“भाव तसा देव”
मी आणि नाडी ग्रंथ प्रेमी मनीष घाडगे डॉक्टर वऱ्हाडपांडे यांच्या एका मित्राला घेऊन त्यांच्या घरी जायचे ठरले होते. डॉक्टर वऱ्हाडपांडे यांचे नाडी ग्रंथ भविष्य या विषयावर काय मत आहे हे जाणून घेण्याकरता मला त्यांच्या बाजूचा एक साक्षीदार पण मिळाला. असे साक्षीदार मी नेहमीच बरोबर घेत असे कारण की ज्यांच्याशी नाडी ग्रंथ भविष्य विषयावर चर्चा होत असे, नंतर काही लोक मी असे म्हणालोच नाही, असे म्हणाले तर माझ्या बाजूचे साक्षीदार तरी निदान मला खोटे पाडणार नाही अशी माझी धारणा होती. नंतरच्या पत्रव्यवहारात मला त्या साक्षीदारांचा सुद्धा पाठिंबा मिळत गेला.
या सगळ्याचे कारण असे होते की साधारण १९९५-९६ सालापासून माझ्यावर नाडी ग्रंथ विषयाचा मी अभ्यासक असल्यामुळे नाडी भविष्य हे थोतांड आहेत असे म्हणणारे अनेक बुद्धीवादी आणि बुद्धिवादी संस्था माझ्यावर टीका करीत असत. त्यामध्ये डॉ. नी. र.वऱ्हाडपांडे हे मान्यवर होते. त्यांची उंचीपुरी देहयष्टी, शैक्षणिक पदव्यांची लांबलचक मालिका, विपुल ग्रंथसंपदा पाहून छाती दडपून जावी असे ते खमके विज्ञानवादी व्यक्तिमत्व होते.
“भाव तेथे देव” असं म्हणतात म्हणून ज्याचा जसा अनुभव असेल तसा तो त्या घटनांवर किंवा आपल्या विचारांवर ठाम असतो आणि ते योग्यच आहे. पण म्हणून एखाद्याला आलेला अनुभव थोतांड मानणे, बरोबर नाही. कारण आमच्या तत्त्वज्ञानात बसत नाही म्हणून आम्ही मानत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. विज्ञानवादाची कास धरून माझे मत आहे म्हणून ते इतरांनी मान्य करायलाच हवे हा अट्टाहास सुद्धा चुकीचा आहे.
डॉ. नी. र. वऱ्हाडपांडे म्हणाले की, आम्ही विवेकवादी नाडी भविष्य वगैरे मानत नाही कारण ज्योतिषाला आम्ही मानत नाही. असा पवित्रा घेतलेले अनेक जण आपण पाहतो. नाडी भविष्य हे ज्योतिषशास्त्राचा एक भाग असल्यामुळे तेही ज्योतिषशास्त्रासारखेच थोतांड असले पाहिजे असे माझे मत आहे असे जर कोणी म्हणाला तर त्याच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही कारण तो व्यक्ती कितीही थोर असला तरी नाडी ग्रंथ भविष्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय वाद घालायला लागला तर तो खोटारडा असतो असा माझा पूर्वीपासूनचा पवित्रा होता. अनेकदा मला विविध व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून त्यांच्याकडून टीकेचा विषय व्हावे लागत असे.डॉक्टर वऱ्हाडपांडे यांनी विवेकवाद नावाचे एक मोठे पुस्तक लिहिलेले आहे. याशिवाय त्यांचे विज्ञानवादी विचार खूपच प्रसिद्ध आहेत. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी बर्ट्रांड रसेल या जागतिक कीर्तीच्या निरीश्ववाद्याची भेट घेऊन चर्चा केल्याच्या माहितीमुळे त्यांचा दबदबा फारच मोठा होता. हे सगळे सांगायचे कारण असे की अशा या व्यक्तीला त्यांचे मत काय आहे हे समजून घेण्यासाठी मी आधीच पत्रव्यवहार करून त्यांना माझ्या पुस्तकाची एक प्रत वाचनार्थ पाठवली होती. याला एक वेगळी पार्श्वभूमी पण होती कारण प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या एका दिवाळी अंकामधील लेखावर डॉक्टर नी.र. वऱ्हाडपांडे यांनी काही आक्षेप घेतले. त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणे प्रा अद्वयानंद गळतगे यांना भाग पडले आणि त्यातूनच मलाही अशा व्यक्तीला भेटून नाडी भविष्याच्या संदर्भात त्यांचे मत इतके टोकाचे का आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.
