स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती २०१२ मध्ये देशभर साजरी झाली. त्यातीलच एक आयाम ग्रामायण.
विविध सेवा संस्थांना भेटी देण्यापासूनच ग्रामायणने आपल्या कामाची सुरुवात केली. शहरातील नागरिकांच्या मोठ्या संख्येत प्रकल्पांना भेटी ग्रामायणने घडवून आणल्या.
*प्रदर्शन*
त्यातून सेवा संस्थांच्या अडचणी लक्षात येऊ लागल्या. मग संस्थांच्या उत्पादित मालाची विक्री व्हावी म्हणून ग्रामायणने प्रदर्शन सुरू केले. स्वदेशी, स्वनिर्मित, आरोग्यदायक, पर्यावरण पूरक वस्तूंच्या निर्मितीसाठी ग्रामायण प्रदर्शनाने लवकरच आपली ओळख निर्माण केली.
*अभ्युदय*
ग्रामायणतर्फे असे 7 यशस्वी प्रदर्शने झाली.
मागील वर्षीपासून आपण सेवा संस्थांसाठी विशेषत्वाने प्रदर्शन घ्यायला सुरुवात केली. अभ्युदय सेवा प्रदर्शन या नावाने.
*अभ्युदय भूमिका*
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम, त्यांना त्यांच्या कामाची व्यापकता, येणाऱ्या समस्या आणि निर्माण होणाऱ्या गरजा समाजापर्यंत पोचवण्याचं माध्यम म्हणजे अभ्युदय सेवा प्रदर्शन. कामासाठी काम करावं आणि प्रसिद्धीपासून दूर रहावं, असं करताना मात्र संस्थांना आर्थिक मदतीची, कार्यकर्त्यांची, कौशल्य विकसनाची गरज भासते. यासाठीच हे एकत्रीकरण.
*अभ्युदय २०२५*
मागील वर्षी महाराष्ट्रातून ४१ संस्थांनी या प्रदर्शनात भाग घेतला.
मागील वर्षीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष.
१२,१३,१४ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसात अभ्युदय सेवा प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सहभागी सर्व सेवा संस्थांसाठी हे प्रदर्शन निशुल्क होते. फ्रेंड्स को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी च्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन घेण्यात आले. सोसायटीच्या तात्या टोपे हॉल, तात्या टोपे नगर, वेस्ट हायकोर्ट रोड, नागपूर या ठिकाणी हे प्रदर्शन घेण्यात आले. यावर्षी प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातून ६२ संस्था सहभागी झाल्या.

*सत्पात्री दान*
आपल्या शास्त्रात सत्पात्री दानाची संकल्पना आहे. हे सत्पात्र निवडीचं जिकिरीचं काम या प्रदर्शनात एकाच ठिकाणी आलेल्या संस्थांच्या निवडीतून सहज शक्य होतं, म्हणूनच पितृपक्षात आयोजन केले आहे. सेवा संस्थाच्या मदतीतून, समाजाला काय देऊ शकतो या शोधात, कदाचित आपल्या जगण्याला एक नवा अर्थ मिळेल.
*उद्देश*
सेवा प्रदर्शनाचा उद्देश सेवा संस्थांमध्ये तयार केलेल्या वस्तूंची विक्री हा नव्हता, तर ती संस्था कोणासाठी व कसे काम करते याबद्दल माहिती नागरिकांना मिळावी, असा होता. यामध्ये अपंग, बेघर, भटक्या विमुक्त महिला मुलांना, पुरुषांना काही वस्तू बनवायला शिकवले होते. त्यांनी बनवलेल्या वस्तू प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या होत्या.

*व्यवस्था*
१२ तारखेला संपूर्ण स्टॉल्स संस्थेच्या नावाचे बॅनर लाऊन तयार होते. सकाळी दहा पासून संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे येणे सुरू झाले. Google form द्वारे संस्थेची एन्ट्री झाल्यामुळे नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी झाली.
*उद्घाटन*
दुपारी १ वाजता सेवा प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे उद्योजक व वेंचर कॅपिटलिस्ट श्री. शशिकांत चौधरी होते.
आपल्या भाषणात त्यांनी ‘समाजकार्यासाठी राबणाऱ्या सेवासंस्थांना
टाळ्या-फुलांचा गौरव वा शाबासकीची गरज नसते. कारण, त्यांचे कार्य हे कोणत्याही कीर्तीसाठी नसून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी असते. अशा संस्थांना मदतीचा हात आणि खऱ्या अर्थाने साथ देणे हीच खरी कृतज्ञता ठरते’, असे मत व्यक्त केले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर दंडारे यांनी या सेवा संस्थांचे कार्य बघून त्यांना मदतीचा हात देण्यासोबत आपणही काहीतरी सेवा कार्य करावे अशा संवेदना जागृत व्हाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी यवतमाळ को-ऑप. बँकेचे अध्यक्ष प्रा. नितीन खर्चे यांनी देखील अशा सेवा प्रदर्शनाच्या आयोजनाचे भरभरून कौतुक केले, आणि शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनानंतर अतिथींनी संपूर्ण प्रदर्शन बघितले.
*संवाद*
सहभागी सर्व संस्थांच्या व्हिडिओ क्लिप्स मोठ्या एलईडी स्क्रीनवर सातत्याने दाखवण्यात येत होत्या, त्यामुळे कार्याचे प्रत्यक्ष दर्शन येणाऱ्यांना होत होते. संस्थांचे कार्यकर्ते/पदाधिकारी देखील आपसात चर्चा करून अनुभवांची देवाणघेवाण करीत होते.
तीनही दिवस अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. संस्थेची माहिती घेतली.
*संस्था सहभाग*
यावर्षी सर्व दूर महाराष्ट्रातून 62 संस्था यात सामील झाल्या आहेत. बदलापूर, ठाणे, पुणे, अहिल्यानगर संभाजीनगर, बीड इथूनही संस्था आल्या आहेत. विदर्भाचे विशेषत्वाने प्रतिनिधित्व आहे. पूर्व विदर्भातून गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, सीरोंचा येथील दोन संस्था आल्या आहेत.
आलेल्या सेवा संस्थांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व होतेच, सोबतच राजस्थान जयपुर इथून देखील एक संस्था आली होती.
*संस्था विविधता*
रेल्वे स्टेशन वरील मुलांसाठी काम करणारी संस्था, जेलमधील कैद्यांच्या कुटुंबासाठी काम करणारी संस्था, टेंडर ट्रान्सजेंडरवर काम करणारी, जखमी प्राण्यांना जीवनदान देणारी, कुमारी माता, अनाथ मुले, वृद्ध, दिव्यांग यावर काम करणाऱ्या अनेक संस्था, पारधी मुले व कुटुंबासाठी काम करणाऱ्या संस्था, मनोरुग्णांची सेवा करून त्यांची घरवापसी करणाऱ्या संस्था, आर्थिक दुर्बल मुलांना शिक्षणाचा खर्च देणारी संस्था, महिला सबलीकरण, महिलांसाठी रोजगार, आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्था तिथे आल्या आहेत. मेळघाटातील बांबू आधारित रोजगार उपलब्ध करून देणारी संस्था, तसेच कुपोषित मुलांवर काम करणारी संस्था देखील या प्रदर्शनात एकत्रित आले आहे.
*सेवाकार्याचा उद्देश*
भारत देश संपन्न व्हावा, शोषित पीडित समाजाला न्याय मिळावा, जगण्याची समान संधी मिळावी, त्यांचीही प्रगती व्हावी यासाठी आयुष्य वेचणारे हे महाभाग ! या महान व्यक्तीना ग्रामायण परिवार आदराने नमन करतो !! त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो !!!
जगण्याचा खरा अर्थ सांगून जाणारी माणसं भेटणं आणि त्याचं काम समजून घेणं हे खरोखर प्रेरणादायी ठरतं.
*कार्यशाळा… ..*
तीन दिवसाच्या प्रदर्शनानंतर काय… .. याचेही उत्तर ग्रामायणने कार्यशाळांचे माध्यमातून दिले आहे. सेवा संस्थांना उपयोगी पडणारे, त्यांच्या समस्या – प्रश्न सोडवणारे विषय घेऊन ग्रामायण सातत्याने कार्यशाळा घेत असते. नागपूर चंद्रपूर यवतमाळ या भागांमध्ये देखील या कार्यशाळा वर्कशॉप होत असतात.
*तज्ञांचे मार्गदर्शन*
प्रदर्शनात मान्यवरांच्या भेटीसोबतच अजून एक उपक्रम ग्रामायणने जोडला तो म्हणजे तज्ञांचे मार्गदर्शन. अनुभवी तज्ञ मंडळींचे one to one मार्गदर्शन प्रदर्शनाच्या ठिकाणीच वेगळ्या कक्षात सुरू होते. संस्थेचे पदाधिकारी प्रत्यक्ष जाऊन आपल्या अडचणी सांगून त्यावर समाधान मिळवीत होते.
*Fast track… ..*
हे मार्गदर्शन संस्थांसाठी कायमस्वरूपी वर्षभर सुरू असते. Fast track assesment, social audit असे उपक्रम ग्रामायण संस्थांसाठी उपलब्ध करून देत आहे.
*समाजसेवी पुस्तिका*
महाराष्ट्रातील दिवंगत समाजसेवी यांच्या कर्तुत्वाचा आलेख असणारी पुस्तिका ग्रामायण प्रकाशित करणार आहे. संवेदनशील, निःस्वार्थ, निःस्पृह कार्य केलेले, काळाच्या पडद्याआड गेलेल्या महानुभावांच्या कार्याचा आलेख यात असेल. त्यासंबंधीचे माहिती संकलनात आपण सारेच योगदान देऊ शकता.
*विद्यार्थ्यांचे योगदान*
एक स्तुत्य उपक्रम ग्रामायण ने अजून राबवला.. .. तो म्हणजे सोशल वर्क कॉलेजच्या मुलांना विशेषत्वाने प्रदर्शन स्थळी येण्यास सांगितले. दिनांक 13 सप्टेंबर रोजी समाजकार्य शिकणारे मुले मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देण्यास आले. मुलांना एकाच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या 62 संस्था, त्याही वेगवेगळ्या विषयांवर काम करणाऱ्या एकाच ठिकाणी पाहता आल्या. मुलांनी संस्थांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला , कामाचे स्वरूप जाणून घेतले. संस्थांनी देखील सोशल वर्कर म्हणून या मुलांचे इंटरव्यू केले. आलेल्या सर्व मुलांचे स्वपरिचयपत्र एकत्रित करण्यात आले. या उपक्रमामुळे संस्था आणि विद्यार्थी या दोघांनाही फायदा झाला.
*विद्यार्थ्यांच्या स्पर्धा*
विद्यार्थ्यांच्या दोन कॉम्पिटिशन स्पर्धा पण घेण्यात आल्या. मला आवडलेली NGO असा लेख मुलांनी लिहिला, तसेच संपूर्ण प्रदर्शनावर आधारित रील बनवण्याची एक कॉम्पिटिशन घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने दोन्हीही स्पर्धांमध्ये भाग घेतला. प्रत्येक कॉम्पिटिशन साठी तीन बक्षीस देण्यात आली. रोख रक्कम आणि सर्टिफिकेट असे बक्षीसाचे स्वरूप होते.
*समारोप… ..*
सेवा प्रदर्शनाचा समारोप पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे व VIA चे अध्यक्ष मा .श्री. प्रशांत मोहता यांनी यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी डॉ. श्री रवींद्र कोल्हे यांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सेवा संस्थांचे काम समाजासमोर आणून त्यांना पाठिंबा मिळवून देण्याचे ग्रामायण करीत असलेले काम आज महाराष्ट्र व्यापी झालेले आहे व हे कार्य लवकरच देशव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रशांत मोहता यांनी विदर्भातील इंडस्ट्रीजचा सीएसआर फंड योग्य सेवा संस्थांना मिळावा यासाठी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन ग्रामायण प्रतिष्ठान च्या माध्यमातून एकत्रपणे कार्य करेल अशी ग्वाही दिली.
दैनिक हितवादचे संपादक श्री. विजय फणशीकर यांनी आपल्या भाषणातून मनाला आश्चर्यचकित करणाऱ्या इतक्या सेवाभावी कामांचं दर्शन ग्रामायण ने घडवून ग्रामायण ने नागपूरकरांवर एक प्रकारे उपकारच केले आहेत असे उदगार काढले.
*नागपूरकरांचा भरभरून प्रतिसाद*
तीनही दिवस भेट देणाऱ्या सुजाण नागरिकांचा ओघ कायम होता. इंडस्ट्रीचे लोकं पण चांगल्या संख्येने आले. सोबतच युवा मंडळी ही मोठ्या संख्येने भेट देत होती. सर्वांनीच संस्थांच्या कार्याची ओळख करून घेतली.
साधारणतः 5000 मान्यवरांनी अभ्युदय सेवा प्रदर्शनाला भेट दिली.
*दातृत्व*
अनेक संस्थांना नागरिकांनी आर्थिक स्वरूपातील मदत पण केली.
*CSR*
अनेक संस्थांना रोख डोनेशन मिळाले. CSR देणाऱ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. संस्थाना प्रत्यक्ष भेटी दिल्या. अभ्युदय सेवा प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढेही या कंपन्याद्वारे संस्थांना मदत नक्कीच होऊ शकते.
*मिडिया*
मीडियाने पण याला हा विषय उचलून धरला आणि उत्तम प्रसिद्धी दिली.
*बक्षीस वितरण*
यावेळी सोशल वर्क कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ज्या दोन स्पर्धा झाल्या त्यांचे बक्षीस वितरणही करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
*मनोगत… ..*
प्रदर्शनास सहभागी 62 संस्थांपैकी पाच संस्थांच्या प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
* झाडू तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या गोपाळ समाज बांधवांना, 100 झाडूची, प्रत्यक्ष ऑर्डर मिळाली, ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरली. आम्ही ग्रामायनचे मनःपूर्वक आभारी आहोत.
भटके विमुक्त कल्याणकारी संस्था, विदर्भ प्रांत, भंडारा
* या प्रदर्शनाद्वारे आम्हाला चांगले exposure मिळाले. 3 दिवसात 175 व्यक्तींनी आमच्या स्टॉलला भेट दिली. डोनेशन प्राप्त झाले. काही कार्यकर्ता म्हणून join करतील अशी खात्री वाटते. ग्रामायन प्रतिष्ठानला अनेक धन्यवाद – स्वामी विवेकानंद विद्या प्रतिष्ठान अहिल्यानगर
* अभ्युदय सेवा प्रदर्शनाची संकल्पना, नियोजन उत्कृष्ट जनसंपर्क,आणि व यशस्वी आयोजना साठी ग्रामायण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन. प्रतिसाद वाढलेला होता. विद्यार्थी वर्ग गटागटाने येऊन उत्सुकतेने माहिती घेत होते. आपल्या या सहकार्यामुळे आम्हाला आमचे कार्य अनेकांपर्यंत पोचवण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
डॉ. प्रतिमा शास्त्री,अध्यक्ष, अपंग महिला बाल विकास संस्था नागपूर
* ग्रामायण टीमचे यशस्वी आयोजनासाठी आणि स्नेहांचल परिवाराला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. या माध्यमातून आम्हाला आमचे ध्येय व उद्दिष्ट – पॅलियेटिव्ह केअरचा संदेश जनसामान्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली.
स्नेहांचल परिवार, नागपूर
* नवीन लोकांना वऱ्हाड चे काम सांगण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे दालन उभे करून दिले त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे इतर संस्था सोबत जुळता आले एकमेकांची मदत घेता येईल ही खात्री झाली. – वऱ्हाड, अमरावती जेल मधील कैद्यांच्या कुटुंबासाठी काम करणारी संस्था
* आपण एकाच छत्राखाली खुप लोकांना आपलस करून घेतल ही फार मोलाची कामगिरी बजावली. अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.
राजाभाऊ जोध, मानव विकास संस्था
*मनोरुग्ण महिनेला आधार*
गणेश पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एक मनोरुग्ण महिला पोलिसांना दिसली. नंददीप फाउंडेशन, यवतमाळचे संदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्या महिलेला प्रदर्शन स्थळी आणून दिले. प्रदर्शनानंतर यवतमाळला परतताना संदीप शिंदे त्या महिलेला घेऊन गेले. महिनाभरातच ही महिला स्वगृही परतेल असा विश्वास संदीप शिंदे यांनी व्यक्त केला.
*आभार … ..*
उपक्रमात सहभागी समारोपप्रसंगी सेवा प्रदर्शनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत केलेल्या प्रत्येकाचे आभार मानण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*जाणीव जबाबदारीची*
या तीन दिवसीय महोत्सवात ग्रामायण टीमचे सर्वांनीच खूप कौतुक केले. ग्रामायण देखील सेवा संस्थांसाठी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची प्रभावी योजना करण्यास तत्पर आहे.
*माझे कर्तव्य….*
स्पर्धात्मक जगात वावरताना स्वतःपलीकडे बघता यावं यासाठी हे आयोजन. दिनचर्येतून जरा डोकावून आपणच आपल्याला प्रश्न विचारावा, ‘ काय बरं आहे माझ्याकडे देण्यासारखं? वेळ, धन की कौशल्य.’ याच संवेदनशीलतेतून सामाजिक संस्थांच्या गरजांची ओळख होते आणि मदतीचे हात पुढे येतात.
*मान्यवरांची साथ हवी*
संवेदना सृजनाला जन्म देते, याची ग्वाही तेथे आलेल्या प्रत्येक संस्थेच्या कार्याची गोष्ट ऐकताना होते. अभ्युदयच्या प्रदर्शन तसेच अन्य उपक्रमांमध्ये वेळ काढून आपणही सहभागी व्हावे आणि सेवाकार्यातून मिळणाऱ्या समाधानाचे, समृद्ध अनुभवाचे भागीदार व्हावे. ग्रामायण परिवारात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.
“हरवले आभाळ ज्यांचे
हो तयांचा सोबती,
सापडेना वाट ज्यांना
हो तयांचा सारथी”
टीम एन एस टी
☎️9869484800