Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्यहलकं फुलकं

हलकं फुलकं

‘आईच्या आईची रिवाज कथा’.

आज २ सप्टेंबर. पिठोरी आमावस्या अर्थात् मराठी रिवाजानुसार मातृदिन ! (Mother’s Day नव्हे हं ! तो वेगळा😛) हा ‘मातृदेवो भव’ वाला ! 👏☺️
तर…… आज ह्यानिमित्ताने ‘सुपर मॅाम’ यानेकी की ‘आईच्या आईची रिवाज कथा’ वाचू या. 😀

“रिवाज-एक दृष्टीकोन !”🧐
दिवेलागणीची वेळ ! लीलाताई परत एकदा बाल्कनीतून डोकावून घरात आल्या. ही वेळ खरंतर हुरहुर लावणारी अशी ! त्या वाट पहात होत्या त्यांच्या नातवंडांची, प्रथमेश नि नेहाची !

‘वाट’ बघण्यात कित्तीही आतुरता असली तरी आताशा, (डास सोडले तर 😛) सातच्या आत कोण अस्तंय घराच्या ‘वाटे’वर ? मनातल्या मनात काहिशी चिडचिड होत होती लीलाताईंची !
अस्वस्थतेला आवर घालत लीलाताई देवापाशी समई लावायला वळल्या. दूध-साखरेचा नैवेद्यही दाखवून झाला.

दोन्ही नातवंडं गुणाची ! विशेषत: मोठा प्रथमेश तर फारच शांत नि समजूतदार ! ही धाकटी जरा त्यामानाने ‘महामाया’ टाईपची😛!!
काही सांगायला गेलं की, “असं का?” हा प्रतिप्रश्न निर्भीडपणे विचारणारच !😊

आता आजची सकाळचीच गोष्ट !
“आज कायै विशेष गं ? कानात हेsss एवढे ‘झोपाळे’ वगैरे, नि गळा मात्र ‘भुंडा’ अं ?”

“आज्जी ! यू नो, काॅलेजमध्ये आज ‘इअरिंग डे’ आहे.
अगदी ‘युनिक’ दिसतील म्हणून सिलेक्ट केलेत. ‘थोडीसी जलन होके वाॅssऊ’ वाटलं पाहिजे फ्रेंडस् ना !”
ड्रेसअप होता होता, नेहाचं उत्तर आलं.
“झोक्यातल्या आनंदाऐवजी ‘झोक’ जाईल ते सांभाळतांना 😜नि काssय ही भाषेची मिसळ गं !!”

उंच झोक्यात वरून खाली येतानाचं…
पोटातलं ‘वूss’ फिलींग आठवत, लीलाताईंनी नेहाला दटावलं.
“चिलपिल गं आज्जी ! तू आता सुरू नको नं होऊ ! 🤓कस्सं दिसतंय ते सांग आधी“
असं विचारलंन् खरं पण घाईघाईनं ‘बाssssय’ करत गेली सुध्दा !

कानात हेsssएवढं मोठ्ठालं अडकवून त्याच्याखाली असलेल्या ‘उघड्या-बोडक्या’ प्रदेशाकडे बघणाऱ्याची नजर अधिक आकर्षित करण्याची ही सध्याची ‘inn’ फॅशन ‘उघड्या’ डोळ्यांनी बघणं तसं ‘नजरवळणी’ पडलं होतंच की लीलाताईंच्या !😊 पण …

नेहाने मात्र जी काही स्टाईल केली होती ती डिसेंटही होती नि तिला शोभूनही दिसत होती. मनातल्या मनातच दाद देऊन टाकली त्यांनी नातीला 😍!!

आज्जी नि दोन नातवंडांचं त्रिकूट कायम एकत्र असल्याने (दीज डेज हे थोडं निराळं वाटेल😀) अशा शाब्दिक चकमकी चालू असत. परंतु बाहेरून घरी आल्यावर ‘आज्जी’ घरात दिसायलाच हवी, दोघानाही !!😌
आई-बाबांना (लीलाताईंच्या मुलाला- सुनेला) त्यांच्या प्रोफेशनमुळे घरी यायला होणारा ‘उशीर’, प्रथमेश-नेहाला आज्जी घरी असल्यामुळेच तर सहज पचनी पडला होता.😊

“अरे अरे, काय रे हे लिबलिबीत हातावर घेत बसता ! ‘सॅनिटायझर’, !!
नाव तसं भारीय नि ‘हाता’च्या स्वच्छतेचं प्रस्थ माजवून ‘हातोहात’ त्या कंपन्यांचं उखळ पांढरं करणारंही !!🤨
आणि…पाय कोण धुणार ?? तस्संच आपलं पाय ताणून बसायचं म्हणजे sss 😒 ! बाहेरून आल्यावर हात – पाय – तोंड पाण्यानी स्वच्छ धुवावं की ! एवढ्या तीन्तीन बाथरूमा आहेत”

“हो ग्गं आज्जी, हो ss!!
‘उखळ ?? म्हंजे🤔 बंपर गेलं😇 n ‘बाथरूमा’😲! काहीही plural करतेस हं !!”
ह्या असल्या ‘डूज ॲण्ड डोंटस्’चा रतीब असे घरात.