आम्ही मनीष घाडगे आणि डॉक्टरांचे एक स्नेही बरोबर घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो. सुरुवातीला थोडेफार तुम्ही कोण ? आम्ही कोण ? हे झाले. त्यानंतर मी त्यांना नाडी भविष्याबद्दल त्यांचे मत काय आहे ? असे विचारून चर्चेला सुरुवात केली. तुम्ही मला भेटायला आलेले आहात त्या अर्थी तुम्हाला माझे मत काय असेल याची कल्पना असेलच, मी नाडी भविष्य वगैरेवर अजिबातच विश्वास ठेवत नाही म्हणून तुम्ही लिहिलेले पुस्तक वाचायच्या लायकीचे नाही म्हणून मी ते वाचले देखील नाही,असे त्यांनी सुनावले.
यावर मी त्यांना अशी विनंती केली की आज आपला जसा विश्वास नाही तसा एक दिवशी माझाही नव्हता. परंतु मला आलेल्या अनुभवामुळे आणि नंतर केलेल्या शोधकार्यातील निष्कर्षामुळे असे म्हणावे लागते की नाडी भविष्य हा प्रज्ञाचक्षूंचा चमत्कार आहेत. इंडॉलॉजीतील मॅन्युस्क्रिप्टोलॉजीत तमिळ अभ्यासकांनी ताडपत्रावरील कोरलेल्या मजकुरात व्यक्तिची नावे व इतर माहिती त्याच्या जन्माअगोदर लिहिली आहे असे म्हटले आहे म्हणून तुमच्यामाझ्या सारख्या तमिळ भाषा न समजणाऱ्यांनाही नाडी भविष्याचे गूढ मान्य करावे लागते. याकरिताच ही भविष्य कथन पद्धती इतर ज्योतिषशास्त्राच्या विधांपेक्षा खूपच वेगळी आहे.
मानवी पंचेंद्रियाच्या बुद्धीच्या पलीकडे असलेल्या ज्ञानाच्या भांडारातूनच हे नाडी ग्रंथ भविष्य लिहिले जातात असे माझे मत बनलेले आहे आणि हे लेखन ज्यांनी केले ते महाभारत, रामायण, भागवत वगैरे प्राचीन ग्रंथातील वेगवेगळे महर्षी आहेत. उदा. अगस्त्य, विश्वामित्र, वशिष्ठ, काक भृशुंडी आणि अनेक, जे उत्तर भारतातील लोकांना अजूनही ज्ञात नाहीत अशांनी ते लिहिले आहेत. डॉ. परत परत म्हणत राहिले की, माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. तेव्हा मित्र मनीष म्हणाला की तुम्ही अनुभव न घेताच असे कसे काय बोलू शकता ? “मला असल्या थोतांडाचा अनुभव घेण्याची मुळीच गरज नाही कारण त्याला प्रायमासीच काही अर्थच नाही. म्हणून तुम्ही मला कितीही म्हणाला की अनुभव घ्या तरी मी तो घेणार नाही! कारण माझी बुद्धिवादी भूमिका अत्यंत ठाम आहे. डॉक्टर वऱ्हाडपांड्यांचे मित्र आता त्यांच्याशी आता वाद घालू लागले आणि ते म्हणाले की ठीक आहे, तुमचा ज्योतिषावर विश्वास नाही पण म्हणून नाडी ग्रंथाच्या ताडपट्ट्यात काय दिलेला आहे याचा शोध घेण्यासाठी अनुभव सुद्धा तुम्ही घेणार नाही हे आम्हाला पटत नाही. अनुभव घ्या आणि मग ठरवा. वैज्ञानिक बुद्धीवादी व्यक्तीचे ते कर्तव्य आहे असा आमचा समज आहे. आता डॉक्टरांच्या विरोधात सगळेच बोलू लागले. तरीही वऱ्हाडपाडे यांनी आपले म्हणणे सोडले नाही. ‘मी नाही बघणार’ असेच सारखे म्हणत राहिले. तेव्हा आतल्या खोलीतून एकदम दरडावणीचा आवाज आला, ‘गप्प बसा हो, ते काय बोलताय ते समजून घ्या.’ ते ऐकून आम्ही स्तब्ध झालो. त्या होत्या सौभाग्यवती वऱ्हाडपांडे!बाहेरचा रागरंग पाहून मी त्यांना भेटावयास आतल्या खोलीत गेलो. तेव्हा मी बाकीचे विषय दूर ठेवून आपली मुले काय करतात वगैरे विचारले. मला कळले की त्यांचा एक मुलगा हवाई दलात आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल वेगळी आपुलकी वाटली. साधारण अर्ध्या पाऊण तासानंतर बोलण्यात काही अर्थ नव्हता.
डॉक्टर वऱ्हाडपांड्यांच्या घरातून आम्ही बाहेर पडलो. तोपर्यंत दुपारचे बारा वाजून गेले होते. म्हणूनच नंतरच्या भेटीच्या संदर्भात रणरणत्या उन्हातून कुलकर्णी कुटुंबीयांचा पत्ता शोधत फिरावे लागले होते. अशी अहंमन्य डॉ. नी. र. वऱ्हाडपांडे यांची भेट आज बऱ्याच वर्षानंतर सुद्धा लक्षात राहिली.
कुलकर्णी यांच्या घरून बाहेर पडल्यानंतर त्या दिवशीच्या शेवटच्या भेटीसाठी आम्ही डॉक्टर उत्तरा हुद्दार यांच्या घरी पोहोचलो. संध्याकाळची वेळ झाली होती. बाईंनी आम्ही आल्यानंतर दरवाजा उघडून नेहमीप्रमाणे स्वागत केले. परंतु नंतर तुम्ही जर माझ्या पुनर्जन्माच्या केस बद्दल बोलायला किंवा त्याबद्दल माझ्या आठवणी विचारायला आला असाल तर माझ्याशी बोलू नका, मला त्याबद्दल काहीही बोलायचे नाही असे म्हटल्याने आमची ती भेट पहिल्या पंधरा मिनिटातच संपणार की काय असे वाटू लागले होते. मी त्यांना म्हटले की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि इतर बुद्धिवादी लोकांनी तुम्हाला मानसिक त्रास दिला याची कल्पना तुम्ही लिहिलेल्या एका लेखामधून आली आहे. किंबहुना माझी पण परिस्थिती अशीच आहे. कारण डॉ. दाभोळकर आणि त्यांचे चाहते यांच्याकडून मला लक्ष्य बनविले गेले आहे. नंतर जवळजवळ एक दीड तास गप्पा रंगल्या. त्यांची केस चमत्कारिक होती. विशिष्ट तिथीनंतर शारदा नावाची एक बंगाली स्त्री त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होत असे. तेंव्हा तिचे बोलणे बंगालीतून होई. ती बंगाली पद्धतीने साडी नेसायची. काही काळानंतर ते थांबले. अशा केसवर शोधकार्य करायला अनेक पुढे आले. त्यात डॉ नरेंद्र दाभोलकर होते. ‘आपल्याला नावाचा गाजावाजा व्हायला ही असली युक्ती त्या करतात. एरव्ही त्यांच्या केसमध्ये काही तथ्य नाही’ वगैरे लिहून त्यांच्या अनुभवाला चेष्टा मस्करीत जमा केले. म्हणून त्या डॉ दाभोलकर यांच्यावर त्या रागावल्या होत्या. तो विषय वेगळा करून त्यानंतरच्या पुढच्या जीवनामध्ये त्यांच्यात काय फेरबदल झाले किंवा त्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांना नंतर कधी त्रास किंवा मदत झाली का, अशा गोष्टी आम्ही चर्चेत बोलत होतो. त्या म्हणाल्या की आज कित्येक वर्षांनी अशा तऱ्हेच्या गोष्टींना विचारून पुन्हा उजाळा मिळाला. शिवाय नाडी भविष्य या विषयाचा मला परिचय झाला.
