विधान सभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महाराष्ट्रातील मतदार या वेळेस नको तितका गोंधळला आहे. कारण यादी पाहिली तर “एकाला लपवा, दुसऱ्याला झाका” अशी लाजिरवाणी परिस्थिती आहे. सारेच एका माळेचे मणी. असो…
गेल्या काही वर्षात राजकारणातील चिखल गलिच्छ झाला आहे. अगदी खालच्या स्तराला पोहोचला आहे. राज्याचे,देशाचे राजकारण एकमेकावर कुरघोडी करणे, दुसऱ्या पक्षाला घाणेरड्या भाषेत शिव्या, दूषणे देणे, आपले काम, आपल्या भविष्य कालीन स्थायी विकासाच्या योजना यावर भर देण्याऐवजी दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे असेच निम्नस्तराचे उद्योग सुरू आहेत. प्रत्येक पक्षाचे, नेत्यांचे एकसंघ राष्ट्राचा सामयीक विचार कुठे दिसतच नाही. जाती धर्मावरून समाज दुभांगण्याचे प्रयोग सुरू आहेत.
या ढोंगी नेत्याच्या सभाना होणारी गर्दी बघून आपल्या समाजाची देखील कीव करावीशी वाटते. अर्थात गर्दीचे मानसशास्त्र देखील फसवे असते. कारण तिचं ती मंडळी आलटून पालटून वेगवेगळ्या सभाना पैशाच्या लोभाने हजर राहत असल्यास नवल नाही. किती सुशिक्षित, हाय फाय सोसायटीतले लोक (डॉकटर, इंजिनियर, वकील, उद्योगपती) यांच्या सभाना हजर राहतात याचा शोध घेतला पाहिजे.
ज्या आश्वासनांनी फक्त सरकारी तिजोरी खाली होईल, सरकार कर्ज बाजारी होईल अशी खोटी आश्वासने देऊन लोकांना भूल देण्याचे काम सुरू आहे. पैसे वाटून कुणाच्याही समस्या सुटत नाहीत. फक्त भिकेवर अवलंबून राहणारी लाचारी वाढते.त्यापेक्षा उत्तम शाळा, उत्तम हॉस्पिटल्स, शुध्द हवा, शुध्द पाणी, शेतकऱ्यांना हमीभाव, शेतीसाठी वीज पाण्याची सोय या मूलभूत गरजा कडे लक्ष दिले पाहिजे. अमुक एका वर्गाला लाडके म्हणुन गोंजारण्या पेक्षा संपूर्ण समाज लाडका झाला पाहिजे. प्रत्येक वर्गाला न्याय मिळाला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, अन्न, निवारा या मूलभूत गरजा विना सायास पूर्ण झाल्या पाहिजेत. पण सरकारी पक्षांचा अजेंडा हा सरकारी तिजोरी भरण्याऐवजी स्वतःच्या सात पिढ्यांची सोय कशी करता येईल, स्वतःची तिजोरी कशी भरता येईल यावर लक्ष केंद्रित असतो.
आपण उमेदवाराची यादी अन् त्यांची प्रसिध्द झालेली माहिती पाहिली तर डोळे पांढरे होण्याची वेळ येईल. अनेक उमेदवार अशिक्षित आहेत. अनेकांवर बलात्कार, खून, भ्रष्टाचार, असे गंभीर आरोप आहेत.अनेक जण जेलमध्ये जाऊन आले आहेत ! अनेकांची संपत्ती कोट्यानुकोटीत आहे.
हे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे आले कुठून याची चौकशी कधी होत नाही. होणारही नाही.तेही एकमेकांना सांभाळून घेणार सत्तेत आल्यावर!तू ही खा मीही खातो, ही यांची वृत्ती !
असे नेते मंत्री झाल्यावर काय दिवे लावणार ? अगदी शिकल्या सवरल्या,भ्रष्टाचार निर्मुलनाचा वसा घेतलेल्या स्वच्छ चारित्र्याचा आव आणणाऱ्या आमआदमी पार्टीच्या नेत्याचे उदाहरण डोळे उघडणारे आहे.
शिशमहल मध्ये राहणारे राजविलासी नेतेही जेल मधुन बेल वर आहेत! त्यामुळे विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न आहे. निष्ठा जर स्वतःच्या पक्षाशी नाही, आपल्याच नेत्याशी नाही तर देशाशी काय एकनिष्ठ राहणार ही मंडळी ? आज इथे उद्या तिथे असा सावला गोंधळ चालला आहे. याला आता कुठलाही पक्ष, कोणताही नेता अपवाद राहिलेला नाही.त्यामुळे सगळ्यात जास्त पंचाईत सामान्य नागरिकांची, संभ्रमित मतदारांची झाली आहे.जाती धर्माच्या गलिच्छ राजकारणाचा आता प्रत्येकाला वीट आलेला आहे. आपण सगळे फक्त भारतीय, आपली जात फक्त मानव जात हा विचार समाजात कधी रुजेल देवच जाणे !
प्रत्येक जॉब साठी शिक्षण, योग्यता,अनुभव,चारित्र्य यांच्या अटी शर्ती असतात. मग निवडणुकी साठीच सगळे मोकळे रान कसे काय ? आता सर्वोच्च न्यायालयानेच यात हस्तक्षेप करून शैक्षणिक पात्रता, चारीत्रिक पार्श्वभूमी, याबद्दल अटी शर्ती घालून दिल्या पाहिजेत. संसदेने, निवडणूक आयोगाने उमेदवारा च्या पात्रतेसाठी कडक कायदे, नीती नियम केले पाहिजेत. एरवी हा असा गोंधळ चालूच राहील. अन् सामान्य नागरिक, मतदार हतबल होऊन बघत राहील !
आपल्या देशात लोकशाही खऱ्या अर्थाने जगवायची असेल तर निवडून येणारी राज्य करणारी मंडळी सुशिक्षित, चारित्र्य संपन्न, राष्ट्रनिष्ठ अशीच हवीत. फक्त मानव धर्म पाळणारी, केवळ देशाचा विचार करणारी, विवेकाने कारभार करणारी अशीच हवीत. अशा सुधारणासाठी एक नवी चळवळ उभारणे ही देशाची गरज आहे. तोपर्यंत सध्या चालू असलेला तमाशा बघत बसणे एव्हढेच आपल्या हातात आहे !!
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सर तुमचा लेख खूप छान आहे.मनाला भिडणारा, अनेकांच्या मनात आजच्या राजकारणाबद्दल खूप चिड निर्माण झाली आहे.पण बोलून दाखवायचे कोणाला, सगळे एकाच माळेचे मणी. सुरवातीला इमानदार नेता निवडून दील्यानंतर, तोच काही काळाने भष्टाचारी बनतो आणि आपल्या मनातून उतरतो. पुढील पिढी साठी घातक परिणाम निर्माण होणार आहे हे नक्की.
चिंता या वेळच्या निवडणुकीपेक्षा पुढील निवडणुकीतीलची वाटते. विधानसभेत वाढून २८८ चे ४५० आमदार होतील. लोकसभेत ५४३ चे ८५० खासदार होतील. मुस्लिम समाजाच्या बाहुल्यामुळे २०२९ सालचे निकाल विचित्र परिस्थिती निर्माण करणारे होणार आहेत.
संपूर्ण राजकारण हे बजबजपुरी माजवणाऱ्यांच्या हातात आहे. मोदींच्या उत्साही नेतृत्वाखाली बदल होण्यास सुरुवात झाली आहे. मतांच्या जोरावर भ्रष्ट नेते, निवडणारी लोकशाही ही जगातील सर्वात धोकादायक राज्य शासन पद्धती झाली आहे.