पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सायकल चे असलेले महत्व ओळखून ती चालविण्यास प्रतिष्ठा मिळावी, ती लोकप्रिय व्हावी, यासाठी युनायटेड नेशन्स ने एप्रिल २०१८ मध्ये ३ जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. खरं म्हणजे ३ जून ऐवजी १२ जून हा दिवस ठरविला असता तर सायकल च्या जनकास ती एक प्रकारे आदरांजली ठरली असती. कारण जर्मनीतील मॅनहाइम येथील कार्ल ड्रेस यांनी सायकल तयार करून ती १२ जून १८१७ रोजी प्रथम चालवली. अर्थात ती सायकल आजच्या सायकलीप्रमाणे नव्हती तर लाकडापासून बनविलेली होती. त्यात सुधारणा होत होत आजतर गिअर असलेल्या सायकली आल्या आहेत.

आपण लहानपणी सायकल चालवायला कसे शिकलो, कितीदा पडलो, एकेका तासाच्या भाड्याने सायकली आणून त्या कशा चालवल्या, याच्या खूप साऱ्या आठवणी खूप जणांच्या मनात घोळत असतात. अनेक जणांनी त्या लिहिल्या देखील आहेत. पण याच व्यक्ती पुढे “मोठ्या” झाल्यात की मात्र त्यांनाच सायकल चालविण्याची लाज वाटू लागते. असे का बरे ? कारण भारतात स्कूटर, मोटार सायकल, मोटार या स्वयंचलित वाहनांना जी अवाजवी प्रतिष्ठा आहे ती सायकलला नाहीय.
खरं म्हणजे सायकल चालविण्याचे खूप फायदे आहेत. सायकल चालविण्याने छान व्यायाम होतो. स्कूटर, मोटार सायकल, मोटार या स्वयंचलित वाहनांमुळे जे प्रदूषण होते, तसे प्रदूषण सायकलने होत नाही. सायकल चालवताना निसर्गाशी अधिक जवळीक वाटते. स्वयंचलित वाहनांच्या तुलनेत सायकलच्या किंमती अतिशय कमी असतात. तसेच स्वयंचलित वाहनांप्रमाणे सायकलला पेट्रोल, डिझेल लागत नाही. देखभालीसाठी तिला सर्विस सेंटर मध्ये न्यावे लागत नाही. तिची देखभाल आपणच करू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे वाचतात.

भारतात जरी सायकल वापरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात नसले तरी युरोप मध्ये मात्र सायकल वापरणे हे कमीपणाचे समजले जात नाही. एखाद्या कंपनीत कामाला जाणारा कर्मचारी सायकल ने कंपनीत जात असेल तर कदाचित त्याच रस्त्याने, त्याच्या मागेपुढे त्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा स्वतःच्या सायकलने कंपनीत जात असेल.मी स्वतः पाच वर्षांपूर्वी युरोप मध्ये त्यातही विशेषत: नेदरलँडमध्ये पाहिले आहे की, शहरांमध्ये रस्त्यांवर स्वयंचलित वाहनांपेक्षा सायकलींची संख्या खूपच जास्त असते. मोठी माणसंच नाही तर युवक, युवती सुद्धा ऐटीत, दिमाखाने सायकलीं चालवताना दिसतात. तिथे ४० टक्के नागरिक वाहतुकीचे साधन म्हणून सायकल वापरतात. सायकल चालविण्याचे महत्व, गरज, सहज उपलब्धता वाहतुकीचे नियम, पार्किंग व्यवस्था अशा सर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. एका प्रयोगानुसार २०१४ मध्ये एक किलोमीटरभर लांब रात्री चमकणार्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले असून, दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात. रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो.
स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे या बोगद्यात सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा आहेत.
इतरही अनेक पाश्चात्य देशात रस्ते बांधणी करताना सायकलस्वारांचा विचार अवश्य केला जातो. त्यांच्यासाठी स्वतंत्र ट्रॅक ठेवण्यात येतात. सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पार्किंगची आखणी केली जाते.
आपल्याकडे मात्र शहर नियोजनात अजूनही सायकलस्वारांचा विचारच करताना कुणी दिसत नाही कारण त्यांनाही तशी गरजच वाटत नाही. अर्थात याला कारण नागरिक अजूनही मोठ्या प्रमाणात सायकल वापरीत नाही, हेच असावे.
कोणे एकेकाळी सायकल चे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे देखील आता सायकलींपेक्षा स्वयंचलित वाहनांनील गजबजलेले दिसतेय.
सायकल च्या बाबतीत इतर काही शहरांमध्ये काही प्रयोग मात्र करण्यात आले आहेत. नवी दिल्ली येथील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सम विषम तारखांना सायकल चालविण्याचा प्रयोग करण्यात आला. नवी मुंबईत काही वर्षांपूर्वी महापालिकेतर्फे सायकली भाड्याने देण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. विशिष्ट ॲप सायकल चे बुकिंग करून सायकल अनलॉक करून इच्छित स्थळी नेता येत असे. तिथे जवळपास असलेल्या सायकल पार्किंग च्या ठिकाणी ती उभी करून लॉक करून तिथेच ठेवून देता येत असे. दुर्दैवाने आपल्या कडे त्या त्या अधिकाऱ्याची बदली झाली की, त्याने सुरू केलेले उपक्रम पुढे चालू राहतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे नवी मुंबईत अस्तित्वात आलेली सायकल योजना संबंधित महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर दिसेनाशी झाली. पण खरं म्हणजे ही सायकल योजना सरकारने सर्व महानगरपालिका आणि इतर शहरांमध्येही लागू करण्याबाबत विचार केला पाहिजे. पण शेवटी जगभरच्या स्वयंचलित वाहनांचे करोडो रुपयांचे हित संबंध गुंतलेले असताना “सायकल युग” कधी अवतरेल, कुणास ठाऊक !

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800