प्राचीन भारतीय ऋषी मुनींचे तत्त्वज्ञान हे खरोखरच किती अद्भुत आहे याची मला पुन्हा जाणीव झाली. त्यांनी त्यांचे काही लेख आणि पुस्तके सुद्धा आवर्जून दाखवली. त्या सतार देखील वाजवत असत. अनेक हृद्य आठवणी समजून घेत बैठक समाप्त झाली. अनेक वर्षे लोटली. त्या स्वर्गवासी झाल्या. प्राचार्य अद्वयानंद गळतगे सध्या लिहित असलेल्या लेखमालेतील उत्तरा हुद्दारांची केस ही पुनर्जन्माची नसून ती परकाया प्रवेशाची आहे असे प्रतिपादन केले. डॉक्टर आयन स्टीव्हनसन यांच्या पुनर्जन्म निष्कर्षाशी ते विरोधात होते. उत्तरा हुद्दार यांची केस डॉ स्टिव्हेनसन यांच्या वतीने पुण्यातील विद्वान डॉक्टर वा. वि. अकोलकर यांनी हाताळली होती. नाडी ग्रंथांच्या संदर्भात त्यांचीही माझी ओळख झाली आणि स्नेह वाढला. ही आठवण हवाई दलाशी निगडित जरी नसली तरी सुद्धा माझ्या हवाई दलातील दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमधून काही गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्यातील ह्या होत्या. म्हणून आज आवर्जून या लेखातून प्रसिद्ध करताना मला वेगळा आनंद होत आहे.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
प्रियंवदा गंभीर यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली असती तर आवडले असते.
त्या म्हणाल्या
भाव तसा देव…
शशिकांत ओक यांनी त्यांना आलेले अनुभव कथन थोडे तरी करायचे होते.
Those who have scientific view, they need some real experience.
_ प्रियंवदा गंभीर,पुणे.
या लेखाचा तो उद्देश नाही. हवाईदलातील कार्यकाळात घडलेल्या काही रंजक अनुभवांची नोंद सादर करत आहे.
आपल्या सारख्या अनेक वाचकांना नाडी ग्रंथ भविष्य विषयावरील माझे अनुभव वाचायला हवे असतील तर त्यांनी ई-बुक पुस्तकाची मो क्र ९८८१९०१०४९ वर मागणी करावी.
भाव तसा देव…
शशिकांत ओक यांनी त्यांना आलेले अनुभव कथन थोडे तरी करायचे होते.
Those who have scientific view, they need some real experience.
_ प्रियंवदा गंभीर,पुणे.
वरील कॉमेट संदर्भात…
हवाईदलातील माझे दिवस या सदरातून काही घडलेले रंजक किस्से सादर करण्यात येतात. आपल्याला माझे नाडी ग्रंथ भविष्य विषयक अनुभव वाचायला हवे असतील तर ई-बुक्स उपलब्ध आहेत. या साठी मो क्र ९८८१९०१०४९ वर संपर्क साधावा.