रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार निवासी शिबिर खेर्डी, ता. श्रीवर्धन येथे दि. ६ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले होते.
या शिबिरात सहायक प्रा. सुमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५० विद्यार्थिनी स्वयंसेविकांनी सहभाग घेतला होता. शिबिरात स्वच्छता ही सेवा, प्लास्टिक मुक्त परिसर, आरोग्य सर्वेक्षण, शासनाच्या विविध योजनांचे सर्वेक्षण, उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, श्रमसंस्कार असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

महिला विषयक कायदे, राष्ट्र उभारणीतील महिलांचे योगदान, आरोग्य धनसंपदा, सायबर सुरक्षा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, स्त्रियांची आर्थिक उन्नती या विषयांवर मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करण्यात आली. जागर स्त्री शिक्षणाचा- उच्चशिक्षित राष्ट्र निर्मितीचा, लेक माझी सुरक्षित आहे का ? समस्या स्थलांतराची-व्यक्त कोकणाची, सायबर सुरक्षा- जागृत ग्राहक, भरकटतेय तरुणाई (ताण-तणाव व आरोग्य) या विषयांवर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आली. दरम्यान विद्यापीठ रा.से.यो. समिती समन्वयक प्रा. डाॅ. सुलक्षणा माणे यांनी स्वयंसेविकांना ऑनलाईन संबोधित केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांच्या अध्यक्षते तर उपविभागीय पोलीस अधीक्षक मा. सविता गर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार निवासी शिबिराची शेवटच्या दिवशी सांगता झाली.
सांगता समारंभात स्वयंसेविकेंना मार्गदर्शन करताना गर्जे मॅडम म्हणाल्या, तुम्ही सात दिवसांत जे श्रमदान केलेत, वेगवेगळ्या मान्यवरांची व्याख्याने ऐकलीत, जनजागृतीपर कार्यक्रम राबविले ते नक्कीच तुमच्या जीवनावर चांगला परिणाम करतील. तुम्हीच उद्याचे या देशाचे नेतृत्व आहात. मुलींचे उच्चशिक्षणातील आणि सरकारी नोकरीतील प्रमाण कमी दिसते यावर त्यांनी खंत व्यक्त केली. परंतू तुम्ही सर्वजणी उद्या वेगवेगळ्या हुद्द्यावर दिसाल अशी स्वयंसेविकांकडून अपेक्षा व्यक्त केली.

कपिलवस्तु बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष प्रदिपजी मोहिते यांनी स्वयंसेविकेंना दैनंदिनी लेखनाचे महत्त्व समजावले व दैनंदिनी लेखन करण्याचे आवाहन केले, ग्रामस्थांच्या वतीने बोलताना त्यांनी स्वयंसेविकेंना आणि ग्रामस्थांना भावूक केले.
ते पुढे म्हणाले, सकाळी ७ वाजता राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात व्हायची. विद्यापीठ गीत, लक्षगीत, खरा तो एकची धर्म चा आवाज गावभर घुमायचा.रोजच्या कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने व्हायची. या सर्व आठवणी आमच्या ह्रदयात कायम राहतील.
अध्यक्षीय भाषणात डाॅ. डी. पी. राणे स्वयंसेविकेंना मार्गदर्शन करताना विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतल्याने नोकरीत व व्यवसायात कसा फायदा होतो हे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयीन युनिट लीडर कु. दिप्ती कोसबे हिने केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण यांनी व्यक्त केले.
सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. डाॅ. योगेश लोखंडे यांनी शिबिरात स्वयंसेविकेंसाठी सात दिवस मिनरल्स पाणी पुरविले. शिबीर यशस्वी करण्यासाठी मनिषा श्रीवर्धनकर, प्रविण मोहिते, संतोष मोहिते व दिनेश आडगावले यांनी मोठे परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800