मुंबई मराठी साहित्य संघ आणि देवनार येथील कुमुद विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. एकाहून एक सरस कार्यक्रमांमुळे हे संमेलन चांगलेच फुलत गेले.
‘आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तरी माणूस माणसापासून दूर चाललाय. नाती महाग होऊ लागली आहेत. अशा वेळी संवेदनशीलता जागवून साने गुरुजींची “खरा तो एकची धर्म” ही शिकवण अनुसरायला हवी,’ असे प्रतिपादन सदानंद पुंडपाळ यांनी देवनार येथे आयोजित ‘बालकुमार मराठी साहित्य संमेलना’त अध्यक्षपदावरून बोलताना केले.
यावेळी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी साहित्त्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल मौलिक विचार मांडले. तसेच संघाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.

कोषाध्यक्ष आनंद बिर्जे यांनी मंगेश पाडगावकरांची “चिऊताई चिऊताई दार उघड” ही कविता सादर करून साहित्य हे मनोरंजनाबरोबरच प्रबोधन करते असे सांगितले.
साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी ‘विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागावी आणि त्याच्यातून साहित्यिक घडावेत यासाठी महाविद्यालयीन आणि बालकुमार साहित्य संमेलने आयोजित केली जातात. असे साहित्यिक घडल्याचा अनुभवही गेल्या सतरा वर्षातील महाविद्यालयीन संमेलनातून मी अनुभवलेला आहे.’ असे प्रतिपादन केले.

कुमुद मेमोरियल फंडच्या अध्यक्ष श्रीमती मीना पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, मोबाईल पासून दूर राहिलात तरच यश प्राप्त होईल. एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. दिवंगत शिक्षण तज्ञ श्री शरद पाटील व त्यांची पत्नी श्रीमती मीना पाटील यांनी आपले आयुष्य पणाला लावून ही कुमूद विद्यामंदिर मराठी शाळा गोवंडी देवनार भागात काही वर्षांपूर्वी सुरु केली. आजच्या काळात जेथे मराठी शाळांची विद्यार्थी पटसंख्या भयानकरीत्या खालावत असताना ह्या मराठी शाळेची पटसंख्या १२०० हून अधिक आहे, तर त्यांच्याच इंग्रजी शाळेची पटसंख्या १९०० आहे.
मुलामुलींनी मोबाईलच्या आहारी जास्त जाऊ नये म्हणून ह्या कुमूद विद्यामंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने तसेच विश्वस्त मंडळाने अनेक परिणामकारक उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रंथालयातील एखादे पुस्तकाचे वाचन अपरिहार्य करण्यात आले आहे. तसेच त्या पुस्तकाबद्दल स्वहस्ताक्षरात आपले रसग्रहण / विचार संक्षिप्त स्वरूपात मांडावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांत वाचनाची, पर्यायाने मोबाईलच्या अतिरिक्त वापरापासून दूर राहण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

इतर मराठी शाळांच्या व्यवस्थापनांनी कुमूद विद्यामंदिर शाळेला भेट नितांत देण्याची गरज आहे.
शाळेचा मुख्याध्यापिका रश्मी गायकवाड यांनी स्वागत करताना शाळेच्या उपक्रमशीलतेबद्दल माहिती दिली. ‘जय जिजाऊ, जय सावित्री’ अशी घोषणा करून आई वडील हेच आपले पहिले गुरू आहेत. त्यांचा आदर करा व नोकरीचा मागे न लागता सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात उतरावे’ असे संमेलनाच्या उद्घाटक अलबत्या गलबत्या फेम अभिनेत्री कु. श्रध्दा हांडे यांनी सांगितले. या सत्राचे संचालन कुमार सोहम साळेकर आणि कुमारी समीक्षा शिंदे यांनी केले.
उद्घाटनाच्या सूत्रसंचालनाची तयारी श्री.सुनील साळवे, श्री.सुधीर कराळे, श्रीमती मीना जाधव श्रीमती रितिका मटकर तसेच साहित्य संघाच्या प्रतिमा बिस्वास यांनी करून घेतली.

सकाळी नऊ वाजता श्री. पुंडपाळ, प्रा. प्रतिभा सराफ, समन्वयक, प्रा. प्रतिभा बिस्वास व एकनाथ आव्हाड यांच्याहस्ते ग्रंथपूजनाने ग्रंथदिंडीची संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी लेझिम आणि ढोल ताशाच्या गजरात ग्रंथदिडी काढण्यात आली. त्यानंतरच्या सत्रात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमापूजनाने संमेलनाची प्रत्यक्ष सुरवात झाली. ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात ‘श्यामशी आई’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात ‘श्याम’ची बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता शर्व गाडगीळ याची मुलाखत कुमार प्रणव जावळे कुमारी सीमा पांजगे या विद्यार्थ्यानी घेतली. या मुलाखतीत शर्वने त्याचा चित्रपट प्रवास सांगितला. या चित्रपटात श्यामच्या भूमिकेसाठी मी ५०० जणामधून निवडला गेलो होतो, असे सांगून मला चित्रपट सृष्टीत करिअर करायचं आहे, असे त्याने सांगितले. सध्या शर्व पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन महाविद्यालयात, मानसशास्त्र विषयाचे शिक्षण घेत आहे .
प्रतिभा बिस्वास यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भोजनानंतरचा कथाकथन सत्रात अध्यक्ष म्हणून अभिनेत्री आणि लेखिका मेघना साने उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, कथाकथन करणे हे अतिशय कठीण आहे. मोठमोठ्या कलावंतांनाही ते जड जाते कारण एकट्याने स्टेजवर उभा राहून केवळ माईकच्या सहाय्याने आपली कला पोहोचवायची असते. पण आज या बाल संमेलनातील विद्यार्थ्यांनी आपल्या कथा अतिशय सुंदर रीतीने सादर केल्या. त्यांचे पाठांतर व स्वराविलास पाहून माझी खात्री झाली की पुढील पिढीचे कथाकथनकार घडत आहेत.
यावेळी चार विद्यार्थ्यांनी अनुक्रमे सुधा मुर्ती, प्रतिभा सराफ व एकनाथ आव्हाड यांचा कथा नाट्यमय रितीने सादर केल्या. या सत्राचे मार्गदर्शन एकनाथ आव्हाड व स्मिता शिंदे व राधा वाकचौरे यांनी केले.
ज्येष्ठ कवी प्रथमेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आंतरशालेय कवीसंमेलन आयोजित केले होते. या काव्यवाचनात ११ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मार्गदर्शन प्रतिभा सराफ व वर्षांराणी गायकवाड व पोशीरकर यांनी केले. मुलांनी स्वलिखित कविता सादर केल्या . पाठक यांनी विज्ञानावरची कविता सादर केली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या दिवसभराच्या संमेलनाला मुंबई मराठी साहित्य संघातर्फे प्रा. सुहासिनी कीर्तिकर, सावित्री हेगडे, मीनाक्षी जयकर, अरुण जोशी, प्रा. रजनी कुलकर्णी, शाळेचे विश्वस्त महादेव कोळी, विलास कांबळे, पर्यवेक्षिका मनीषा मोरे इ. मान्यवरांसहित विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

— लेखन : प्रतिभा बिस्वास. मुंबई मराठी साहित्य संघ
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