२/३ वेळा नेहाचा फोन न लागल्याने लीलाताईंची अस्वस्थता आणखीन वाढली. 😔
कशात तरी लक्ष गुंतवावं म्हणून त्यांनी मोबाईलवर ‘you tube’ चॅनेलची निवड केली.
लीलाताईंच्या ‘ह्या नेट साक्षरते’ मध्ये नातीचा हातभार जरा जास्त ! अगदी त्यांच्या शिकण्याच्या ‘मंदगती’ ची जर्राही तक्रार न करता.😃

“मी भूमिका केलेल्या पहिल्या कमर्शिअल नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचं मिळालेलं मानधनाचं पाकीट, (रू ६० फक्त 😲) घरी जाऊन आईच्या सूचनेनुसार मी घरातल्या देवाजवळ ठेवून मनोभावे नमस्कार केला”

you tube वरच्या मुलाखतीत, शरद पोंक्षे एका प्रसंगाचं वर्णन करून सांगत होते.

“हे क्षेत्र सहजी लागणाऱ्या व्यसनांसाठी काहीसं बदनाम असल्याने आईच्या मनात भरपूर धास्ती असणं सहाजिक होतं. ‘देवाचा प्रसाद मानून त्या पाकीटातले पैसे वापरले तर ते पैसे गैरमार्गी लागण्याची शक्यता कमी’ हा असा त्या कृतीमागचा अर्थही सूचित केला होता आईने !”

लीलाताई हे ऐकताना भावुक होऊन गेल्या एकदम !!

स्पर्धा परिक्षांचं निकालपत्र असो किंवा कोणतंही यशदर्शक प्रमाणपत्र, देवासमोर ठेवून नमस्कार करणं, हे दोन्ही iनातवंडांमध्ये रूजवत आल्या होत्या लीलाताई आजवर !
यशानंतरही ‘नतमस्तक’ रहाणं (नेहाला समजावतांना ‘ग्राउंडेड ! यू नो’ असं गोडीगुलाबीनं सांगावं लागे😊) हा मुख्य हेतु ह्यापाठचा !

तुलना म्हणून नाही पण नेहा ‘बुध्दीमत्ता नि जिद्द’ ह्याबाबतीत जरा जास्तच ‘गिफ्टेड’ असल्यामुळे तिला जमिनीवर आणणं अधिकच आवश्यक वाटे लीलाताईंना !
‘आई-बाबां’ च्या अती व्यग्र वेळापत्रकामुळे प्रथमेश चे विचार पूर्णतया वेगळे बनले होते. वेळोवेळचे छोटे छोटे आनंद ‘जगण्या’कडे त्याचा कल असल्याने स्पर्धात्मक जगाकडे पाठ फिरवली होती त्यानं ! अर्थातच त्याच्या महत्वाकांक्षी आई-बापाला हे डायजेस्ट करणं अंमळ जडच जात होतं.
पण …

‘लेखन’, ‘अभिवाचन’, ‘मुलाखती घेणं‘, ह्या आणि अशा स्वत:च्या विविध ‘आवडी’ पुरवायला पुरेसा वेळ मिळेल ह्याचा पूर्ण विचार करून, शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रथमेशनं साधासा जाॅब स्वीकारला होता नि नुकताच आज तिथं १ महिना पूर्ण होत होता.

जोरजोरात वाजलेल्या बेलच्या आवाजाने लीलाताई विचारांच्या तंद्रीतून भानावर आल्या.
“आssज्जी, ओली भेळ आणलीय,
मीही खाणारे तुझ्याबरोबर ! मी पटकन हात-पाय धुवून आले”
फोनही केला नव्हता नि यायलाही उशीर झाल्याने घरात पाऊल टाकल्या टाकल्या नेहाची लगबग अन् हे ‘हात-पाय धुवून….😉’ वगैरे सुरू झालं.
‘लाडीगोडी कशी लावावी हे कुणी हिच्याकडून शिकावं गं बाई’, रागेजलेल्या लीलाताईंच्या मनात त्याही परिस्थितीत नातीबद्दलचं कौतुक दाटलं.
“व्हाॅटस् राॅंग विथ यू, आज्जी ?”
ना रागावलेली – ना तिरकस, आजीची अशी कोणतीच रिॲक्शन न आल्याने कन्फ्यूज झालेल्या नेहाने प्रश्न विचारता विचारता आजीकडे पाहिलं.
“प्रथमेशही आला नाहिय्ये गं बाई अजून ! एक फोन करायचं सुचत कसं नाही म्हणते मी ! ऐन म्हणे ही स्मार्ट पिढी !😒मोबाईलचं शस्त्र नुस्तं हातात असून उपयोगी नई, योग्य वेळी चालवायलाही हवं नं !
ह्या अशा ‘कातरवेळी’ इतका घोर लागतो जीवाला ! कळत कसं नाही ग्गं !”

जवळजवळ एका श्वासात घडाघडा आलेल्या ह्या लीलाताईंच्या प्रतिक्रियेनं नेहाला ‘सिग्नल’ मिळाला नि नीटसा अर्थ न कळूनही ‘घोर’ आणि ‘कातर वेळ’ ह्यांच्या कातरीत सापडलेल्या नेहानं प्रश्न न विचारता आजीचा हात हातात घेतला.

“अग्गं कोणीतरी फ्रेंडस् भेटले असतील किंवा ॲाफिसमध्येच लिहित बसला असेल. सडनली काहीतरी सुचलं म्हणून !
डोंट वरी !! मी फोन लावून बघते”

फोन एंगेज्ड येत होता. लीलाताईंचं आत-बाहेर सुरूच होतं. काही न बोलता ‘भेळेचं’ पार्सल टेबलावर ठेऊन नेहा सोशल मिडियात घुसली – प्रथमेशनं फेसबुक -व्हाॅटस् ॲपवर काही स्टेटस अपडेट केलंय का ते पहाण्यासाठी.

“ hey bro, व्हेअर आर यू ? आजी कित्ती अपसेट झालेय माहित आहे का ?”

शेवटी एकदाचा लागला फोन प्रथमेशला ! एकदम सतर्क होऊन संभाषणाकडे लक्ष लागलं लीलाताईंचं !

“अगंबाई, आलोच ! शून्य मिनिटात पोचतोय ! चल, दार उघडून ठेव”
“ओक्के, उघडते“

गंभीर चेहऱ्याने घरात आलेल्या प्रथमेशनं फटाफट हात-पाय धुवून खिशातला मोबाईल हातात घेतलेला पाहिला लीलाताईंनी !
संध्याकाळपासूनची चिडचिड – एक्साईटमेंट सगळं सगळं अश्रूंच्या रूपात जमा होऊ लागलं.

“आज्जी, नैवेद्याची वाटी खाली काढून ठेवतोय गं ! मला तिथे मोबाईल ठेवायचाय ! कारण तिथे ‘डबल धमाका गुड न्यूज‘ कैद झालेय आज !”

देवाला साष्टांग नमस्कार घालून प्रथमेश आजीला नमस्कार करण्यासाठी वाकला.

“आज्जी, आज पहिला पगार क्रेडिट झाल्याचा मेसेज आहे त्यात ही पहिली बातमी अन् ‘संस्कृति हितवर्धक मंडळातर्फे’ होणाऱ्या कार्यक्रमात “सलील-संदीप” ची मुलाखत घेण्यासाठी माझी निवड झालेय हे कळवणारी mail ही तिथेच लाॅक झालेय. हां, आता ही ‘पेपरलेस टेक्नाॅलाॅजी’ देवालाही ‘लेस टाईममध्ये’ स्विकारायला हवीय.”

लीलाताईंना काहीही बोलायची संधी न देता कोचावर बसवलं प्रथमेशनं !

पहिल्या पगाराच्या आणि सिलेक्शनच्याही आनंदाने उजळलेला प्रथमेशचा चेहरा पाहून लीलाताईंचा तणाव विरळ होत असतानाच देवापुढे नम्रपणे मोबाईल ठेवणाऱ्या नातवाच्या कृतीला त्यांनी मनोमन दाद दिली.

“चलो, चलो इस विनिंग मोमेंटपर भेल हो जाए“ म्हणत नेहानं भेळेचं पॅकेट उघडलं.

पोक्षेंच्या आईने एक वेगळा दृष्टीकोन दिलेली नि वर्षानुवर्ष रूजवलेली रीत सांभाळणारया नातवंडांकडे पाहतांना स्वत:च्याच भाग्याचा क्षणभर हेवा वाटला लीलाताईंना !😍

कुरमुरे पिचपिचित झाले होते तरिही त्या त्रिकूटासाठी ती जगातली सर्वात टेस्टी भेळ होती . 😋😋

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. वाह् अनुजाताई, एकदम मस्त, खुसखुशीत लेख. नवीन टेक्नाॅलाॅजी व त्यासोबत भाषा पण वापरलीय आजीॅनी. छान वाटतंय हे वाचून. आजी व नातवंडांची जमलेली गट्टी, मनाला खुप भावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments