Wednesday, January 15, 2025
Homeलेखशिरीष पटेल : नवी मुंबईचे शिल्पकार

शिरीष पटेल : नवी मुंबईचे शिल्पकार

नगर नियोजनातील शिरीष पटेल यांचे असामान्य योगदान लक्षात घेता त्यांना नवी मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांचे नुकतेच निधन झाले. या निमित्ताने नवी मुंबई च्या उभारणीतील त्यांचे योगदान जेष्ठ पत्रकार, नवी मुंबई वर कॉफी टेबल बुक साकारणारे श्री सुधीर शालीनी ब्रह्मे अतिशय तरलपणे या लेखात रेखाटले आहे. शिरीष पटेल यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

अस्खलित मराठी बोलणारे, राजकीय नेत्याला साजेल अशा पेहरावातले मृदू आवाज आणि अत्यंत विनम्र स्वभाव हे शिरीष पटेलांच्या व्यक्तिमत्वाचे बाह्यवर्णन.

२०१४ ची अखेर. नवी मुंबईच्या कालनिहाय विकासावर आणि सिडकोने केलेल्या कार्यावर चे पुस्तक मी लिहायला घेतले होते. अडचणी कमी नव्हत्या, अगदी माहिती स्रोतापासून. मी माहितीच्या मार्गावर, अडचणी माझ्या मार्गावर. सिडकोच्या स्थापनेपूर्वीचे आणि स्थापनेपासूनच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडींचे दस्तावेजीकरण सिडकोमध्येच झालेले नव्हते. बाळाची चाहूल लागताच पाळणा आणावा लागतो घरात; चित्र रेखाटण्याआधीच कॅनव्हास, रंग, कुंचला असावा लागतो हातात. अगदी तस्सच असतं नियोजानाआधीचं पूर्व-नियोजन. फळझाडाची लागवड हे नियोजन, जागेची निवड हे पूर्वनियोजन. हे पूर्वनियोजन मला जाणून घ्यायचं होतं.

या नव्या शहराच्या विकासासाठी सिडकोची स्थापना झाली १९७० साली. त्याच्या आधीच्या घटनांची माहिती आणि प्रारंभीच्या काळातील सिडकोचे दिवस जाणून घेण्यासाठी मी शिरीष पटेल यांच्या कार्यालयात फोन करून मी त्यांना भेटायला गेलो. मुंबई विद्यापीठाच्या पूर्वेस दलाल स्ट्रीटच्या बाजूला, कंदील रेस्टॉरंटच्यामागे त्यांचे कार्यालय आहे. निश्चित केलेल्या वेळेप्रमाणे सकाळी ९.३० वाजता पटेल यांच्या कार्यालयात मी हजर झालो. स्वागत कक्षात बसलो होतो. अर्ध्या बाह्यांचा सफेद सुती शर्ट, सुती पँट, सफेद केस, सफेद मिशी अशा सर्वशुभ्र परिवेशातली साधी व्यक्ती आली. सत्तरीच्या पुढचे पण उमदे व्यक्तिमत्व. विनम्र देहबोली. नावानिशी माझे हसून स्वागत करत त्या व्यक्तीने मला मानानं मीटिंग रूममध्ये गेले. ते साक्षात श्री. शिरीष पटेल होते हे त्यांच्या “बोला, काय घेणार, चहा की कॉफी” या प्रश्नामुळे मला कळले. आम्ही गॅलरीतल्या एका मोकळ्या कोपऱ्यात बसलो. राजाबाई टॉवर स्पष्ट दिसत होता. याच टॉवरमध्ये मी एम.ए चा अभ्यास केला होता. बसताच स्मितहास्याचा एक कटाक्ष टाकत ते म्हणाले, आर यु कम्फर्टेबल ! त्यांनी माझ्यासाठी तांब्याच्या जगमधून काचेच्या ग्लासात पाणी ओतले. “मी ग्रीन टी घेतो तुम्हाला चालेल ?” मी म्हटलं, “हो चालेल”.
नवी मुंबईची जडणघडण आणि त्यात सिडकोचे योगदान यावर एक पुस्तक लिहितोय याची कल्पना त्यांना दिली आणि म्हटलं, “सर, तुमचे नाव सिडकोचे मुख्य अभियंता यांच्या दालनात वाचले. तुम्ही आणि ती सर्व माणसे यांची माहिती मला हवीय”. सिडकोचे पहिले व्यवस्थापकीय संचालक जे.बी. डिसुझा, शिरीष पटेल, चार्ल्स कोराया, के. पी. बत्त्तीवाला, डॉ. फिरोझ मेधोरा, डॉ. किरीट पारीख, डॉ. माधव गोरे आणि विजय तेंडुलकर ही नावे.

पटेल सांगू लागले, डिसुझा अभ्यासू वृत्तीचे होते. जी जबाबदारी ते स्वीकारत त्याचा खोलात जाऊन ते विचार करत. सिडकोच्या स्थापनेची शिफारस करणाऱ्या मंडळावर (BMRPB) श्री. डिसुझा विशेष निमंत्रित सदस्य होते. त्यांना प्रस्तावित शहराच्या निर्मितीतील बारकाव्यांचे सखोल ज्ञान होते. नवीन शहर आणि मुंबईच्या पुनर्रचनेशी संलग्न असलेल्या एका गटावर डिसुझा होते. मी आणि चार्ल्स कोराया सुद्धा होतो. ‘मार्ग’ (MARG) मासिकात छापला गेलेला ‘बॉम्बे – प्लॅनिंग अँड ड्रिमिंग’ हा लेख डिसुझांनी वाचला होता. मी, चार्ल्स कोराया आणि श्रीमती वीणा मेहता या तिघांनी मिळून तो लिहिला होता.

सिडकोचा कार्यभार स्वीकारताच डिसुझा यांनी शिरीष पटेल यांना बोलावून घेतले. सिडकोचा पहिला तांत्रिक कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. सिडकोमधील नियोजन आणि अंमलबजावणीची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली.

श्री. पटेल व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागारही होते. पटेल आणि डिसुझा यांच्या पहिल्याच भेटीत शहराच्या जडणघडणीशी संबंधित महत्वाच्या क्षेत्रातील तज्न्य व्यक्तींना सिडकोत आणण्याची एक संकल्पना डिसुझांनी मांडली. एक छोटा ग्रुप त्यांना हवा होता. पटेल यांनी नावे सुचविली. समाजशास्त्रज्ञ डॉ. माधव गोरे त्यावेळी टीसचे (TISS) संचालक होते, भारतीय सांख्यकी संस्थेतील मुख्य अर्थतज्न्य फिरोझ मेधोरा, टाटा हायड्रोमधील वरिष्ठ स्थापत्य अभियंता श्री. के. पी. बत्त्तीवाला, ख्यातनाम व्यवस्थापन संशोधक डॉ. किरीट पारीख, ख्यातनाम नाटककार-साहित्यिक विजय तेंडुलकर, ख्यातनाम स्थापत्यविशारद चार्ल्स कोराया आणि पटेल, असा डिससुझांसह आठ जणांचा एक गट तयार झाला. हेच ते सिडकोचं आद्य अष्टप्रधानमंडळ.

या गटाला ‘नियोजन मंडळ’ (Planning Board) म्हटलं जात असे. या गटानेच पाया घातला सिडकोचा. सिडकोचे प्राथमिक स्वरूप इथेच निश्चित झाले. बहुपेडी, बहुआयामी आणि बहुजीवी संघटन म्हणून सिडकोची मूलभूत चौकट या गटानेच तयार केली. त्यामुळेच नगर नियोजनातील भारताची अग्रगण्य संस्था ही ओळख सिडकोला मिळवता आली .
ती डीसुझांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या या गटामुळेच.
तज्ज्ञांचा हा गट प्रारंभी प्रत्येक सोमवारी भेटत असे, नंतर आवश्यकतेनुसार भेटू लागला. व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत प्रकल्प अंमलबजावणीच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होत असे. ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील असली तरी त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू नव्या शहराची उभारणी हाच असे, त्यामुळे विचार प्रक्रियेतील तात्विक मतभेद अंतिमत: सहमतीवर येऊन थांबत. या गटाची ही सौहार्दपूर्ण आणि एकजुटीची कार्यपद्धती १९७३ पर्यंत चालू होती. या गटानेच सर्वंकष विकास आराखड्याची मांडणी केली.

“नगर नियोजन ही केवळ स्थापत्यशास्त्रीय संकल्पना नाही, मानवी जीवनाशी संबंधित अनेकविध पैलूंचा विचार करणेही गरजेचे आहे, या मुद्यावर आम्ही परस्परांशी पूर्णतः सहमत होतो”, पटेल सांगत होते. नगर रचना अधिक अर्थपूर्ण व फलद्रूप ठरण्यासाठी वाहतूक आणि पायाभूत सोयीसुविधांसह अर्थकारण, समाजशास्त्र आणि पर्यावरण या जीवनाच्या विविध घटकांचा विचार करण्याची गरज आहे, असे डीसुझांचे म्हणणे होते.
श्री. पटेल मूळ स्थापत्य अभियंता असले तरी नगर नियोजनातील यांचा अभ्यास डिसुझांना माहीत होता. डिसुझांनी पटेल यांना नियोजन व बांधकाम विभागाचे संचालक, श्री. कोराया यांना प्रधान वास्तुविशारद आणि अभियंता निमाले. श्री. बत्त्तीवाला अभियंता, डॉ. मेधोरा अर्थतज्ज्ञ आणि श्री. पारिख यांना कार्यव्यवस्था संरचना प्रमुख केले. सिडकोचे सल्लागार किंवा संचालक म्हणून ही मंडळी कार्यरत होती. पटेल म्हणाले, “सिडकोचे बहुपेडी आणि बहुआयामी संघटन हे स्वरूप निश्चित झाले डिसुझांमुळेच”.

डॉ. गोरे आणि तेंडुलकर यांची काय भूमिका होती, मी विचारले. “या जोडगोळीने केलेल्या सूचना आणि मार्गदर्शनामुळे नवी मुंबईत एका निकोप, सर्वसमावेशक आणि सर्वधर्म समानतेच्या समाजव्यवस्थेने मूळ धरले. वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा असलेल्या जनसमुदायांच्या सशक्त आणि सकारात्मक सह-अस्तित्वासाठी जे धोरण ठरविण्यात आले ते या दोघांमुळेच, पटेल म्हणाले. “डिसुझा यांना मानवकेंद्रित विकास अपेक्षित होता. विविध समाज गटांचे सहजीवन, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सौहार्दता नव्या शहरात नांदावी हे त्यांना अभिप्रेत असावे. गोरे यांना सहाय्यक म्हणून तेंडुलकरांची नेमणूक झाली असावी”.
डिसुझा यांनी हाच मुद्दा आपल्या पुस्तकात छेडला आहे . डिसुझा लिहितात, “बरेच महिने घेतलेला नगर समाजशास्त्रज्ञाचा (urban sociologist) आमचा शोध अयशस्वी ठरला”. स्वतःला मिळत असलेल्या (अवघे रुपये २२५०) पगारापेक्षा अधिक पगार योग्य, जाणकार आणि स्वयंप्रेरित अशा सक्षम व्यक्तीला देण्याची तरतूद डिसुझांनी केली होती. समाजशास्त्रज्ञ म्हणून पटेल यांनी एका व्यक्तीला बोलावले. व्यक्ती पदास योग्य होती, अनुभवी होती. परंतु डिसुझा यांनी त्यांची नेमणूक केली नाही. त्या व्यक्तीचे नाव योगायोगाने डिसुझा होते. “आणखी एक ‘डिसुझा’ नको” असे पटेल यांना डिसुझांनी सागितले. वशिलेबाजीचा ठपका आपल्यावर ठेवला जाऊ नये म्हणून ते सजग होते. सार्वजनिक क्षेत्रात संवेदनशील प्रशासकीय अधिकारी आपल्या प्रतिमेला डाग लागू नये म्हणून किती सजगतेने वागतो याचे हे उत्तम उदाहरण होय.
डॉ. माधवराव गोरे आणि विजय तेंडुलकर या दोघांनी नगर समाजशास्त्रज्ञाची उणीव समर्थपणे भरून काढली. या दोघांच्या विचारांचे, प्रत्यंतर सिडकोच्या सामाजिक धोरणात आढळते.

सर्वधर्मियांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रत्येक नोडमध्ये लोकसंखेच्या गरजेनुसार समाज मंदिरे, ग्रंथालये आदि सेवासुविधा विकसित झाल्या त्या त्यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच.
सिडकोचे तत्कालीन उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा मॅडम यांच्या नजरेखालून पुस्तकाचा मसुदा गेला. श्री. भाटीया यांच्या जागी आलेल्या भूषण गगराणी याच्या काळात २ मार्च २०१८ रोजी ‘एक्सप्लोरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नवी मुंबई.’ प्रकाशित झाले.
ती भेट संपताना पटेल म्हणाले, “जाता-जाता तुम्ही ‘युड्री’ला (UDRI) अर्बन डिझाईन अँड रीसर्च इंस्टिट्यूटचा भेट देऊन जा, इथून जवळच आहे. त्यांना माझा रेफरन्स द्या. चार्ल्स कोरायाचं आर्काइव्ह पाहून जा, असे बोलून त्यांनी शर्टाच्या खिशातून तांबूस-लाल फाऊंटन पेन काढलं. आपल्या वळणदार हस्ताक्षरात “UDRI” आणि इमारतीचे नाव लिहून दिले. कट निब असलेले कॅलीग्राफी पेन होते ते.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. नवी मुंबईचा साद्यंत इतिहास असणारे एक्सप्लोरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नवी मुंबई हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.)

सुधीर ब्रह्मे

— लेखन : सुधीर शालिनी ब्रह्मे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय