“तुमच्याकडे सिद्धी असेल तर प्रसिद्धी तुम्हाला शोधत येते”. लिहित रहा लोकांकडून पुरस्कारांची, प्रतिसादाची अपेक्षा करू नका. तंत्र आलं म्हणजे गझल लिहिली असं नाही, तर गझलेत तंत्र शुद्धता असेल, तंत्रावर प्रभुत्व असेल तरच गझल सरस ठरते असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष गझलकार डॉ अविनाश सांगोलेकर यांनी केले. ते नवी मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पारिजात साहित्य परिवाराच्या दुसर्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणुन बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. संचालिका शबाना मुल्ला यांनी अर्चना देवधर लिखित सुमधुर गीत गाऊन सर्वांचे स्वागत केले. शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आयोजकांनी मान्यवरांचे स्वागत केले.
उपस्थित मान्यवरांनी मनोगतामध्ये कविता, गझल विषयी अतिशय सुरेख मार्गदर्शन केले व पारिजात समूहाच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी मुल्ला दाम्पत्याचे कौतुक केले.
राजश्री भावार्थी यांनी साहित्य लेखन विषयी सुंदर विचार मांडले. सोशल मीडियावर साहित्य टाकण्याची असलेली घाई आणि तिथे मिळत असलेल्या लाईक्स यामुळे अनेकजण साहित्यिक झाल्याचे समजतात. परंतु साहित्यिक म्हणजे काय ? याचं त्यांनी सविस्तर विवेचन केले.
संमेलनाचे प्रमुख अतिथी गझलकार ए के शेख यांनी शबाना मुल्ला यांचे कौतुक करून दोन गझल सादर केल्या. यामध्ये सर्वांच्या आग्रहाखातर गरिबाच्या लग्नात नवरी गोरी काय काळी काय ही गाजलेली गझल ऐकवली.
या संमेलनाचे खास वैशिष्ट्य ठरला तो पुस्तक प्रकाशन सोहळा. यावेळी शबाना मुल्ला यांचा वृत्तबद्ध काव्यसंग्रह ए के शेख सरांच्या हस्ते, उर्मिला बांदिवडेकर यांचे ११ गझलसंग्रह आणि १ दीवानचे प्रकाशन गझलनंदा सुनंदामाई पाटील यांच्या शुभहस्ते तर डॉ. शरयू शहा यांचे ५ गझलसंग्रह १ दीवानचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्याहस्ते झाले. ही सर्व पुस्तके प्रकाशित करणार्या बाजीगर प्रकाशनचे प्रकाशक गझलकार सिराज शिकलगार यांनी “इतरांचे पुस्तक प्रकाशन करताना आपल्यालाही नवीन काही शिकता येतं” असे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते समूहाच्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या साहित्यिकांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
निमंत्रितांचे काव्यसंमेलन एक पर्वणीच
सकाळच्या पहिल्या सत्रात निमंत्रितांचे गझल संमेलन पार पडले. यात अनंत जोशी, सय्यद चांद तरोडकर, डॉ इक्बाल मिन्ने, डॉ.सुभाष कटकदौंड, आप्पा ठाकूर, नंदिनी काळे, राजश्री भावार्थी, मनिषा पाटील रायजादे, शबाना मुल्ला, सिराज शिकलगार यांनी भाग घेतला.
आप्पा ठाकूर यांची “आईचा सातबारा” ही मनाचा ठाव घेणारी गझल सादर केली.
मेल्यावर माझ्या दारी मरणाचा उत्सव व्हावा
हा देह गरजवन्तांना वा किडमुंग्यांना द्यावा…
सारस्वतांच्या मागणीनुसार आप्पा ठाकूर यांनी विठ्ठलाला सूचना करणारी त्यांची प्रसिद्ध गझल सादर केली.
संमेलनाच्या प्रथम सत्राचे सूत्रसंचालन नंदिनी काळे आणि मनीषा पाटील रायजादे यांनी यांनी तर सूत्रसंचालन केले.
“चुकांमधून शिकून काहीतरी चांगले करा” – डॉ.इक्बाल मिन्ने
चुकांमधून शिका आणि त्यातून चांगले काहीतरी करा. दुध खराब झाले तर त्याचे दही बनवता येते, दही खराब झाले तर चिझ बनवता येते. चिझ खराब झाले तर त्यापासून वाईन बनवता येते आणि दुधापेक्षा दही, दह्यापेक्षा चिझ आणि चिझ पेक्षा वाईन महाग असते. चुकांमधून सुद्धा जी नवी निर्मिती होते ती मौल्यवान असली पाहिजे. एकमेकाला वाचायला शिका, दुसऱ्यांचे साहित्य वाचलात तर त्यातून अधिक चांगले काहीतरी गवसते. पुस्तके विकत घेऊन वाचा तरच त्यांचं मोल कळतं. माणसाला स्वतःसाठीच नव्हे तर दुसऱ्यासाठी सुद्धा जगायला शिकले पाहिजे असे मौलिक विचार उद्घाटक गझलकार डॉ.इक्बाल मिन्ने यांनी मांडले. यावेळी त्यांनी गझलेचे काही शेर सादर केले.
वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते
पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते
आई असते म्हणुनी सारे सोसत जाते
रातरातभर जागत जाणे सोपे नसते
दुसऱ्या सत्राची सुरुवात ज्येष्ठ गझलकारा प्रा.सुनंदा पाटील यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. यावेळी मुलाखतकार नंदिनी काळे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी शाळेत असताना लिहिलेला निबंध वाचून ही मुलगी पुढे लेखिका होणार असे मुख्याध्यापकांनी सांगितले होते इथंपासून गझलकारा म्हणून नावलौकिक मिळविण्यापर्यंतच्या संपूर्ण साहित्यिक प्रवासाचा लेखाजोखा मांडून गझल सम्राट सुरेश भट यांनी त्यांना बहाल केलेल्या गझलनंदा या बिरुदामागील कहाणीही सांगितली.
अखेरच्या सत्रात तब्बल ३५ कवी, कवयित्रीनी कविता, गझलांचे प्रभावी सादरीकरण करून कार्यक्रमाचा उत्तरार्ध गोड केला. संमेलनाचे अध्यक्ष गझलकार सिराज शिकलगार यांनी गझल तर संयुक्त अध्यक्ष अनंत जोशी यांनी स्वर्गातील सुरेख रचना सादर करून हास्य खुलवले. सर्व सहभागीना त्यांचे त्यांचे सादरीकरण झाल्यावर सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत होते.

“कवी मनाचा कानोसा” या कवी संमेलनात कवीजनांनी आपल्या वेगवेगळ्या विषयावरच्या कवितांचे सादरीकरण करून संमेलनात रंग भरले. संमेलनाचे सूत्रसंचालन ज्योती देशपांडे आणि पल्लवी भागवत यांनी केले. तर सविता कांबळे आणि पूर्वा चौधरी, आसावरी मदतनीस दिवसभर कार्यरत होत्या.

यावेळी ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ आणि निर्मात्या सौ अलका भुजबळ यांचा शबाना मुल्ला यांनी यथोचित सन्मान केला.

संमेलनाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक एस यु मुल्ला यांनी केले.
या संमेलनासाठी चांदा ते बांदा पर्यंतचे साहित्यिक सारस्वत सहभागी झाले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
