Sunday, June 29, 2025
Homeसाहित्य'अभिमानाची लेणी'

‘अभिमानाची लेणी’

पाच वर्षांपूर्वी कोरोना च्या भयंकर काळात सर्व प्रकारचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. २४/२४ तास घरातच बसून रहावे लागत होते. आपला “वेळ वाया घालवणे, हा सामाजिक गुन्हा आहे”, असे मानणाऱ्या माझ्यासाठी तर त्यामुळे घरी रिकामे बसणे म्हणजे दुहेरी शिक्षा वाटत होती. त्यातूनच ऑनलाईन पद्धतीने माझा परिचय “ई साहित्य” प्रतिष्ठानचे प्रमुख श्री सुनील सामंत यांच्याशी झाला आणि त्यांच्या प्रेरणेने, सहकार्याने माझे “अभिमानाची लेणी” हे “ई पुस्तक” प्रकाशित झाले.

आज फेसबुक बाबाने ही आठवण करून दिली. म्हणून त्यावेळी प्रसिद्ध केलेला वृत्तांत पुढे देत आहे. या वृत्तांतात पुस्तकाची लिंक सुद्धा दिली आहे. आपण पुस्तक वाचून आपला अभिप्राय कळविल्यास आनंद होईल.

पुन्हा एकदा श्री सुनील सामंत यांचे आणि पुस्तकाला छान प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल जेष्ठ लेखक श्री नागेश शेवाळकर यांचे मनःपूर्वक आभार. गंमत म्हणजे आजपर्यंत आम्हा तिघांचीही समक्ष भेट झालेली नाही. पण ती व्हावी, अशी इच्छा मात्र जरूर आहे.!

ठाणे (बातमीदार) :- देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले, सुनील सामंत यांच्या ई साहित्य प्रतिष्ठान यांनी प्रकाशित केलेले “अभिमानाची लेणी” या चरित्र ग्रंथाचे लोकार्पण आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. या ग्रंथाचे मुद्रितशोधन उमा नाबर यांनी केले असून साहित्यिक नागेश सू. शेवाळकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

अत्यंत मनमोहक मुखपृष्ठ लाभलेल्या “अभिमानची लेणी” या पुस्तकात महात्मा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, रवींद्रनाथ टागोर, गौतम बुद्ध, बाळशास्त्री जांभेकर, अण्णाभाऊ साठे, सानेगुरुजी, छत्रपती शाहू महाराज, उत्तम बंडू तुपे, विनोबा भावे, वि. स. पागे, रामभाऊ मंडलीक यांच्या सोबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (तीन लेख), स्वातंत्र्यवीर सावरकर (दोन लेख) या महनीय व्यक्तिंच्या जीवन कार्याची अभ्यासपूर्ण अशी माहिती वाचकांसाठी देण्यात आली आहे.

शासनाच्या माहिती संचालक या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या देवेंद्र भुजबळ यांची यापूर्वी “भावलेली व्यक्तिमत्व”, “करिअरच्या नव्या दिशा”, “गगनभरारी”, “प्रेरणेचे प्रवासी” आणि “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” ही पुस्तके प्रकाशित झाली असून ती वाचकप्रिय ठरली आहेत.

देवेंद्र भुजबळ लेखक म्हणून जेवढे लोकप्रिय आहेत तितकेच ते व्यासंगी व्याख्याते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे चौथे विश्व साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात भुजबळ यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ या विषयावर अत्यंत विद्वत्तापूर्ण असे व्याख्यान झाले. श्रोत्यांनी त्यांच्या व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद दिला. पुढे चालून हेच शीर्षक घेऊन प्रकाशित झालेले भुजबळांचे पुस्तकही खूप गाजले. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी असे द्विभाषिक आहे. सावरकरांविषयीचा लेख या संग्रहात वाचायला मिळेल.

“अभिमानाची लेणी” या पुस्तकात समाविष्ट असलेला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता’ हा लेख मराठी भाषेसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, आणि ऊर्दू भाषांमध्ये प्रकाशित झाला आहे. यावरून लेखक भुजबळ यांच्या चतुरस्र लेखनीची कल्पना येऊ शकते.

वास्तविक पाहता चरित्र लेखन हा विषय जितका अवघड तितकाच तो नाजूक असतो. कारण चरित्र नायक ही समाजप्रिय अशी व्यक्ती असते. समाजाच्या भावना त्या चरित्र नायकाशी जोडलेल्या असतात. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक चरित्रलेखन करावे लागते. लेखक भुजबळ यांनी ही कामगिरी लीलया पेलली आहे. अत्यंत बारकाईने, सखोल अभ्यास करून, साध्या, सरळ, रसाळ, ओघवत्या भाषांमध्ये त्यांनी प्रत्येक महापुरुषाची कामगिरी गुंफली आहे.

लेखक भुजबळ ह्यांनी साने गुरुजींनी शिकविलेल्या अमळनेर येथील शाळेत जाऊन तिथल्या कार्याची माहिती घेतली. तसेच गौतम बुद्ध यांनी सांगितलेली विपश्यना ही उपासना लेखक स्वतः अनुभवतात हे वाचताना भुजबळ यांच्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावतो.

शाहू महाराजांचे कार्य असो, तुकडोजी महाराज यांची कामगिरी असो, जांभेकरांची पत्रकारिता असो, रवींद्रनाथांची साहित्याची भरारी असो, महात्मा फुले यांची जनसेवा असो, विनोबा भावे यांची लोकोपयोगी कामे असो, अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार असो, उत्तम तुपे असो, वि. स. पागे यांचे काम असो, प्रत्येकाच्या कार्याची देवेंद्र भुजबळ यांनी उत्तम मांडणी केली आहे. ही सर्व मंडळी आम्हा भारतीयांसाठी गौरवाची, सन्मानाची आणि अभिमानाची आहे म्हणून या चरित्र ग्रंथाला दिलेले “अभिमानाची लेणी” हे नाव जवळचे वाटते, ह्रदयाला भिडणारे वाटते.

सुनील सामंत यांच्या ई साहित्य प्रतिष्ठान यांनी अत्यंत सुबक आणि आकर्षक अशी मांडणी करून लेखक देवेंद्र भुजबळ यांच्या परिश्रमाला न्याय दिला आहे. वाचकांसाठी हे ई पुस्तक
http://www.esahity.com/ uploads/5/0/1/2/501218/abhimanachi_leni_devendra_bhujbal.pdf
या लिंकवर विनामूल्य उपलब्ध आहे. वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन लेखक आणि प्रकाशकांनी केले आहे.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील
अविनाश ब.हळबे. on अष्टपैलू सुचिता पाटील