Saturday, January 18, 2025
Homeयशकथा"हरिभाऊ विश्वनाथ" : गौरवशाली वाटचाल

“हरिभाऊ विश्वनाथ” : गौरवशाली वाटचाल

मुंबईतील वाद्ये बनविणाऱ्या आणि आपली गुणवत्ता, सचोटी, विश्वासाऱ्हता शंभर वर्षे टिकवून ठेवलेल्या “हरिभाऊ विश्वनाथ ग्रुप ऑफ म्युझिकल कंपनी” उद्या, ५ जानेवारी २०२५ शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने त्यांच्या गौरवशाली वाटचालीचा घेतलेला हा आढावा. हरिभाऊ विश्वनाथ यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
कोणताही व्यवसाय सुरू करताना किंवा एखादा छंद जोपासताना जिद्द, चिकाटी तर असावीच लागते. मुळात उत्सुकता, जाण, अनुभव आणि आत्मीयता असावी लागते. परत हे करताना भविष्याचाही वेध घेता आला पाहिजे.

संस्थापक हरिभाऊ विश्वनाथ

“हरिभाऊ विश्वनाथ” या संगीत वाद्ये बनविणाऱ्या कंपनीचे संस्थापक हरिभाऊ विश्वनाथ दिवाणे हे मुळात संगीतवेडे होते. ते हार्मोनियम वाजवीत असत. या आवडीतून त्यांनी दादर पश्चिम रेल्वे स्टेशन समोर १९२५ साली वाद्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करून तो पुढे नेला पाहिजे, अशी हरिभाऊंची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी १९३२ साली दादर – कुंभारवाडा येथे हार्मोनियम बनविण्याचा कारखाना सुरू केला. त्यावेळी त्यांच्याकडे ४०-५० कारागीर होते. तसेच गिरगांव-मुंबई येथे आणखी एक दुकान सुरू केले.

भारताची १९४७ साली फाळणी झाली. त्यामुळे बरेचसे कारागीर पंजाबमध्ये तर काही पाकिस्तान मध्ये निघून गेले. त्यामुळे त्यांनी कुंभारवाड्यातील कारखाना बंद करून त्यांचे मूळगाव असलेल्या नगर येथे स्थलांतरित केला. नगरच्या कारखान्यातून हार्मोनियमची उत्पादने होऊ लागली. तेथील हार्मोनियम दादर व गिरगांव येथील दुकानात पाठविण्यात येऊ लागली..

१९६६ नंतर वाद्यांच्या निर्यातीला सुरूवात झाली. त्यावेळी पंडित रविशंकर यांच्या सितार वादनामुळे सितार, हार्मोनियम व तबला-डग्गा अशी वाद्ये परदेशात फार लोकप्रिय होऊ लागली. तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनामुळे संतूर सुद्धा परदेशात लोकप्रिय झाल्याने हार्मोनियम, संतूर, स्वरमंडळ, इलेक्ट्रिक बुलबुल, तरंग अशी अनेक वाद्ये निर्यात होऊ लागली.

“हरिभाऊ विश्वनाथ ग्रुप ऑफ म्युझिकल इंडस्ट्री’ या कंपनी” मार्फत नागेशराव दिवाणे हे गिरगाव येथील, वसंतराव दिवाणे हे दादर येथील दुकानांचा व्याप सांभाळत असत. आता दुसरी पिढी दिलीप दिवाणे, दिनेश दिवाणे व उदय दिवाणे हे अनुक्रमे गिरगांव, प्रभादेवी आणि दादर दुकानांचा व्याप सांभाळत आहेत. तिसऱ्या पिढीतील आशिष दिवाणे हे गिरगांव येथील दुकान व कारखाना सांभाळतात.

या सर्व वाटचालीविषयी बोलताना श्री दिनेशराव दिवाणे म्हणतात, “आज शंभर वर्षे पूर्ण होत असताना मागे वळून पाहिले तर मन भरून येते. कारण माझे काका हरिभाऊ दिवाणे, नागेशराव दिवाणे व माझे वडिल वसंतराव दिवाणे आज हयात नाहीत. थोर संगीतकार, गायक व गायिका तसेच अनेक थोर कलाकार, म्युझिशियन्स यांचा आम्हाला सहवास लाभला. त्यातील थोर संगीतकार व गायक हेमंतकुमार, यशवंत देव, सुधीर फडके, अनिल मोहिले, प्रभाकर पंडित, श्रीधर फडके, अन्नू मलिक, गायक भिमसेन जोशी, महेंद्र कपूर, मन्ना डे, पंडित जसराज, गायक व संगीतकार शंकर महादेवन, हरिहरन, सुरेश वाडकर, गायिका किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, अश्विनी भिडे -देशपांडे, देवकी पंडित, साधना सरगम, वैशाली माडे, बेला शेंडे, मधूरा दातार त्याचप्रमाणे नव्या पिढीतील अनेक नवोदित गायक व गायिका तसेच अनेक थोर संगीतकारांपैकी माझे जवळचे मित्र, अप्पा वढावकर तसेच उत्तम तालवाद्य वादक, थोर परकोशिओनिष्ट व जवळचे मित्र दीपक बोरकर तसेच आता हयात नसलेले माझे व्हायोलिन वादनातील गुरुजी प्रभाकर पंडित यांचे हरिभाऊ विश्वनाथ यांच्याबरोबर खूप घनिष्ट संबंध होते. हरिभाऊ विश्वनाथ यांच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. बाबुजी सुधीर फडके यांचेसुद्धा हरिभाऊ यांच्याशी घनिष्ट संबंध होते. तसेच संबंध श्रीधर फडके यांनी कायम ठेवले आहेत.”

आज हरिभाऊ विश्वनाथ यांच्याकडील संगीत वाद्यांना देशात व विदेशात खूप मागणी आहे. येथील सर्व वाद्ये पूर्णपणे पारखून, निरखून, तपासून मगच विक्रीसाठी ठेवली जातात. या सर्व क्रियेत दिवाणे कुटुंबातील दिलीप दिवाणे, आशिष दिवाणे, दिनेश दिवाणे व उदय दिवाणे यांचे मोलाचे परिश्रम व कष्ट आहेत. तसेच ही वाद्ये बनविणाऱ्या कारागिरांचा मोलाचा सहभाग आहे. हे एक टिमवर्क आहे. त्यामुळेच हरिभाऊ विश्वनाथ यांची वाद्ये सर्वांच्या पसंतीस उतरतात. या कारखान्यात तयार होणाऱ्या वाद्यांना देश परदेशात मागणी असल्याचे सौ पद्मा दिवाणे यांनी सांगितले. अमेरिका, इंग्लंड दक्षिण आफ्रिका, दुबई, लंडन, जर्मनी, हॉलंड या व अन्य देशात आमच्या कारखान्यात तयार होणाऱ्या वाद्यांची निर्यात केली जाते. विशेष करून जर्मनी आणि हॉलंड या दोन देशात अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
अलिकडेच म्हणजे २०२० मध्ये ‘कोरोना’ हा महाभयंकर आजार आला. या आजाराने भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडले होते. यावेळी अनेक व्यवसाय डबघाईला आले, अनेकांना आर्थिक झळ बसली. या आजाराचा व्यवसायावर परिणाम झाला. पण काही दिवस आर्थिक मंदी सोसल्यानंतर पुन्हा व्यवसायाला उभारी आली.

केवळ व्यवसाय करून बक्कळ पैसा कमवावा, असा या कंपनीचा कधीच हेतू राहिला नाही. तर समाजाचे आपण देणे लागतो, ही भावना लक्षात ठेऊन रचना संसद प्रभादेवी येथे ‘माय म्युझिक क्लब’ सुरू केला. संगीताबद्दल लहान मुलांना जिज्ञासा, कुतूहल असते. या लहान मुलांना संगीत म्हणजे काय ? त्याचे महत्व, संगीताची गोडी लागावी म्हणून सध्याचे आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, अशोक पत्की यांच्यासारखी संगीत क्षेत्रातील मंडळी या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी येत होती. त्याचप्रमाणे मोठ्यांसाठी देखील संगीत वर्ग सुरू करण्यात आले होते. १८ ते ८० वयोगटातील लोक या संगीत वर्गाचा लाभ घेत होते. गायिका उत्तरा केळकर, सोमनाथ परब यांच्यासारखी दिग्गज मंडळी शिकविण्यासाठी येत असे. नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पुरस्कार सुरू करण्यात आला होता. आमच्या संगीत शाळेने गुणवत्ता कायम ठेवली होती, असे श्रीमती पद्मा दिवाणे यांनी सांगितले. आमच्या वाद्य विक्रीच्या दुकानास नाही म्हटले तरी १ लाख लोकांनी भेट दिली असावी, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. संस्थेने रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सवी कार्यक्रम साजरे केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. याचवेळी वाद्ये कम्युनिटीने दुष्काळग्रस्तांसाठी थैली दिली होती.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता वाद्यांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने विक्री होत असते. दिवाणे परिवारातील तिसरी पिढी या संस्थेच्या कामात लक्ष घालू लागल्यामुळे ती व्यवसाय वाढीसाठी नवनवीन, अभिनव कल्पना राबवित आहे.

अशा या गौरवशाली कंपनीचा शतक महोत्सवी सोहळा मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होत आहे. ही कंपनी वाद्य निर्मिती आणि विक्रीशी संबंधित असल्यामुळे शतक महोत्सवी सोहळा वाद्यांच्याच अद्वितीय सादरीकरणाने, अतिशय अभिनव पद्धतीने साजरा होणार असून या सोहळ्यास प्रसिद्ध संगीतकार सर्वश्री अशोक पत्की आणि कौशल इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. तर प्रसिद्ध संतूर वादक राहुल शर्मा यांचे संतूर वादन रसिकांना यावेळी अनुभवता येईल. त्यांना ओजस अधिया तबला साथ करतील.तर सुप्रसिद्ध वादक आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू यांच्या हार्मोनियम जुगलबंदीचा संगीत प्रेमींना लाभ घेता येईल. त्यांना ढोलकीसाथ सुप्रसिद्ध वादक अनिल करंजवकर तर तबलासाथ सुप्रसिद्ध वादक प्रसाद पाध्ये हे देणार आहेत. त्याचसोबत सारेगम फेम निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांची ढोलकी जुगलबंदी असे सादरीकरण रसिकांचा संगीतानुभव नक्कीच समृद्ध करेल.
या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहितीही श्रीमती दिवाणे यांनी दिली. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हरिभाऊ विश्वनाथ संस्थेच्या दादर, प्रभादेवी आणि गिरगाव येथील दुकानांमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रवेशिका संपल्या असल्या तरी सभागृहात जागा उपलब्ध असल्यास ऐनवेळी येणाऱ्या रसिकांनाही या कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल,असेही त्यांनी नमूद करून वर्षभर संगीत विषयक आणखी काही कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे, असे सांगितले.

अशा या गौरवशाली इतिहास असलेल्या “हरिभाऊ विश्वनाथ” यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. Very nice Really interested, AND Golden Era Memories Remember to me. Too.much LIKED it THANKS AGAIN.

  2. Dear Sir, VERY MUCH NICE Advice & GUIDELINES & ARTICALS REALITY TOO.MUCH LIKED IT. I HAVE PERSONAL VISITING GIRGAON SHOPPY & VERY MUCH RESPECTED, NICELY PERSONALITY TALK WITH ME .BEST WISHES TO YOURALL THE OWNERS& STAFF. WITH WARM REGARDS TO YOU. O.K.THANKS.

  3. ‘हरिभाऊ विश्वनाथ’ याच्या संपूर्ण शतकातील गौरवशाली इतिहास मा. श्री देवेंद्र भूजबळ यांनी सविस्तर पद्धतीने छान लिहिला आहे.

    त्याच बरोबर अनेक दिग्गज कलाकार तिथली अनेक प्रकारची वाद्य घेत शिक्षण घेऊन कलेत निपूण होत गेली याबद्दल हरिभाऊ विश्वनाथ यांच्या संपूर्ण दिवाणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
    तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी व पुढील संगीतमय उपक्रमासाठी
    तुम्हांला आम्हां रसिकांकडुन अनेक अनेक हार्दिक शुभेच्छां.

  4. *हरीभाऊ विश्वनाथ कंपनी* तेव्हा अहमदनगर मध्ये दिल्ली दरवाजा , पटांगण गल्ली येथे वाद्यं निर्मिती करत असे. माझ्या लहानपणी , १९७० साला पासून पुढे काही वर्षे तो कारखाना तेथे होता.आज त्या इमारतीत डाॕ घोरपडे ( अस्थीरोग तज्ञ ) ह्यांचा दवाखाना आहे .वर उल्लेख केलेला वाद्य निर्मिती कारखाना , गुंडु साडी , सारडांचे कापड दुकान , घास गल्लीतील दुधालेंचा टाळ बनविण्याचा कारखाना इ व्यवसाय प्रसिध्द होते.नगरला अनेक प्रथितयश त्या निमित्तानं भेटी देत असत.( दशरथ पाटील )

  5. दिवाणे कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐आपली अशीच वाटचाल अविरत सुरू राहो ही सदिच्छा..पद्मा ताईंची भेट अनेक वेळा झाली…गोड व्यक्तिमत्त्व 😍🤝

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on एक घास त्यांच्यासाठी..
Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय