लग्नानंतर मी पत्नीला पहिल्यांदाच सांगितलं, “आपण ऑफिस मधून येताना घराची किल्ली सोबत घ्यायची काही गरज नाही” “मग घरी आल्यावर दार कोण उघडणार ?”
“आई बाबा आहेत ना”!
“अरे, पण ते तेव्हा घरी असतीलच कशावरून”?
“आपल्या घरी येण्याच्या वेळी ते नक्की घरी असतील. आजपर्यंत मी घरी येण्याच्या वेळी ते कधी बाहेर गेले नाहीत.”
“आता तुझी येण्याची वेळ पण ते सांभाळतील”
“अरे पण असे का ?
त्यांना आपल्यासाठी वाट बघायला का लावायची ?”
“त्यांची पण त्यावेळी काही कामं असतील ना ?”
“आपल्यासाठी त्यानी का अडकवून घ्यावं ?”
तो हसून म्हणाला, “त्यांची कामं आपण यायच्या आधी ते करून घेतात”
“अरे, पण कशासाठी ?”
“वाट पाहणारं दार !”
तो हसून म्हणाला.
‘म्हणजे’ ?! समजून तिने विचारले.
“आई बाबा म्हणतात कि कोणी येणार असलं कि त्या घराचे दार वाट पहात असतं. घरातील माणसांना त्यांच्या येण्याने होणारा आनंद दार उघडल्यावरच व्यक्त होतो.”
“दार उघडल्यावर माप ओलांडून आत येणाऱ्याचा चेहरा, आनंद, उत्साह हा पावलं ओलांडून आपल्या घरात प्रवेश करतो आणि दार उघडणाऱ्याचा चेहरा बघून त्याला या घरात प्रवेश करताना विश्वास बसतो, की या घराला माणसांची ऍलर्जी नाही.
तिने चमत्कारिकपणे हसतच त्याला हो म्हंटले.
त्यानंतर तिला कधी पर्समध्ये किल्ली घेऊन जायची खरंच कधी वेळच आली नाही.
लिफ्ट मधून थकून भागून बाहेर पडावं आणि बेल वाजवायला जावी
त्याआधीच बाबा दार उघडायचे. आईंना वर्दी द्यायचे, “अगं सुनबाई आली बरं का !” असं म्हणत आनंदाने दार उघडत.
“बाबा, तुम्ही दाराशीच बसलेले असता का मी यायच्या वेळेस ?”
ती आश्चर्याने विचारी.
“अगं, तुझी यायची वेळ हीच ना ?” ते हसत हसत म्हणत. त्यांच्या आनंदी व उत्साही चेहऱ्यानेच घरात शिरल्या शिरल्या प्रसन्न वाटे.
आईंनी देवा समोर लावलेले निरंजन आणि उदबत्तीच्या सुगंधाने देवघर उजळून निघालेले असायचे. ओट्यावर संध्याकाळच्या खमंग पदार्थाचा वास दरवळत असायचा. मग तो आला की सगळ्यांचे एकत्र बसून हसत खेळत खाणे पिणे व्हायचे. पाहुणेरावणे आले की बाबाच दार उघडत आणि आनंदाने कपाळावर आठ्या न घालता याssss असे स्वागत करत.
हळूहळू घराची किल्ली न नेता ऑफिस ला जायची सवय तिच्या अंगवळणी पडली. दिवस सरले, वर्ष सरली.
आई बाबांचे आजी आजोबा झाले. आता आजी आजोबा शाळेतून येणाऱ्या नातवंडासाठी दार उघडतात, “आली का माझी पिल्लू ? आला का माझा सोन्या ?” हे प्रेमळ शब्द ऐकायला दारही आसुसलेलं असतं.
ही नातवंड एवढ्या लवकर का मोठी होतात ?
आताशा बेल वाजल्यावर धावत जाऊन मुले दार उघडायला लागली.
मुले शिकून सवरून परदेशात गेली. आई देवाघरी गेली. बाबाही थकले पण कोणी आले कि हळूहळू का होईना दार उघडायला बाबाच येत.
परदेशातील मुलं येतात अधून मधून भेटीला.
आता बाबाही परत न येणाऱ्या वाटेवर गेलेत.
आम्ही आता निवृत्त होऊन घरीच असतो. पण अजूनही नियम तोच आहे बाहेर जाताना किल्ली घेऊन जायची नाही.
डोळ्यात प्राण आणून कोणाच्या तरी येण्याची वाट पाहणारं दार मात्र तसेच आहे.
एक दिवस आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक असेच कोणाच्या तरी येण्याची वाट बघत बसेल, त्या वाट पाहणाऱ्या दारासारखे !

— लेखन : प्रशांत कुलकर्णी. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800