पद्मा गोळे
मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, लेखिका, आणि नाटककार पद्मा विष्णू गोळे यांनी स्त्रीचे भावविश्व आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी ठेवून काव्यसृष्टीची उपासना केली. त्यांचे मराठी कवितेत अनन्यसाधारण असे स्थान आहे.
पूर्वाश्रमीच्या पद्मावती परशुराम पटवर्धन म्हणजेच नामवंत कवयित्री म्हणून परिचित असलेल्या कवयित्री, लेखिका पद्मा गोळे ह्यांचा जन्म १० जुलै १९१३ रोजी तासगाव येथे झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले. त्यांची लेखनाची सुरुवात शाळेत असताना नाटकापासून झाली नी पुढील आयुष्यात मात्र त्यांनी “पद्मा” या नावाने सातत्याने काव्यलेखन केले.
पद्मा गोळे यांनी शालेय जीवनापासूनच लेखनास प्रारंभ केला होता. नाटककार म्हणून सुरू झालेला हा साहित्य प्रवास कवयित्री म्हणून विस्तारित पावला. त्यांचा पहिला कवितासंग्रह “प्रीतिपथावर” हा १९४७ साली प्रकाशित झाला. कवितासंग्रहाशिवाय त्यांची ‘नीहार’ (१९५४), ‘स्वप्नजा’ (१९६२), ‘आकाशवेडी’ (१९६८) व ‘श्रावणमेघ’ (१९८८) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘माझ्या पाठच्या बहिणी’, ‘आईपणाची भीती’, ‘चाफ्याच्या झाडा’, ‘मी माणूस’, ‘लक्ष्मणरेषा’ इ. कविता लक्षणीय आहेत.

निसर्गातील प्रतिमांचा वापर करत प्रेमातील उत्कटता, स्वप्नाळूपणा, असफल प्रेमातील आर्तता नि समजूतदारपणा त्यांच्या कवितांमधून व्यक्त होतो…
स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्गप्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये.
कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), भा. रा. तांबे, रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचा संस्कार झाल्यामुळे त्यांचं काव्य मराठी साहित्यात वेगळं ठरलं.
“नीहार’ व ‘स्वप्नजा’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी त्यांचा सत्कारही केला .
पद्मा गोळे यांनी काव्य लेखनाबरोबर मुलांसाठी लेख ‘नवी जाणीव’, ‘रायगडावरील एक रात्र’, ‘एक स्वप्न’ या नाटिका आणि ‘वाळवंटातील वाट’ ही कादंबरी तसंच अनेक वैचारिक लेख लिहून मराठी साहित्यात आपलं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ केलं आहे.त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे..

साहित्याप्रमाणेच त्यांचं सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. गोवामुक्ती आंदोलनातील शुश्रुषा पथकात त्या सहभागी झाल्या होत्या.
अर्वाचीन मराठी कविता असा विषय निघाला की अनेक कवींचं स्मरण होतं. आधुनिक कवी केशवसुतांनी काव्याची पताका रोवली. आपल्या भाषा सौंदर्याने ती पताका कवी गोविंदाग्रजांनी उंचावली. त्याचप्रमाणे कवी बीं पासून ते कवी बा. सी. मर्ढेकरांपर्यंत सर्वांनी मराठी कवितेला जणू सोन्याचा साज चढवला यापैकी एक कवयित्री म्हणजे पद्मा गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले पण या प्रतिभावान कवयित्री कवितेच्या रूपाने आजही अजरामर आहे.

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800