आयुष्याच्या वाटेवर एक वेळ अशी येते की, जेव्हा जबाबदारी थोडी कमी होते. मुलं शिक्षण अथवा नोकरी निमित्ताने बाहेर पडलेली असतात. आता डबा, सकाळचे वेळापत्रक बदलले असते. घड्याळाच्या काट्यावर चालायला ब्रेक मिळतो. जणू एका नव्या आयुष्याला सुरवात होते. कधी एकटेपणा जाणवतो तर कधी मोकळेपणा वाटतो. आता तरी स्वतःसाठी जगावे असे वाटते.
वेळेचे बंधन थोडे कमी झाल्याने छान गप्पा गोष्टी रंगतात. भावनांना मोकळी वाट मिळते. त्या मोबाईलच्या आभासी दुनियेपेक्षा प्रत्येक्ष भेटी गाठीतून शब्दांचा ओलावा मिळतो एक आधार मिळतो. आयुष्यातील हा एक सुखद टर्निंग पॉईंट आनंद देणारा, समाधान देणारा वाटतो. रोजच्या त्याच त्याच रुटीनचा कंटाळा येतो. मग हवा असतो तो बदल, एक ब्रेक अशी एखादी सहल मग ती एक दिवसाची का असेना….
आमच्या योगसनाचे प्रशिक्षक प्रकाश सर यांनी अशी एक सहल आयोजित करण्याची कल्पना मांडली आणि आम्हालाही ती तात्काळ आवडली. आमच्या सातारा पासून जवळच असलेल्या कास पठार, कास तलाव, ऐकीव धबधबा, ठुशी डँम तसेच दूध सागर धबधबा येथे जाण्याचे ठरले. घरून डब्बे घेऊन सकाळी नऊ वाजता निघालो. आम्ही एकूण ३५ जण होतो. त्यामुळे दंगा, मस्ती, नाच, गाणी हे तर ठरलेलेच.
सकाळी मस्त पोहे, जोडीला फक्कड चहा ते ही मोकळ्या वातावरणात. गाडीत गाण्याच्या भेंड्या ही रंगल्या होत्या. आधी गणेश वंदना, मग भजन देखील झाले. पुढे हिंदी गाण्याने बहर आली. आता आम्ही पोहचलो ते ऐकीव धबधब्यापाशी. खाली गावात नाचणीची भाकरी व रान भाजी देखील काही मैत्रिणींनी घेतली. त्याची गोडी वेगळीच अतिशय पौष्टिक.

ऐकीव धबधबा हा थोड्या उंचीवर होता. मग वाट काढत एकमेकांना हात देत सर्वांच्या सोबत्तीने वर पोहचलो. मन प्रसन्न झाले. जणू या वाहत्या पाण्याबरोबर सर्व ताण तणाव वाहून गेला. पावसाने थोडी मेहरबानी केली. त्यामुळे वाट फारशी निसरडी नव्हती ते बरे झाले त्यामुळे सर्वांना जवळून धबधबा पाहता आला.

आमच्या योगा वर्गात लहान मुलींपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्व वयोगटातील योग साधक अगदी खेळीमेळीचे राहतात. त्यामुळे सर्वांना सांभाळत काळजी घेत पुढील प्रवास करत होतो.
ड्राइव्हरची वाट चुकली आणि गाडी वळण्याची वेळ आली. मात्र आमच्या वजनाने गाडी काही हलेना. मग ठराविक लोक गाडीत बसून आम्ही सर्व खाली उतरलो आणि गाडी ढकलण्याचा छान अनुभवही घेतला. त्याची देखील एक वेगळीच गंम्मत वाटली.

थोड्याच अंतरावर असलेला दूध सागर धबधबा विलोभनीय होता. दोन्ही हात वर करून जेव्हा ते पांढरे शुभ्र पाण्याचे तुषार, तो गारवा जाणवला, तो क्षण जगला तेव्हा आवर्जून वाटले की, अरे चा, खरा आनंद तर लहान लहान गोष्टीत लपलेला आहे.!या सुंदर निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. आयुष्यात अजून काय हवे…?
पुढे जेवणाचा आस्वाद घेतला. अनेकींनी घरी केलेले ते पदार्थ…पोळी, भाजी, भाकरी, ठेपले, ठेसा, अळू वडी, गोड भात…. अशी अंगत पंगत करता करता, सर्वांची ताटे भरून गेली. ती आपुलकी, तो स्नेह, आग्रह पाहूनच मन तृप्त झाले.

पुढे आमची फौज पोहचली ती ठुशी धबधबा येथे. आता पाण्यात जाण्याचा मोह आवरता आला नाही. तेथे पायऱ्यांवर बसून एकमेकींना सावरून हातात हात धरून मनसोक्त भिजलो, नाचलो शिट्ट्या मारल्या. खूप खूप दंगा केला. कोण काय म्हणेल… याची चिंता जरा देखील नव्हती कारण सोबतीला मनमोकळे जगण्याचा आनंद घेत असलेल्या मैत्रिणी होत्या !

पुढे ओल्या कपड्याने चहाचा आस्वाद घेतला. एका शेकोटीवर शेकण्याची संधी ही मिळाली. त्यामुळे थंडी पळून गेली.
नंतर कास तलावाला आलेले ते अथांग पाणी पाहताना वाटले जणू येथेच शांत बसावे. थोडे त्यालाच आपले हितगुज सांगावे.
तेथून पुढे आमची गाडी वळली ती कास पठार येथे. हिरव्या निसर्गात वसलेले कास पठार धुक्याच्या चादरीत लपले होते. ते मनमोहक दृश्य पाहताना असे वाटले की वेळेचे हे चक्र येथेच थांबावे.
खरेच परमेश्वराने निर्माण केलेला हा अद्भुत निसर्गाचा खजिना लाख मोलाचा आहे.

अवघ्या चारच महिन्यांपूर्वी लावलेला हा योग वर्ग. मात्र ! मला जरा देखील नवेपणा जाणवला नाही जणू अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहे असे वाटले.

निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा दिवस अनेक आठवणी देऊन गेला. एक आपलेपणा जाणवला दिवस वाऱ्यासारखा उडून गेले ही जादू होती मायेची, सोबतीची.
अनेक फोटो मध्ये हे जगलेले क्षण कैद केले. आज वय विसरून स्वतःसाठी जगलो. या छोट्याशा ब्रेक मुळे पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली.

— लेखन : सौ रश्मी हेडे. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800