Saturday, October 5, 2024
Homeलेखवन आणि मानव

वन आणि मानव

निसर्ग, मनुष्य, पशु, पक्षी ही एक जीवनसाखळी एकमेकास पूरक अशीच असून यातला एकही घटक कमी पडला तर जीवनचक्रच बदलून जातं.

विकास व्हायला हवा अन तो खूप वेगाने होतोय, मोबाईलचे टॉवर जागोजागी उभे राहिले आणि त्या चुंबकीय लहरींनी प्रथमतः चिमण्या गायब झाल्या, त्यांना आपण पारखे झालो. स्थलांतरीत परदेशी पक्षांना त्यांचा नेहमीचा क्रमित मार्ग सापडेनासा झाला. हळूहळू डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे त्यांनी जीवनशैली जुळवून घेताना दिसून आली, म्हणून आज चिमण्या पुन्हां दिसायला लागल्या.

आपला देश स्वतंत्र झाला तेंव्हा लोकसंख्या पस्तीस कोटी होती तीच स्वातोंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना एकशे चाळीस कोटी झाली. आता ही वाढ होताना प्रत्येक मनुष्याच्या रहिवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी जेंव्हा शहरात जागाच उपलब्ध नाही म्हणून मनुष्यप्राणी प्राण्यांच्या जंगलात शिरू लागला, स्वतःची सोयीस्कर सोय करताना प्राण्यांच्या मूळ अधिवासावर अतिक्रमण करू लागला. मग ते बिच्चारे प्राणी रहाणार कुठे बरे ? बरं त्यांच्यातही जगण्यासाठी ठराविक सीमा रेषा त्यांनीच आखून ठेवलेल्या असतात, अधिवासाचं ज्याचं त्याचं स्वामित्व असतं दुसऱ्या प्राण्यानी घुसखोरी केली की जिवो जिवस्य जिवनम् वा बळी तो कानपिळी या उक्ती प्रमाणे जो जिंकतो तो जगतो अन जो हरतो तो जिवन कसे जगावे या विवंचनेत असतो. कधी कधी त्याला त्याचा हक्काचा अधिवास सापडतोही.

मूळ जंगले नष्ट करून मानवप्राणीच काँक्रिटची जंगले आपल्या गरजेपोटी उभी करत आहे ती ही निसर्गाचा समतोल बिघडवूनच, विस्कळीत करूनच. जंगले कमी झाली की आपोआपच मांसभक्षक प्राण्यांना पुरेसे गरजेचे अन्न मिळत नाही अन स्वतःच्या जगण्यासाठी ते शहरात शिरून शिकार मिळवण्याचा प्रयत्न करतात. फक्त कुत्रे, मांजरे, गुरे, वासरे, कोंबडया, बदके यांनाच मारतात का? नाही, बऱ्याच ठिकाणी शाळकरी मुला – मुलींना, तान्ह्या मुलाला मारल्याच्या कित्येक घटना मागील काही वर्षात घडल्या आहेत, हे भयानकच पण सत्य वास्तव आहे. गुरुदास नुलकर यांनी अनुवादित केलेले ‘दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकात, “निबिड घनदाट उंचच उंच वाढणाऱ्या जंगलात नवीन रोपानं कधी रुजायचं अन चुकून रूजलंच तर वाढू द्यायचं की नाही हे त्या जंगलातली झाडेच ठरवतात” मनुष्यप्राण्याला हे केंव्हा बरं कळायचं ? हे कळेल तो सुदिनच म्हणायचा.

राखीव जंगले घोषित केलेली आहेत ती संभाळण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट नामक यंत्रणा उभारलेली आहे, हजारो मनुष्यप्राणी कर्मचारी त्यात काम करतात. आपण घाम गाळून कष्ट करून पैसे कमवतो अन सरकारला शंभर प्रकारचा कर भरतो या करांच्या रकमेतूनच त्यांचे पगार, भत्ते, इतर सुखसोयी यावर खर्च केला जातो. परंतु आपल्याकडे तर ग्रामपंचायतीच्या चपराशापासून पंतप्रधानांपर्यंत सगळेच (क्वचित अपवाद सोडून जसा नियमाला अपवाद असतो तसे) प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करतात, त्यामुळे अवैध शिकार करणाऱ्यांचे प्रमाणही तितकेच वाढले आहे अन जंगलातल्या प्राण्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी सावज, भक्ष मिळवणे अवघड जाते. मनुष्यप्राणी भ्रष्टाचारी असला तरी जंगलातला मांसभक्षक प्राण्यात भ्रष्टाचार सुरू झालेला अजून तरी ऐकिवात नाही त्यामुळे स्वतःचे उदरभरण करण्यासाठी मग ते शहरात अतिक्रमण करून जे मिळेल त्यावर ताव मारतात, अगदी न घाबरता. त्यांनाही माहित आहे ‘जो डर गया समझो मर गया’ यामधे त्यांची काय चुकी आहे बर ?

ज्याचं जळतं त्यालाच कळतं,,,,,,,,,,, माकडांची उत्पत्ती आता अतोनात, प्रमाणाबाहेर झाली आहे अन त्याचा जबरदस्त आर्थिक फटका शेती – बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना न सोसवेल इतका बसू लागला आहे. काही काही देशांमधे शेती फस्त करणाऱ्या डुकरांना, हरणांना वा तत्सम प्राण्यांना मोहीम काढून ठार मारतात अन त्यांचे प्रमाण आकुंचित ठेवतात, इथे तसा न्याय शेतकऱ्यांना कधी मिळणार या आशेकडे ते आ वासून पहात आहेत. आणि अशाच मागणीला आता जोर धरू लागला आहे, प्रमाणाबाहेर लोकसंख्या नको तशीच प्रमाणाबाहेर ही जनावरे सुद्धा नकोच. प्राणी जगलेच पाहिजेत पण……… माणसाच्या पोटावरच पाय आणून वा आपलं तान्हुलं बिबट्याच्या कराल जबड्यात देऊन नाही.

प्राणीही निवांत जगले पाहिजेत अन मनुष्यप्राणी सुखांत जगलाच पाहिजे. यावर निसर्ग संरक्षण करणाऱ्या अनेक विचारवंत समित्यांनी त्यांचे त्यांचे अहवाल वेळोवेळी सादर केले आहेत परंतु असे कळते की ते सरकारने बासनात गुंडाळून ठेवले आहेत त्यांच्या मेंदूत खरोखरच जेंव्हा मनुष्य संरक्षणांची गांडूळे वळवळ करायला लागतील तेंव्हाच काही ठोस उपाययोजना प्रत्यक्षात येईल न पेक्षा हे थोरले नेते, पुढारी, काही तर स्वतःला देवाचा अवतार समजणारे फक्त आपापली, आपापल्या पक्षाची मते कशी वाढतील ही भ्रांत सोडविणेत मशगुल रहातील. प्राण्यांकडून मनुष्यप्राणी मारला गेला की पाच लाख रुपये भरपाई करून भागवता येतंच ना ? कुणास काय पडलंय हो ? खरं तर या विषयाच्या पोटातच अनेक विषय अंतर्भुत आहेत पण तुर्तास एवढेच.

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. लोक भावना मुद्यावर चांगला लेख लिहिला आहे.

    अभिनंदन सुनील चिटणीस सरजी

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९