Wednesday, December 10, 2025
HomeUncategorizedअजोड सदानंद जोशी

अजोड सदानंद जोशी

एक पात्री प्रयोग सादर करून ज्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर तर भारतात इतिहास घडविला, आचार्य अत्र्यांच्या आवाजात, वेशात प्रत्यक्ष अत्र्यांचे व्यक्ती दर्शन घडवून तीन हजार पेक्षा जास्त कार्यक्रम जगभर सादर करून एक उच्चांक स्थापन केला अशा सुप्रसिद्ध सदानंद जोशी यांचा जन्म 16 जुलै 1922 रोजी नाशिक येथे एका उच्च शिक्षित घराण्यात झाला होता.
त्यांचे वडील त्या काळी म्हणजेच शंभर वर्षापूर्वी एम.ए. झालेले होते. आजोबा शिक्षण अधिकारी होते, तर मामा वकिल होते.  

सदानंद जोशी यांच्या मध्ये उपजतच कलागुण होते. बालपणापासून उत्तम निरीक्षण करून कोणत्याही व्यक्तीच्या चालण्याबोलण्याची ते हुबेहूब नक्कल करीत. पुढे त्यांनी साने गुरुजीं सारख्या कोमल मनाच्या माणसापासून ते हिटलर सारख्या हुकुमशहा पर्यंत विविध लोकांच्या नकलांचे उत्तम सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी पेडगावचे शहाणे, गोळवलकर गुरुजी, चाचा नेहरू, बाजिराव पेशवे, शिवाजी महाराजांपासून तर मेरा जुता है जपानी गाणा-या राज कपूर पर्यंत अनेकांच्या नकलांचे कार्यक्रम सादर केले.

सदानंद जोशी यांनी मॅट्रिकनंतर नासिकच्या रूंगटा विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली. त्यावेळी त्याच शाळेचे मुख्याध्यापक श्री. ग.वि. अकोलकर यांच्या सारखाच कोट आणि चष्मा लावून त्यांच्या चेहऱ्याप्रमाणे स्वतःच्या चेहर-याचे हावभाव करून फोटो काढून घेतला. तो फोटो बघून सर्वांना खूप कौतुक वाटले. पण एका चुगलखोर व्यक्तीने तो फोटो खुद्द अकोलरांनाच  दाखवून तुमची नक्कल सदानंद जोशी नी केली असे सांगितले असता अकोलकरांनी जोशींना बोलाऊन आणायला सांगितले. तेव्हा आता जोशींची चांगलीच खरडपट्टी होणार असा अंदाज त्या व्यक्तीने केला. पण अकोलकर सरांनी तू याच कलेत करीयर कर, खरोखर मोठा कलाकार होशील असा आशीर्वाद दिला. त्या प्रमाणे सदानंद जोशी यांनी मुंबईत येऊन तसे प्रयत्न सुरू केले.

 मुंबईत आल्यावर सदानंद जोशीनी दंतमंजनाचा व्यवसाय सुद्धा केला. त्याचबरोबर हातगाडी वर जाहिरातीचे बोर्ड परळ ते माहीम भागात फिरवण्यासाठी माणसे नेमून जाहिरात व्यवसायही करून बघितला. त्यांचे आचार्य अत्र्यांसोबत घनिष्ठ संबंध असल्याने “शामची आई” चित्रपटात सुरवातीला स्वतःचे चरित्र कथन करणाऱ्या शाम म्हणजेच साने गुरुजींची भुमिका करण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्याच चित्रपटास पहिला सुवर्ण कमळाचा  राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळाला होता. दिल्लीत २६ जानेवारीच्या शोभायात्रेत  महाराष्ट्राचा चित्ररथ करण्याची  सर्वात पहिली संधी त्यांना मिळाली. त्याचेही त्यांनी सोने केले आपल्या सर्वांच्या आदरणीय शिव राज्याभिषेकाचा देखावा तयार केला होता त्याला ही सर्वोत्तम देखाव्याचे पारितोषिक मिळाले होते.

मार्शल मार्सो नावाचे फ्रान्स मधील मुकाभिनय करणारे सुप्रसिद्ध कलावंत १९६१ साली मुंबईत आले होते. सदानंद जोशी यांनी मार्शल मार्सो यांच्याकडून मुकाभिनय शिकण्याचे वचन मिळविले. फ्रान्सला जाणे त्या काळात एवढी सोपी बाब नव्हती. त्यात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.
पण त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी त्यांच्या पत्नी सौ आशा जोशींनी आपले मंगळसूत्र मोडुन ते पैसे त्यांना दिले. अशा प्रकारे फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी मुकाभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
परदेशात जाऊन एकपात्री चे प्रशिक्षण घेऊन आलेले सदानंद जोशी हे एकमेव कलावंत होते. पुढे त्यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या कार्यक्रमात उत्तम प्रकारे केला.

सदानंद जोशी यांचे मामा जेष्ठ साहित्यिक, नाट्य समिक्षक श्री. माधव मनोहर यांनी सुध्दा त्यांना वेळोवेळी खुप मदत केली, मार्गदर्शन केले. प्रत्येक मराठी माणसाला सुपरिचित असलेले बहुगुणी, बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले मराठा संपादक, निर्भिड पत्रकार, शिक्षणतज्ञ, लेखक, कवी, विडंबनकार, टिकाकार, नाटककार, ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी होत असे महान वक्ते, चित्रपट निर्माते अशा आचार्य अत्रे यांचे दर्शन ते हयात असताना त्यांच्या समोर करण्याचे धारिष्ट सदानंद जोशींनी १९६५ साली दाखवून एक मोठा उच्चांक प्रस्थापित केला. त्या साठी दोन वर्षे अथक परिश्रम घेतले. अत्र्यांच्या “क-हेचे पाणी” आणि “मी असा झालो” या दोन्ही आत्मचरित्रपर पुस्तकांची मदत घेतली आणि त्यांच्या वेशात आणि आवाजात तंतोतंत अत्रे स्टेज वर साकार केले. त्या एक पात्री कार्यक्रमाचा शुभारंभ १७ जानेवारी १९६५ रोजी झाला त्या प्रसंगी स्वतः अत्रे साहेबांनी मी जिवंत असताना जोशींनी मला अमर केले आहे मी मरायला मोकळा झालो, असे उद्गार काढले होते.  
     
तीन वर्षे लोकांना भरपूर हसवून झाल्या वर काही तरी गंभीर करून बघावे म्हणून सदानंद जोशींनी  श्री.रणजीत देसाई यांच्या स्वामी कादंबरीचे एक पात्री रूपांतर करून त्याचे ५० हुन अधिक प्रयोग केले.
तिकिट लाऊन एकपात्री कार्यक्रम हाऊस फुल्ल होऊ शकतो, हे सदानंद जोशींनी सिद्ध करून दाखवले. त्या नंतर रंगनाथ कुलकर्णी, रणजीत बुधकर, व.पु.काळे. लक्ष्मण देशपांडे अशा अनेक कलावंतांनी पुढे ही परंपरा चालू केली.

अशा या थोर कलाकाराचे 12 नोव्हेंबर 2008 रोजी निधन झाले. सदानंद जोशी यांना विनम्र अभिवादन.

— लेखन : अनिरुद्ध जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…
सौ.मृदुला राजे on धुक्याची चादर
सौ.मृदुला राजे on बहिणाबाईं…
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on प्रतिभावान प्रतिभा
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on सानपाडा : अनुकरणीय आनंद मेळावा
चंद्रकांत Chandrakant बर्वे Barve on चित्र सफर : 58
Vilas kulkarni on खळी पडू दे !