आपल्याला काही व्यक्ती समक्ष भेटलेल्या जरी नसल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्यावर चांगलाच प्रभाव पडतो. असंच मला प्रभावित करून गेलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ गौरी जोशी-कंसारा या होत. ऋजुता, इतरां विषयी आदर, आपल्या विषयाच सखोल ज्ञान आणि वक्तशीरपणा, विविध गोष्टींची आवड हे त्यांच्यातील गुण वाखाणण्या जोगे आहेत.
मुळ नाशिकच्या आणि गेली १५ वर्षें अमेरिकेत न्यू जर्सी येथे राहणाऱ्या डॉ गौरी यांचा आणि माझा दूरस्थ परिचय झाला तो, त्या एक कवयित्री आहेत म्हणून. पुढे चर्चेतून त्यांनी आपल्या न्युजस्टोरीटुडे या वेब पोर्टलसाठी आठवड्यातून एकदा “मनातील कविता” हे गाजलेले मराठी कवी, त्यांच्या कवितेचं रसग्रहण आणि त्या कवींना अर्पण म्हणून स्वतः लिहिलेली कविता असं या सदराचं स्वरूप ठरलं.
अतिशय तन्मयतेने लिहिल्या जात असलेलं “मनातील कविता” हे सदर एकदोन भागातच लोकप्रिय झालं. डॉ गौरी यांचा कवी, त्यांचं साहित्य, एकंदरीतच रसग्रहण, अभ्यास, लेखन पाहून, वाचून खूप जणांना, त्या डॉक्टर म्हणजे एमए पीएचडी झालेल्या अशा साहित्यातील डॉक्टर वाटतात. पण त्या डॉक्टर म्हणजे वैद्यकीय डॉक्टर आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून त्यांनी बीएएमएस ही पदवी प्राप्त केली आहे.
अमेरिकेत आल्यावर डॉ गौरी यांना सुरुवातीला जरा अवघड गेलं. म्हणजे बाकी गोष्टींपेक्षा एकटेपणा, किंवा आपल्या सांस्कृतिक वातावरणापासून दूर आहोत ह्या विचाराचा त्यांना त्रास व्हायचा. नंतर मात्र ओळखी वाढत गेल्या आणि जग किती जवळ आले आहे ह्याची जाणीव झाली. तिथेही अनेक ठिकाणी आपले सणवार साजरे होतात. गणपती उत्सव, दिवाळी, नवरात्र साजरे होतात, हे कळाले आणि त्या रुळत गेल्या.
अमेरिकेत डॉ गौरी अनेक संस्थांमार्फत आयुर्वेद व्याख्याने आणि योगा वर्ग आयोजित करीत असतात. त्यांचे स्वतःचे योगा वर्ग आहेत. आयुर्वेदिक जीवन पद्धतीबद्दल त्या सल्ला देतात आणि मार्गदर्शनही करतात.
डॉ गौरी या आयुर्वेद आणि योगाबरोबरच
न्यू जर्सी येथील प्रथितयश नृत्य विद्यालयात कथक नृत्य शिक्षिका आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये कथक नृत्य सादरीकरण केले आहे. तर अनेक कार्यक्रमात सूत्र संचलनही केले आहे.
त्यांना अभिनयाची आवड असून त्यांनी अभिनयाचे रितसर प्रशिक्षण घेतले आहे. त्या संस्कृत आणि हिंदी भाषाही शिकवत असतात. त्यांनी हिंदी नाटकाचे अभिवाचन केले आहे. लवकरच त्यांची एक इंग्लिश आणि दोन हिंदी नाटके रंगमंचावर सादर होत आहेत.
त्यांनी सौंदर्य स्पर्धांचे परीक्षण केले आहे. एक सक्षम गृहिणी, पत्नी, माता असलेल्या डॉ गौरी यांना पाककलेतही भरपूर रस आहे.
आपल्या कवी आणि कवितांच्या आवडीविषयी डॉ गौरी म्हणतात, “माझ्या आणि ज्येष्ठ कवी-कवयित्री यांच्या ‘भेटी‘ ह्या मुख्यत्वे शालेय जीवनात प्रथम झाल्या. इथे ‘भेटी’ म्हणजे, मी त्यांना भेटले आहे, पाहिले आहे किंवा त्यांचा चरणस्पर्श केला आहे असं मला म्हणायचं नाही. ‘खऱ्या भेटी ‘ कवितांद्वारे होतात असं माझं नक्की मत आहे.
आपण रूढार्थाने ज्याला भेट म्हणतो, ती दोन बाह्यरूपांची भौतिक जगाच्या पातळीवर होणारी असते. त्यात शंभर शिष्टाचार आणि सोपस्कार असतात, परंतु कवितेद्वारे होणारी भेट ही ह्या साऱ्याच्या पलीकडे असते… आरपार… थेट मनच स्वच्छ दिसू शकेल; निदान त्या-त्यावेळी उमटलेले तरंग तरी दिसू शकतील इतकी जवळून होणारी. म्हणजे कवीने त्याचा जीव, त्याचे आवेग ज्या शब्दांत रिते केलेले असतात, रसिक वाचक ते समजून घेण्यासाठी त्यात आपला जीव ओततात. ही अशी जीवांची होणारी भेट विलक्षण सुंदर असते.
बाकी इतर लेखन म्हणजे कथा, कादंबऱ्या, लेख, माहितीपत्र, किंबहुना अगदी गीते देखील, हे लिखाण अतिशय अप्रतिम, दर्जेदार, मान्यताप्राप्त आणि अनन्यसाधारण महत्त्वाचं आहेच परंतु त्यात अशा जीवांच्या भेटी घडत नाहीत. हा मान केवळ कवितेचा! माझ्या आणि प्रतिभावान कवी कवयित्रींच्या अश्या ‘भेटी’ ह्या अगदी थेट होत्या. म्हणजे एखादी कविता वाचनात यायची, ती इतकी मग्न करायची की त्या कवीच्या साऱ्या कविता वाचाव्यात असं वाटू लागायचं. म्हणजे एका कवितेच्या मुहूर्ताने सुरु होणारे हे सगळे सोहोळे असायचे !”
पहा, किती मनोज्ञपणे, समर्पकपणे डॉ गौरी त्यांचं, कवीचं आणि कवितेशी असलेलं नातं उलगडतात. त्यांच्या रस ग्रहणाचा एक नमुना पहा…
कवी बा भ बोरकर यांची ‘लावण्य रेखा’ ही कविता कर्मयोगाचे श्रीकृष्णाने सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय सौंदर्यपूर्ण शब्दात समजावणारी अशी वाटते मला. ‘अनंता तुला कोण पाहू शके’ ही अशीच आणखी एक आध्यात्मिक बैठक लाभलेली कविता.
‘जे न देखे रवि ते देखे कवि’ ही उक्ती मुळातच बा. भ. बोरकर यांना भेटल्यानंतर बनवली असणार. कल्पनाशक्तीच्या ठाई ठाई फुललेल्या लाख कळ्या कवितेबरोबर हळूहळू उमलत जातात आणि त्याचा गंध आपल्याही नकळत आपल्या आसपासच्या वातावरणात दरवळू लागतो.. …
अशा या अष्टपैलू डॉ गौरी यांचे पती श्री आशिष कंसारा हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांनाही कारओकेवर गाण्याची आवड आहे. तर अकरावीत असलेला मुलगा आर्य हा तबला छान वाजवतो.

असं हे काव्यात रंगलेलं कुटुंब आहे. आणि हो, डॉ गौरी यांचा आज वाढदिवस आहे ! आपल्या सर्वातर्फे त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
– देवेंद्र भुजबळ, +91 9869484800
श्री.राजेंद्र अचलारे पुणे तसेच श्री.डाॅ.संतोष मोहिरे कराड यांच्या विषयी ची माहिती वाचून खूपच छान वाटले, आनंद ही झाला.समाजातील तरुण पिढीने आर्दश घ्यायला हवा.पुढील वाटचालीस शुभेच्छा.श्री.देवेंद्र जी भुजबळ व रश्मीताई हेडे यांचे ही मनापासून आभार त्यांनी खूप चांगली माहिती दिली.
श्री देवेंद्र भुजबळ सर आपले खूप धंन्यवाद, तुमच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तीमत्वांची ओळख करून देतात….डॉ गोरी जोशी यांना वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा💐💐आपण एक उत्तम कवियत्री आहात.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
डॉ. गौरी जोशी यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
आज खरोखर या लेखातून एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख झाली आणि एका व्यक्ती मध्ये किती अमर्याद शक्ती आणि ऊर्जा असते याचे उदाहरण त्यांनी दाखवून दिले.
त्यांच्या या प्रतिभावान कामगिरीला सलाम आणि खूप शुभेच्छा…
प्रकाश फासाटे.
मोरोक्को.
नॉर्थ आफ्रिका.
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
आपणा सर्व रसिक वाचकांना स्नेह असाच राहो आणि दिवसेंदिवस वृद्धींगत होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
श्री. देवेंद्र जी, आपले मनःपूर्वक आभार.
आपण माझे इतके कौतुक केले आहे, मला खरंच भरून आले आहे. मी काही कुणी थोर व्यक्ती नाही, तरीही आपल्यावर माया करणारे, आपल्याला शुभेच्छा देणारे लोक केवळ आपल्या घरात नसून जगाच्या पाठीवर सर्वत्र आहेत ह्या विचारानेच भरून आले आहे. मला आपल्या सारख्या गुणीजनांकडून अजून बरेच शिकायचे आहे. आपण माझ्याबद्दल हे लेखन केले आणि रसिक वाचकांनी ते वाचले ह्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार !
मी खरोखर भाग्यवान आहे की मला इतके मोठे कुटुंब लाभले आहे🙏🏻
मी डाॅ. गौरींचे सदर नेहमी वाचते व मला ते फार आवडतेहि. त्यांची भाषाशैली सुरेख व स्वत: उत्तम कवियत्री आहेत हे प्रत्येक वेळी जाणवले. खुप सुंदर शब्दांत लिहिलेले त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज कळले. धन्यवाद माननीय देवेंद्रसर.
वाढदिवसानिमित्त डाॅ.गौरींना माझ्या मन:पूर्वक शुभकामना. त्यांचे यश व किर्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो.
खूप खूप आभार 🙏🏻
डॉ. गौरी जोशी कंसारा यांची कथा वाचून आनंद झाला आहे. खरोखरीच त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलूच घडलेले आहे.. डॉक्टर गौरी यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त सरोदे परिवारा मार्फत मनःपूर्वक शुभेच्छा…
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