सौ. माधुरी मगर -काकडे संपादित ‘मधुसिंधू’ ह्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन पहिल्या विश्व काव्यसंमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी
डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ.अरुणा मोरे होत्या. ईशस्तवन सौ. सुरेखा बिबवे यांनी, स्वागतगीत सौ. आशा नष्टे यांनी सादर केले. सौ.माधुरी मगर-काकडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सौ. राजश्री मराठे व सौ प्रतिमा काळे यांनी सूत्रसंचलन केले.
या प्रातिनिधिक काव्यसंग्रहास डाॅ. मधुसूदन घाणेकर यांनी २०२२ चा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. मधुसिंधू या काव्यप्रकार संदर्भात “सौ.माधुरी काकडे यांनी काव्यविश्वात मधुसिंधू हा काव्यप्रकार आणला असून निश्चितच ही एक क्रांतीच केली आहे. अनेक मधुसिंधू कवयित्री घडवून यातूनच प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची दर्जेदार निर्मिती केल्याने हा काव्यसंग्रह नक्कीच विश्वविक्रमी ठरेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही” असे गौरवोद्गार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी मधुसिंधू प्रकाशित करताना काढले.
काव्यनिर्मिती संदर्भात विशेष प्रकाशझोत टाकताना त्यांनी सांगितले की, कवी मंडळींनी काव्यलेखनात प्रत्येक अक्षराच्या अंतरंगात शिरल्यास ती निर्मिती शाश्वत काव्याच्या दिशेने जाईल. सभोवतालच्या बदलत्या विश्वाबद्दल सजग राहून आत्मचिंतन करत रहावे असा सल्लाही त्यांनी दिला.
या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात ३५ कवयित्रींच्या काव्यरचना समाविष्ट केल्या आहेत. या संग्रहातील काही कवयित्रींच्या लक्षवेधी काव्यरचना सादर
करून स्वनिर्मित काही रचनाही सादर करत उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.
या प्रकाशन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठकार रणजीत वर्मा तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र च्या राज्यसचिव श्रीमती वनश्री मोरे, जेष्ठ साहित्यिक व नाट्यकर्मी श्री.जगन्नाथ शिंदे, प्रा.डाॅ. मधुकर मोकाशी आदि मान्यवरांचीही भाषणे झाली. सौ. अनुष्का गोवेकर, सौ. माधुरी देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
‘मधुसिंधू हा काळावर उमटवलेला ठसा आहे.’ असे प्रतिपादन समारंभाच्या अध्यक्षा प्रा. डाॅ. अरुणा मोरे यांनी करुन हा काव्यसंग्रह म्हणजे महिलांच्या सबलीकरणाचेच प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले.
माधुरी काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. राजश्री मराठे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
बोलकी प्रतिक्रिया
मधूसिंधु विषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना कवियत्री प्रीती भिसे, बेंगलोर म्हणतात, “मधूसिंधु या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिमाखात पार पडले. सौ. माधुरी ताई काकडे यांचे सुंदर नियोजन, आयोजन याचाच परिपाक म्हणजे ३५ कवयित्रींनी रचलेल्या या ३५० कवितांचा संग्रह आहे. मला या काव्यसंग्रहात सहभागी होता आले हे मी माझे भाग्य समजते. या काव्यसंग्रहाचे विशेष म्हणजे प्रकाशनाच्या वेळीच डॉ. मधुसूदन घाणेकर (सबकुछ मधुसूदन) यांनी या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. याचे सगळे श्रेय या मधूसिंधु काव्याच्या निर्मात्या सौ. माधुरी ताई काकडे यांना जाते. यासाठी माधुरी ताईंचे आणि सर्व सहभागी कवयित्रींचे मनःपूर्वक अभिनंदन.
या अनोख्या उपक्रमाला टीम एन एस टी तर्फेही मनःपूर्वक शुभेच्छा.
– टीम एनएसटी. 9869484800