जागवितो असा का रे मजला
नीज नीज रे माझ्या बाळा l
प्रहर तिसरा उलटत जाई
डोळ्याला डोळा लागत नाही
घेवून कुशीत गोंजरतो तुजला
नीज नीज रे माझ्या बाळा l
फुलाहूनही कोमल काया
गोरी गोरी तुझी ही चर्या
तुजस्तव अंगाई गातो अवलिया
नीज नीज रे माझ्या बाळा l
कृष्ण कुंतल तुझे मोकळे
हळुवार मी हात फिरवले
काय हवे ते देईन तुजला
नीज नीज रे माझ्या बाळा
निबीड तिमिरात संपली रात
पहाटे स्वप्नी घडेल मग भेट
हास्य फुलवेल मी तुझिया गाला
नीज नीज रे माझ्या बाळा l

– रचना : विलास कुलकर्णी, मीरारोड