पुढे असंख्य वेळेला वाट्याला येणार आहे याची त्या कोवळ्या वयात आणि कोवळ्या क्षणात जाणीवच नव्हती.

विमान पोहोचायला रात्र होणार होती. आमची शिप लोकपालक कलकत्त्याच्या एका जेट्टीवर उभी होती. ही जेट्टी कलकत्त्यापासून खूप लांब होती. म्हणून शहरातील मरीन क्लब मधे एक रूम मुकुंनी book केली होती. मला आवडतात म्हणून गजरे आणून ठेवले होते. ती रात्र मरीन क्लब वर राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे सर्व सामान-सुमान घेऊन शिप वर गेलो.

जहाजावरचं रोजचं काम, घाई-गडबड सुरू होती. सर्वांनी खूप आनंदाने स्वागत केलं. हरीने पहिला प्रश्न विचारला, घरसे खाने मे क्या क्या लाई हो ?
आमचा स्टुअर्ड करवालोनं Good morning म्हणून स्वागत केलं आणि मला अगदी *आपल्या घरी* आल्याचा आनंद झाला !
क्रमशः

वेदवती कुलकर्णी

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले (पूर्व) मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800*

RELATED ARTICLES

11 COMMENTS

  1. डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर मोठी सुट्टी झाली त्यानंतर लेखमाला परत पुढे सुरू करताना मनाला एक हुरहुर वाटत होतीच.

    वाचक हो,
    तुम्हा सर्वांच्या प्रेम व प्रतिसादांमुळे पुढचं लेखन करण्याचा उत्साह वाटला.

    आपण सर्वांनी माझी जीवन नौका या माझ्या लेखमालेच्या चौदाव्या भागाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप धन्यवाद.
    पुढच्या ही सर्व भागांचे माझ्याकडून चांगले लेखन व्हावे आणि आपण ते जरूर वाचावेत, प्रतिसाद द्यावा.
    आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे.
    🌷🙏
    शुभैषी,
    वेदवती मुकुंद कुलकर्णी.
    विलेपार्ले पूर्व , मुंबई

  2. वेदवती ताई,
    लोकपालकमधील तुमच्या पुनरागमनाने जसा जहाजावरील तुमच्या कुटुंबियांना आनंद वाटला तसाच,
    लेखमालिकेतील पुनरागमनाने रसिक वाचकांना आनंद वाटला. मस्त योगायोग 👌👌

  3. Pradnyatai, मी पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. Cataractच्या operationनंतर तुम्ही पूर्णपणे बरे झालातं आणि डॉक्टरांनी तुम्हाला वाचण्याची व लिहिण्याची परवानगी दिली आहे, हे ऐकून आनंद झाला, take care

  4. वेदवती ताई
    या लेखमालेतील आजचे लेखन हे *माझी जीवन नका*
    या शीर्षकाला साजेसे आहे. विशाखापटनम आणि मुंबई तसेच सासर आणि माहेर हे साम्य आणि तुमची झालेली धुलाई मान स्थिती प्रकर्षाने जाणवली.
    नणंद भावजय यांची मैत्री अनोखी.*आम्ही नणंद भावजया जणू बहिणी समजाव्या* सुखी जीवनाचा मंत्र तुम्हाला लीलया सापडला. नेहमीप्रमाणे लेखन खूप उगवतं आणि मनाला भावेल असेच झाले आहे.
    *डॉ. सुरेखा विवेक जोशी*

  5. वेदवती, खूप छान लिहिलं आहेस. तुझी मानसिक उलाघाल अगदी तरल पणे व्यक्त केली आहेस. खूप दिवसांनी तुझ्या आठवणी वाचायला मिळाल्या. तुझ्या जीवन नौकेचा प्रवास असाच आमच्यासमोर उलगडू दे.

  6. खूप छान मनाची उलघाल मांडली आहे, नव्या जगतात प्रवेश व नंतर समरस होतानाचे बारकावे पकड घेतात. आता पुढे वाचायला मजा येईल

  7. वेदवती उर्फ प्रज्ञा, नववधूचं अंतर्मन तू या लेखात योग्य शब्दात टिपले आहेस. नणंद,भावजय यांचं सुंदर नातं तू चित्रित केलं आहेस‌.ते तुझ्या शब्दात ‘अपारंपारिक’ पण आदर्शवत् आहे. याबाबतीत तू खूप नशीबवान आहेस. सासरच्या लोकांच्या प्रेमाने तुला पतीविरहवेदना सहन करता आली. ‘अहो’चे कालांतराने ‘ए’ झाले. हा बदलही नातेसंबंध कसे घट्ट झाले याचे द्योतक आहे. वृंदाचे शब्दचित्र तू सुरेख रेखाटलं आहेस. आणीबाणीत वृंदा तुरुंगात गेली हे खूप धाडस होते.याबरोबर वृंदाची तुरुंग पाहण्याची जिज्ञासा कौतुकास्पद वाटते.मुंबईच्या जीवनाचे तू घेतलेलं व्यावहारिक शिक्षण, घरकाम करणाऱ्यांची आपुलकी, रमेशदादाची इंग्रजी साहित्याबद्दलची चर्चा, पत्नीकडे परत जाण्यासाठी तू करत असलेली तयारी आणि पतीची भेट याचं वर्णन तू खूप उत्कटपणे केलं आहेस.तुझ्या लेखनास अनेक शुभेच्छा.

  8. नेहमी सारखा लेख उत्तम झालेला आहे. सर्व लेखांचे मिळून छान पुस्तक होउन जाउदे

  9. जहाज प्रवासाआधीची मुंबई ट्रिप आणि मुकुंद यांपासून दूर राहण्यातील तरल भाव छान व्यक्त झालेत. आता पुढं काय ही उत्सुकता आहे.

  10. व्वा !! इतक्या दिवसांच्या gap ने लिहिलयसं तरी link तुटली नाहीये तेवढच उत्कंठावर्धक .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments