Homeलेखपद्मश्री प्रसाद सावकार

पद्मश्री प्रसाद सावकार

जीवन झाले सुरेल मैफिल !
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भारत सरकार तर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्याच्या बातम्या सुध्दा देशभर झळकतात. पण या बातम्यांना मर्यादा असते, त्यामुळे या सर्व व्यक्तींचे सविस्तर कार्य, जीवन परिचय आपल्या पुढे येतोच, असे नाही. म्हणून आपण “पद्मश्री” ही लेखमाला आपल्या पोर्टल वर सुरू करीत आहोत. सिंगापूर स्थित लेखिका, जाज्वल्य देशभक्त, स्टेट बँकेच्या निवृत्त व्यवस्थापक नीला बर्वे या ही लेखमाला लिहिणार आहेत. अतिशय छान कल्पना सुचली या बद्दल आणि त्यासाठी विशेष परिश्रम घेत असल्याबद्दल बर्वे मॅडम यांचे मनःपुर्वक अभिनंदन. वाचू या आजचा पहिला भाग.
– संपादक

“मॅडम, आत येऊ कां ?” गोव्याला पणजी शाखेत बदली झाल्यापासून या प्रश्नाची सवय झाली होती. कामासाठी तर ग्राहक यायचेच पण, “नवो, मॅनेजर कोण पळोवया” म्हणत सहज येऊन, भेटून ओळख करून घेणारेही अनेक आणि गोवन माणसं असायची. अतिशय प्रेमळ. येतील, भेटतील, डायरेक्ट वैयक्तिक विचारपूस करतील, आपलीही माहिती सांगतील आणि परक्या ठिकाणी आलात, काही मदत लागली तर जरूर सांगा असे आवर्जून सांगतील. कित्येक बायका हळदी कुंकुवाला तर ख्रिश्चन ख्रिसमसला, ‘मेरी’ येते घरी तेव्हां संध्याकाळी बँकेत येऊन घरी घेऊन जायच्या प्रेमाने.
तर वरील प्रश्न आल्यावर मी लिहिता लिहिता थांबून वर पाहिले आणि चकीत झाले. झटकन् उठून त्यांच्या जवळ जात, तुम्ही प्रसाद सावकार नां ?”, हर्षभरित होऊन विचारले. त्यांनी स्मितहास्य करीत हो म्हणताच, ‘ या, बसा नां” म्हणत बोलू लागले.
प्रसाद सावकार !

निसर्गाचे वरदान लाभलेली गोव्याची भूमी ! सध्या खाणींच्या बातम्या गाजत असतील पण गोव्याची भूमी ही कलाकारांची खाण आहे, यांत दुमत नाही. कलाक्षेत्रात या छोट्याशा प्रदेशाने जेवढी महान व्यक्तिमत्त्वे दिली आहेत त्याला तोड नाही. विशेषतः लेखन, संगीत आणि नाट्यक्षेत्रामध्ये! एक थोर गायक नट म्हणजे पद्मश्री प्रसाद सावकार अशाच ज्येष्ठ गोमंतकरत्नांपैकी एक. संपूर्ण जीवन रंगभूमीची सेवा करण्याचं व्रत बाळगलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी. मराठी माणूस, मग तो जगांत कोठेही असो त्यांना न ओळखणारा नाट्यवेडा शोधून सापडणार नाही.संशयकल्लोळ, सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान, जय जय सांगू गौरीशंकर, सुवर्णतुला, मंदारमाला……. विविध भूमिकांनी रंगमंच गाजविलेल्या त्यांच्या किती नाटकांची नांवे घ्यावीत ?

मराठी संगीत रंगभूमी आपल्या कर्तृत्वाने गाजविणाऱ्या सावकारांनी तब्बल सत्तर वर्षे मराठी संगीत रंगभूमीवर एक गायक नट म्हणून आपला वेगळा ठसा उमटविला. हजारो रसिक प्रेक्षकांचे अत्यंत आवडते कलाकार झाले. त्यांनी गायिलेली ‘जय गंगे भागीरथी’, ‘नारायणा, रमारमणा’ यासारखी नाट्यपदे आणि ‘गोरा कुंभार’ सारख्या चित्रपटात त्यांनी गायिलेली ‘उठ पंढरीच्या राजा’, ‘पतीतपावन नाम ऐकुनी सारखी गाणी आजही घरोघरी गुणगुणली जातात. माझ्या वडिलांच्या संग्रही ही त्यांच्या साऱ्या पदांच्या रेकॉर्डस् होत्या, त्यामुळे त्यांचे सूर आमच्या घरी कायम घुमत असत.

वयाच्या ८५ व्या वर्षी ‘अवघा रंग एकचि झाला’ मध्ये भूमिका करण्याचा आग्रहाचा प्रस्ताव स्विकारुन अत्यंत कुशलतेने भूमिका निभावणारे सावकार म्हणतात, “हो. मी आहे नाटकवाला ! ‘नाटकवाला’ या शब्दाला काही विशेष अर्थ आहे अशी माझी धारणा आहे. ‘नाटकवाला’ म्हणजे अशी व्यक्ती जिला नाटकाशिवाय दुसरे काही येत नाही. तिचा श्वास आणि ध्यास फक्त नाटक आणि नाटकच असतो. मराठी संगीत रंगभूमीवर तर अशा ‘नाटकवाल्यांची फार मोठी परंपराच होती. बालगंधर्व, दीनानाथराव, केशवराव भोसले अशी केवढी तोलामोलाची माणसे! ती मोठी झाली नाटकांमुळे आणि नाटक मोठे झाले त्यांच्यामुळे. नाटकाखेरीज इतर कोणत्याही क्षेत्रात त्यांना जा म्हणून सांगितले असते, तर त्यांनी जे कर्तृत्व रंगभूमीवर दाखवले, ते त्यांना जमले असते की नाही मला शंका वाटते, कारण त्यांच्या श्वासात आणि ध्यासात केवळ नाटक होते.आज मी जो काही आहे, मराठी माणसांच्या घराघरांमध्ये माझे नाव पोहोचले आहे, ते केवळ रंगभूमीमुळे. नाही तर कोण प्रसाद सावकार गोव्याच्या कुठल्याशा एका गावांत वाढला आणि कोठल्या क्षेत्रात त्याने उदरनिर्वाह केला याची आठवण जगाने कां ठेवली असती ? पण रंगभूमीने मला नांव मिळवून दिले, किर्ती दिली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रसिकांचे उदंड प्रेम दिले.”

रसिकांना मायबाप म्हणणाऱ्या सावकारांनी मराठी रंगभूमीचा एक फार मोठा कालखंड फार जवळून पाहिला आहे. त्यांच्यावर लहान वयातच नाटक व संगीत यांचे संस्कार होत गेले. गायन-अभिनयाचे प्राथमिक धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या… रंगदेवता रघुवीर सावकार यांच्या ‘रंगबोधेच्छू – नाट्यसमाज’ या नाटक कंपनीत त्यांच्या चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लागला. नाटक होते, ‘जिंजीहून सुटका’ आणि त्यांची आयुष्यातील पहिली भूमिका, बालशिवाजी! मग अवघे आयुष्य रंगभूमीच्याच सेवेत गेले. गोपीनाथ सावकार, मो. ग. रांगणेकर, भालचंद्र पेंढारकर, प्रभाकर पणशीकर आदींच्या नाटक कंपन्यांमधून सावकारांनी ह्या नाट्यसृष्टीचा फार जवळून अनुभव घेतला. प्रेक्षकांचे उदंड प्रेम अनुभवले. अनेक नट- नट्यांचा सहवास त्यांना लाभला. शेवटी रंगभूमीवरून निवृत्ती स्वीकारली आणि नंतर २२ वर्षे रंगमंचावर पाऊल ठेवले नव्हते, पण तरीही रंगभूमीचे पुनश्च बोलावणे आले आणि ‘अवघा रंग एकचि झाला’ ने आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा चेहऱ्याला रंग लावला.

आईची इच्छा त्यांना नाटकापासून दूर ठेवण्याची होती पण विधिलिखित टळत नाही हेच खरे. सावकार यांचा जन्म बडोद्याचा. (१४ डिसेंबर, १९२८) पाचव्या वर्षी स्टेजवर प्रथम उभे राहिल्यावर वडिलांच्या नाटक कंपनीत आठ वर्षांपर्यंत राहिले. ज्या नाट्यगृहात नाट्यप्रयोग असे, तिथेच रहायचे. प्रमुख नटवर्गासाठी खोल्या असायच्या आणि त्यांत नाटकातील लग्न झालेल्या नटमंडळीची बिऱ्हाडे मुक्काम करायची.त्या वेळच्या आठवणी सांगतांना ते म्हणतात, “लहान असतांनाच नाटक सुरू झाले की मी ते बघायला जाऊन बसायचो. कळले नाही तरी मला ते नाटक बघणे आवडायचे एवढे खरे. अर्थात रात्री तिथेच झोप अनावर व्हायची. मग बाकी बिऱ्हाडकरू मंडळी माझी मोटली उचलून आमच्या खोलीत नेऊन सोडायची. आपण दुसरे तिसरे काही नव्हे, तर नाटकच करायचे हे कदाचित त्या नकळत्या वयातच मनात बिंबले असेल,” मात्र त्यांना नाटकांचे वेड लागू नये म्हणून शिक्षणासाठी म्हापशाला पाठवायचा निर्णय त्यांच्या आईने घेतला आणि त्यांचे काका दत्ताराम सावकार यांच्याकडे म्हापसा येथे पाठविण्यात आले. परंतु त्यांचे काका उत्तम हार्मोनियम वादक असल्याने तेथेही संगीताचे वातावरण व संस्कार त्यांना लाभले. सातेरीच्या देवळांत उत्सवात नाटके होत, त्यांत त्यांनी नाटकांची हौस भागविण्यास सुरुवात केली. रामनवमीच्या उत्सवात हनुमान थिएटरमध्ये “संशयकल्लोळ’चा प्रयोग झाला. त्यांत त्यांनी वडिलांबरोबर कृत्तिकेची भूमिका केली. एवढेच नव्हे, तर ह्याच नाटकात कृत्तिका, साधू, जलशातील गायक व वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी करून त्यांनी एक विक्रमच केला.

गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर’ संस्थेच्या सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान अशा नाटकांतून त्यांनी सुरुवातीला काही भूमिका केल्या, तसेच हौशी रंगभूमीवर करीन ती पूर्व इ. नाटकांतूनही कामे केली. मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेच्या (स्था.१९४१) रंभा (१९५२), कुलवधू, कोणे एके काळी, एक होता म्हातारा या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या.

अनेक नाटक कंपन्या बंद पडत असतांना १९६० पासून संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करू लागले त्यांत नाट्य संगीताला संजीवनी देण्यात सावकार अग्रगणी होते. ते उत्तम नट तर आहेतच परंतु त्यांनी शास्त्रीय गायनाची तालीमही घेतली. ग्वाल्हेर घराण्याचे पंडित नारायणराव व्यास, आग्रा घराण्याचे पंडित गोविंदराव अग्नी, जयपूर घराण्याचे पंडित निवृत्तीबुवा सरनाईक हे थोर गुरू त्यांना लाभले. शिवाय स्वरराज छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवण गुरू मानले होते.१९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके– पंडितराज जगन्नाथ व सुवर्णतुला लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले आणि प्रसाद सावकारांनी गायिलेली त्या नाटकांतील पदे रसिकप्रिय झाली. ‘जय गंगे’ने तर लोकप्रियतेचा कळस गाठला व श्रेष्ठ गायक-नट म्ह्णून प्रसाद सावकार रसिकांच्या मनांत अढळ स्थान मिळवून बसले ते आजतागायत. या गाण्याची आणखी एक गम्मत म्हणजे, ‘पंडितराज जगन्नाथ’ मध्ये त्यांना सुरुवातीला एकच गाणे होते. पण त्यांच्या गाण्यावर फिदा झालेल्या रसिकांनी त्यांच्यासाठी आणखी एखादे गाणे नाटकात घालण्याची मागणी केल्यानंतर त्यांना आणखी एक गाणे दिले गेले, ते म्हणजे “जय गंगे भागीरथी!’ धन्य ते रसिक, धन्य ते नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, धन्य ते अभिनेता, गायक प्रसाद सावकार ! आणि हे समजल्यावर धन्य झालेले तुम्ही-आम्ही ! सुवर्णतुला नाटकात कृष्ण,मंदारमाला (१९६३) नाटकात त्यांनी ‘मदनगोपाळ, जय जय गौरीशंकर (१९६६) मध्ये ‘ ‘श्रृंगी,’ कट्यार काळजात घुसली (१९६७)मध्ये ‘सदाशिव,’ तो राजहंस एक (१९७५) मध्ये कृष्ण, अशा विविध भूमिका वठविणाऱ्या सावकारांची भरे मनात सुंदरा, ‘नारायणा रमारमणा,‘ ‘घेई छंद’, राम मराठे यांच्याबरोबर ‘बसंत की बहार’ ही जुगलबंदी, सावन घन गरजे’अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली, त्यांच्या ध्वनिमुद्रिका ही निघाल्या.

सावकार ऐन उमेदीत एकाच वेळी तीन-तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करत असत. दिसणे, गाणे आणि अभिनय ही गायक नटाला आवश्यक तिन्ही अंगे त्यांच्यापाशी होती. त्यांचा ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाचा पाचवा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व नाट्य मंदिरात होता तेव्हा भारतरत्न पंडीत रवीशंकर व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे महान कलाकार मुद्दामहून प्रयोग पहायला आले होते. यावरून त्यांची थोरवी लक्षात येते. सततच्या प्रयोगांमुळे आणि गाण्यांच्या शिकवण्यांमुळे त्यांच्या आवाजावर पुढे विपरीत परिणाम झाला आणि त्यांचे गाणे काही काळ थांबले. या अकल्पित आघातामुळे ते दुःखीकष्टी झाले तरी त्यांनी हार मानली नाही. ज्या ‘कटयार काळजात घुसली’ मध्ये त्यांनी गायक सदाशिवची भूमिका गाजवली होती, त्याच कट्यार’मध्ये त्यांनी संगीताचा कान असलेल्या, पण गळा नसलेल्या बांकेबिहारीची भूमिका करून त्यावरही आपली छाप उमटविली. त्यांना नृत्याचेही अंग आहे. ‘अमृतमोहिनी’ मध्ये ते उत्तम नृत्य करीत. सावकारांनी छोटा गंधर्वांबरोबर सौभद्रमधे अर्जुनाची भूमिका केली. ते नाटक तर गाजलंच पण नंतर पत्नी शालिनी हिच्या समवेतही केलेले सौभद्र रसिकांच्या पसंतीला पडले. तिच्यासमवेत अमेरिकेची रंगभूमीही त्यांनी गाजविली.

प्रसाद सावकार यांचे मराठी रंगभूमीवरील योगदान अपूर्व असे आहे. ‘पेडगावचे शहाणे’ व ‘गोरा कुंभार’ अशा मोजक्या चित्रपटातही त्यांना भूमिका केल्या. गोरा कुंभार मधील त्यांचे “उठ पंढरीच्या राया” हे गीत खूप गाजलेही. त्यांचे पूर्ण नांव सांबप्रसाद रघुवीर सावकार. पेडगांवचे शहाणे या चित्रपटात राजाभाऊ परांजपे यांनी सावकारांना भूमिका करण्याबाबत विचारले. त्यांनी होकार देऊन शूटिंगला सुरुवात झाल्यावर एक दिवस राजाभाऊ त्यांना म्हणाले, तुझं हे नांव फार लांबलचक आहे, चित्रपटासाठी छोटी नांवे सोयीस्कर असतात. आपण तुझं नांव प्रसाद असं ठेवू या. त्यांनी बारसं केलेलं हेच नांव जनमानसी रुळले.

सावकार यांची नाट्यसृष्टीतील योगदानाची दखल घेऊन २००६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने
गौरवले. त्यापूर्वीही त्यांना अनेक मानसन्मान लाभले. अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृतिपुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, गोमंतक मराठी अकादमीच्या दीनानाथ स्मृतिप्रतिष्ठानतर्फे लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, दीनानाथ प्रतिष्ठानचा ‘लता मंगेशकर पुरस्कार,’ पुणे येथील भारत गायन समाजाचा ‘पंडित भास्करबुवा बखले’ पुरस्कार सांगली येथील ‘गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. संगीत नाटक अकादमी, कोलकत्ताने ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर पुरुष पुरस्काराने’ही त्यांना गौरवले आहे.

कोरोनामुळे घरी अडकून पडले म्हणून नाहीतर ९१ वर्षे वयातही स्कूटरवरून सगळीकडे फिरत होते. गेल्यावर्षीही जरा जाऊन येतो बँकेत म्हणून निघाले स्कूटरवरून ! अगदी डॉक्टरांकडेही. आता मात्र जरा थकले आहेत. तरीही लोकाग्रहास्तव त्यांनी आपले आत्मचरित्र “मी नाटकवाला” प्रकाशित केले. पण खरे तर तो एक मराठी नाट्यसृष्टीच्या प्रदीर्घ कालखंडाचा… सुमारे ९० वर्षांचा…आलेख आहे.
अभिनय, संगीत यांच्या रक्तातच. शिवाय पत्नी शालिनीही त्यांच्याबरोबर नाटकांत भूमिका करायच्या. त्यामुळे दोन्ही मुले, शेखर आणि सलील यांच्यात ते गुण न उतरल्यास नवल ! लहानपणापासूनच त्यात गम्य असलेले दोघे. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अंकुश या चित्रपटातील गाणी गाणी गाण्यांत शेखरचा सहभाग आहे. त्यातील “इतनी शक्ती हमें दे दाता” हे तर अनेक शाळांत प्रार्थना म्हणून स्वीकारले गेले. पुढे सलील बिझनेस आणि संघकार्य यांत अतिशय व्यस्त झाल्याने आपली कला फुलवू शकले नाहीत पण जमेल तेव्हां संगीत मैफिलीत हजेरी लावतात. मात्र शेखर यांनी संगीत परंपरा सुरु ठेवली आणि निवड केली गझलेची. संपूर्ण देशभर त्याच्या गझल सादरीकरणाचे कार्यक्रम सुरु असतात.

गोष्टीवेल्हाळपणामुळे सावकारांकडे किस्स्यांचा खजिनाही भरपूर; किस्से रंगवून सांगण्यात त्यांचा हातखंडा. अनेक हलक्याफुलक्या गोष्टी सावकारांनी आपल्या स्वभावानुसार आपल्या स्मृतिकोशात जपल्या. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा. तसेच गोव्याला येणारे रंगमंच, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय परत जात नाहीत.

नाट्यजीवनातील साऱ्या गमतीजमती प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकण्यात मजा आहे याचा अनुभव मी बऱ्याचदा घेतला आहे. वयाच्या साडेपांच-सहा वर्षी मी आजी बरोबर प्रथमच नाटक पाहिले ते कट्यार काळजांत घुसली…ते प्रसाद सावकार यांचे. त्यावेळी तेवढे कळले नाही पण प्रथमच नाटक पाहिले त्यामुळे ते कायमचे स्मरणांत राहिले आणि आजीपासून घरांतील सर्व त्यांचे फॅन असल्याने कायम नांव कानावर येत राहिले आणि कॉलेजला जाईपर्यंत त्यांची सर्व नाटके पाहिली. कट्यार तर पुन्हां एकदा पाहिले. पणजी शाखेत भेटल्यापासून त्यांची माया मला लाभली. माझे वडील लवकर गेले पण इथे गोव्याला, नोकरीमुळे बदली झाल्यामुळे एकटे रहात असतांना त्यांच्या रूपात मला बाबा भेटले. दोन वर्षांपूर्वी आई शालिनी गेल्या, इतक्या वर्षांची साथ सुटली हे त्यांच्या जिव्हारी लागलेलं दुःख आहे. शेखर आणि सलील, लाघवी सुना माधवी आणि स्नेहा, साऱ्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले हे माझे भाग्य. गोव्याला मला एक माहेरच भेटले. बाबा, कधीही फोन केला की प्रथम मलाच विचारतात, कशी आहेस ? तब्बेतीची काळजी घेतेस नां ? आणि मग गप्पा मारत छान बोलणे चालले असतांना ते नाटकाच्या जगांत जातातच आणि दोन/चार किस्से सांगून हसवितात. त्यांच्या स्मरणशक्तीची कमाल वाटते. असेच हसत राहोत, हसवत राहोत आणि त्यांचा शतकपूर्तीचा सोहळा सुरेख साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना !

नीला बर्वे

– लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Atishay Prasiddha Prasadjincha ha lekh wachunhi amhi dhanya zalo. Neela tu khari Nashibwan ki tula tyanche pitrutulya Prem milale. Te Prem asech milat raho n ya Natakwalyanchi Shatakottar purti amhi pagan hich Sardinia! Prasadjinna Shat Shat Pranam!🙏🙏🙏💐❤️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments