Monday, November 11, 2024
Homeलेख"माध्यम पन्नाशी" :  १०

“माध्यम पन्नाशी” :  १०

दिसतं तसं नसतं !
   ‌‌
थोर साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी माझ्या पहिल्या वहिल्या कथेला अभिप्रायाच्या रूपाने आशीर्वाद दिला. ते आशीर्वचनाचे चार शब्द माध्यम मुशाफिरी करताना आयुष्यभर दिपस्तंभासारखे दिशादर्शक ठरले. गो.नी.दां चे माझ्या अंत:करणात कोरलेले ते शब्द होते, “केवळ दृष्टी सदैव मोकळी ठेवायला हवी. मोकळी आणि अकल्पिताच्या  स्वागतासाठी सिद्ध ! तेवढे ते स्वागत करणे साधले, तर मग सारे साहित्यक्षेत्र नव्याच्या सत्कारासाठी सिद्ध आहे !”

खरंच! गो.नी. दां च्या या संदेशाने मला मोकळी आणि वेगळी दृष्टी दिली. ती दृष्टी सभोवताली घडणाऱ्या घटनांना संवेदनशीलतेने टिपत होती. त्याचवेळी त्या घटना, त्या घटनांशी संबंधित व्यक्तींच्या मनाचा तळ गाठून आंत खोलवर दडलेली सत्यता शोधण्याचा प्रयास करत होती. ही दृष्टी अज्ञात घटितांचा दृष्टिगोचर होणारा भाग टिपत होतीच. त्याचबरोबर संवेदनशीलतेने त्या घटितांच्या आंत खोल दडलेल्या पण दृष्टिक्षेपाच्या पलीकडील गोष्टींचा अन्वयार्थही शोधत होती. ही सटिक, साक्षेपी नजर गो.नी.दां च्या संदेशातील त्या चार शब्दांनी अंत:चक्षुंना बहाल केली हे निर्विवाद सत्य ! सुदैवाने या मोकळ्या दृष्टीला पोषक ठरतील अशा संधी आकाशवाणीतील बाह्य ध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमांनी मला भरभरून दिल्या हे माझं सौभाग्य !

एक दिवस कुटुंब कल्याण विभागाकडून एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं. मी नेहमीप्रमाणे सनदी साहेबांशी कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यासाठी आकाशवाणीत गेले. कॉन्ट्रॅक्टवर विषयाचा उल्लेख मोघम होता. तो मला नीटसा समजला नव्हता. “तुला चेंबूरच्या “बालकल्याणनगरी” या संस्थेतील मुलांवर कार्यक्रम करायचा आहे”. सनदी साहेब म्हणाले.
“कधी येणार आहेत संस्थेची लोक आकाशवाणीत रेकॉर्डिंग ला ?” माझी विचारणा.
“अहं,  तुला चेंबूरला बालकल्याणनगरीत जायचंय. ते इथे येणार नाहीत.”
“अरे बापरे ! मग रेकॉर्डिंग कसं करायचं ?”
“तू तिथे जाताना सोबत पोर्टेबल रेकॉर्डर आणि काही टेप्स घेऊन जा. तिथे जाऊन संचालक, पर्यवेक्षक, शिक्षक, तिथली मुलं आणि मुली या सर्वांच्या मुलाखती टेप्स वर रेकॉर्ड कर.”
“मला जमेल हे ?”
“न जमायला काय झालं ? जशा तू आकाशवाणीच्या स्टुडिओत मुलाखती घेतेस तशाच तिथे घ्यायच्या. असे spot interviews घेऊन त्याच्या टेप्स घेऊन आकाशवाणीत ये. पुढे काय करायचं ते मी तुला नंतर सांगेन !”

सनदी साहेब मला गुरुस्थानी ! त्यांचा शब्द डावलणं शक्यच नव्हतं. सनदी साहेबांनी ‘बालकल्याणनगरी’ या संस्थेच्या प्रमुख संचालकांची दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतली. मनावर खूप मोठं दडपण घेऊन मी निघाले. तडक बाजारात जाऊन एक चांगला वजनदार पण आटोपशीर असा पोर्टेबल रेकॉर्डर आणि काही टेप्स विकत घेतल्या.
हा रेकॉर्डर पुढे अनेक वर्ष माझा जिवाभावाचा सांगाती बनेल आणि जागोजागी मला साथ देईल हे तेव्हा मला कुठे ठाऊक होतं ?
आज तंत्रज्ञान खूपच अद्ययावत झालं आहे. मोबाईल क्रांतीने बाह्यध्वनीमुद्रणाच्या तंत्रात अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. तसंच कॉम्प्युटरमुळे एडिटिंग ही सुलभ झालं आहे. असं असलं तरी बाह्यध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमांचा मूळ गाभा मात्र पन्नास वर्षानंतरही तसाच आहे.

तर बालकल्याण नगरी इथल्या बाह्य ध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमाने माझ्या माध्यमातील मुशाफिरीला सुरुवात झाली. त्यानंतर पुढील काळांत बाह्य ध्वनिमुद्रणाचे असे शेकडो कार्यक्रम करण्याची नामी संधी आकाशवाणीतील वेगवेगळ्या निर्मात्यांनी मला प्रत्यही दिली. त्यानिमित्ताने मी आकाशवाणीतल्या बंदिस्त स्टुडिओतून आणि चाकोरीबद्ध कार्यक्रम करण्यातून बाहेर पडले. उघड्या जगांत वावरले. या कार्यक्रमांनी मला चार भिंतीतल्या सुरक्षित, उबदार घरांतूनही बाहेर काढलं आणि पंचतारांकित दुनियेपासून झोपडपट्ट्या, डान्सबार, वेश्यावस्त्यांपर्यंत जागोजागी फिरवलं. त्यामुळे मुंबईसह उभ्या महाराष्ट्राची ओळख झाली. प्रत्येक ठिकाणांचे, तिथल्या माणसांचे अनुभव मी संवेदनशीलतेने टिपत गेले. त्या अनुभवांनी माझ्या मनावर खोल ठसा उमटवला. चौकटी बाहेरच्या वेगवेगळ्या विषयांचा आणि माणसांचा त्यानिमित्ताने परिचय झाला आणि हळूहळू मनांतला मध्यमवर्गीय संकोच गळून पडला. त्यामुळे कोणत्याही स्तरातल्या माणसांशी संवाद साधण्याची कला अवगत झाली. त्या निकट संवादातून समाजातल्या उपेक्षितांची, वंचितांची दुःख, वेदना जाणता आल्या. वृत्तपत्रं, आकाशवाणी, दूरदर्शन अशा विविध माध्यमांतून त्या व्यथा  मांडता आल्या. हस्तीदंती मनोऱ्यांतील सुखवस्तू समाजापर्यंत त्या पोहोचवता आल्या. त्यांच्यामध्ये अल्पशी जाणीव जागृती निर्माण करण्यात यश आलं. माध्यमांच्या या जगतामुळे अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे हातून अल्पशी सामाजिक जबाबदारी पार पाडता आली याचं खूप समाधान आहे. या कार्यक्रमांमुळे स्वतःच्या खाजगी आयुष्यातील जमेची बाजू अधोरेखित झाली आणि वैयक्तिक आयुष्यातील उणीवा, व्यथा कृत्रिम आणि क्षुद्र वाटू लागल्या.

एकूणच बाह्यध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमांमुळे एक अनोख विश्व नजरेसमोर उलगडत गेलं आणि माझं वैयक्तिक आयुष्य आशयघन झालं. अनुभवसंपन्न झालं.
तर अशा वेगळ्या अनुभवविश्वाची पहिली झलक मी अनुभवली ती बालकल्याणनगरीतल्या त्या कार्यक्रमामध्ये !
ऐन दुपारची वेळ ! रणरणत्या उन्हात हातांतला जड रेकॉर्डर सावरत तिथल्या विस्तीर्ण आवारात मी पाय टाकला. आपण जरा मॅच्युअर दिसावं यासाठी प्रथमच नेसलेल्या साडीत पावलं अडखळली. पण सावरून आवारातल्या बैठ्या बराकीसारख्या दिसणाऱ्या खोल्यांच्या दिशेने मी चार पावलं टाकली आणि अचानक कुठून तरी पाच पंचवीस मुलांचा घोळका माझ्याकडे धावत आला. त्या मळकट, साध्याशा कपड्यातल्या मुलांनी मला घेराव घातला. त्या काहीशा थोराड, नुकती मिसरूड फुटलेल्या, वेडसर दिसणाऱ्या मुलांनी माझा जणू ताबाच घेतला. बघता बघता त्या मुलांपैकी एकाने माझ्या हातातला रेकॉर्डर खेचला. दुसऱ्याने माझ्या शेपट्यात माळलेल्या पिवळ्या गुलाबाला हात लावला. तिसऱ्या मुलाने माझी पर्स खेचली. तर आणखी एकाने माझ्या पदरालाच हात घातला. आता मात्र मी घाबरून किंचाळलेच. क्षणभर असं वाटलं तिथून पळून जावं ! नको तो आकाशवाणीचा कार्यक्रम ! बिलकुल नको. तेवढ्यात त्या भल्या मोठ्या आवाराच्या टोकाशी असणाऱ्या बैठ्या कौलारू इमारतीतून एक शिक्षिका धावत माझ्याकडे आली. तिने त्या मुलांच्या गराड्यातून मला सोडवलं. मी थरथरत उभी होते. तिने सगळ्या मुलांना पांगवलं. माझा हात धरला आणि मला ऑफिसच्या दिशेने नेऊ लागली. मी सहज मागे वळून पाहिलं. मुलांचा तो घोळका आताही थोडंसं अंतर राखून आम्हा दोघींच्या मागून येतच होता. पण आता माझा  धीर थोडा चेपला होता. छातीतली धडधड कमी झाली होती.

त्या शिक्षिकेने मला ऑफिसमध्ये बसवलं. पाणी पाजलं. मी थोडी स्थिर झाले. पण आता एक नवीनच दडपण येऊ लागलं. या अशा (?) मुलांच्या मुलाखती कशा घ्यायच्या ? ही मुलं काय बोलतील ? कसं बोलतील ? संस्थेची माहिती कशी देतील ? सगळं काही खूपच अवघड वाटत होतं. हा पहिलाच बाह्य ध्वनिमुद्रणाचा कार्यक्रम एक चॅलेंजच होता माझ्यासाठी !
थोडा वेळ तसाच गेला. संस्थाचालक बाहेर गेले होते. त्यांना यायला थोडा वेळ होता. मी दबकत उठले. त्या शिक्षिकेला म्हटलं, “सर येईपर्यंत मी संस्था बघू शकते का ?” तिने तत्परतेने होकार दिला. आम्ही एकेका खोलीतून फिरू लागलो. हळूहळू माझ्या लक्षात आलं, मळकट कपड्यातली कळकट अवतारातली ही बिनचेहऱ्याची मुलं मतिमंद आहेत. ही सगळी मुलं आजूबाजूच्या वस्त्यांमधली गोरगरिबांची मतिमंद मुलं आहेत. मुळांत गरीबी ! त्यात गतिमंदतेचा शाप !  त्यामुळे त्या सगळ्यांचे चेहरे कमालीचे दिनवाणे दिसत होते.
आता हळूहळू मी त्या मुलांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलू लागले. ती मुलं गोड हसत, हातवारे करत माझ्याशी त्यांच्या बालीश शब्दांत संवाद साधू लागली आणि क्षणांत डोक्यांत लख्ख प्रकाश पडला.
अंगापिंडाने मजबूत असलेली, नुकती मिसरूड फुटलेली ही पौगंडावस्थेतील मुलं, दिसायला दणकट असली, तरुण असली तरी त्यांचं मानसिक वय जेमतेम पाच ते सात वर्षांच होतं. मी आवारांत पाऊल टाकल्यावर एका अनोळखी व्यक्तीला पाहण्यासाठी ती माझ्या भोवती जमा झाली होती. माझ्या हातांतल्या रेकॉर्डरला, जो त्यांनी यापूर्वी कदाचित कधीच बघितला नसेल, केसांतल्या फुलाला, साडीच्या पदराला ही निरागस मुलं बालसुलभ कुतूहलाने पाहत होती. त्याला हात लावत होती. त्या स्पर्शात वासनेचा लवलेश नव्हता. होती ती फक्त जिज्ञासा ! कुतूहल ! पाच सहा वर्षाच्या मुलाला असावं तेच आणि तसंच कुतूहल !

मला माझीच लाज वाटली. मी स्वतःहून पुढे झाले. एका थोराड दिसणाऱ्या पण चेहऱ्यावर बालभाव असलेल्या मुलाला मी प्रेमाने थोपटलं. हळूच रेकॉर्डर ऑन केला आणि त्याला विचारलं, “तुला कसं वाटतं इथे ? तू काय काय शिकतोस ?” त्याला बाजूला ढकलून दुसरा दांडगट मुलगा पुढे झाला. सांगायला लागला, “आम्ही ना मैदानात फुटबॉल खेळतो. पण बाई आम्हाला ओरडतात आणि काळोख पडला की खोलीत कोंडतात. प्रार्थना म्हणायची असते ना मग ! आणि हा ना रोज माझी चपाती पळवतो” दुसऱ्याने तक्रार केली.
आता मला त्यांच्या गप्पांमध्ये गंमत वाटू लागली. ती मुलंही माझ्याशी खुलून बोलू लागली. माझ्या हातातला रेकॉर्डर चोख काम करत होता. मध्येच खट आवाज आला. टेप संपली. मी दुसरी टेप घातली. मग तिसरी —– चौथी—– बऱ्याच वेळाने संस्थेचे प्रमुख आले असल्याचा निरोप मिळाला. मी ऑफिस कडे निघाले. त्या मुलांचा निरोप घेताना प्रत्येकाने जोरजोरांत माझा हात हातात धरून हलवला. क्षणभर त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं आणि माझ्याही ! भरलेल्या डोळ्यांनी त्या मुलांपासून दूर दूर जाताना आयुष्याने एक नवा धडा शिकवला !

“दिसत तसं नसत !” जे दिसतय त्याच्या पलीकडच्या जगांत डोकवायला हवं. त्यासाठी दृष्टी सदैव मोकळी आणि अकल्पिताच्या स्वागतासाठी सिद्ध ठेवायला हवी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ! अशा सामाजिक संस्थांमधून फिरताना टिपिकल  संकुचित विचारांची झापडं दूर सारून संवेदनशीलतेने या माणसांमध्ये मिसळायला हवं. त्यांच्या पातळीवर उतरून त्यांच्याशी संवाद साधायला हवा. तरच त्यांचं खरं खुरं आयुष्य जाणता येईल. श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येईल. मात्र त्यासाठी आकाशवाणीच्या औपचारिक कोरड्या मुलाखतीचा हेतू मनात न ठेवता, स्वतःच्या आंतल्या खोल गाभ्यातल्या हळव्या संवेदनांना जागं करावं लागेल ! आत्मीयतेच्या हळुवार शब्दांनी अशा वंचितांच्या दुःखावर फुंकर घातली, तर आणि तरच संवादातून सुसंवाद घडेल ! अशा सुसंवादातून त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी घडामोडी घडतील असा भाबडा आशावाद न ठेवता, त्या लोकांचे काही क्षण आपल्याला सुकर, सुंदर करता आले याचं सीमित
समाधानही खूप खूप मोठं असेल !
गेली ५० वर्षे सामाजिक संस्थांवर बाह्यध्वनीमुद्रणाचे असंख्य कार्यक्रम केले. आजही करत आहे. पण प्रत्येक वेळी मनाच्या तळाशी हा विचार दृढ असतो. आजही !
क्रमशः

— लेखन : माधुरी ताम्हणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती :  अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खरंच बाह्य ध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमांमुळे एक आगळं वेगळं जग नजरे समोर आलं आणि सगळं आयुष्य अनुभव संपन्न करुन गेलं.

  2. बाह्यमुद्रणाचा पहिलाच अनुभव तुम्हाला बरच काही शिकवून गेला. हा अनुभव खूप छान शब्दबद्ध केलात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments