बालपणापासून पोहोण्याची आवड असल्याने मी नदीत उतरत गेलो आणि नदीच्या परिसराचा अभ्यास करताना शेवटी नदीच माझ्या जीवनात उतरली असे प्रतिपादन नदिष्टचे लेखक प्रा.मनोज बोरगावकर यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी, बेंगळूरू विभाग आयोजित व महाराष्ट्र मंडळ बेंगळूरू यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळूरू येथील महाराष्ट्र मंडळ सभागृहात आयोजित प्रकट मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. करामसाप बेंगळूरू विभाग उपाध्यक्ष डॉ अनुराग लव्हेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
यावेळी बोलताना प्रा बोरगावकर पुढे म्हणाले, मी प्रथम निसर्ग वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला भेटणाऱ्या पशु पक्षांचा अभ्यास केला. ऊन, वारा, पावसासारख्या भयंकर नैसर्गिक संकटात मोराच्या पावलातील अंतर बदलत नाही हेही मला निसर्गाच्या सानिध्यात शिकता आले. मला नदी म्हणजे आईचे विस्तृत गर्भाशय वाटते. मी नदीला घाबरत नाही. असे स्पष्ट करून गंगा ही शरीर स्वच्छ करते, विचार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वि ग सातपुते पुणे, प्रा.विजयकुमार चौधरी, डॉ. राजेंद्र पडतुरे, डॉ. संध्या राजन, रेखा नाईक, दीपक शिंत्रे, सुधा बेटगेरी, प्रतिभा टेकाडे इत्यादी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
करामसापची भूमिका मांडताना करामसापचे अध्यक्ष व महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी यांनी, करामसापने स्थापनेपासून आजपर्यंत कर्नाटकाच्या विविध भागात सहा राज्य मराठी साहित्य संमेलने आयोजित करुन मराठी भाषा साहित्य विषयक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रे आयोजित केल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष ओंकार संगोराम, कोषाध्यक्ष दीपक कुलकर्णी, महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष घाणेकर, करामसाप बेंगळूरू विभाग सभासद प्रा. व्यंकटेश देवनपल्ली व अनिरुद्ध शास्त्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन, सजावट व अन्य सर्व व्यवस्था करामसाप बेंगळूरू विभाग कोषाध्यक्ष तुषार भट यांनी पाहिली. गायत्री बेहरे यांनी गणेश स्तवन सादर केले तर स्नेहा घाटे व राकेश शेटे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात नदी या विषयावर कविता सादरीकरणासाठी बेंगळूरूच्या परिसरातून तसेच महाराष्ट्रातून कवी उपस्थित होते. करामसाप बेंगळूरू विभाग कार्यवाह प्रतिभा टेकाडे यांनी काव्य मैफिल कार्यक्रमाचे नेतृत्व केले. तर संगीता कुलकर्णी यांनी काव्य मैफिलीसाठी कवितांची निवड केली. कवींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे फोटो, विडिओ व फेसबुक लाईव्ह डॉ. महेश वझे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून साकारले.
कार्यक्रमाची सांगता कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगळूरू विभागाच्या अध्यक्षा दिपाली वझे यांनी नदीवरच्या सुरेल गझलेनी व उपस्थितांचे आभार मानून पुढील अनेक कार्यक्रमासाठी करामसाप बेंगळूरू विभाग प्रयत्नशील असेल असे आश्वासन दिले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800