मी भारतात आल्यावर एखाद्या स्थळाला भेट देताना त्या भागात राहणारे नातेवाईक अगर मित्र यांनाही आवर्जून भेटण्याचा प्रयत्न करत असतो. काळुस मध्ये राहणारी माझी सख्खी चुलत बहीण सिंधू व तिची मुले यांनाही अनेक वर्षानंतर दिलेल्या धावत्या भेटीत एक तास का होईना जुन्या आठवणीवर गप्पागोष्टी करत छान वेळ गेला आणि हो दुधात साखर पडावी असे काही गोड प्रसंग अनुभवायला मिळाले.
अखंड हरिनाम सप्ताहासाठी ह.भ.प. श्री. रंगनाथ महाराज यांच्या वारकरी कीर्तनासाठी आम्ही टेमगिरवाडी या गावी गेलो होतो. हरिनाम सप्ताह- शेवटचा दिवस म्हणजे काला कीर्तन संपवून आम्ही दुसरीकडे एका कार्यक्रमासाठी जाणार होतो. सकाळी सकाळीच लवकर टेमगिरवाडीत पोहचलो. आयोजकांनी कीर्तन सकाळी साडेनऊ ऐवजी साडेदहाला पुढे ढकलले. मधल्या वेळात गावातील शाळेच्या विश्वस्तांनी आम्हाला शाळा दाखवण्यासाठी त्यांच्या शाळेतील शिक्षक श्री रामकृष्ण वाटेकर यांना बोलावले. ह्या शाळेतील शिक्षण पद्धतीने आम्हाला एकदम अचंबित केले आणि एक प्रकारचा सुखद शैक्षणिक धक्का बसला.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या होत असलेली मराठी शाळांची वाताहात थांबविणारी ही शाळा वाटली. नवीन पिढीसाठी मराठी भाषा जपण्याचा एक आशेचा किरण दिसला. शाळेतील चार भिंतीच्या आत चालणाऱ्या वर्गाऐवजी मुलांना इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, पर्यावरण, याचा अभ्यास शाळेबाहेरील पटांगण आणि मुलांना खेळण्याच्या जागेत असणाऱ्या सोयी आणि झाडाखाली एक मोठा पार केलेला पाहून आपण महाराष्ट्रातील एका छोट्या गावात की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी चालविलेल्या शांतिनिकेतन मध्ये तर आलो नाही ना ? असे वाटत होते.

पुणे जिल्हा परिषदेच्या या शाळेला भारतातील उत्कृष्ट ५५ व महाराष्ट्रातील ५ शाळा पैकी एक शाळा म्हणून गौरविण्यात आले आहे. शाळेतील दूरदृष्टी आदर्श शिक्षक श्री रामकृष्ण वाटेकर यांनी त्यांच्या शाळेविषयी आम्हाला अतिशय सखोल माहिती सांगितली. २३ वर्षे ते या शाळेत शिकवत आहेत. इतर शाळांपेक्षा एका विशिष्ट प्रकारे मुलांना शिकवले जाते. त्या त्या विषयामध्ये प्रवीण असलेल्या विद्यार्थ्याला वर्गप्रमुख म्हणून निवडतात. हे वर्गप्रमुख इतर विद्यार्थ्यांबरोबर स्वयंशिक्षण घेत असतात. पहिली ते चौथी या वर्गातील मुलांना चार भिंतीच्या आत शाळेत पुस्तकातील धडे शिकविण्याऐवजी त्यांना बाहेर नेऊन नैसर्गिक वातावरणात खेळत बागडत व प्रतिकृतीद्वारे मुलांना घोकमपट्टी न करता प्रत्यक्षरीत्या शिकवले जाते. भारताचा नकाशा, राजगड, महाराष्ट्र, पुणे जिल्हा यांच्या नकाशांचे बारीक सारिक गोष्टी दाखविणाऱ्या सखोल प्रतिकृती करून त्याचे शिक्षण दिले जाते. गणिताचे देखील वेगवेगळ्या मॉडेल्स मार्फत त्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इत्यादी शिकवले जाते.जीवन उपयोगी शिक्षणावर या ठिकाणी जास्त भर दिला जातो. वेगवेगळी रोपे कशी वाढवायची, त्याची निगा कशी ठेवायची, वेळेवर पाणी व खुरपणी करून त्यापासून उत्पन्न कसे काढले जाते हेही त्यांच्याकडून करविले जाते. भारताच्या नकाशात असलेले पर्वत, नद्या, वेगवेगळी महत्त्वाची शहरे, प्रांत. राज्य त्या भागातील वेगवेगळ्या चालीरीती व संस्कृती त्यांना शिकवली जाते नव्हे तर विद्यार्थी स्वतः शिकतात.
या शाळेतील चौथीची मुले केंद्र परीक्षेमध्ये नेहमीच गुणानुक्रमे सातत्याने क्रमवारीत वरच्या स्थानावर असतात. हे ऐकून तर मी भारावून गेलो. साधारणतः इतर शाळांमध्ये मुलांना घोकंपट्टी करण्यावरच खूप भर असतो, परंतु या शाळेत स्वयंस्फूर्तीने, व्यवहारिक आणि नैसर्गिक शिक्षण मिळाल्यामुळे ही मुले क्रमवारीत बरीच वरच्या स्थानावर येतात. या शाळेतील शिक्षक सर्वश्री रामकृष्ण वाटेकर व दीपक रेटवडे मुलांना खरोखर जीवनाचा मार्ग दाखवत आहेत. ते या शाळेसाठी दररोज साधारणपणे १२ ते १५ तास झटत असतात. पुणे जिल्ह्य़ातील खेड तालुक्यातील साठ सत्तर घरांची वस्ती असलेल्या टेमगिरवाडी या गावातील लोकसंख्या तीनशे पेक्षा कमी असूनही टेमगिरवाडीतील गावकरी आणि ग्रामस्थ महिला असल्या आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळेसाठी लागणारी मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.
शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री संपत टेमगिरे हे तर सदैव प्रत्येक कामामध्ये जातीने लक्ष घालून स्वतः पाहुण्यांसाठी व शाळेसाठी सतत राबताना दिसत होते. अनेक महिला आपल्या घरचाच कार्यक्रम आहे असे समजून आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक पाहुणचार करत होते. शिक्षणाला पूर्ण वाहून घेतलेले हाडाचे शिक्षक, शक्य होईल तेवढी मदत करणारे शाळा व्यवस्थापक, आणि गावातील शाळा ही आपलीच आहे याची जाणीव ठेवणारे गावातील ग्रामस्थ असा हा सर्वांचा सुंदर संगम घडून येत असल्यामुळे या लहानशा गावातही राष्ट्रीय पातळीवर गाजणारी आदर्श शाळा व विद्यार्थी घडत आहेत. ‘It takes a village to raise the child’ म्हणी प्रमाणे गावातील अबालवृद्ध मंडळी शाळेतील कार्यक्रमासाठी झटत असल्याचे दिसून येत होते.
टेमगिरवाडी गावात झालेल्या दोन्ही कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा स्वावलंबीपणा आणि स्वयंसेवकपणा प्रकर्षाने जाणवला. वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक नसतानाही अनेक विद्यार्थी स्वतःहून विविध कामांमध्ये मदत करताना दिसत होते. त्या शाळेत चालणारे शैक्षणिक उपक्रम तसेच वेगवेगळ्या क्षेत्रावर विचारलेल्या प्रश्नांची माहिती अतिशय समाधान पूर्वक देत होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंदिशा, स्वयंशिस्त आणि आत्मविश्वास प्रकर्षाने जाणवत होता.
शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय चमू सोबत मराठी माध्यम असणाऱ्या जि. प. प्राथमिक शाळा टेमगिरवाडी शाळेला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण शाळांची संख्या १ लाख ८ हजार २५० असून त्यामधे दोन कोटी १२ लाख ७२ हजार ६११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशभरात १ कोटी पेक्षा जास्त शिक्षक संख्या कार्यरत आहे. यामधून राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (NIEPA), नवी दिल्ली या भारत शिक्षण मंत्रालयाकडून देशभरातील ५५ सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी निवडण्यात आल्या. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील ४ शाळांचा समावेश होता. (पुणे जिल्हा – टेमगिरवाडी, नंदूरबार जिल्हा- तोरणमाळ, अहिल्यानगर जिल्हा – वाघोली, गडचिरोली जिल्हा – शिवनीपथ ) देश पातळीवरील ५५ शाळांमधे एकूण विद्यार्थी पटसंख्या नुसार सर्वात लहान द्विशिक्षकी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगिरवाडी ची राष्ट्रीय स्तरावर निवड ही या लहानशा गावासाठी विशेष अभिमानाची बाब आहे.
National Conference on Successful School Leadership : Innovative Pathways for Viksit Bharat @2047 साठी संपूर्ण देशभरातून निवड झालेल्या ५५ शाळांची राष्ट्रीय परिषद NCERT नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झाली होती. त्यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा टेमगिरवाडी च्या नवोपक्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले.

टेमगिरवाडी शाळेत शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शालेय चार भिंतींच्या बाहेरील समृद्ध अध्ययन अनुभव देण्याच्या पद्धतीचे राष्ट्रीय परिषदेमधे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, प्रभावी संवाद कौशल्य, आत्मविश्वास, सहयोग, स्वयं दिशा, स्वयंशिस्त, देश अभिमान जागृती या भावनांची जाणीव होण्यासाठी Arts integration, sports integration and Toy based Pedagogy या मुद्यांच्या आधारे अनुभवात्मक अध्ययन अनुभव घेण्याची उत्कृष्ट संधी शाळा टेमगिरवाडी शाळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. टेमगिरवाडी ने जानेवारी २०२६ व फेब्रुवारी २०२६ मध्ये राज्य स्तरावर पाच स्पर्धेत अव्वलस्थानी येऊन उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे. त्यामध्ये शाळेला – १. राज्य शालेय गुणवत्ता मानंकनात अ + श्रेणी २. अनुभवात्मक अध्यापन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक ३. राज्यस्तरीय शिक्षक – अधिकारी डॉक्युमेंट्री स्पर्धेत राज्यात पाचवा क्रमांक ४. हरित शाळा पुरस्कार – चार लाख रुपयांचे जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ५. पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा अध्यक्ष चषक पुरस्कार.
हरित शाळा अवॉर्ड टाटा मोटर्स व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे आयोजित टाटा मोटर्स बिकन हरित शाळा अवॉर्ड कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा २७ मार्च २०२६ रोजी टाटा मोटर्स पिंपरी चिंचवड येथे पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगिरवाडी काळुस, तालुका खेड या शाळेस ग्रामीण शासकीय शाळा विभागातील द्वितीय क्रमांकाचे चार लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर विद्यार्थी व शिक्षकांसाठी टाटा मोटर्स कंपनीच्या सफारी आणि हॅरिअर या दोन कारचे उत्पादन होत असलेल्या ठिकाणी कारखाना सहल आयोजित करण्यात आली होती. रस्त्यावर धावणाऱ्या मोटारी प्रत्यक्षात कशा तयार होतात हे पाहण्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. विशेष म्हणजे हा संपूर्ण कारखाना महिला इंजिनियर्स व कामगार चालवतात हे पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले व प्रेरणाही मिळाली.

कधी कधी आपल्याला आश्चर्याचे धक्के बसत असतात. योगायोगाने एकाच दिवसात अनेक चांगल्या गोष्टी घडुन येतात. जाणार होतो एका कार्यक्रमाला पण अचानक या आदर्श शाळेला भेट देता येऊन आगळ्या वेगळ्या शाळेच्या शैक्षणिक पद्धतीची माहिती मिळाली. पुणे नाशिक रस्त्यावर मोशी ते चाकण या दरम्यान महामार्गावर वाहतुकीची कोंडी फार असते. त्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी पुण्यावरून पहाटे साडेपाचलाच निघालो. महाराजांना भेटण्याच्या वेळेआधीच चाकण मध्ये पोचल्यामुळे आमचे वर्गमित्र श्री. तुकाराम कांडगे यांचीही भेट झाली व नेहमीप्रमाणे त्यांच्या मोनिका हॉटेलवर त्यांनी आमचा पाहुणचार करताना केलेल्या खमंग नाश्त्याचाही आस्वाद घेता आला.
माझ्या या भेटीच्या एक आठवड्यानंतर टेमगिरवाडी शाळेत सुमारे ४0 शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी आणि केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरामध्ये मला निमंत्रित वक्ता म्हणून बोलावून त्यात प्रेरणादायी भाषण करण्याची व त्या सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली.

सध्या महाराष्ट्रात अनेक मराठी शाळा एकामागे एक बंद होत आहेत.मराठी भाषेचे बुरुज ढासळत आहेत. पण हे शिबिर व टेमगिरवाडी शाळा पाहिल्यानंतर या शाळा आणि आदर्श शिक्षक श्री रामकृष्ण वाटेकर व श्री दीपक रेटवडे, केंद्रप्रमुख सौ. जयश्री गोरे व माननीय गटशिक्षणाधिकारी श्री अमोल जंगले सारखे प्रशासक मराठी भाषेचे ढासळणाऱ्या बुरुजांची डागडुजी करून निदान ग्रामीण भागात तरी मराठी शाळा निश्चितच तग धरून राहतील आणि मराठी भाषेचे संवर्धन होत राहण्यासाठी खारीचा का होईना वाटा उचलून योगदान देत राहतील यात काहीच शंका नाही.
टेमगिरवाडी शाळा म्हणजे पर्यावरणातून शिक्षण देणारे बाल उद्यान विद्यामंदिर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधे शैक्षणिक गुणवत्ता विकासामधे पर्यावरणातून शिक्षण व पालक सहभागाला महत्वपूर्ण स्थान देण्यात आले. मुलांचा शैक्षणिक पाया अधिकाधिक भक्कम करण्यासाठी या आराखड्याने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या मदतीने बाल्यवस्थेत ‘काळजी व शिक्षण’ या घटकावर भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२२ मध्ये समावेश करण्यात आलेल्या घटकांपैकी ‘पालकांचा पाल्याच्या अध्ययनातील पर्यावरणात्मक कृतियुक्त सहभाग‘ बाबींस महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. तीन ते दहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना निसर्ग, परिसर, समाज व कुटुंब यातून शिक्षणाचे खूप उत्तम अध्ययन अनुभव पालकांच्या मदतीने उपलब्ध होऊ शकत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला उत्तम गती मिळू शकते.

पालक व शिक्षक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे ‘शिकणं आणि जगणं’ (learning and living) हे उत्तम प्रकारे टेमगिरवाडी शाळेत घडत आहे. शाळा, पालक व समाज या उपक्रमामुळे एकत्रित येताना दिसले. त्यामुळे चांगले शैक्षणिक वातावरण तयार होण्यास मदत झाल्याचे दिसून आले. शाळेतील उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहचते. पालकांच्या सूचनांचा स्वीकार करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया व शाळेतील भौतिक सुविधा अधिक समृद्ध केलेल्या जाणवल्या. अध्ययनातील रूची वाढल्यामुळे विद्यार्थ्यांचे मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. “पालकांचा पर्यावरणात्मक कृतीयुक्त अध्ययन सहभाग” हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगिरवाडीमध्ये प्राथमिक स्तरावर उत्कृष्ट प्रकारे राबवला जात आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून येण्यासाठी व त्यांची संपादणूक वाढविण्यासाठी सदर पर्यावरणात्मक उपक्रम उपयुक्त ठरत आहेत. उपलब्ध शैक्षणिक साहित्य, घर – परिसरातील अध्ययन अनुभवामुळे मुलांच्या अध्ययनातील सातत्य वाढत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी शाळेत येऊन मुलांना कला – क्रीडा भाषा, गणित विषयांचा अध्यापन, क्षेत्रभेटी व सहलीमध्ये सहभाग यामुळे शाळेतील शिक्षकांच्या अध्यापनाबाबतचा ताण कमी होण्यास मदत होत आहे.
‘अन्नपूर्णा’ उपक्रमात माता पालकांचा सहभाग वाढल्यामुळे उत्कृष्ट प्रकारचं शालेय पोषण आहार तयार होऊ लागला आहे. त्याचबरोबर प्रत्येक माता पालकाला आपल्या पाल्याच्या अध्ययनातील सद्यस्थिती वर्गशिक्षकांकडून समजू लागली. ‘ग्रंथ आपल्या दारी ‘ या उपक्रमामुळे पालकांबरोबर विद्यार्थ्यांना ही वाचन प्रक्रियेत आवड निर्माण झालेली दिसून आली. विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढले. पालकांचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील सहभाग वाढल्यामुळे पाल्यांची अध्ययन प्रक्रिया भीती विरहित, तणाव मुक्त व आनंददायी होऊ लागले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये स्वतः पालकांनी विविध शैक्षणिक साधने, पर्यावरणात्मक अध्ययन अनुभव यांचा वापर करून पाल्यांच्या अध्ययनात सुलभकांची भूमिका घेतल्यामुळे शाळा व घर यामध्ये अंतर न राहता ‘मुलांचे घर हे विद्या मंदिर बनले, तर शाळा हे भवन निर्माण झाल्या सारखे वाटले. शाळा टेमगिरवाडीच्या या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी मधे सहभागी असलेले सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघ, शिक्षक व प्रशासन अधिकारी वर्ग यांचे मनपूर्वक अभिनंदन !

— लेखन : माधव ना. गोगावले. शिकागो, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 98694 84800
