Wednesday, December 18, 2024
Homeकलाअनुकरणीय, अविस्मरणीय वाढदिवस…

अनुकरणीय, अविस्मरणीय वाढदिवस…

जन्मलेल्या प्रत्येकाचा दरवर्षी वाढदिवस येत असतो. ज्याची जशी ऐपत असेल, इच्छा असेल तसा तो साजरा केला जातो. किंवा साजरा केलाच जातो, असेही नाही. जगात ज्या काही समान गोष्टी आढळतात त्यातील एक गोष्ट म्हणजे वाढदिवस साजरा करणे ही होय. आपल्या बालपणीचे वाढदिवस आठवल्यास आईने औक्षण करणे आणि जेवायला काही गोड धोड, विशेषत: शिरा ! करणे हे होत असे. काळ बदलत चालला तसे वाढदिवस साजरा करण्याचे स्वरूप ही बदलत चालले. या विषयी लिहू तितके थोडेच. असो.

आम्ही काल ज्या वाढ दिवसाला गेलो होतो, तो मात्र पूर्णपणे आगळावेगळा, अनुकरणीय अविस्मरणीय असा वाढदिवस सोहळा ठरला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सोहळा देखील म्हणता येणार नाही, कारण पारंपरिक पद्धती प्रमाणे, पुष्पगुच्छ, भेट वस्तू देऊन शुभेच्छा देणे, गौरवपर खरी खोटी भाषणे करणे असे काहीही नव्हते.

तर अशा या वाढदिवसाचे निमित्त होते ते म्हणजे आमच्या सोसायटीतील रहिवाशांसाठी सतत काही तरी सांस्कृतिक उपक्रम करणाऱ्या श्रीकांत जोशी यांच्या आईचा ८७ वा आणि पत्नी सौ माधुरी यांचा ६० वा वाढदिवस.

या वाढदिवसानिमित्त जोशी परिवाराने आयोजन केले होते, ते प्रख्यात गायिका प्रा डॉ मृदुला दाढे यांच्या “पसायदान” या कार्यक्रमाचे.

आपल्या अतिशय आटोपशीर प्रस्तावनेत श्रीकांत जोशी यांनी सांगितले की, ४० वर्षांपूर्वी नागपूर येथे भावाने “अमृताचा धनू” हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची आठवण कायम येत असे. तसाच कार्यक्रम आपणही आयोजित करावा म्हणून आई आणि पत्नीचा वाढदिवस, मुलीच्या लग्नाला सर्वांना न बोलवता आल्याची मनात राहिलेली रुख रूख अशा या सर्व बाबींमुळे आजचा हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमासाठी मदत करणारे कलावंत रवी वाडकर, बॅक स्टेज डिझाईन करणारे प्रकाश पाटील, पनवेल यांचाही त्यांनी या वेळी गौरव केला.

जोशी परिवाराचे आध्यत्मिक गुरू श्री अरविंद आठ्यले यांनी यावेळी जोशी काकू आणि माधुरी ताईंना आशीर्वाद दिले. जोशी परिवाराशी आपला २५ वर्षांचा परिचय असून माऊली हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असे सांगितले. आई आणि माऊली यातील फरक सांगताना ते म्हणाले, पावसात आपल्या मुलांना पदराखाली घेते, ती आई पण सर्व जगाला पदराखाली घेते, ती माऊली !

या नंतर निरुपणकार प्रा धनश्री लेले यांनी माईक चा ताबा घेतला आणि सुरू झाली एक तरल, लोभस, गोड जुगल बंदी. एकीकडे त्यांचे ज्ञानेश्र्वरी, गीतेतील तत्वे आणि त्यांचे आजच्या जीवनातील प्रयोजन या विषयीचे भाष्य तर दुसरीकडे मृदुलाताईंचे गोड स्वरातील गायन…भरगच्च भरलेले सभागृह मंत्रमुग्ध झाले होते.

कुणी न सांगताच योग्य वेळी टाळ्यांचा कडकडाट होत असे तर काही जण, जणी हळुवारपणे टाळ्या वाजवत न कळत त्या गायन समाधीत सहभागी होत राहिले. खरोखरच कधी संपूच नये अशी वाटणारी ही सुरेल मैफल शेवटी वेळेच्या बंधनामुळे दोन तासांनी अखंडपणे सुरू राहून संपली पण सर्व उपस्थितांना स्वर्गीय सुखाचा आनंद देऊन गेली.

हा गायनाचा कार्यक्रम संपल्यावर जोशी काकू आणि माधुरी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वांची एकदम झुंबड उडाली. सोसायटीतील नवरात्री उत्सव आणि इतर उपक्रमात जोशीकाकु सर्व मुली, सूनांसोबत आनंदाने सहभागी होत असतात, छान ठेका धरत असतात त्यामुळे त्या आजच्या पिढीत ही प्रिय असून सर्वांना आपल्याच वाटतात. त्यामुळे अवघे ९३ वय असलेले जोशी काका आणि काकू यांच्या पाया पडायला अक्षरशः रांग लागली होती. तर दुसरीकडे माधुरी ताईंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मैत्रिणींनी गराडा घातला होता.

माधुरी ताईंना पुस्तक भेट देताना सखी अलका भुजबळ

खरोखरच अविस्मरणीय अशी कालची संध्याकाळ होती. जोशी काकू, माधुरी ताईंना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि श्रीकांत जोशी, धनश्रीताई, मृदुलाताई आणि त्यांचे सर्व साथीदार यांचे मनःपूर्वक आभार.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ९८६९४८४८००

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. 👌👏👏🙏🙏
    असाही वाढदिवस साजरा केला जाऊ शकतो ,किती छान आयडीया .

  2. अविस्मरणीय आणि अनोख्या पध्दतीच्या वाढदिवसाचे सुरेख लेखन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३
सौ.मृदुलाराजे on “माहिती”तील आठवणी” : ३१